जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे. आत्मज्ञानी गुरूच हा मार्ग दाखवू शकतात. समजावून सांगू शकतात. यासाठी अशा गुरूंची सेवा कशी करायची हे समजून घ्यायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।। १६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – अर्जुना, गुरुसेवेने जे ज्ञान मिळते या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात
पूर्वीच्या काळी गुरुकुले असायची. तेथे शिक्षण दिले जात होते. उच्चशिक्षितांनाच शिक्षणाचा अधिकार होता. वेदपठणाचा अधिकार तर फक्त ब्राह्मणानाच होता. विशिष्ट जातीपुरते हे शिक्षण मर्यादित असलेल्या या परंपरे विरोधात इतिहासात अनेकदा आवाज उठविला गेला. ही परंपरा बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी मोडली. सर्वांसाठी त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आध्यात्मिक अभ्यासाचा पाया रचला. सर्व जाती धर्मासाठी त्यांनी हा मार्ग खुला केला. यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मणेतर समाजातील मराठा, शिंपी, माळी, कुंभार, कुणबी आदी संत झाले.
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे राजर्षी शाहुंच्या कार्यकालातही ब्राह्मण समाजाचेच वर्चस्व होते. वेदपठण फक्त याच समाजापुरते मर्यादित होते. यासाठी राजर्षी शाहूंनी बहुजन समाजासाठी वेद पठणाची शाळा सुरू केली. पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठामध्ये क्षात्र जगतगुरूपीठाची स्थापना केली. आता सर्व जाती धर्मातील लोक याचा अभ्यास करू शकतात. पण सध्या शिक्षण पद्धती बदलली आहे. केवळ पोटापाण्यासाठी, कामधंदा मिळविण्यासाठी शिक्षण दिले जात आहे. याची आज गरजही आहे. बदलत्या परिस्थितीत हा बदल स्वीकारला नाहीतर आज जगणेही कठीण होणार आहे. हे जरी खरे असले तरी जीवन कशासाठी आहे हे समजून तरी घ्यायला हवे. पण याचा विचारही सध्याच्या पिढीमध्ये केला जाताना दिसत नाही. यामुळेच कदाचित आत्मज्ञानी गुरूंचे महत्त्व कमी झालेले असेल.
तसे आत्मज्ञानी गुरूही आजकाल फारच कमी पाहायला मिळतात. तर शैक्षणिक ज्ञान देणारे गुरू सेवा म्हणून काम करताना दिसत नाहीत. आर्थिक जगामध्ये आज सर्वांची तुलना ही पैशाने केली जात आहे. पैसा असेल तर वाट्टेल ते शिक्षण आज उपलब्ध होऊ शकते. यासाठी गुरूचीही गरज लागत नाही. पैशामुळे गुरूचे महत्त्वच राहिलेले नाही. मग सेवेचा धर्म या पिढीला समजणार कसा? कारण पैसा असेल तर तेथे शिक्षणाची सेवा सहज उपलब्ध होते.
पण जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे. आत्मज्ञानी गुरूच हा मार्ग दाखवू शकतात. समजावून सांगू शकतात. यासाठी अशा गुरूंची सेवा कशी करायची हे समजून घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू समाधीस्थ झाले तरी ते त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करतात. अनुभव देतात. यासाठी भक्तीसेवेचा अभ्यास करायला हवा. हे ज्ञान देणारे गुरू केवळ पान, फुल, फळ यांचाच स्वीकार करतात. तेही भक्ताने शुद्ध अंतःकरणाने दिले तरच अन्यथा याचीही गरज त्यांना वाटत नाही. फक्त मनाने सेवा देणारे शिष्यच त्यांना आवडतात. असे शिष्यच आत्मज्ञानी होऊन आत्मज्ञानाची सेवा करतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.