भारतीय साहित्याचे निर्माते : नामदेव ढसाळ – प्रा. डॉ.रणधीर शिंदे
आज देशात न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला जात असताना, ढसाळांची कविता सांगते की न्यायव्यवस्था प्रस्थापित व्यवस्थेशी हात मिळवणी करत आहे. ती प्रस्थापितांचा आवाज बनली आहे. न्यायव्यवस्था ही राक्षसी रान रेड्यासारखी तर न्यायाधीश दगडी हृदयाचा आहे. आज पुन्हा न्यायप्रक्रियेत त्याच प्रत्यंतर येत आहे.
रवि राजमाने, मोबाईल – 7709999860
ravirajmane51@gmail.com
स्वर्ग आकाशात नाही तो भूतलावरच आहे. वास्तवतेचे हे भान आपल्या कवितेतून समाज मनाला ठणकावून सांगणारे. आपल्या कविता रुपात ईश्वरी कल्पना राज्याला कायम विरोध करणारे, धर्मपरंपरेवर, सरंजामी जातीव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवणाऱ्या नामदेव ढसाळ यांची कविता आधुनिकतावादी आहे. सामाजिक जाणीवेवर आधारलेली मानवतावादी आहे. ढसाळांचा स्वर्ग भूतलावर आहे. जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या देशातील करोडो गरिबांना, दलितांना वंचितांना, उपेक्षितांना मिळाला.
गावकुसा बाहेरच्या वेशीतून बाहेर काढण्याच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कम्युनिस्ट विचारसरणी, मार्क्सवादातून बऱ्यापैकी झालं. तोच खरा स्वर्ग अनेकांना मिळाला पण हाच पृथ्वीवरला स्वर्ग दलितांना, वंचितांना, उपेक्षितांना मिळवून देण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचल्यानंतरही बाबासाहेबांच्या नावाबद्दलबद्दल ज्यावेळी देशाच्या संसदेत चुकीचा उल्लेख केला जातो. त्यावेळी मात्र आमचा आवाज तोंडातल्या तोंडात गुळणी गिळल्यासारखा गप्प होतो. कारण आता आमचं पोट भरलंय. “वरल्या अंगाला तुम्ही पाणी भरायचं, खाल्ल्या अंगाला आम्ही”. ही चातुर्यवर्ण व्यवस्था संपल्याचा आभास निर्माण केला जातोय.
भांडवलशाहीन अख्खा देश गिळंकृत करायचं ठरवलंय न दिसणारी छुपी हुकूमशाही राजरोसपणे आपला कार्यभार उघड्यावरच आटोपत आहे. आम्ही मात्र गांधीजींच्या तीन माकडाप्रमाणे…? कारण आता आमचं पोट भरलंय. आता जोहार मायबाप “येसकराला भाकरी येऊ दे ” म्हणायचे दिवस राहिले नाहीत. सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी दिल्या गेलेल्या आरक्षणाचा अनेकांना फायदा झालाय. पण अनेक जण ते सोयीस्करपणे विसरलेत.अशा काळात भारतीय साहित्याचे निर्माते नामदेव ढसाळ हे डॉ. रणधीर शिंदे सरांनी भेट दिलेला (मोनोग्राफ) ग्रंथ हातात पडला.
नामदेव ढसाळ यांचे राजकीय व सामाजिक चळवळीतले योगदान, एक कवी लेखक म्हणून मराठी साहित्यातल त्यांच योगदान, मानव मुक्तीचे गीत गाणारा एक प्रतिभावंत कवी म्हणूनच ते भारतीय साहित्याचे निर्माते ठरतात.
नामदेव ढसाळ यांच बालपणच मुळात जातीभेदाने, विषमतेने, विटाळलेले व अवहेलना भोगलेल आहे. मूळच्या गावात तिसरीपर्यंत शिक्षण झालेले ढसाळ आईबरोबर मुंबईला आले. जी विषमता गावकुसात होती तीच शहरात होती. शहरातल्या दलितांच्या वंचितांच्या वस्त्या म्हणजे कोंडवाडाच होता. हे त्यांनी जवळून पाहिलं. त्यांचं अकरावीपर्यंत शिक्षण मुंबईत झालं. सामाजिक व राजकीय चळवळीशी संबंध आला. मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दलितांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्रात एक लढाऊ संघटना स्थापन झाली तिचं नाव ‘दलित पॅंथर’ ते या संघटनेचे संस्थापक सदस्य होते.
मार्क्स, लेलिन, माओ, फिडेल कॅस्ट्रो यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. मुंबईतल्या वास्तव्याने त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. दलित पॅंथरचा लढाऊ कार्यकर्ता म्हणून ढसाळांची केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाला ओळख झाली. वरळीतल्या दंगलीने दलित पँथर अधिकच आक्रमक झाली. दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यावर खटले दाखल करण्यात आले. तरीही त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा रौप्य महोत्सव काळा दिन म्हणून पाळला. दलित पॅंथरची या लढाऊ आक्रमकतेची नोंद पंतप्रधान इंदिरा गांधींना घ्यावी लागली.हे दलित पॅंथरच यश म्हणावं लागेल. सामाजिक व राजकीय चळवळीसाठी नामदेव ढसाळ यांनी अहोरात्र काम केलं.
1962 -63 पासून कविता लिहिणाऱ्या ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित झाला. मुंबईतल्या अपरिचित वास्तवविश्वाची कल्पना मराठी साहित्य विश्वाला घ्यावी लागली. गोलपिठानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे हे कवितासंग्रह विशेष उल्लेखनीय ठरले. नामदेव ढसाळ यांनी आपल्या काव्य लेखनातून राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणली. जनतेच्या मनात राजकीय व सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या कविता मधून परंपरा, धर्म व ईश्वर, प्रस्थापित व्यवस्थेलाच लाथाडलं. इथल्या धार्मिक व सामाजिक व्यवस्थेने जातीय द्वेषातून अनेकांना छळलं. ढसाळ यांची कविता शहरी व गाव गाड्यातील व्यवस्थेचा प्रखर विरोध करते.
आज देशात न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला जात असताना, ढसाळांची कविता सांगते की न्यायव्यवस्था प्रस्थापित व्यवस्थेशी हात मिळवणी करत आहे. ती प्रस्थापितांचा आवाज बनली आहे. न्यायव्यवस्था ही राक्षसी रान रेड्यासारखी तर न्यायाधीश दगडी हृदयाचा आहे. आज पुन्हा न्यायप्रक्रियेत त्याच प्रत्यंतर येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच जीवन व त्यांचे कार्य हे नामदेव ढसाळ यांच्या जीवनाचा, त्यांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू आहे. बाबासाहेबांना केंद्रबिंदू ठेवून त्यांनी अनेक कविता लिहिल्या. ढसाळ यांच्या मते भारतीय समाजाला दुःख व शोषणातून मुक्तीच्या काळोखातून उजेडाकडे नेणारा घेऊन जाणारा, इतिहास परंपरा व धर्माविरुद्ध बंड पुकारणारा व माणसाला माणूसपण व प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांच्या मनात सदैव कृतज्ञता राहिली. महानगरातील पीडित वर्गातील जाणिवांचा संघर्ष त्यांच्या कवितात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शहराकडे चला या मंत्राने लाखो करोडो लोक शहराकडे वळले. पण तिथेही गाव कुसाबाहेरचाच अनुभव त्यांच्या वाटेला आला.
महानगरे ही कोंडवाडा, पिंजरा व तुरुंग असल्याची भावना ते व्यक्त करतात व बहुतांशी ते खरे आहे. आजही महानगरात झोपडपट्टी एरियात वंचित समाज बऱ्यापैकी आढळतो. भांडवलशाही, लोकांचा धाक आहे. मुठभर लोकांसाठी सारी यंत्रणा राबत आहे. करोडो लोक आजही छोट्याशा जागेत आपलं कुटुंब सांभाळतात. मात्र भांडवलदारासाठी पायघड्या घातल्या जातात. श्रीमंताची ट्रेन मोकळी धावते व गरिबांच्या जनरल डब्यात दोन हजार लोक असतात. त्यावेळचे व आजचे वास्तव आहे. मानवतावादाचा आरंभ, जात आणि वर्ग विषमतेला विरोध, लोक कल्याणकारी संस्थेच्या राज्यासाठी ते आपली लेखणी खर्ची घालतात. शोषण, दुःख नष्ट व्हाव यासाठी ते लिहितात. “नंतर उरल्या सुरल्याने कुणालाही गुलाम करून लुटू नये.
काळा गोरा म्हणू नये.
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये.
कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा आयभण न ओळखण्याचा गुन्हा करू नये.
आभाळाला आजोबा तर जमिनीला आजी मानून त्याच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावं.
चंद्र सूर्य फिके पडतील असे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा.
माणसावरच सूक्त रचावे माणसांचे गाणे गावे माणसाने.
असे स्वप्न पाहणारे नामदेव ढसाळ मानवतावादी कवी आहेत. महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक लेखक व कवी म्हणून नामदेव ढसाळ यांच योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या विद्रोही लेखनाने महाराष्ट्राच्या वांग्मयीन वर्तुळात त्यांनी आपल्या नावाचा धबधबा निर्माण केला. एक व्यक्ती म्हणून सामाजिक व राजकीय चळवळीतला त्यांचा सहभाग खूपच महत्त्वाचा आहे.
दलित चळवीला व्यापक व आक्रमक रूप देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या हाडकी हाडवळा व निगेटिव्ह स्पेस या दोन्ही कादंबऱ्या गावगाड्यात होणारी अवहेलना, जाती विषमता तर निगेटिव्ह स्पेस मध्ये मुंबईतील गुन्हेगारी विश्व यांच त्यांनी चित्र रेखाटल आहे. येथेही दलित शोषितांच्या अन्यायाला ते वाचा फोडतात. एकूणच नामदेव ढसाळ यांचे साहित्य माणुसकी व समतेचे स्वप्न पाहणार आहे. इतिहास व धर्म परंपरेला पाहण्याची नवी दृष्टी देणार आहे. भारतीय साहित्याचे निर्माते हा डॉ.रणधीर शिंदे यांचा ग्रंथ दलित चळवळीला दलित साहित्यिकांना नव समाजभान देणार आहे. क्रांतीची, विद्रोहाची चळवळ थंडावत चालली आहे असं वाटत असताना नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा नव्याने विचार करावयास लावणार हा ग्रंथ खूप गरजेचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, कायदा, कायद्याचं राज्य हे शब्दप्रयोग केवळ भाषण बाजीपुरते मर्यादित वाटतात. संविधानिक गोष्टीला विरोध करणारे व संविधान वाचवण्याचा डांगोरा पिटनारे तेवढेच जबाबदार आहेत. अशा काळात नामदेव ढसाळ यांच्या साहित्याची नव्या पिढीसाठी ओळख करून देणे हे डॉ. रणधीर शिंदें सरांचे विचार मौलिक आहेत.
धर्म व्यवस्थेला, समाज व्यवस्थेला, जातिव्यवस्थेला, विषमतेला आपल्या साहित्यातून प्रखर विरोध करणारे नामदेव ढसाळ व आजच्या परिस्थितीत भूमिका बदलणारे दलित,वंचित घटकातील नेते वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी, भौतिक सुखासाठी पदोपदी भूमिका बदलताना दिसतात. महापुरुषांच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम चालू आहे. राजकीय सत्ता ही सर्वांनाच मिळते असं नाही. राज सत्तेचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे तरच ती सत्ता उपयोगाची ठरते.
अशा काळात डॉ. रणधीर शिंदे यांनी नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा नव्याने ग्रंथ रूपाने परिचय करून देण हे कालसुसंगत आहे. जात व्यवस्था नाकारणारे नामदेव ढसाळ व आजचे वास्तव पाहिलं तर राजकीय स्वार्थासाठी जाती पुन्हा नव्याने मजबूत केल्या जात आहेत. धार्मिक ध्रुवीकरण करून मानवतेचा ,समतेचा विचार संपुष्टात आणण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे चालू आहेत.
देश मूठभर भांडवलदारांच्या हातात जाण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी कवीची साहित्यिकांची जबाबदारी फार मोठी आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक सामाजिक विचारांचे पुरस्कर्ते महाराष्ट्रातील प्रख्यात समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी नामदेव ढसाळ भारतीय साहित्याचे निर्माते हा साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला हा ग्रंथ नामदेव ढसाळ यांच्या साहित्याच्या परिचयासाठी प्रत्येकाने वाचला पाहिजे व अभ्यासला पाहिजे.
पुस्तकाचे नाव – भारतीय साहित्याचे निर्माते : नामदेव ढसाळ
लेखक – प्रा. डॉ.रणधीर शिंदे
प्रकाशक – साहित्य अकादमी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.