March 25, 2023
Uskondi novel by Dr Shrikant Patil book review by Gulab Bisen
Home » बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी

शेतकर्‍याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. “वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती” या ओळींप्रमाणे शेतकर्‍याने संकटांचा समर्थपणे सामना करण्यासाठी तत्पर राहावे असा संदेश देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

✍ गुलाब बिसेन

सकल जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी “अन्नदाता” म्हणून उपाधी प्राप्त असला तरी वास्तवात शेतकर्‍याला आणि त्याच्या शेतमालाला दिली जाणारी किंमत नगण्यच असते. पिकवलेला शेतमाल विकेपर्यंत त्याची लूट सुरूच असते. तो कधी निसर्गाकडून तर कधी व्यवस्थेकडून नागवला जातो. मग कधी गळफास तर कधी विषाची बाटली त्याला जवळ करावी लागते. महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी शेतकर्‍याची अवस्था यापेक्षा वेगळी दिसत नाही. साहित्यिक डाॅ. श्रीकांत पाटील यांनी लिहिलेली “ऊसकोंडी” ही कादंबरी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांची व्यथा सांगणारी कादंबरी असली तरी ती नुसती ‘व्यथाच’ सांगत नाही तर कितीही वाईट परिस्थिती आली तरी “हे ही दिवस जातील” हा आशावाद कायम ठेवत सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचा प्रयत्न करते.

‘ऊसकोंडी’ या ग्रामीण कादंबरीचे कथानक हे वारणाकाठच्या ऊसपट्यातील एका गावात घडते. या कादंबरीचा नायक ‘मनुदा’ नावाचा सर्वसामान्य शेतकरी आहे. ऊस हे नगदी पीक असल्यामुळे ऊसपट्यात शेतकर्‍यांची भरभराट झाली. उद्योगधंदे वाढले. सहकारी संस्था भरभराटीस आल्या. कारखानदारी वाढली. शेतकर्‍यांच्या जीवावर सहकारी संस्था मोठ्या झाल्या. परंतु सर्वसामान्य शेतकर्‍याचे हाल मात्र अजूनही संपलेले नाहीत. बळीराजाचा बळी अजूनही जातोच आहे. मनुदा हा तरूण बी. ए. शिकलेला सुशिक्षित शेतकरी रक्ताचं पाणी करून ऊस पिकवतो. स्वत:च्या हिमतीवर ऊसाचा मळा फुलवतो. परंतु सर्वांनाच दुसर्‍यांचं चांगलं बघवतं असं नाही. आणि सगळेच दुसर्‍याच्या वाईटावर टपून बसलेले असतात असेही नाही. त्यामुळे या कादंबरीत मनुदाला साथ देणार्‍यांसोबतच मनुदाच्या कामात धोंडा घालणारी अशा दोन्ही प्रकारच्या मनोवृत्ती वाचकाला या कादंबरीमध्ये अनुभवायला मिळतात.

मनुदा आपल्या शेतात कष्टाने ऊस पिकवतो. पिकवलेल्या ऊसावर वेगवेगळ्या फवारण्या करतो. वेळोवेळी महागडी खते देतो. संसाराला हातभार लागावा म्हणून दुभती जनावरे पाळतो. त्यांची वैरण – काडी करण्यात त्याची ओढाताण होते. परंतु तरीही तो ऊसामुळे हातात पैसा खेळत राहत असल्याने सारं सोसत जिद्दीने शेती करतो. ऊसामुळे हातात पैसा खेळता असला तरी त्याचा येण्याच्या मार्गापेक्षा जाण्याचे मार्ग अधिक असतात. त्यामुळे ऊस बागायतदारांची श्रीमंती लोकांना दिसत असली तरी ती बाळसं नसून सूज असल्याचं लेखक नमूद करतात.

प्रयत्नवादी असलेला मनुदा शेतातील ऊसाला पोटच्या लेकराप्रमाणे जपतो. परंतु पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे ऊसशेती पुराच्या पाण्यात बुडते. यामुळे ऊसाची मोठी हानी होते. बारा दिवसाच्या सततच्या पावसामुळे ऊसकांड्याच वाहून जातात. लावण पाण्यात गेली. अशाही परीस्थितीत मनुदा आपला संयम किंचितही ढळू देत नाही. अशा कठिण समयी आबांनी दिलेला सल्ला ऐकत तो चिडचिड, दगदग न करता पुन्हा नव्या जोमाने शेत ऊस लावणीसाठी तयार करत ऊसकांडी ऐवजी नर्सरीतील रोपे लाऊन, त्याची चांगली निगा राखून शेतीचं रूपडं पालटतो.

या कादंबरीमध्ये वाचकाला ऊस उत्पादक मनुदा या शेतकर्‍याचे कष्ट प्रामुख्याने बघायला मिळत असले तरी तो ‘बिचारा’ शेतकरी नाही. अरे ला कारे ने उत्तर देण्याची तो हिंमत दाखवतो. आपल्यावर होणार्‍या अन्यायांना तो कुरवाळत न बसता सरळ बोटाने लोणी निघत नसेल तर तो बोट वाकडे करून लोणी काढायची धमकही दाखवतो. ऊस तोडणी, वाहतूक, कारखान्यातील काटामारी, सोयटीचे कर्ज अशा दुष्टचक्रात सापडलेला मनूदा वडीलांच्या साथीने परिस्थितीवर मात करतो. ऊसनोंदीपासून ऊसतोडीपर्यंत होणारी ऊस उत्पादक शेतकर्‍याची ऊसकोंडी मनुदा या शेतकर्‍याच्या रूपाने प्रातिनिधीक स्वरूपात वाचकाला समजून घ्यायला मदत करते.

शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे मनुदाचा शेतात वाळलेला ऊस, त्यामुळे ऊसाच्या वजनात २० टक्के घट होऊन झालेल्या नुकसानीमुळे त्याची ऊसकोंडी होते. पावलो पावली शेतकर्‍याच्या होणार्‍या पिळवणूकीला कंटाळलेल्या मनुदाच्या मनात ऊस शेती नको असा विचारही येऊन जातो. याच उद्विग्नतेतून तो आपल्या मनातील सारी खदखद शेतकरी मंडळाच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर बोलवून दाखवतो. मनूदाची झालेली ऊसकोंडी सगळे गावकरी जाणून असल्याने सार्‍यांनाच त्याचे म्हणणे पटते. मनुदासारखी ऊसकोंडी कुणाही शेतकर्‍याची होऊ नये यासाठी मनुदा प्रयत्न करतो. यातून शेतकरी गावातील पाणंदीच्या रस्त्यावर कारखान्याला मुरूम टाकण्यासाठी अर्ज करणे, रस्त्यासाठी कुणाची अडवणूक न करणे, पैसे मागणार्‍या मुकादमाची कारखान्याकडे तक्रार करणे, ऊस तोडल्यावर बारा तासात ऊसाची उचल करणे यासारखे शेतकरी हिताचे ठराव मंजूर करून त्यांचा कारखान्याकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी शेतकरी मंडळाचे कार्यकर्ते स्विकारतात. या घटनेने मनुदाच्या मनावरील मरगळ दूर होऊन साखरपेरा जगवण्यासाठी तो परत एकदा नव्या जोमाने ऊसशेतीच्या मशागतीला लागतो.

वारणाकाठच्या गावात घडणारी ही कादंबरी वारणाकाठच्या बोलीने सजलेली आहे. लेखकाने या कादंबरीत अस्सल वारणाकाठच्या बोलीतून फुलवलेले संवाद वाचताना ग्रामीण बोलीचा गोडवा वाचकाला आपसूकच चाखायला मिळतो. शेतकर्‍याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. “वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती” या ओळींप्रमाणे शेतकर्‍याने संकटांचा समर्थपणे सामना करण्यासाठी तत्पर राहावे असा संदेश देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. सदानंद देशमुख यांनी या कादंबरीची
पाठराखण केली आहे. चित्रकार विजय जोगमार्गे यांनी साकारलेले या कादंबरीचे मुखपृष्ठ ‘ऊसकोंडी’ या नावाप्रमाणेच बोलके आहे. शेतकर्‍याला प्रयत्नवादाची अनुभूती देत जगण्याची नवी उमेद देणारी ही कादंबरी वाचकांना नक्की आवडेल अशी आशा आहे.

पुस्तकाचे नाव – ऊसकोंडी
पुस्तकाचे लेखक – डाॅ. श्रीकांत पाटील
प्रकाशक – ललित पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठ संख्या – १८७
मूल्य – २५० ₹

Related posts

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह अन् संकल्पना

वाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान

Leave a Comment