July 1, 2025
महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला शैक्षणिक आणि राजकीय वाद
Home » पहिलीपासून हिंदी या मुद्द्याला विरोध करणे चुकीचे अन् मराठी माणसाच्या तोट्याचे
विशेष संपादकीय स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पहिलीपासून हिंदी या मुद्द्याला विरोध करणे चुकीचे अन् मराठी माणसाच्या तोट्याचे

सध्या हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जावी का ? या संदर्भात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यावर राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नच अधिक होत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणाचा हा सर्वात मोठा पराभव आहे असे म्हटले तर चुक होणार नाही. या मुद्द्यावर तज्ज्ञांनी फारसे बोलणे टाळलेले दिसते. पण अशा गंभीर मुद्द्यावर गप्प बसणे हा तज्ज्ञांचा धर्म नव्हे हे लक्षात घ्यायला हवे व तज्ज्ञांनी अन् संशोधकांनी यावर मते ही मांडायलाच हवीत, कारण हा देशाच्या विकासाशी निगडीत मुद्दा आहे. हा काही राजकारण करून मते मिळवण्याचा मुद्दा नव्हे. मते मिळविण्यासाठी याचे भांडवल जर महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टिने ते निश्चितच हिताचे नाही.

राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

एखादी भाषा शिकण्यासाठी वय किती असावे अन् कोणत्या वयात साधारण किती भाषा शिकाव्यात या संदर्भात बरेच संशोधन झाले आहे. एकंदरीत झालेल्या संशोधनाचा गोषवारा घेतला असता असे आढळते की भारतातील बहुभाषिक वातावरण हे नैसर्गिक भाषाशिक्षणासाठी अनुकूल आहे. बहुभाषिक असल्याने याचे अनेक फायदे आहेत. यामुळे अनेक भाषा शिकल्याने त्यांची आकलन शक्तीही प्रगल्ब होते. मेंदूचा विकास उत्तम होतो. वयाचा विचार करता तीन ते आठ या वयोगटात दोन ते तीन भाषा सहज येतात. वय वाढेल तसे नवी भाषा शिकण्याकडचा कलही कमी होतो अन् वयाच्या १७–१८ नंतर नवीन व्याकरण आत्मसात होणे कमी होते. या संदर्भात झालेल्या संशोधनात लहान वयात जितका अधिक भाषिक संपर्क असेल तितकी मेंदूविकासाची क्षमता वाढते यावर एकमत असल्याचे पाहायला मिळते.

Sensitive Period Hypothesis किंवा Critical Period Hypothesis ( संवेदनशील कालावधी गृहीतक / गंभीर कालावधी गृहीतक ) या संकल्पनेनुसार लहान वयात, विशेषतः ० ते ७ वयोगटात, भाषा शिकण्याची मेंदूची क्षमता अत्यंत प्रभावी असते. १९६७ मध्ये प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ Eric Lenneberg यांनी मांडले की, भाषेचा नैसर्गिक आत्मसात करण्याचा सर्वोत्तम काळ puberty साधारणतः १२ ते १३ वर्षांपर्यंत असतो. हॉर्वड विद्यापीठातील द्विभाषिक अभ्यासानुसार Harvard University – Bilingualism Studies लहान मुले एकावेळी दोन किंवा तीन भाषा सहज आत्मसात करू शकतात, विशेषतः वयाच्या ३ ते ६ या काळात. हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. तसेच बहुभाषिक (Multilingual) वातावरणात वाढणारी मुले कार्यकारी कार्यक्षमता (executive function), स्मरणशक्ती, आणि संज्ञानात्मक लवचिकता यामध्ये अधिक कुशल असतात.

जगभरातील विविध भाषा तज्ज्ञांच्या मते लहान वयात मेंदू neuroplasticity मुळे ( मेंदूची स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता म्हणजे neuroplasticity ) सहज नवीन भाषा आत्मसात करू शकतो. वयानुसार ही लवचिकता कमी होते, म्हणूनच नव्या भाषेचा नैसर्गिक प्रवाह (fluency) घडवणं कठीण जाते. UNESCO, UNICEF व NCERT च्या शिफारशीनुसार मुलांनी किमान २ ते ३ भाषा शालेय वयात शिकाव्यात (NEP 2020 – त्रिभाषा सूत्र).

Lenneberg’s Original Study (1967) नुसार मेंदूच्या दोन्ही hemispheres लहानपणी भाषेसाठी सक्रिय असतात. वय वाढल्यावर मेंदूच्या एका बाजूकडे (बहुधा डावीकडे) भाषा प्रक्रिया मर्यादित होते. त्यामुळे दोन्ही hemispheres वापरून भाषा आत्मसात होण्याची क्षमता लहान वयात अधिक असते.

तर Newport (1990) – “Less is More Hypothesis” यांच्या मते लहान मुलांमध्ये भाषेची मर्यादित समज असल्यामुळे, ते हळूहळू पण प्रभावीपणे भाषा आत्मसात करतात. त्यामुळे ३–७ वर्षे वयोगट भाषा आत्मसात करण्यासाठी सर्वाधिक योग्य मानला जातो.

Johnson & Newport Study (1989) यांनी 46 कोरियन आणि चायनीज विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनानुसार जे विद्यार्थी वयाच्या ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आले, त्यांनी इंग्रजी व्याकरणात मातृभाषिकासारखा अचूकपणा दाखवला व जे १५ वर्षांनंतर अमेरिकेत आले, त्यांची अचूकता खालावली होती.

तर European Commission – Early Language Learning Report (2011) नुसार लहान मुलांमध्ये Multilingual Exposure (दोन किंवा अधिक भाषांतील अनुभव) cognitive development ला चालना मिळते. अशा मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता decision making, memory, आणि problem solving समस्या सोडविण्याची क्षमता उच्च असते, असे आढळले आहे.

भारतामध्येही या संदर्भात संशोधन झाल्याचे आढळते. Azim Premji Foundation ने केलेल्या क्षेत्रीय संशोधनानुसार (2018–2022) अनेक मुले घरात एक भाषा (जसे गोंडी, कन्नड), शाळेत दुसरी (हिंदी), आणि माध्यम म्हणून तिसरी भाषा (इंग्रजी) शिकतात. बालवयात (वय ३–८) मुलं वेगवेगळ्या भाषांचे स्पष्ट विभाजन न करता सहज आत्मसात करू शकतात. भाषांमध्ये भावनिक जवळीक असेल तर एकावेळी २–३ भाषा सहज शिकतात. मुलं भाषेचा वापर “परिस्थितीनुसार” करतात, म्हणजेच कोणत्या ठिकाणी कोणती भाषा वापरायची हे नैसर्गिकपणे शिकतात. शिक्षकांनी मातृभाषेचा वापर केल्यास संज्ञानात्मक विकास जलद होतो.

CIIL (Central Institute of Indian Languages), म्हैसूरच्या संशोधन अहवालानुसार भारतात ५ वर्षांपर्यंत वयाची मुले २ ते ३ भाषा समांतर आत्मसात करू शकतात. शाळेतील इंग्रजी शिक्षणात अडचण येण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मातृभाषा किंवा स्थानिक भाषेचा अपुरा वापर असेही मत त्यांनी संशोधनात मांडले आहे.

TISS (Tata Institute of Social Sciences) यांनी भाषा आणि समावेशी शिक्षण प्रकल्प: Language and Schooling in Multilingual Contexts (2016–2021) या अभ्यासात स्पष्ट केले आहे की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवल्यास भाषा व विषय दोन्ही अधिक आत्मसात होतात. त्यांच्या मते वय ६–१० पर्यंत मुलं अनेक भाषांमध्ये शब्दसंपदा सहज आत्मसात करतात. इंग्रजी किंवा हिंदी थेट शिकवण्याऐवजी मातृभाषेतून भाषिक संकल्पना स्पष्ट केल्यास शिकण्याचा दर्जा वाढतो.

अशी संशोधकांची असणारी मते विचारात घेऊन सरकारने व राजकर्त्यांनी निर्णय घ्यायला हवेत. एखाद्या गोष्टीचे भांडवल करून वातावरण दुषित करण्यात अनेक तोटे आहेत. यात महाराष्ट्राचे नुकसान आहे हे विचारात घ्यायला हवे. जनतेनेही या संदर्भात संवेदनशील भुमिका घेऊन या गोष्टीकडे गांभिर्याने पाहायला हवे. आत्तापर्यंत मराठी भाषेचा आग्रह धरणारे हे राजकर्ते मराठी बाबत किती प्रयत्नशील होते याचाची अभ्यास करायला हवा. यांनी मराठी भाषेच्या संदर्भात कोणते कार्य केले आहे याचाही विचार करायला हवा.

छत्रपतींचे नाव घेऊन राज्य करणारे कार्यकर्ते खरचं छत्रपतींचे विचार आचरणात आणतात का ? छत्रपतींनी मराठी व संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी कसे प्रयत्न केले याचा विचार करून तसे प्रयत्न त्यांनी कधी केले आहेत का ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकालात राज्य व्यवहार व लोक व्यवहारामध्ये उर्दु व फारसीमधील शेकडो शब्दांचा वापर होत असे. तो कमी करण्यासाठी छत्रपतींनी प्रयत्न केले. कागदपत्रांमध्ये शेकडा ७५ टक्के शब्द हे मराठी व्यतिरिक्त होते. हे कमी कसे होतील यासाठी छत्रपतींनी प्रयत्न केले. फारसी व उर्दुतील शब्दांना पर्यायी शब्द त्यांनी निश्चित केले. या त्यांच्या प्रयत्नाना पहिल्याच दशकात परिणाम दिसून आला.

शिवाजी महाराज यांनी ऑक्टोबर १६६२ मध्ये सर्जेराव जेधे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मायना वगळता १२७ शब्द होते. त्यामध्ये २० शब्द हे फारसी होते. म्हणजे हे प्रमाण १५.७४ टक्के इतके भरते. राज्यभिषेकावेळी महाराजांनी फारसी नावे बदलून मराठी पदनामे निश्चित केली. राज्यभिषेकानंतर १६८५ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी पाठविलेल्या पत्रामध्ये मायना वगळता २६१ शब्द होते. त्यामध्ये केवळ १३ शब्द हे फारसी होते. याचा अर्थ फारसी शब्द वापराचे प्रमाण ४.९८ टक्के भरते. असे प्रयत्न कधी या राजकर्त्यांनी मराठी भाषेच्या वापरा संदर्भात केलेले आढळते का ? नामांतर अन् पर्यायी शब्द यातील फरकही विचारात घ्यायला हवा. नामांतर म्हणजे पर्यायी शब्द होत नाही. जनतेनेच आता या राजकर्त्यांनी बुद्धी ठिकाणावर आणण्याची गरज आहे अन् महाराष्ट्राच्या अन् मराठी भाषेसह मराठी माणसाच्या विकासाची द्वारे स्वतःच उघडायला हवीत.

मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर जावा, त्याचा विकास व्हावा असे वाटत असेल तर हिंदीला विरोध करणे चुकीचे आहे. महाराष्ट्राबाहेर हिंदी बोलली जाते अन् संपर्क माध्यमही ते आहे. अशा वेळी त्या भाषेवर आपले प्रभुत्व असेल तर आपणास अधिक लाभ होईल याचा विचार करून हिंदीकडे पाहायला हवे. मराठी माणसाचा विकास अन् फायदा त्यात आहे याचा विचार व्हायला हवा. असे झाले तरच मराठी माणूस देशभरात जाईल अन् मराठीचा झेंडा फडकवू शकेल. यासाठी हिंदीवरही प्रभुत्व असायलाच हवे यासाठी पहिलीपासून हिंदी ही असायला हवी.

📊 वयानुसार भाषाशिक्षणाची शिफारस…

वय भाषाशिक्षण क्षमतेचा प्रकार शिफारस
०–३ वर्षे ध्वनी, लय, बोली शिकण्याची नैसर्गिक क्षमता मातृभाषा व घरातील दुसरी भाषा ऐकवावी
३–७ वर्षे उच्च श्रवण आणि अनुकरण क्षमता दुसरी किंवा तिसरी भाषा शिकवायला योग्य काळ
७–१२ वर्षे व्याकरण आणि अर्थ समजून शिकण्याची तयारी शाळेतून परकीय भाषा (जसे की इंग्रजी, संस्कृत) शिकवावी
१२–१८ वर्षे शिस्तबद्ध व प्रबोधनात्मक शिक्षणाची तयारी चौथी किंवा पाचवी भाषा (कोडिंग भाषाही) शिकण्यास योग्य

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading