मठगाव येथील महादेव मंदिर दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने आतापर्यंत या मंदिराची माहिती महाराष्ट्रातच काय पण भुदरगड तालुक्यातील अनेकांना नाही. हे मंदिर शेकडो वर्ष पुराने असून जागृत असल्याचे सांगितले जाते गेल्या तीनशे वर्षात दोनदा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र महादेवाच्या कृपेने आजही हे मंदिर आहे.
किशोर आबिटकर ( वरिष्ठ पत्रकार)
राष्ट्रीय अध्यक्ष
द पॉवर ऑफ मिडिया
मठगाव गाव हे भुदरगड तालुक्यातील एक डोंगरी दुर्गम गाव या गावात श्री महादेव महादेवाचे पुरातन जागृत देवस्थान आहे मात्र याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवभक्तांना नाही हे मंदिर वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी सतत 23 वर्षे लढा दिला हे मंदिर आता जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. गावकऱ्यांनी ही यासाठी आता एक दिलाने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.
व्हिडिओ – अंकुश तेजम, गावठी क्रिएटर
मठगाव येथील महादेव मंदिर दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने आतापर्यंत या मंदिराची माहिती महाराष्ट्रातच काय पण भुदरगड तालुक्यातील अनेकांना नाही. हे मंदिर शेकडो वर्ष पुराने असून जागृत असल्याचे सांगितले जाते गेल्या तीनशे वर्षात दोनदा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र महादेवाच्या कृपेने आजही हे मंदिर आहे.
मंदिराचा इतिहास
गेल्या अनेक शतकापासून कलाकुसर आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले महादेव मंदिर मठगाव येथे आहे. पूर्वी पाटगाव, रांगणा , मठगाव परिसरात मोठी वर्दळ असायची. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेस निघाले असता पाटगावच्या मौनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाटगाव येथे मुक्कामी होते, त्यावेळी महाराजांचे पाय या मंदिरास लागल्याचे परिसरातील बुजुर्ग सांगत असत.
मठगावच्या मंदिरास दोन तीनशे वर्षांपूर्वी जाण्यासाठी रस्ते होते. लोकांचे जाणे येणे होते. पण हणमंता घाट. रांगणा घाटाचे अस्तित्व संपल्यानंतर या भागातील लोकांचा वावर कमी झाला. हा दुर्गम भाग अतिदुर्गम होत गेला.
मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात झाले असल्याचे जाणकारांचे मत आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम दगडात सुबक कोरीव काम केलेले असे होते. मंदिराचा बांधकाम आकार खूप मोठा होता. त इतके पुरातन व इतिहास प्रसिद्ध मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात नाही मात्र कालांतराने हे मंदिर दुर्लक्षित होत गेले या पिढीला या मंदिराची माहितीच नाही.
या मंदिरावर सतराव्या शतकात मुघल सैन्याने हल्ला करून मंदिर उद्ध्वस्त केले गाभारा पाडण्याचा प्रयत्न होत असताना गाभाऱ्यातून हजारो मधमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी मंदिर पाडणाऱ्यांवर हल्ला केला त्यांना पळवून लावले यामुळे मंदिराचा थोडा भाग आणि गाभारा सुरक्षित राहिला. पाडलेल्या मंदिराचा आकार आणि अवशेष आजही पाहायला मिळतात. कोरीव काम केलेल्या भल्या मोठ्या दगडी शिळा, खांब आजही पाहायला मिळतात मंदिराच्या आसपास जमिनीत गाडलेल्या दगडी तुळया, चबुतऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येतात.
मठगाव येथे महादेव मंदिर परिसरात श्री महादेव, श्री काळम्मा देवी, श्री सातेरी देवी अशी 11 पुरातन मंदिरे आहेत. त्यापैकी महादेव व काळमा मंदिराजवळ महादेवाची राई आणि काळमाची राई अशा दोन घनदाट देवराया होत्या. 1970 च्या दशकात भूमीहिनाना जमीन देण्याच्या शासकीय योजनेतून एका नालायक तहसीलदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून दोन कुटुंबातील 15 जणांना भूमीहीन ठरवत प्रत्येकी पाच एकर जमिनीचे वाटप केले. यापैकी महादेवाची राई व काळमती राई या दोन देवराया तुरंबे येथील मुल्लानी कुटुंबियाकडे गेल्या. त्यांनी येथील लाखो रुपयांची झाडे तोडून जंगल साफ केले.
मठगाव भूखंड लढा
मठगावकर ग्रामस्थांना आपण जंगल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सुरुवातीस भासवणाऱ्या तुरंबेकरांनी नंतर या जमिनीची मालकीच आमच्याकडे असल्याचे सांगत देवस्थान जमिनी कसणाऱ्या कुटुंबीयांना हाकलून लावण्याचे प्रयत्न झाले. गावकऱ्यांना मंदिरात येण्यास, पूजाअर्चा करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मठगाव ग्रामस्थ आणि संबंधित जमीन धारक यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. हे वाद भुदरगड पोलीस ठाण्यात आल्यानंतर परस्पर विरोधी तक्रारी सातत्याने सुरू झाल्या.
1985 च्या जुलै महिन्यामध्ये पाटगाव धरणाच्या सांडव्यास धोका निर्माण झाल्याची बातमी आल्यानंतर भुदरगडचे तत्कालीन फौजदार सूर्यवंशी हे पहाणी करण्यासाठी मला घेऊन पाटगाव कडे निघाले असता वाटेत संबंधित मुल्लानी भेटला त्यांनी हा विषय काढला. त्यानंतर फौजदार सूर्यवंशी मला म्हणाले मठगाव मध्ये देवस्थान जमिनीचा काहीतरी मोठा विषय आहे, लक्ष घाला.. यानंतर चारच दिवसात मठगाव ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ तहसीलदार आणि प्रांत यांना भेटण्यासाठी गारगोटीत आले असता त्यांची व माझी भेट झाली. या शिष्टमंडळामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती बळवंत पाटील, माजी सरपंच श्रीपती आबा पाटील, यशवंत बाबुराव कोळगे नाना विष्णू पाटील, बाबुराव भाऊसो पाटील, बळवंत धोंडीराम पाटील, तत्कालीन सरपंच तुकाराम पांडुरंग मोरे, टी ए पाटील, सहदेव दाजी पाटील, राजाराम बचाराम पाटील, देवबा भिवा कांबळे, पांडुरंग आत्माराम कांबळे, धोंडीराम यशवंत पाटील आदी लोकांचा समावेश होता
त्यांच्याकडून मला या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी मुळाशी जाण्याचा निश्चय गावकऱ्यांच्या साथीने मी केला. या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यासाठी मी आणि मठगाव चे सरपंच मोरे, टी ए पाटील सुमारे दोन महिने प्रयत्न करत होतो. त्यानंतर या प्रकरणाची खोली लक्षात आली. कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्रात या बातम्या येऊ लागल्यानंतर मठगाव भूखंड प्रकरण हे उजेडात आले. त्यानंतर गावकऱ्यांच्या विलक्षण एकजुटीचा लढा सुरू झाला, तो सुमारे 17 वर्ष.. अखेर या प्रकरणी गावकऱ्यांना न्याय मिळाला. सरकारने गावकऱ्यांसारखा निकाल देऊन मंदिरे खुली केली. मंदिरांना नियमानुसार जमीन देऊन उर्वरित जमीन शासनाने जमा करून घेतली
मठगाव गावकऱ्यांकडे मंदिरे आल्यानंतर नियमित पूजापाठ, महाशिवरात्री सप्ताह, यात्रा असे विविध कार्यक्रम सुरू झाले. गावकऱ्यांनी एकजुटीने मंदिराची डागडुजी केली. त्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रयत्नातून मंदिरास क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली. वाहनतळ, मंडप सारखी कामे झाली. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणखी कामे सुरू झाली आहेत. मंदिरात पर्यंत जाणारे रस्ते झाले आहेत. या मंदिरात आता पर्यटकांना, यात्रेकरूंना जाता येत आहे.
पण अजून खूप टप्पा गाठायचा आहे. मंदिराचा जिर्णोद्धार व्हायचा आहे.. पूर्वी होते तसे मंदिर उभा केले जावे अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. पुरातत्व विभागामार्फत शासनाने हे मंदिर उभे करावे , पर्यटनाचा दर्जा वाढवून मिळावा, भक्तनिवास उभे राहावे, सरकार जमा झालेली या देवस्थानची जमीन मंदिरास मिळावी, महादेव मंदिर परिसरात असलेल्या सर्व मंदिरांना जोडणारे अंतर्गत रस्ते व्हावेत. या ठिकाणी मोबाईल फोनची कनेक्टिव्हिटी व्हावी, मंदिरास पुजाऱ्यांची नियुक्ती व्हावी, दिवाबत्तीची सोय व्हावी. कायमस्वरूपी वीज पाण्याची सोय व्हावी, अशी अनेक कामे शिल्लक आहेत. यासाठी मठगावकर ग्रामस्थांना सर्व स्तरातून मदतीचे हात मिळायला हवेत, मठगावकरांच्या साथीने सर्वांनीच एक दिलाने प्रयत्न करायला हवेत, हीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो
शिवरात्र सप्ताह
मठगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवरात्री निमित्त मंदिरात प्रतिवर्षी सप्ताहाचे नियोजन करण्यात येत असते. तसेच सोमवारी मंदिरात पूजा अभिषेक केला जातो.
मठगाव महादेव मंदिरात कसे झाले
कोल्हापूर येथून गारगोटी- तांबाळे -मठगाव
निपाणी- गारगोटी- तांबाळे -मठगाव
आजरा- वेसर्डे – बशाचा मोळा -मठगाव
सावंतवाडी- गवसे- वेसर्डे -बशाचा मोळा-मठगाव
कोल्हापूरहून 84 किलोमीटर
गारगोटी हून 34 किलोमीटर
मठगाव कडे जाण्यासाठी एसटी बसची फारशी सुविधा नाही. गारगोटी येथून खाजगी गाड्या मिळू शकतात. तांबाळे येथून चालत पाच किलोमीटर
मठगावचे महादेव मंदिर अकराशे वर्षे पुराणे
मठगावचे महादेव मंदिर अति प्राचीन असून त्याचे अस्तित्व सुमारे अकराशे वर्षां पूर्वीचे असल्याचे दिसून येते. या परिसरात हे देवस्थान जागृत असल्याची भावना नागरिकांच्यात आहे. असे असले तरी या मंदिराची माहिती तालुक्याच्या अन्य भागात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात फारशी नाही. या मंदिराचा इतिहास काय असावा ? याची माहिती संकलित केली असता ती थक्क करणारी अशीच आहे.
मठगाव पाटगाव हा परिसर वर्तमानात दुर्गम, डोंगराळ, जंगलांनी वेढलेला, रस्त्याच्या सोई गेल्या 20- 30 वर्षापर्यंत नसलेला असाच होता. आता कुठे या परिसरात रस्ते, वीज, पाण्याच्या सोयी व्हायला लागल्या आहेत. पण इतिहासाचा मागोवा घेतल्यानंतर समजते की पाटगाव मठगाव परिसरातील नागरी जीवन संपन्न, समृद्ध होते चांगला व्यापार उदिम होता. शेकडो वर्षांच्या कालखंडानंतर हे चित्र पालटले.
मठगाव शिवमंदिराबाबतची स्थानिक वयोवृद्ध नागरिकांकडून गेल्या 40 वर्षापासून मी माहिती मिळवत आहे. या मंडळींकडून वेळोवेळी मिळालेली माहिती, आख्यायिका आणि मंदिर परिसरातील वस्तुस्थिती याचा विचार करता इतिहासातील अनेक बाबीवर प्रकाश झोत पडतो.
स्थानिक वयोवृद्धांच्या मते हे मंदिर 400 वर्षांपूर्वीचे असावे, तर काहींच्या मते हे मंदिर त्या पूर्वीचे म्हणजे शिवकाळापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. सध्या मंदिर छोटे म्हणजे फक्त गाभारा आणि त्याच्या समोरील थोडासा भाग अस्तित्वात असला तरी पूर्वी हे मंदिर खूप मोठे आणि प्रशस्त होते. स्थानिकांच्या मते सध्याच्या मंदिराखाली आणखी एक मजला असावा. तसेच मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूला जिथे लिंगाचे देवस्थान आहे त्या बाजूने निघणारे भुयार होते, असे सांगण्यात येते. सुमारे 100 वर्षांपूर्वी हे भुयार पाहिल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
मंदिराचा आकार सुमारे 120 फूट रुंद आणि लांबी 150 फूट असावी. काहींच्या म्हणण्यानुसार हे मंदिर पांडवकालीन तर काहींच्या म्हणण्यानुसार हेमाडपंथी असावे, या मंदिराच्या परिसरात पूर्वी मोठी वस्ती असल्याचे बुजुर्ग सांगतात. तर या गावात तीन चार पिढ्यांपूर्वी मोठा व्यापार असल्याची माहिती ही अनेकांकडून मिळते. इतके भव्य मंदिर अशा दुर्गम, जंगलात कोणी बांधले असावे ? ते इथेच बांधण्याचे कारण काय ? आणि ते नक्की कोणत्या कालखंडात बांधले असावे ? असे अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे इतिहासातील घटनांच्या आधारे पडताळून पाहू.
शिलाहार राजवट
या परिसरात नवव्या शतकापासून शिलाहार राजवंशाच्या सत्ता होती. शिलाहार राजवटीच्या तीन शाखा होत्या. त्यापैकी कोल्हापूर विभागा अंतर्गत हा परिसर येतो. या परिसरात पूर्वी नवव्या शतका पर्यंत राष्ट्रकूट राज्याची सत्ता होती. शिलाहार या काळात राष्ट्रकुट राजाच्या पदरी होते. नवव्या शतकामध्ये राष्ट्रकूट सत्ता खिळखिळी झाल्यानंतर शिलाहरांचे वर्चस्व निर्माण झाले. इसवी सन 940 ते 960 च्या दरम्यान शिलाहार वंशाचा प्रथम राजा जातीका यांने या परिसरावर आपला अंमल बसवला. या राजाकडे कोल्हापूर, सातारा, बेळगाव, कोकण गोव्यापर्यंतच्या परिसरातील मोठे राज्य होते. या राजवंशातील जातीका द्वितीय या राज्याची कारकीर्द 1000 ते 1020 पर्यंत होती. या राजवटी पासून पाटगाव मठगाव हा परिसर राजवटीचे प्रशासकीय, लष्करी आणि व्यापारी केंद्र होते.
राजा जातीका द्वितीय याच्या कारकीर्दीत अनेक सुधारणा झाल्या. या राजानंतर सुमारे दीडशे वर्षात अनेक राजे होऊन गेले. पुढे 1175 ते 1215 या काळात या वंशातील राजा भोज द्वितीय याने सत्ता चालवली. या राजाची कारकीर्द दैदिप्यमान अशीच ठरली. या दोन राजां मधल्या दीडशे वर्षात अनेक राजे होऊन गेले. पण त्यांचा प्रभाव जाणवत नाही. मात्र राजा भोज द्वितीय यांने आपल्या कारकिर्दीत मोठी बांधकामे केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता किल्ले पन्हाळा, भुदरगड, विजयदुर्ग, रांगणा यांसारख्या किल्ल्यांचे बांधकाम केले. याबरोबरच खिद्रापूर येथील मंदिराचेही बांधकाम त्याच्याच काळात झाले असल्याचे उल्लेख आहेत
ही सर्व भौगोलिक व ऐतिहासिक परिस्थिती पाहिली असता मठगाव येथील महादेव मंदिराचे बांधकाम त्याच कालावधीत झाले असावे. शिलाहार राजवटीच्या काळात भुदरगड ते विजयदुर्ग या संपूर्ण परिसरात त्याचा अंमल होता. समुद्रावरून येणारा माल हनमंता घाटातून वर आल्यावर तो पाटगाव मठगाव या ठिकाणी येऊन तिथून पुढे राज्याच्या अनेक भागाकडे वितरित होत असावा. या ठिकाणी मोठे व्यापारी केंद्र होते. प्रशासकीय केंद्र होते, लष्करी केंद्रही होते. त्याकाळी या परिसरातील जनता सुखी, संपन्न होती. याचा संदर्भ घेतला असता महादेव मंदिराचे बांधकाम याच काळात झाले असावे, ही शक्यता ठळक होते.
देवगिरीच्या यादवांचा काळ
नव्या ते बाराव्या शतकापर्यंत शिलाहरांचे राज्य वैभव संपन्न होते. त्याचा अंमल दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण, गोवा इतक्या मोठ्या प्रदेशात होता. याच समकालीन देवगिरीच्या यादवांचेही साम्राज्य होते. त्याचा विस्तारही खूप मोठा होता. देवगिरीच्या यादवांच्या काळात अनेक समाज उपयोगी कामे, मंदिरांची बांधकामे झाली.
यादवांनी त्यांचा प्रधान हेमाद्री पंत यास निर्देश देऊन बांधकाम शैलीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे हेमाद्री पंतांने आपल्या राज्यातील तज्ञ कारागिरांना एकत्र करून बांधकाम शैली विकसित केली. या शैलीस पुढे हेमाडपंती असे संबोधले जाऊ लागले. यादव वैष्णव पंथाला मानत असल्याने त्यांनी प्रामुख्याने विष्णू , श्रीकृष्ण यांची मंदिरे बांधली.
या समकालात कोल्हापूरच्या दक्षिण पश्चिम भागात शिलाहरांचे वर्चस्व असल्याने यादव कालीन बांधकामांचा संबंध या ठिकाणी येत नाही. हेही लक्षात घ्यायला हवे. 12 व्या शतकानंतर यादवांनी शिलाहारांचा पराभव केल्यानंतर त्याच्या आमलाखाली कोल्हापूरचा हा भाग आला. या काळात यादवांनी आपले दक्षिणेकडील केंद्र सांगली परिसरात केले होते. पुढे यादवांचा पराभव मोंगलांनी केल्यानंतर यादव साम्राज्याचा ऱ्हास झाला. पर्यायाने हा परिसर ही मोंगलांच्या ताब्यात गेला. पुढील तीन शतके या परिसरात सत्ता अलटून पालटून होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत या परिसरात स्थिर सत्ता नव्हती.
ही सर्व ऐतिहासिक, राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती पाहता मठगावचे शिव मंदिर बाराव्या शतकात शिलारांनी म्हणजेच शिवभक्त असलेल्या भोज राजा द्वितीय यांने बांधले असावे, हे स्पष्ट होते. त्यामुळे हेमाडपंथी, पांडवकालीन बांधकाम नाही, हे ही स्पष्ट होते.
शिलाहार वंशातील भोज राजाच्या पदरी सोमनाथ सुरी ( 1190 ते 1215) नावाचे काश्मिरी ब्राह्मण कवी होते. त्यांनी बृहतसंहिता नावाचा ग्रंथ कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरातील एका मंदिरात लिहिला असल्याचा संदर्भ मिळतो. याचाच अर्थ असा की भोज राजाच्या काळात कले बरोबरच साहित्यालाही महत्त्व असल्याचे स्पष्ट होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
पात्र व्हा, कृपा आपोआप होईल