ही कादंबरी पर्यावरणाविषयीचा सद्भाव मनामध्ये रुजवते. ज्या अधिवासापासून आपण तुटत चाललो आहोत, त्या पशुपक्ष्यांच्या अधिवासाला आपल्याशी जोडू पाहते. इतकेच नाही तर जंगलवाचनाची नवी दृष्टी देऊ पाहतेय.
नंदकुमार मोरे
निसर्गा, तुझ्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणेच सारं कसं घडत राहतं ! तुझी अजबाई कशी समजून यायची!’ हे वाक्य आहे, ‘पेणा आणि चिकोटी’ या सलीम सरदार मुल्ला यांच्या नव्या किशोर कादंबरीतील. ही ‘अजबाई’ समजून घेणे ही साधी सोपी गोष्ट नाही. शास्त्रज्ञ, संशोधकांबरोबर अनेक लेखक-कलावंतही हे काम शेकडो वर्षे करताहेत. तरीही यासंदर्भात रोज नवी माहिती समोर येतेच आहे.
वनविभागात नोकरी करणाऱ्या सलीम मुल्ला यांनीही आपल्या पद्धतीने ही अजबाई समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालविला आहे. त्यांची यापूर्वीची पुस्तके याची साक्ष देतात. जंगल खजिन्याचा शोध, अवलिया, ऋतुफेरा नंतरची ‘पेणा आणि चिकोटी’ ही किशोर कादंबरी जगंलवाचनाचे नवे भान देणारी आहे. ठिपक्या मुनियाची जोडी आपले भावविश्व जगत असताना त्यांनी आपल्या नजरेतून न्याहाळलेले जंगल या कादंबरीत वाचता येते. हे वाचन विलक्षण आहे. नवे जग आणि त्याची नवी भाषा हे या वाचनाचे विशेष आहे.
कादंबरीचा प्रारंभ शरद ऋतू सुरू झाल्यानंतरच्या दिवसांचे वर्णन करून होतो. लेखक या दिवसांचे वर्णन किती बारकाईने करतो ते प्रत्यक्ष वाचण्यासारखे आहे. तो लिहितो, ‘पूर्वा नक्षत्राच्या अखेरच्या टापूत सुरू झालेला झडीचा पाऊस अकस्मात थांबला. काळ्याकिट्ट ढगांची फाकाफाक झाली. तांबसर किरणांची सुरखाई जंगलभर पसरली. ओढ्यातले पाणी ऐन्यागत दिसू लागले. पाऊसथेंबांनी गवत चमकू लागले. भारंगीच्या जर्द निळ्या फुलांवर भुंगे भिरभिरू लागले. कवडी, चांदवा ही फुलपाखरे दिंड्याच्या फुलोऱ्यावर बसली. चांदव्याने उन्हाची ऊब घ्यायला पंख पसरले. त्याच्या निळ्याशार पंखावरील शुभ्र ठिपके लुकलुकू लागले. टेहळणीवरील किंवड्या पोपटाची या बेसावध फुलपाखरावर नजर होतीच. लालचुटूक फुलांनी लगडलेल्या मुरुडशेंगेच्या फांदोऱ्यात हरेवा, शिंजिर, फुलटोच्यांची कलकल वाढली. या कलकलीचा लाभ घेत एका किंवड्या पोपटाने फर्रदिशी झेप टाकून बेसावध चांदवा अंतराळी चोचीत पकडला.’ हे वर्णन वाचकाला नव्या विश्वात घेऊन जाते. गुंतवून टाकते. शिवाय लेखक जंगलाचे किती बारकावे टिपतो याची साक्षही देते.
अशा दिवसानंतर मुनियाची काहीशी रोमँटिक कथा सुरू होते. पण या कथेत जंगलाचे भय, सततची असुरक्षितता, त्यातून वारंवार येणारी संकटं हे सारचं स्तंभित करणारे वास्तव ही कादंबरी सांगत जाते.या सांगण्यात विलक्षण जिव्हाळा आहे. निसर्गाविषयीची आस्था आहे. जंगल समजून सांगण्याची आस्थेवाईक ओढ आहे. पर्यावरणाचा खोलवरचा विचार आहे. तो समजून घेणे मात्र आवश्यक आहे.
ही कादंबरी पर्यावरणाविषयीचा सद्भाव मनामध्ये रुजवते. ज्या अधिवासापासून आपण तुटत चाललो आहोत, त्या पशुपक्ष्यांच्या अधिवासाला आपल्याशी जोडू पाहते. इतकेच नाही तर जंगलवाचनाची नवी दृष्टी देऊ पाहतेय. कादंबरीला स्वत:ची भाषा आहे. या भाषेत असंख्य देशी शब्द येतात. त्यातून जंगलाची बारीक हालचाल समजून घेता येते. ही भाषा इतकी प्रवाही आणि सूक्ष्मअर्थवाही आहे की जंगल कळत जाते. चांदउजेड, गवताचा खुर्दळा, गोमगाला, उतरवट, खराट, खिमडी, चकांदा, चिकटाई, चिमखडा, चिंभाटी, डंगाळ, ढापी, बेचके, भिंगूळवाणे, साळशिट, सुरखाई, हलसूद यासारखे बोलीतील शब्द किती अर्थसखोल आहेत याची प्रचिती ही कादंबरी वाचताना येते. एकूणच, ही कादंबरी जंगलवाचनाची नवी दृष्टी देते.
अत्यंत ओघवत्या निवेदनात साकारलेली ही पक्ष्यांची कथा नैसर्गिक अधिवासाचे आणि निसर्गसाखळीचे भान देते. आपल्यासह इतरही जीवजंतू येथे आहेत, त्यांचेही एक भावविश्व आहे, त्यांनाही आपल्यासारख्याच भावभावना आहेत, याची जाणीव करून देते. त्यामुळेच ही माणसाला निसर्गाशी जोडणारी कादंबरी वाटते.त्यासाठी सलीम सरदार मुल्ला यांच्या या नव्या कादंबरीचे मन:पूर्वक स्वागत आणि नवं वाचायला दिल्याबद्दल अभिनंदन करायला हवे.
पुस्तकाचे नाव – पेणा आणि चिकोटी (किशोर कादंबरी)
लेखक – सलीम सरदार मुल्ला
प्रकाशन – दर्या प्रकाशन, पुणे
पृष्ठे ७२, किंमत रु. १००/-