कॅलिग्राफीची आवड कशी निर्माण झाली ?
राजेंद्र हंकारे – आमचे वडील बापुसो सखाराम हंकारे हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते. त्यांना सुंदर रेखीव अक्षरे कोरण्याचा छंद होता. त्यांच्या हा छंद आम्हालाही लागला. वडीलांकडूनच सुंदर हस्ताक्षराची ही देणगी मिळाली आहे. वडीलच आमचे या मागचे प्रेरणास्थान आहेत. वडीलांच्या या सुंदर हस्ताक्षराच्या छंदास आम्ही नवेरुप दिले. यामध्ये नवनवीन शोध घेतले. नवी निर्मिती केली. अक्षरे लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार आम्ही विकसित केले. यातूनच या कॅलिग्राफीचा उदय झाला.
कॅलिग्राफीबद्दल थोडक्यात…
राजेंद्र हंकारे – कॅलिग्राफी हा ग्रीक शब्द आहे. कॅली म्हणजे सुंदर कळी आणि ग्राफी म्हणजे मांडणी. सुंदर अक्षरांची मांडणी असा याचा सरळ साधा अर्थ आहे. मराठीत आपण याला चित्रलिपी म्हणू शकतो. पुर्वीच्याकाळी टाक, बोरू यांनी अक्षरे लिहीली जायची. जवळपास 19 व्या शतकांपर्यंत तरी टाक, बोरूचा वापर होत होता. आमचे वडील 1940 मध्ये शाळेत दौत आणि टाक घेऊन जात असत. त्यानंतर पेनाचा शोध लागला तसा टाक आणि बोरूचे महत्त्व कमी झाले. पण कॅलिग्राफीसाठी टाक, बोरू यांचाच वापर केला जाऊ लागला.
सध्या बोरु कॅलिग्राफी, ब्रश कॅलिग्राफी, स्टील ब्रश क्रलिग्राफी केली जाते. पण आर्टिस्टीक कॅलिग्राफीमध्ये विविध साधनांचा वापर करून कॅलिग्राफी केली जाते. उदाहरणार्थ स्पंज, झाडू, कंगवा, फणी, टुथब्रश, स्पंज रोलर याचा वापर करूनही सुंदर अक्षरे काढली जातात.
कॅलिग्राफीच्या प्रकाराबद्दल….
राजेंद्र हंकारे – विविध देशात कॅलिग्राफी केली जाते. नेपाळीज कॅलिग्राफी, तिबेटीयन कॅलिग्राफी, इस्लामिक कॅलिग्राफी, पारसियन कॅलिग्राफी, अरेबिक कॅलिग्राफी, जापनिज कॅलिग्राफी, चायनिज कॅलिग्राफी, देवनागरी कॅलिग्राफी, रोमन क्रॅलिग्राफी, मोडी कॅलिग्राफी असे विविध प्रकार पाहायला मिळतात. अरेबिक, पारसियन, इस्लामिक कॅलिग्राफी उजवीकडून डावीकडे केली जाते. देवनागरी, रोमन कॅलिग्राफी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर जापनीज आणि चायनिजमध्ये वरून खाली (टॉप टू बॉटम) उभी कॅलिग्राफी केली जाते.
देवनागरी कॅलिग्राफी आता मागे पडू लागली आहे. सम्राट अशोकाच्या काळातील “अ’ हे अक्षर आणि आत्ताचे “अ’ यामध्ये फरक आहे. त्याकाळात ब्राम्ही लिपी होती. पण काळानुसार अक्षरातील ठेवन बदलत गेली. लोकांना बदल हवा असतो. आम्ही दिल्लीतील भारतीय संग्रहालयात मांडलेली ब्राम्हीलिपी पाहिली. त्यानुसार आता या जुन्या लिपीला संजिवनी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कॅलिगाफी शिकण्यासाठी प्राथमिक लिखानाची ठेवण जाणून घेणे गरजेचे आहे. तरच तुम्ही उत्तम कॅलिग्राफी करू शकतो.
देवनागरी लिहिताना उजव्या बाजूस 45 अंशात कापलेले पेनाचे टोक आवश्यक आहे. अशा पेनाच्या टोकाने सुंदर, योग्य जाडीचे, रेखीवपणा असलेले अक्षर उमटते.
रोमन कॅलिग्राफीमध्ये डाव्याबाजूस 45 अंशात कापलेले पेनाचे टोक वापरले जाते. पेनाचे टोक ब्रॉड असेल तर अक्षरातील उठावदारपणा, बारकावे यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. अक्षरे सहजरित्या सुंदर उमटतात.
कॉपर प्लेट कॅलिग्राफी या प्रकारात पेनाचे टोक हे तिरकस (ऑब्लिकहोल्डर) असते. टाकाप्रमाणे हे टोक शाईमध्ये बुडवून अक्षरे काढली जातात. अक्षरे लिहिताना पेनावर कमी जास्त दाब देऊन सुंदर रेखीव अक्षरे काढली जातात. करस्यु रायटिंग हा प्रकार यातूनच आला आहे.
आपल्या कॅलिग्राफीबद्दल थोडक्यात…
राजेंद्र हंकारे – मी स्वतः कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राद्यापक म्हणून काम करतो. माझा भाऊ संजय हंकारे हे मुंबईमध्ये इंग्रजीचे प्राद्यापक म्हणून काम करतात. आम्ही दोघांनी नोकरी सांभाळत ही कला जोपासली आहे. कॅलिग्राफीवर आम्ही काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. रोमन कॅलिग्राफीमध्ये दोन पुस्तके आहेत. इंडियन कॅलिग्राफी लर्निग बुक अशी पुस्तके आहेत. अक्षरामध्ये विविधता आणत विविध फॉन्ट स्वतः विकसित केले आहेत. मासळीच्या आकारातील अक्षरे (फिश फॉन्ट), गुलाबाच्या आकारातील अक्षरे (रोज फॉन्ट), ग्राफिक क्रिएटिव्ह फॉन्ट, फ्युजन लेटर, ज्वेलरी डिझाईन लेटर्स, पाळण्याच्या आकारातील अक्षरे (कॅडल फोॅर्मेशन फॉन्ट) आम्ही विकसित केले आहेत.
जागतिक स्तरावरही आमच्या कामाची दखल घेतली गेली आहे. आम्ही 2012 मध्ये वॉशिंग्टन येथे झालेल्या कॅलिग्राफर्स ग्लुईड युएसए या पोस्टकार्ड साईज स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तसेच लंडन येथील केंट ब्रिटीश कॉन्फरन्स लायब्रीमध्ये भारताची प्रतिज्ञा सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली.
कॅलिग्राफीचा वापर कोठे होतो?
राजेंद्र हंकारे – तीच तीच अक्षरांची रचना पाहून कंटाळा येतो. यामुळे अक्षरातील बदलास महत्त्व आहे. सुंदर सुबक अक्षर नेहमीच हवे हवेसे असते. अशी सुंदर अक्षरे अनेक ठिकाणी वापरली जाऊ शकतात. अनेक वस्तूवर याचा वापर केला जाऊ शकतो. जाहिरातींचे फलक असोत किंवा लोगो असो तेथे अक्षरातील वेगळेपण हे हवे असते. पाण्याच्या बॉटलवर, पोस्ट कार्डवर, चहाच्या कपावरही अशी सुंदर अक्षरे लिहिली जाऊ शकतात. शर्ट, ओढणी, साडी ड्रेस आदी कपड्यावरही याचा वापर केला जातो. इतकेच काय दप्तर, बॅग, छत्री सुंदर दिसावी यासाठी त्यावरही अक्षरे लिहून त्याचे सौंदर्य वाढवले जाऊ शकते. घरामध्ये वॉलपेंटींगमध्येही कॅलिग्राफी केली जाते. इंटेरिअर डेकोरेशनसाठी सध्या बरीच मागणी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.