March 23, 2023
Home » कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान
संशोधन आणि तंत्रज्ञान

कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान

कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो.

लेखन – प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे 

जागतिक वार्षिक मृत्यूदरामध्ये हृदयरोगानंतर दुसरा क्रमांक हा कर्करोगाचा आहे. मानवी शरीर हे सुमारे दशलक्षाहून अधिक प्रकारच्या विविध पेशींपासून बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना पेशींचे विभाजन हे कठोर नियंत्रणात असते. मात्र या नियंत्रण व्यवस्थेमध्ये काही कारणांनी बिघाड झाल्यास पेशींची अनियंत्रित विभाजन होऊन वाढ होते या अवस्थेस कर्करोग असे म्हणतात. कर्करोग हा एक जटिल आजार आहे. कर्करोग (कॅन्सर) हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ खेकड्याच्या चाव्याप्रमाणे वेदना होण्याच्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे.पुरातन काळापासून कर्करोगाने मानवांवर परिणाम केला आहे परंतु गेल्या शतकात मृत्यूच्या उच्च दराचे हे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. कर्करोगाचा परिणाम व्यक्तींच्या कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, परंतु वृद्धापकाळातील लोकांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. एपिडेमियोलॉजिकल आणि एटिओलॉजिकल अभ्यासानुसार स्पष्टपणे निदर्शनास आले आहे की वय वाढल्यामुळे कर्करोगाच्या घटनांचा धोका वाढतो.

कर्करोग निर्माण होण्याच्या प्रक्रियेस कार्सिनोजेनेसिस असे संबोधितात. कॅन्सर होण्यास कारणीभूत घटकांना कार्सिनोजेन संबोधितात. विसाव्या शतकात सरासरी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली. यामुळे वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे आणि शेवटी कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

कर्करोगावर विजय मिळविण्याच्या मुख्य ध्येयासाठी अद्याप मानवी समाज संघर्ष करीत आहे. सामान्य पेशी या कर्करोगाच्या ऊतकात रूपांतरित होतअसतात. कर्करोगाच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या केमोथेरपी औषधे ही वेगाने विभाजन होणाऱ्या पेशीविरूद्ध सक्रिय असतात. ही औषधे कर्करोगाच्या पेशी तसेच सामान्य पेशी, विशेषत: केसांच्या फोलिकल्स, हाडांमधील रक्त पेशी आणि शरीरातील वेगाने विभाजित होणाऱ्या पचनसंस्थेच्या पेशी नष्ट करतात. गंभीर आणि विषारी दुष्परिणामांमुळे उपचारांची प्रभावीता गंभीरपणे मर्यादित राहते कारण रासायनिक औषधे कर्करोग आणि सामान्य पेशींमध्ये भेद करण्यास अक्षम आहेत. 

कर्करोगाचे पाच प्रकार

1) कार्सिनोमा: शरीराच्या अवयवांच्या बाहेरील स्तरांमध्ये कार्सिनोमाची सुरूवात होते. हा एखाद्या अवयवामध्ये किंवा ग्रंथीमध्ये विकसित होतो किंवा स्त्राव, फुफ्फुस, गर्भाशय, आतडे आणि मूत्रमार्ग यासारख्या स्राव करण्यास सक्षम असलेल्या अवयवांच्या बाह्यआवरणामध्ये उद्भवतो 

2) सॅक्रोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू आणि नसा सारख्या हाडांच्या मज्जाच्या बाहेरील सहाय्यक आणि संयोजी ऊतकां मध्ये व पेशींमध्ये उद्भवतो. सामान्यत: सॅक्रोमा मोठ्या प्रमाणात वेदनादायी असणारा कर्करोग आहे. 

3) लिम्फोमा: हे रक्त पेशींचे ट्यूमर असतात जे लिम्फॅटिक नोड्‌स आणि इम्यून सिस्टमच्या ऊतकांमध्ये उद्भवतात. 

4) ल्युकेमिया: हा कर्करोग हाडांच्या पोकळीतील रक्तपेशींमध्ये सुरू होतो आणि रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या श्वेत रक्त पेशींच्या असामान्य वसाहतींचे अत्यधिक उत्पादन करतो.. 

5) अडेनोमा: या प्रकारात ग्रंथीच्या पेशींमध्ये तयार होणारे ट्यूमर जसे स्तन, पिट्यूटरी, थायरॉईड, यकृत,अधिवृक्क, लाळ उत्पादक ग्रंथी इ. समावेश होतो 

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
 https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/

कर्करोगाची कारणे 

अ) अनुवांशिक घटक 

1) प्रोटो-ऑन्कोजेन्सः प्रोटो-ऑन्कोजेन्समधील उत्परिवर्तन ऑन्कोजेन तयार करतात ज्यामुळे कर्करोग होतो. 

2) ट्यूमर सप्रेसर जीन्स: हे जीन्स पेशींचे विभाजन थांबवण्यासाठी आदेश देतात आणि पेशींच्या मृत्यूचे नियमन करतात. ट्यूमर सप्रेसर जीन्समधील परिवर्तनांमुळे पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि कर्करोग होतो. उदा. पी-57, रास. 

3) सुसाइड जीन्स: या जीन्समध्ये उत्परिवर्तन झाल्यास पेशींचा नाश होतो आणि जर यामध्ये बदल झाले तर पेशी मरत नाहीत परंतु वेगाने विभाजित होतात व कर्करोग होतो. 

4) डीएनए-दुरुस्ती जीन्स: हे पेशींमध्ये खराब झालेले डीएनए दुरुस्त करतात. जर ही जनुके उत्परिवर्तित झाल्यास, ते कर्करोगास कारणीभूत असणा-या डीएनए नुकसानीस दुरुस्त करण्यात अक्षम ठरतात व कर्करोगाची सुरुवात होते. 

ब) कार्सिनोजेन्सः कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो. 

कार्सिनोजेन प्रकारावर आधारित, कार्सिनोजेनेसिसची प्रक्रिया विविध विभागांमध्ये विभागली गेली आहे. ते विभाग असे – 

1) रासायनिक कार्सिनोजेनेसिसः 

यामध्ये सेंद्रिय संयुगे, खनिजे, फूड कार्सिनोजेन, तंबाखू (निकोटिन), तंबाखूचा धूम्रपान, एस्बेस्टोस, ऑटोमोबाइल्सच्या एक्‍झॉस्ट धूर, डिझेल एक्‍झॉस्ट पार्टिक्‍युलेट्‌स, आर्सेनिक, निकेल इत्यादींचा समावेश आहे. सामान्यत: ज्ञात कार्सिनोजेनमध्ये एस्बेस्टोस, आर्सेनिक, बेंझिन, 

प्लास्टिक मधील बिस्फेनॉल ए (बीपीए), कीटकनाशके, डायऑक्‍सिन, अतिनील किरणे, पॉलीब्रॉमिनेटेड डायफेनिल एथर्स (पीबीडीई), तंबाखूचा धूर आणि पॉलिसायक्‍लिक, अरोमेटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच), अस्थिर सेंद्रीय संयुगे (व्हीओसी) यांचा समावेश आहे. बेंझोपायरिन या तंबाखूच्या धुम्रपानात असणाऱ्या पॉलिसायक्‍लिक सुगंधी हायड्रोकार्बनमुळे रासायनिक कार्सिनोजेनेसिस प्रक्रियेतून मुखाचा कर्करोग होऊ शकतो. 

2) आयनीकरण किरणांद्वारे कार्सिनोजेनेसिसः 

अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या तुलनेत आयनीकरण किरणें अत्यंत ऊर्जावान असतात. एक्‍स-रे, गॅमा किरण आणि इतर आयनीकरण किरणांमुळे डीएनएमध्ये अनुवांशिक बदल होतात. रेडिएशन प्रेरित कार्सिनोजेनेसिस दरम्यान, पाण्याच्या रेणूंनी उर्जा नष्ट होण्यामुळे पाण्याचे आयनीकरण होते आणि विरघळलेल्या इलेक्‍ट्रॉनसह मुक्त रॅडिकल्स तयार होतात. या मुक्त रॅडिकल्समुळे डीएनएच्या रचनेत बदल होतात 

3)अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे कार्सिनोजेनेसिसः 

मानवी त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे अतिनील किरणोत्सर्गाचा संसर्ग. बेसल सेल कार्सिनोमा (बीसीसी) आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (एससीसी) हे पूर्वी निदान झाल्यास त्यांचे उपचार केले जाऊन बरे होऊ शकतात. शरीरभर पसरण्याची त्यांची क्षमता खूपच कमी आहे. क्‍यूटानियस मॅलिग्नंट मेलानोमा (सीएमएम) त्वचेचा प्राणघातक कर्करोग आहे.त्वचेच्या कर्करोगाशी संबंधित मृत्यूमध्ये 75 टक्के मृत्यू यामुळे होतात. 

4) बायोलॉजिकल कार्सिनोजेनः यामध्ये निकोटिन, स्ट्रेप्टोमायसिस सारखे वनस्पती, प्राणी व किटकांमधील दूषित घटक आहेत कीटकांचे क्विनोन आणि ट्रामाटोड्‌स सारख्या परजीवी विषारी पदार्थांचाही यामध्ये समावेश होतो. 

5) ऑन्कोजेनिक विषाणू: या विषाणूंमुळे यजमान पेशींमध्ये कर्करोग होण्याची शक्‍यता असते अशा स्वरुपाचा आणि जीवरासायनिक बदल होऊ शकतो. उदा. लैंगिक अवयवांचा कर्करोग हा ह्यूमन पॅपिलोमा विषाणूमुळे होतो. 

6) वय: कर्करोगाचा धोका वाढत्या वया प्रमाणे वाढतो परंतु तो कोणत्याही वयात तो उद्भवू शकतो. 

7) जीवनशैली: जास्त मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. 

8) पोषणः लाल मांसाशी संबंधित आहार, उच्च कॅलरी आणि भाज्या व फळांचा अभाव यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. आहारातील खराब सवयींमुळे लठ्ठपणात वाढ होऊन स्तन, गर्भाशय आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्‍यता वाढते 

9) रोगप्रतिकारक यंत्रणा: दुर्बल रोगप्रतिकारक यंत्रणाअसलेल्या लोकांना लिम्फोमासारखे कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त असते. 

कर्करोगाचा प्रतिबंध 

कर्करोगाचा उपचार करण्यापेक्षा त्याला होण्यापासून प्रतिबंध करणे हे उत्तम आहे. हा एक जटिल प्रकाराचा आजार आहे. याला आंतरिक घटक जनुके, जीवनशैली, वय आणि बाह्यपर्यावरणीय घटक जबाबदार असतात. त्यापैकी एक किंवा बरेच घटक कर्करोग होण्याचा धोका निर्धारित करतात. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी म्हणून घेतलेल्या उपायांना कर्करोग प्रतिबंध म्हणतात. यामध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ टाळणे, जास्त प्रमाणात धूम्रपान व मद्यपान न करणे, निरोगी वजन राखण्यासाठी शारीरिक हालचाली व योग्य व्यायाम करणे, नियमित लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. 

(लेखक हे कॅन्सर संशोधक आहेत.) 

Related posts

हुंजा पर्वतरांगातील तारुण्यामागचे रहस्य

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

रासायनिक खताच्या दुष्परिणामावर ‘नॅनो युरिया’चा पर्याय

Leave a Comment