संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती
गाणी-कविता वाचन – पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन
निमंत्रित कवींचा स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन केला जाणार सत्कार : कवीना संपर्क साधण्याचे आवाहन
कणकवली – साहित्य – संगीत प्रेमी मित्र मंडळ कणकवलीतर्फे जानेवारी २०२५ मध्ये कणकवली येथे साहित्य – संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य – संगीत रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी केले आहे.
एका कलेचा दुसऱ्या कलेशी निकटचा संबंध असतो किंबहुना सर्वच कला एकमेकाशी प्रवाहित झालेल्या असतात. साहित्य आणि संगीत या दोन कला तर एकमेकाला अधिक पूरक असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर येथील साहित्य संगीत प्रेमी मित्र मंडळातर्फे सदर साहित्य संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत कलाकारांना तसेच साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संमेलनाचे अध्यक्ष आणि संमेलनाची रितसर रूपरेषा काही दिवसातच जाहीर करण्यात येईल. मात्र या संमेलनात नव्या गुणवंत गायकांची गाणी तसेच निमंत्रित कवींचे कविसंमेलन आणि संगीत व साहित्य आणि कला क्षेत्रातील प्रत्येकी एका गुणवंत कलावंताचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहितीही श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी दिली.
कविसंमेलनात सहभागी होणारे कवी कोणत्याही भागातील सहभागी होऊ शकतात. मात्र तीस कवींना निमंत्रित करून त्यांचे कविता वाचन आयोजित केले जाणार आहे. त्याचबरोबर या सहभागी कवींचा स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सत्कारही केला जाणार आहे. मात्र प्रथम नाव नोंदवणाऱ्या कवीना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. तरी पुढील मोबाईल नंबर आपले नाव कवींनी कळवावे असे आवाहनही श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक – 99605 03171
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.