April 14, 2024
Bhartiya Bhasha Aani Sahitya Sunilkumar Lavte Book Review
Home » भारतीय भाषा अन् साहित्याविषयी जाणून घेण्याची इच्छा वृद्धिंगत करणारे पुस्तक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भारतीय भाषा अन् साहित्याविषयी जाणून घेण्याची इच्छा वृद्धिंगत करणारे पुस्तक

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे. असे कवी कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेत म्हटले आहे. याची आठवण करून देत डॉ. लवटे यांनी हे पुस्तक वाचून त्या-त्या भाषा आणि त्यांच्यातील साहित्य याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल आणि तशी ती व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच त्यांची ही आशा फलदायी ठरते अशी अनुभुती येते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

भारतीय भाषा व साहित्य पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –

जागतिकीकरणाचे भारतीय समाज जीवनावर अनेक परिणाम झाले आहेत. दळणवळणाच्या साधनांचा विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे वाडी, वस्ती, गाव, शहर आणि महानगर यावर परिणाम दिसून येतो. गावांचा विस्तार वाढत आहे. शहर आणि लगतची गावे यात अंतरच राहीले नाही. साहजिकच पिकाऊ जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहीली आहेत. अशा या बदलांबरोबरच माणसाच्या विचारसरणीतही मोठे बदल झालेले पाहायला मिळतो आहे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांसह आत्महत्या, छळवाद, भावनिक तणाव, खूण, मारामाऱ्या असे गुन्हेगारीचे जग विस्तारले आहे. चोरी, लुटीचे प्रकारही आता बदलत्या काळानुसार बदललेले पाहायला मिळत आहेत. कधी कोण कसा लुटला जाईल याची शाश्वती राहीलेली नाही. अशा या घटनात राष्ट्रीयत्व, परंपरा, मूल्य आदीची होणारी घसरण चिंताजनक आहे. भाषिक वादही आता विकोपाला गेलेले पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत भारतीयत्वाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र आणून आंतरभारतीचे स्वप्न साकारायला हवे. सध्या संगणकाच्या विकासाने अन् गुगुल, युनिकोडमुळे तर आंतरभारतीचे स्वप्न न राहता सत्य बनले आहे. आता फक्त उदारमतवादी प्रयत्न व स्वीकार वृत्तीची गरज आहे. मोबाईलमुळे तर आता भाषिक अंतर मिटल्यातच जमा आहे. अशा या परिस्थितीत साने गुरुजी यांच्या आंतरभारतीची व रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारतीची चळवळ रुजविण्याची गरज आहे. यासाठीच भारतीय भाषांची ही माती आणि या मातीत फुललेल्या साहित्याच्या मळ्यांचा अभ्यास हा गरजेचा आहे. या मळ्यास फुललेल्या सर्व साहित्याचा आस्वाद घ्यायला हवा. यासाठी या मातीची ओळख करून घेण्यासाठी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे भारतीय भाषा व साहित्य हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक असे आहे.

दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत केल्या जाणाऱ्या भाषा सर्वेक्षणात भारतातील अनेक भाषा लुप्त झाल्याची नोंद पाहायला मिळत आहेत. भारतात आज घडीला ८८० भाषा बोलल्या जातात. पण गेल्या पन्नास वर्षात भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या आहेत. ही घट थांबवायची असेल तर भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. दहालाखापेक्षा अधिक लोक बोलतात अशा भाषांची संख्या २९ आहे तर राज्यघटनेने आठव्या परिशिष्ठात २२ भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. या भाषांची तोंडओळख करून देणारे डॉ. लवटे यांचे हे पुस्तक आहे. भारतीय साहित्य अनेक भाषातून लिहिले जात असले तरी तिचे स्वरुप मात्र एकात्म असल्याचे भारतीय भाषा आणि साहित्याचे स्वरुप या पहिल्याचे प्रकरणात डॉ. लवटे यांनी म्हटले आहे.

भारतीय भाषा व साहित्य पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –

भारतात असणारे भाषावैविध्य जगात इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही. याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत अनुवादीत करून या दोन्ही भाषिकांमध्ये एकोपा निर्माण केला जाऊ शकतो. भारतीय भाषा आणि साहित्यातून आंतरभारती उपक्रम यशस्वी करण्यासाठी एकविसावे शतक वरदान म्हणून उदयाला आले आहे. या दृष्टिने पाहायला हवे. यासाठीच आंतरभारतीची भाषा भगिनी ही संकल्पना समजून घ्यायला हवी. हे समजण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी डॉ. लवटे यांचे हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक असे आहे.

आसामी भाषा अन्य भारतीय भाषा प्रमाणेच प्राचिन आहे. आसामची मूळ वस्ती शम वंशाची. याशमचे सम झाले. श, सच्या आधी अ उपसर्ग लावण्याचा प्रघात यावरूनच आसाम झाले. आसाम म्हणजे अपराजित प्रदेश. चहाच्या पानातून आसामी भाषेचा दरवळ संपूर्ण जगभर पसरलेला आहे. तिबेटी, ब्रह्मी, ऑस्ट्रियाई, आशियाई भाषात तिची पाळेमुळे अडकलेली आहेत. मागधी भाषेतून आसामी जन्माला आली. यामुळे बंगाली, उडिया, मैथिलीत तिचे साम्य आढळते. बौद्ध साहित्यातील चर्यापद ग्रंथामध्ये आसामीचे आदिम रुप दिसते येथपासून ते ज्ञानपीठ विजेत्या मृत्यूंजय कादंबरीकार बीरेंद्र कुमार भट्टाचार्य, इंदिरा गोस्वामी पर्यंतच्या साहित्याची माहिती देण्यात आली आहे.

भारताला साहित्यात लाभलेले एकमात्र नोबेल पारितोषिक बंगालीमध्ये आहे. बंगाली भाषेचा इतिहास संस्कृत इतकाच हजारो वर्षांचा आहे. भारताचे राष्ट्रगीत बंगालीमध्ये आहे. इतकेच नव्हेतर भारतीय भाषांतील समृद्ध साहित्यपरंपरा बंगालीत आहे. तशी ही इंडोआर्यन भाषा. राढ, पूर्वबंग, बरेंद्रभूमी आणि कामरूप बोलीतून विकसित झालेली ही भाषा आहे. आजच्या आसामी, मैथिली, उडिया भाषांची ही भगिनी असून तिची लिपी देवनागरीतून विकसित झालेली आहे. काही अक्षरे वर्ण विशेषतः ख, ग, श हे तमिळ लिपीशी साम्य साधणारे आहेत. या बंगाली लिपीतूनच मैथिली भाषेचा विकास झाल्याचे मानले जाते. अशा या बंगालीची साहित्यपरंपरा प्रागैतिहासिक आहे. बौद्ध साहित्यातील चर्यापदमध्ये प्रारंभिक बंगालीच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या बंगालीच्या साहित्य परंपरेचा आढावा डॉ. लवटे यांनी घेतला आहे.

अल्पसंख्याक तरी सरस नि सकस असा गौरव करत बोडो भाषेतील साहित्याची ओळख या पुस्तकात करुन दिली आहे. स्वभाषाविषयक लेखन करून बोडो भाषिकांनी बोडी बोलीला भाषिक रुप देण्याचा प्रयत्न केला. साहित्य सभेची स्थापना करून भाषा विकास केला. समकालीन जगण्याचे प्रश्न व संघर्ष यांचे प्रभावी चित्र बोडो साहित्यात आढळते. या साहित्याची ओळख डॉ. लवटे यांच्या या प्रकरणातून होते. अलीकडच्या काळातील ज्या बोलींना भाषेचा दर्जा प्राप्त झाला अशा बोडो, संथाली, मैथिली, मणिपुरी भाषांपैकी डोंगरी ही अशी एकमात्र भारतीय भाषा आहे की, जी भाषा होऊनही तिच्यात बोलीत लिहिण्याची परंपरा अखंडित राहिली आहे. सुईचं क्षेपणास्त्र बनवून लढणारी भाषा असा डोंगरीचा उल्लेख करत या भाषेची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.

भारतीय भाषा व साहित्य पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.in/d/7b65fTn

गुजराती ही आर्यकुलातील भाषा. शौरसेनीपासून तिचा विकास झाला. गुजरातीची स्वतःची एशी लिपी आहे, पण तिच्यावर देवनागरीचा मोठा प्रभाव आहे. मराठीचाही प्रभाव आहे. अशी ही महाराष्ट्र भगिनी गुर्जरा भाषिक गुजराती भारतातील सर्व प्रांतात आढळतात. या भाषेतील लेखनपरंपरा बाराव्या शतकापासून विकसित झाली आहे. यातील साहित्याची तोंडओळख या पुस्तकातून होते. भारतीयांचे हृद्यसिंहासन असणाऱ्या हिंदीचा प्रवासही या पुस्तकात मांडला आहे. लोकव्यवहारातून हिंदी ही केव्हाच भारतीय जनसमुहाची लोकभाषा बनली आहे. आज अनेक विश्वभाषी वा भारतीय भाषांतील साहित्यकृतीवर हिंदी चित्रपट अथवा धारवाहिक मालिका तयार होत असून त्या जगभर पाहील्या जात आहेत. हिंदीचे हे विश्वभारती, आंतरभारती रुपच तिला एक दिवस संयुक्त राष्ट्रसंघाची भाषा बनवेल असा आशावादही डॉ. लवटे यांनी व्यक्त केला आहे.

तमिळ, तेलुगू, मल्ल्याळम्, कन्नड या द्रविडी भाषा म्हणून ओळखल्या जातात. यात तमिळ भाषा प्राचीन मानली जाते, पण सर्वाधिक जुने द्रविड लिखित सापडते ते कन्नडमध्ये. संस्कृतइतकीच कन्नड प्राचीन मानली जाते. नवव्या शतकापासून कन्नडमध्ये लिखित साहित्य आढळते. कविराजमार्ग हा पहिला ग्रंथ त्याच काळातील आहे येथ पासून ते यातील विविध साहित्याचा आढावा घेत कन्नड मराठी सावत्र नव्हे तर सख्या बहिणी असल्याचेही मत डॉ. लवटे यांनी व्यक्त केले आहे. संकटांना पुरून उरलेले इंद्रधनुष्य अशी उपमा काश्मिरी भाषेस डॉ. लवटे यांनी दिली आहे. भारतातील सर्वाधिक उंच प्रदेशात बोलली जाणारी ती भाषा आहे. संस्कृत आणि इराणी भाषिक संकरांनी तयार झालेली पैशाचि भाषा, हे वर्तमान काश्मिरी भाषेचे आद्यरुप आहे. नैसर्गिक अस्थिरपणामुळेच काश्मिरी कादंबरीला फार मोठा वाचकवर्ग लाभला नाही. पण काश्मिरीत नृत्य आणि नाट्यपरंपरा समुद्ध आहे.

कोंकणी वाचूंक लागशात, सवंय सुटची ना..असे या कोकणी भाषेचे वैशिष्ट्य आहे. एकदा का तुम्ही कोकणी बोलू, वाचू लागलात की मग तिची सवय-संगत सुटणे अवघड आहे. स्वभाषिक विकास करत परभाषिक सामर्थ्य आपल्या भाषेत निर्माण करणे म्हणजे खरा भाषिक विकास. याच तत्त्वामुळे कोकणी आजही टिकूण आहे. नामदेव गाथेत काही कोकणी शब्द आढळतात. पोर्तुगीज भाषेतही काही कोकणी शब्द आढळतात. अशा या कोकणीचा इतिहास आणि साहित्याची माहिती या पुस्तकात मिळते. मल्ल्याळम् ही भारतातील श्रेष्ठ साहित्य असलेली भाषा त्यामुळे डॉ. लवटे यांनी संपन्न साहित्यस्वर असे या भाषेस संबोधले आहे. मल्ल्याळम् भाषा तशी तामिळ पुत्री, भगिनी. तिच्यावर संस्कृतचाही मोठा प्रभाव आहे. मणिपुरी ही अल्पसंख्यभाषी भाषा होय. भारतात अवघे चार लाख लोक मणिपुरी बोलतात. असे असले तरी बालभारतीपासून ते पी.एचडी पर्यंत मणिपुरी भाषेत शिक्षण घेता येते. इतकेच काय अनेक विद्यापीठात स्वतंत्र मणिपुरी भाषा विभाग आहेत.

कोणतीही भाषा वा साहित्य त्याच्या श्रेष्ठत्वाची आणि तिचे मृत्युंजयी वा चिरंतन होणे याची एकमात्र कसोटी असते. मराठी ही निरंतर वर्धिष्णू व विकसित होत जाणारी भाषा असल्याने तिचे साहित्यही नित्य आधुनिक होताना दिसते आहे. वर्तमान भारतीय भाषांमध्ये आज ती अभिजात नसली तरी अत्याधुनिक भाषा म्हणून तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अमृताची पैज जिंकणारे साहित्य मराठीत आहे, अशा शब्दात डॉ. लवटे यांनी मराठीचा गौरव केला आहे. मैथिली भाषाचे वैशिष्ट्य विषद करताना डॉ. लवटे म्हणतात, विद्यापती, जयदेवसारख्या कवींच्या कोमलकांत पदावलीतून पदन्यास करणारी मैथिली भारतीय भाषांची कोकिळ भाषा आहे. या भाषेसारखे नादमाधुर्य, कोमलता, अनुप्रासिकता तुम्हास अन्य कोणत्याच भाषेत आढळणार नाही. नेपाळीला तर त्यांनी हिमालयाची गर्द सावली म्हटले आहे. उडिया भाषेचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात, ही भाषा ब्राह्मी लिपीत लिहिली जाते. तिची पूर्व रुपे अशोकाच्या कलिंग येथील शिलालेखात आढळतात. म्हणून या लिपीस कलिंगी लिपी म्हणूनही ओळखले जाते. पंजाबी भाषेच्या उदयाबद्दल सांगताना ते म्हणतात, मझी, दोआबी, माळवी, पत्यावली, डोंगरी, चंबा, पहाडी, ल्यालपुरी, मुलतानी, हिंडको, पोथोहारी अशा कितीतरी बोलीच्या संयोगातून आजची पंजाबी भाषा उदयास आली आहे. एखादी भाषा अथवा भाषिक समूह आपले अस्तित्व आणि अस्मिता जपण्यासाठी कसा धडपडत असतो, हे ज्यांना पाहायचे, अनुभवायचे असेल त्यांनी संथाली भाषा व साहित्याचा अभ्यास केला पाहीजे, असे डॉ. लवटे यांनी विषद केले आहे.

संस्कृत ही इ.स. पूर्व १५०० पासून अस्तित्वात असलेली प्राचिन भाषा. आजही न्याय, तत्त्वज्ञान, संगीताची हीच भाषा आहे. आजही संस्कृतमध्ये कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, काव्य, महाकाव्य, अनुवाद, समीक्षा, कोशलेखन होत आहे. संस्कृतपासूनच सिंधी भाषेचा जन्म आहे. स्वयंविकासाचे निःशब्द रहस्यसूत्र असे सिंधी भाषेस डॉ. लवटे यांनी म्हटले आहे. तमिळ ही द्रविडी किंवा दक्षिणी भाषांतील प्राचीन भाषा आहे. इसवी सन पूर्व ६०० च्या आधीपासून या भाषेत साहित्यनिर्मिती होत आहे. तर तेलुगू भाषेचे वर्णन सर्वव्यापी, सर्वगुणसंपन्न, सर्वस्पर्शी यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. या भाषेने स्वतःचा विस्तार करत माधुर्य कायम राखले आणि हेच या भाषेचे सगळ्यात लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले आहे. उर्दू आज स्वतंत्र भाषा असली तरी तिची उगम हिंदीपासून झाला आहे. तिचे मूळ नाव हिंदूई, हिंदुस्तानी असे होते. अमीर खुसरोने तिचा उल्लेख अनेकदा हिंदी असाच केलेला आढळतो. असे पुरावे देत भाषेंची आणि भाषेतील साहित्यिकांची तोडओळख डॉ. लवटे यांनी या पुस्तकात करून दिली आहे.

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे. असे कवी कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेत म्हटले आहे. याची आठवण करून देत डॉ. लवटे यांनी हे पुस्तक वाचून त्या-त्या भाषा आणि त्यांच्यातील साहित्य याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल आणि तशी ती व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच त्यांची ही आशा फलदायी ठरते अशी अनुभुती येते.

पुस्तकाचे नाव – भारतीय भाषा व साहित्य
लेखक – डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक – साधना प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे
किंमत – २०० रुपये, पृष्ठे – १८६
पुस्तकासाठी संपर्क – ०२०-२४४५९६३५

भारतीय भाषा व साहित्य पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –

Related posts

हे राज्य..

भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

Saloni Art : असे रेखाटा थ्रीडी कार्ड…

Leave a Comment