नर्मदा परिक्रमेसंदर्भात अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत पण हे पुस्तक नक्कीच इतरांनाही ‘साधक’वृत्तीने नर्मदा परिक्रमा करण्यास प्रेरित करेल याची खात्री आहे. राजा दांडेकर यांना त्यांच्या साधनामय जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !
प्रव्राजिका विशुद्धानंदा (भारती ठाकूर)
नर्मदालय, लेपा पुनर्वास, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश
नर्मदा परिक्रमेचे आकर्षण आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी क्वचित कोणी एखाद दुसराच परिक्रमेला निघायचा पण आज मात्र हजारोंच्या संख्येने परिक्रमावासी बघायला मिळतात. त्यातही कुतुहल म्हणून परिक्रमा करणारे, ट्रेकिंगची हौस भागवणारे तर काही आता सर्व तीर्थयात्रा झाल्या फक्त नर्मदा परिक्रमा राहिली आहे म्हणून ती करून ‘टाकणारे’ असे अनेक प्रकार या परिक्रमावासीयांचे अनुभवायला मिळतात. अशा सगळ्या परिक्रमावासीयांत समाज दर्शन व्हावं, साधना घडावी आणि ‘स्व’ चा शोध घेण्यासाठी परिक्रमेला निघालेले देखील काही असतात. त्यातलेच एक म्हणजे राजा दांडेकर. त्यांचे आजवरचे जीवन ही देखील एक समाज साधनाच होती. नर्मदा परिक्रमेचे त्यांचे अनुभव ‘लोकमाता नर्मदा – एक शोध यात्रा’ या पुस्तकात त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. केवळ नर्मदा नदीच नाही तर या प्रवासात भेटलेली माणसे, संस्था, आश्रम – साधू संत या साऱ्यांचे वर्णन इतके हुबेहूब आहे की आपणच त्यांच्या बरोबर परिक्रमा करत आहोत असे वाटावे. नर्मदा परिक्रमेसंदर्भात अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत पण हे पुस्तक नक्कीच इतरांनाही ‘साधक’वृत्तीने नर्मदा परिक्रमा करण्यास प्रेरित करेल याची खात्री आहे.
नर्मदे हर !….
डॉ. राजा दांडेकर
माझ्या मनातली नर्मदा परिक्रमा ही स्व-परिक्रमा | आणि पर-परिक्रमाही असावी अशी इच्छा होती. ती स्वतःबरोबर आणि स्वतःच्या आत केलेली परिक्रमा असणार होती. दैनंदिन जीवनात आपण स्वतःबरोबर किती असतो ? म्हणून स्वतःच स्वतःबरोबर अशी माझी स्वपरिक्रमा करावीशी वाटत होती. त्याचवेळी ४ राज्यं आणि ८०७ गावांतून समाजाभिमुख राहून करायची अशी ती पर-परिक्रमाही असणं अपेक्षित होतं. नद्यांना लोकमाता म्हटलं जातं. समाजाभिमुख राहण्याच्या माझ्या आंतरिक ऊर्मीमुळे, माझी आंतर- परिक्रमा ही एकप्रकारे लोकमाता नर्मदेची, तिच्या काठावरच्या लोकजीवनाची शोधयात्राही ठरणार होती. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय स्व-स्वरूपाची प्राप्ती अथवा जाणीव हेच आहे. तेच परिपूर्ण निरपेक्ष असं शाश्वत सुख आहे. आणि नर्मदा परिक्रमा हा शाश्वताकडे जाण्याचा मार्ग आहे.
पुस्तकाचे नाव – लोकमाता नर्मदा एक शोधयात्रा
लेखक – डॉ. राजा दांडेकर
प्रकाशक – उन्मेष प्रकाशन
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.