November 21, 2024
कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकपुर्ली येथे उत्पादित होणारी बर्फी प्रसिद्ध आहे. ही बर्फी तयार कशी केली जाते हे जाणून घ्या...
Home » ठिकपुर्ली बर्फीत स्वयंपूर्ण मांगले कुटुंब इतरांसाठी आदर्श
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ठिकपुर्ली बर्फीत स्वयंपूर्ण मांगले कुटुंब इतरांसाठी आदर्श

ठिकपुर्लीतील सुमारे २० ते २५ कुटुंबे हा बर्फीचा उद्योग करतात. या गावाच्या नावानेच ही बर्फी प्रसिद्ध झाली आहे. येथील मातीची, दुधाची चवच यासाठी कारणीभूत आहे. असे छोटे छोटे बँड ग्रामीण विकासासाठी मोठे सहाय्यक ठरत आहेत. अशा या उद्योगांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांच्या वाढीसाठी, विकासासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. मांगले कुटुंबाचा माऊली बर्फीचा हा स्वयंपूर्ण उद्योग इतरांसाठी निश्चितच आदर्शवत आहे. त्यांच्या या उद्योगाबाबत…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

ठिकपुर्ली बर्फी कशी तयार करतात ? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा

ठिकपुर्ली बर्फी कशी तयार करतात ? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा

नव्वदच्या दशकात राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली हे गाव चवदार बर्फीसाठी प्रसिद्धीस आले. पाचहचार लोकवस्ती असणाऱ्या या गावातील सुमारे २० ते २५ कुंटुबे आज बर्फीचे उत्पादन करतात. राधानगरी, गारगोटी या भागातील शेतीमध्ये भात हेच मुख्य पिक अन् रब्बीमध्ये हरभरा या व्यतिरिक्त सध्या उसाचे क्षेत्र वाढले आहे. पण तुकड्या तुकड्यांची शेती, त्यातच अल्पभुधारक शेतकरी यामुळे निव्वळ शेतीवर घर चालवणे खूपच कठीण. त्यातच नव्वदच्या दशकात बदललेली आर्थिक धोरणे अन् तरुणांचा शहराकडे नोकऱ्यांसाठी ओढा यामुळे शेतीमध्ये कोण राबणार हाच मोठा प्रश्न होता. तुटपुंज्या उत्पन्नामुळे शेतीला पुरक उद्योग उभा राहावा अशीच धारण या भागातील शेतकऱ्यांची होती. पण उद्योग करणार कसा ? भांडवलही हवे. त्यातच काहीत स्थावर मालमत्ता नसल्याने कर्ज देण्यासाठी बँकाही धजावत नसत.

अशा या परिस्थितीत गावातील काही शेतकऱ्यांनी बर्फी करून विकायची ठरवली. कारण बर्फीसाठी दुध, साखर अन् वेलची इतकेच साहित्य लागते. हे साहित्य सहज उपलब्ध अन् कमी खर्चात येत असल्याने शंकर मांगले, शहाजी चौगले, आनंदा मळगे यांच्यासह गावातील काहींनी करून तरी पाहावे म्हणून हा उद्योग सुरू केला. गावातीलच पाटील नामक आचाऱ्याने या सर्वांना बर्फीच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. घरातच बर्फीचे उत्पादन करून विक्री सुरू केली. परिसरातील हॉटेल, दुकानात जाऊन बर्फीची विक्री होऊ लागली.

ठिकपुर्ली गावात उत्पादित होणाऱ्या बर्फीची चव वेगळी अन् वैशिष्ट्यपूर्ण असल्याने अवघ्या थोड्या कालवधीतच या बर्फीची प्रसिद्धी झाली. हा उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने शंकर मांगले यांनी देना बँकेचे ६५ हजार रुपयांचे कर्ज काढून खवा मशीन खरेदी केले. पण यात फारसे यश न मिळाल्याने त्यांनी बर्फीचाच उद्योग वाढविण्याचा निर्णय घेतला. यातूनच अवघ्या चार – पाच वर्षात कर्ज फेडून या उद्योगात ते स्वयंपुर्ण झाले.

बर्फी तयार करण्याची सोपी पद्धत

चुलीवर कढई ठेवून त्यामध्ये दुध तापत ठेवण्यात येते. लाकडाच्या मंद आचेवर दुध आटवण्याची ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यामध्ये साखर व वेलची पावडर टाकण्यात येते. साधारणपणे तेरा लिटर दुध एकावेळी कढईत मावते. त्यामध्ये अडीच किलो साखर व वेलची पावडर टाकून ते आटवण्यात येते. सुमारे एक ते दीड तासाच्या कालावधीत हे दुध आटून त्यापासून बर्फी तयार होते. तेरा लिटर दुधापासून सुमारे १३० बर्फीचे नग तयार होतात.

मांगले बंधुंचा बर्फीचा उद्योग

शंकर मांगले यांनी सुरु केलेल्या या व्यवसायात आता त्यांची पत्नी छाया, दोन्ही मुले अक्षय व अतुलही हातभार लावत आहेत. सुरुवातील दररोज केवळ चार आदणे म्हणजे ४० ते ५० लिटर दुधाची बर्फी ते करत होते. आता मात्र १५० ते २०० लिटर दुधाची बर्फी रोज तयार करून जागेवरच त्या बर्फीची विक्री रोजच्या रोज करतात. शेळेवाडी फाट्यावर त्यांनी हा बर्फीचा व्यवसाय सुरु केला आहे. कोल्हापूर – गारगोटी मार्गावरच शेळेवाडी बसस्टॉप लगतच ही बर्फी तयार केली जात असल्याने तयार झालेली बर्फी हातोहात जाग्यावरच खपते. रोज बर्फीचे १७०० ते १८०० नगाचे उत्पादन होते. बर्फीचा एक नग १२ रुपयांना विकला जातो. तर ३६० रुपये किलोच्या दराने बर्फीची विक्री केली जाते.

उद्योगाबाबत बोलताना अक्षय मांगले म्हणाले, शेती एक एकरच आहे. त्यावर संसार चालवणे कठीण असल्याने वडीलांनी हा व्यवसाय सुरु केला. माझे व भावाचे दोघांचेही बारावी पर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर इतक्या शिक्षणावर नोकरीत किती पैसे मिळणार म्हणून वडिलांनी चालवलेला हा व्यवसायच मोठा करण्याचा निर्णय आम्ही बंधुंनी घेतला. चार वर्षापूर्वी शेळेवाडी फाटा येथे भाड्याने जागा घेऊन बर्फीचे उत्पादन व जाग्यावरच विक्री सुरू केली. यासाठी मात्र सकाळी साडे पाचपासून राबावे लागते. दुध संकलनापासून सुरूवात होते. ठिकपुर्ली व आसपासच्या चारपाच गावातील शेतकऱ्यांकडून रोज १५० ते २०० लिटर म्हैशीचे दुध आम्ही खरेदी करतो. लिटरला ७० रुपये भावाने ही खरेदी आम्ही करतो. दुध संकलन करणाऱ्या डेअरी उद्योगापेक्षा हा दर जास्त असल्याने शेतकरी आम्हाला दुध देण्यास प्राधान्य देतात. तसेच दुध शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जाग्यावर जाऊन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांनाही यात समाधान वाटते.

लग्न, वाढदिवसाच्या निमित्तानेही मागणी

बर्फीची विक्री जागेवरच होते. तसेच लग्न, वाढदिवस आदी कार्यक्रमाच्या निमित्तानेही बर्फीची ऑर्डर घेतली जाते. यासाठी दुधाच्या संकलनापासून सर्व तयारी आगाऊ करावी लागते. यातूनही चांगले उत्पन्न मिळते तसेच बर्फीची प्रसिद्धीही होत राहाते.

लाकडाची आगाऊ खरेदी

दररोज अंदाजे २२ किलो लाकूड लागते. रोजच्या रोज लाकूड खरेदी करणे शक्य होत नाही. त्यातच पावसाळ्यासाठी आगाऊ लाकूड खरेदी करावी लागते. लाकडे ओली होणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागते. अंदाजे साडे पाच हजार रुपये टनाने लाकडाची आगाऊ खरेदी केली जाते.

बर्फीच्या उत्पादनासाठी एका आदणासाठी होणारा खर्च –

दुध – १३ लिटर – ९१० रुपये
साखर – अडीच किलो – १०० रुपये
लाकुड – ४० रुपये
वेलची पावडर – १० रुपये
कामगार मजुरी – ५० रुपये

एक आदनासाठी अंदाजे – १२०० रुपये खर्च येतो.

एका आदनातून अंदाजे १३० बर्फी निघते. त्याच्या विक्रीतून १५०० रुपये मिळतात. खर्च वजा जाता साधारण ३०० रुपये मिळतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading