ठिकपुर्ली बर्फी ब्रँड म्हणून विकसित करण्याची गरज
दुधाला दर नाही म्हणून ओरडत बसण्यापेक्षा दुधापासून अशी उत्पादने घेऊन स्वयंपूर्ण उद्योग उभे केल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. यासाठी शासनस्तरावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. असे उद्योग कसे वाढतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ठिकपुर्ली बर्फीतून येथील दुधाला न्याय मिळत आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते डॉ. जालंदर पाटील यांच्याशी केलेली बातचीत…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
ठिकपुर्ली बर्फीबद्दल आपले मत ?
डॉ. जालंदर पाटील – शेतीपुरक उद्योगासाठी शासन प्रयत्न करत आहे. तज्ज्ञ त्या अनुशंगाने मार्गदर्शनही करत आहेत. ठिकपुर्ली बर्फी हा त्या शेतीपुरक उद्योगातला तो एक चांगला उद्योग आहे. त्याला खरंतरं ब्रँडिंगची गरज आहे. भारत ब्रँडिंगच्याबाबतीत प्रगत देशांच्या तुलनेत पाठीमागे आहे. गणेश हिंगमिरे यांच्यासारख्या व्यक्ती ब्रँडिंगसाठी काम करत आहेत. ठिकपुर्लीच्या बर्फीचे आता जनतेमध्ये ब्रँडिंग व्हायला लागले आहे. तो एकजर चांगला ब्रँड विकसित झाला तर या परिसरातील दुधाला न्याय देऊ शकणारा तो एक मोठा उद्योग बनू शकतो.
ठिकपुर्ली बर्फीचा उद्योग कसा फायदेशीर आहे ? आकडेवारीत पटवून देऊ शकाल का ?
डॉ.जालंदर पाटील – दोनशे लिटर दुध आटवलं तर त्यापासून ५० किलो खवा तयार होतो. या पन्नास किलो खव्यात दीडशे किलो साखर घातली तर दोनशे किलोची मिठाई तयार होते. म्हणजे तुमची बर्फी तयार होते. दोनशे लिटर दुधाचे साठ रुपये दराने बारा हजार रुपये होतात. दीडशे किलो साखरेचे ३१०० रुपयेच्या दराने ४६०० रुपये साखरेचे होतात. दरातील कमीजास्तपण विचारात घेऊन या दोन्हीचे १७ हजार रुपये होतात. इंधन, मजुरी व इतर खर्च चार हजार रुपये होऊ शकतो. साधारण २० ते २१ हजार रुपये उत्पादन खर्च आहे. आज मिठाईचा दर ३६० ते ५०० रुपये किलो पर्यंत आहे. म्हणजे यातून सुमारे एक लाख रुपये मिळतात. सर्व खर्च वजा जाता या उद्योगात ४० ते ५० हजार रुपये मिळतात. असे शेतीपुरक व्यवसाय शेतकऱ्यांनी उभे केले तर शेतीतील दारिद्र संपूण जाईल असे मला वाटते.
सरकारी योजनेबद्दल आपले मत काय ?
डॉ. जालंदर पाटील – सध्याचे सरकार भिकारी बनवण्याच्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे वाटप असो किंवा आत्ताची लाडकी बहीण योजना असो जनतेला आळशी बनवण्याचा उद्योग सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांच्या दारिद्राचे ते भांडवल करू इच्छित आहेत. कारण भिकेवरती जगवणाऱ्या योजना त्यांना राबवायच्या आहेत आणि तुम्हाला भिकारी ठेवायचे आहे. हे शेतकऱ्यांनी ठोकरून शेतमालाला भाव देणारे उद्योग उभे करायला हवेत. नाचणी आज ३० रुपये दराने जाते. पण त्याचे पापड करून विकले तर त्याच नाचणीचे ३०० रुपये होऊ शकतात. हे शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हवे अन् सरकारी योजनांच्या मागे न लागता स्वतःचे स्वयंपूर्ण उद्योग उभे करायला हवेत. आपल्या मातीत तयार होणाऱ्या शेतमालाची गुणवत्ता विचारात घेऊन त्यावरती उद्योग उभे करायला हवेत.
ठिकपुर्लीचीच बर्फी का प्रसिद्ध झाली ?
डॉ. जालंदर पाटील – प्रत्येक प्रदेशाने त्या त्या परिसराला एक पोटेनशियल दिले आहे. इथेच बर्फीचा उद्योग का मोठा होतो आहे. कारण राधानगरी तालुक्यातील म्हैशीच्या दुधाला उत्तम प्रकारची गुणवत्ता आहे. तो इथला वातावरणाचाही परिणाम असेल. इथे उत्पादित होणाऱ्या चाऱ्याचा परिणाम असेल. इथल्या जमिनीतील सामूचा तो परिणाम असेल. यामुळे त्या दुधाला एक विशिष्ट गुणवत्ता प्राप्त झाली आहे. त्या गुणवत्तेमुळे ठिकपुर्लीत तयार होणाऱ्या बर्फीची प्रत ही उत्तम दर्जाची आहे. याचा विचार करून इथल्या दुधाला न्याय देण्यासाठी हा ब्रँड विकसित करण्याची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.