April 14, 2024
The Story of a Labor Workers Struggle
Home » श्रमिक कार्यकर्त्याच्या संघर्षाची कहाणी :दस्तावेज
मुक्त संवाद

श्रमिक कार्यकर्त्याच्या संघर्षाची कहाणी :दस्तावेज

प्रेम ही माणसाची अनाम वृत्ती असते आणि माणसाने ते करत राहावं. पण या व्यवस्थेत आपल्या जातीतल्या मुलींवर दुसऱ्या कोणीही प्रेम केलेलं चालतं. पण आपल्यातल्या कोणी दुसऱ्या जातीतल्या मुला मुलीबरोबर प्रेम करणं व्यवस्थेला रुचत नाही. ही वास्तव मनोभूमिका खूप काही सांगून जाते.

बाळासाहेब कांबळे
मु. पो. मायणी ता. खटाव जि .सातारा
मो.9730140703

जागतिकीकरण आणि खासगीकरणाचा परिणाम मानवी जीवनावर झाल्याने श्रमिक, कष्टकरी वर्गाची गळचेपी होऊ लागली. या वेदनेला घेऊन परिवर्तनवादी समाजरचनेची मागणी करणारे कार्यकर्ते लढत राहिले. चळवळीतील या लढाऊ कार्यकर्त्यांच्या योगदानाचे आवर्तन लेखक आनंद विंगकर यांच्या ‘दस्तावेज’ कादंबरी मधून समोर येते. सामाजिक, राजकीय बदलाचे प्राक्तन वलयांकित करणारी ही कादंबरी प्रथमदर्शनी एका निश्चित अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी साहित्यकृती वाटत असली तरी नव्वदीच्या दशकातील सामाजिक भेदाभेदाचे वर्तमान,राजकीय मनोभूमिकेचा बदलता चेहरा,विस्तारलेले जागतिकीकरण आणि एकंदर ग्रामीण आणि शहरी समाजावर होणाऱ्या विविक्षित स्थित्यंतराचे चित्र दस्तावेज मधून प्रतिबिंबित होते.

परिवर्तन हे एक मूल्य आहे. ते प्रथम व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावं लागतं आणि नंतर समाजात ते प्रवर्तित होत असतं. याच परिवर्तनाचा विचार घेऊन निघालेला अशोक कांबळे हा या कादंबरीत परिवर्तनवादी भूमिका घेऊन धडपडत राहिलेला दिसतो.आंबेडकरी विचारधारेच्या जातसमूहात जन्मलेल्या अशोकला सकल समाज, माणसे यांच्याबद्दल आत्मीयता आहे. त्याचे सुरुवातीचे जगणे गावातच गेलेले आहे. गावखेड्यातले जातीच्या आधारावर असलेले ‘शोषण’ हे समाजव्यवस्थेतील सत्य त्याने अनुभवले आहे. म्हणून दहावीत असताना अशोकच्या सरांनी लिहिलेल्या नाटकात अशोकला रितीनं मिळणारा शूद्राचा रोल रूढी, परंपरांचा जोखड वलयांकित करतो. आपला जिवलग मित्र रामच्या आजीने ‘ कुणाचा रे तू बाळा?’ म्हणून खोदून खोदून केलेली चौकशी अशोकच्या मनात प्रचंड भीती निर्माण करते. पण शेवटी त्याची ‘महार’ही जात कळूनही त्याच्याशी “माझ्याच लेकीचा मुलगा की रे तू!” म्हणून प्रेमाने वागलेल्या आजीच्या वृत्तीत मानवतावादाची बीजे दिसतात.

प्रेम ही माणसाची अनाम वृत्ती असते आणि माणसाने ते करत राहावं. पण या व्यवस्थेत आपल्या जातीतल्या मुलींवर दुसऱ्या कोणीही प्रेम केलेलं चालतं. पण आपल्यातल्या कोणी दुसऱ्या जातीतल्या मुला मुलीबरोबर प्रेम करणं व्यवस्थेला रुचत नाही. ही वास्तव मनोभूमिका खूप काही सांगून जाते.
गावखेड्यापासून सुरू झालेला अशोकचा प्रवास मायानगरी मुंबई आणि पुढे मोर्चाच्या निमित्ताने दिल्ली असा सुरू राहतो. पोट भरण्यासाठी मुंबईला गेलेल्या आपल्या जातीच्या, विचारांच्या काळ्या, खैऱ्या, व्यसनाधीन माणसात त्याला राहावे लागते. तसेच चळवळीचा विचार घेऊन चालणाऱ्या माणसांच्यातही अशोक वावरतो. जाती-धर्माच्या पुढे जाऊन प्रत्येक गरीब, कष्टकरी, मजूर यांच्या जगण्याची भूमिका घेऊन धडपडणाऱ्या डाव्या विचारांच्या चळवळीत सहभागी होऊन धडपडत राहतो. इथं त्याला अनेक माणसं भेटत राहतात. काही दूरची काही जवळची. काही माणुसकीची तर काही अगदीच अमानवीय.

देशाच्या पहिल्या- दुसऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेलं आप्पा हे एक ग्रामीण राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात तयार झालेल्या सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांना सभासद करण्याचे काम आप्पांनी केले. त्यांच्या घरातील विकास हा नव्या पिढीचे गावखेड्यातल्या सरंजामदारीचे उदाहरण आहे. मात्र त्याच्या अकाली मृत्यूने हळहळणारी त्याची प्रेयसी आणि एकंदर समाज मानवीय मूल्ये जपताना दिसतो. दादा पैलवानांचा उत्तम, आत्मादादांचा संपत, नकला करणारा सागर, नदाफ गुरुजींचा अस्लम, गौतम अशी लहानपणापासूनची अशोकची मित्रमंडळ. ‘माझ्यासोबत मैत्री कराल की मी खालच्या जातीचा म्हणून फटकून वागणार?’ असा प्रश्न अशोकलाही पडतो आहे.

गावात विकली जाणारी दारू आणि ज्या दारूमुळे अशोकच्या चुलत, मावस भावाबरोबर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारिद्र्य ,गरीबी, अगतिकता ही काय कोण्या एका जातीपुरती मर्यादित नाही तर अशा हरेक जातीतल्या हरेक कुटुंबातून ती हद्दपार व्हावी म्हणून पुढाकार घेऊन अशोक त्यासाठी धडपडतो आहे. त्याची पत्नी सुजाताची त्याला या कार्यात खंबीर साथ आहे. गावातल्या अनेक महिलांचे संघटन करून ते दारूबंदी विरोधी आंदोलन करतात. गावात यात्रा एक होते मग जयंती का नाही? असा विचार तरुणांच्या मनात येतो. काही जुन्या मंडळींचीही या गोष्टीला साथ मिळते. मात्र दारुबंदीचे नेतृत्व करणाऱ्या अशोकला काही लोकांच्याकडून दमदाटी, मारहाण होते. याचा त्याला खूप मोठा धक्का बसतो. पण आपल्या पत्नीच्या साथीने या संकटातून सावरून तो उभा राहतो.

नंतरच्या काळात मुंबई नगरीच्या जगण्यातला भाग बनून जाताना आपल्या माणसांमुळे त्याची मुंबईच्या जगण्याची नाळ घट्ट होते. इथूनच त्याचा चळवळीतील कार्यकर्त्याचा खरा प्रवास सुरु होतो. सामाजिक गतिशास्त्र समजावून घेतल्याशिवाय समाजपरिवर्तन अशक्य असते. म्हणूनच पहिल्यापासून आंबेडकरी विचारधारेला जपणारा अशोक नंतर काहीसा अज्ञान, लोकभ्रम आणि पूर्वग्रह यांतून मुक्त झालेली मानवी बुद्धी, सामाजिक संबंधांचे बुद्धिप्रमाण यामुळे सुसंवादी नियमन करण्याचे मार्ग शोधू लागतो. सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याची तळमळ असली तरी ‘जात’त्याची पाठ सोडत नाही. याच जातवास्तवाला हृदयात घेऊन आयुष्यभर तो आपले काम करत राहतो.

मुंबईत गिरणीत कामाला असलेल्या दत्तू अण्णाना संप मोर्चाचा अनुभव होता .गावी आल्यावर त्यांनी झाडून सारी मुले शाळेत पिटाळली होती. भारतासारख्या कृषीप्रधान देशात सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून असल्याने शेती हाच आपल्या जगण्याच्या व्यवस्थेचा कणा असायला हवा होता. मात्र स्वातंत्र्यानंतरही आपल्या लोकशाही राज्यात शेतकऱ्याच्या जगण्याची परवड थांबली नाही. उलट ती अधिक भीषण होत गेलेली दिसते. स्वातंत्र्यकाळापूर्वी शेतकऱ्याचे शोषण करणारे घटक स्वातंत्र्यानंतर बदलले. खासगीकरण -उदारीकरण- जागतिकीकरण या नावाखाली प्रत्येकाचे शोषण होतच राहिले. शिक्षणाचं खासगीकरण होऊन त्यामुळे होणारे परिणाम अशोकसारख्या अनेकांना कळत होते. यामुळे आपल्या समूहाचं जगणं कठीण होणार आहेच, पण कृषक समाज आणि सर्व श्रमिकांचं जगणं भयप्रद होण्याचा धोका लक्षात आल्याने संप, मोर्चे सुरू झाले.

देशभरातील अनेक विचारवंत, लेखक, कवी, कलावंत, अन् डाव्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी जागतिकीकरणाच्या होणाऱ्या अनिष्ट परिणामांविषयी गावोगाव प्रबोधन, सभा, मोर्चे, कलाजथ्ये आयोजित करून लोकांचे प्रबोधन सुरू केले होते. भाकरी मिळवण्यासाठी मुंबईसारख्या महानगरात दाखल झालेले दलित रोजच्या जगण्याशी संघर्ष करत होते. तेही या आंदोलनात सहभागी होत होते.खाजगीकरणामुळे शेतकऱ्याला आत्मघाताचा नवा मार्ग दिसत होता. म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन प्रतिकार करण्यासाठी अशोकसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. अनेक कॉम्रेड ,कार्यकर्ते पोलिसांच्या काठीहल्ल्यात जायबंदी, जखमी झाले. मात्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा लढा जिद्दीने सुरूच होता. याच उदारीकरण, खासगीकरणाविरोधातील जनआंदोलनाची संघर्षमय कथा ‘दस्तावेज’च्या निमित्ताने खोलपणे पुढे येते.

अर्थात अनेकांनी प्रयत्न करूनही खासगीकरण-उदारीकरण थोपवता आलं नाही. शोषण करणारी माणसे बदलली पण प्रवृत्ती तीच राहिल्याने नवसमाज निर्मितीचे स्वप्न घेऊन धडपडणारे कार्यकर्ते व्यतीत झाले. नव्या आर्थिक धोरणामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचे दैन्य कमी होण्याऐवजी वाढतच राहिले. शिक्षण व्यवस्था सर्वसामान्य गरीब यांच्यासाठी दुरापास्त होऊन गेली.आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले असले तरी सरंजामशाहीचा भार वाहणाऱ्या राजकीय वृत्तीमुळे जनवादी चळवळीची निराशा झाली. याअर्थाने दस्तावेज वास्तवाला घेऊन समाज व्यवस्थेतील लढा मांडत राहते.
लोकवाङ्मयगृह यांनी प्रकाशित केलेली पाचशे चार पानांची ही कादंबरी दीर्घ असली तरी वास्तवाचे अनेक प्रश्न घेऊन मनाला भिडत राहते.

पुस्तकाचे नावः दस्तावेज (कादंबरी)
लेखक – आनंद विंगकर
प्रकाशकः लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई

आनंद विंगकर या मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखकाची ‘दस्तावेज’ ही कादंबरी म्हणजे आत्मचरित्र आणि सर्जनशील कथन या दोन वाङ्मयप्रकारांचा हृद्य आणि प्रभावी असा मेळ आहे. परिवर्तनवादी राजकीय चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या आत्मशोधाचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला अतिशय गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या गाभ्याचे दर्शन घडवतो. ग्रामीण सरंजामी व्यवस्थेतील कृषक व श्रमिकांच्या जगण्याचे धारदार कंगोरे, जातवास्तवात पिचणारे स्त्रीपुरुष, मुंबईसारख्या महानगरात जगण्यासाठी गेलेल्या ग्रामीण माणसांची परवड, त्यांना तगून रहायला मदत करणाऱ्या स्त्रिया – हे वास्तव तर विंगकर आपल्या भाषेतून सजीव करतातच; पण बाजारावर आधारित आर्थिक धोरणांनी या साऱ्याच घटकांची केलेली ससेहोलपट, आणि त्यात बदलाव आणू पहाणाऱ्या तरूण धुमाऱ्यांना ऊर्जा देत, व्यवस्थेविरुध्द लढण्यासाठी संघर्षसिध्द करणारे डावे पक्ष आणि त्यांचेही अंतर्गत राजकारण… यांचाही विस्तीर्ण पैस हा दस्तावेज आपल्यासमोर उलगडत जातो. या बहुआयामी वास्तवाला जिवंत आणि अर्थपूर्ण करते ती माणसामधील माणुसकीची प्रेरणा, अधिक सुंदर मानुष जगाच्या निर्मितीची आस. त्यातून होते इतिहासाच्या खऱ्या नायकाची जडणघडण. त्यातूनच घडते त्याचे स्वत्व आणि खरे आत्मभान! मराठी कादंबरीला एक नवा राजकीय आयाम देणारा हा ‘दस्तावेज’ खऱ्या अर्थाने मैलाचा दगड आहे.

माया पंडित

Related posts

आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही – जावेद अख्तर

आत्मा कसा आहे ?

अध्यात्मात स्वयंसिद्ध होण्याचा विचार

Leave a Comment