August 21, 2025
mazhya-jagnayache-pustak-book-review-by-v-n-shinde
Home » माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन
मुक्त संवाद

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

पुस्तकांचे महत्त्व अधोरेखीत करणारे बोते सर स्वत:च्या आयुष्याचा पट ‘माझ्या जगण्याचे पुस्तक’ या पुस्तकातून उलगडत जातात. तो निश्चितच वाचनीय आहे.

प्रा. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

प्रत्येकाच्या जीवनाचे एक पुस्तक असते. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतात. सुखाच्या क्षणांना दु:खाची किनार असते. गरीबीतही सुखाचे, समाधानाचे क्षण असतात. प्रसंग वेगळे असतात, घटना वेगळ्या असतात. मात्र प्रत्येकाचे जीवन अनेक रंगानी रंगलेले असते. ते प्रत्येकाला शब्दात बांधता येतेच असे नाही. काहीजनाना आपले जीवनगाणे शब्दात बांधता येते. त्यातून मराठीतील आत्मचरित्रांचे दालन समृद्ध होत गेले आहे. असेच भटक्याचे जीवन जगणाऱ्या गरीब घरात, जन्माला आल्याचा खेद-खंत न बाळगता जगलेले, शब्दात मांडले. त्यातून तयार झालेले पुस्तक… ‘माझ्या जगण्याचे पुस्तक’ वाचायला मिळाले.

दौलतराव निकम विद्यालय, व्हन्नुर येथे कागल तालुका विज्ञान प्रदर्शन होते. तेथे वि.म. बोते नावाचे हरहुन्नरी शिक्षक भेटले. लौकिकार्थाने ते आज सेवानिवृत्त शिक्षक. ते प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी २०२२ मध्ये लिहिलेले हे पुस्तक. त्यांच्याच हस्ते माझ्यापर्यंत पोहोचले. पुस्तकाच्या पहिल्या पानावर या पुस्तकास दक्षीण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पुरस्कार या पुस्तकास प्राप्त झाल्याचा शिक्का मारलेला दिसला. पुस्तक स्वत:च्या गुणी अपत्यांना अर्पण केले आहे. तर पुस्तकाची संपत गायकवाड यांनी पाठराखण लिहिली आहे. त्यात गायकवाड सरांनी हे पुस्तक म्हणजे बोते यांच्या भावनांचे सिंचन असल्याचे अगदी रास्त लिहिले आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीस मनोगतातच सर म्हणतात, ‘प्रत्येकाचंच आयुष्य एक कादंबरी असू शकतं. पुस्तक असू शकतं.’ हे त्यांच म्हणणं, अगदी खरं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना शब्दबद्ध होऊ शकल्या तर, एक नवी कादंबरी तयार होऊ शकते.

पुस्तकात एकूण २१ प्रकरणे आहेत. या प्रत्येक प्रकरणात वेगळा पैलू घेऊन सर लिहित जातात. असे स्वतंत्र पैलू घेऊन आत्मचरित्र लिहिणे अवघड असते. विविध घटना लिहिताना काळाचे टप्पे दोन प्रकरणात येऊ शकतात. त्यामुळे वाचकाचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. मात्र हे पुस्तक वाचताना असे होत नाही. सरांच्या लेखन कौशल्याचा हा परिणाम आहे. पहिल्या प्रकरणाची किंवा या आत्मकथनाची सुरुवात होते, ती त्यांच्या नाटकाच्या प्रयोगापासून. पुढे त्यांचे शिक्षण, शिक्षणात पडलेला खंड, हातमाग प्रशिक्षण, त्यानंतर मिळालेली शिक्षकाची नोकरी, नोकरीतील चढउतार, बदल्या, लेखन, लेखन प्रसिद्धी, शाळेतील विविध प्रसंग, निवृत्ती, निवृत्तीनंतर ग्रंथालय, पतसंस्था, मानपत्र लेखन, पत्रकारिता हे सर्व पैलू उलगडत जातात. जीवन प्रवासात त्यांना भेटलेल्या चांगल्या लोकांचा कृतज्ञतापुर्वक उल्लेख सहज आल्यासारखा येत राहतो. मात्र ज्यांच्यामुळे त्यांना थोडाफार त्रास झाला, त्यांचा उल्लेख करताना, त्यांना कोठेही ते खलनायक ठरवत नाहीत. जगण्याचा एक भाग म्हणून त्यांनी तो सहज स्विकारला असावा. मुळात असे वाईट, त्रासाचे प्रसंग सरांच्या जिवनात आलेच नाहीत, की त्यांनी जाणिवपुर्वक असे उल्लेख टाळले, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहात नाही. अरूण दाते यांच्या ‘शतदा प्रेम करावे’ या आत्मचरित्रानंतर माझ्या वाचनात आलेले हे दुसरे असे सुंदर आत्मचरित्र.

लेखकाचा जन्म तसा गरीब घरातला. धनगर कुटुंबातील. मात्र त्यांचे पुस्तक कोठेही गरिबीला दोष देत नाही. कुरवाळत बसत नाही. त्याचा उपयोग वाचकाच्या मनात सहानुभुती निर्माण करण्यासाठी होत नाही. गरिबीही त्यांनी सहज स्विकारल्याचे दिसून येते. लेखकाची भाषा इतकी सुंदर आहे की, ते सहज व्यक्त होत जातात. प्रसंग, घटनेस अनुसरून वातावरण तयार करतात, मात्र अगदी सहज. ते सहज प्रसंग सांगत जातात. त्यातील नाट्य उभा करतात. मात्र भाषा कोठेही आत्मस्तुतीची किंवा प्रौढी मिरवणारी होत नाही. म्हणूनच वाचकाला बोते गुरुजींची ही कथा जवळची वाटत राहते. मुळात या पुस्तकात आलेले प्रसंग, घटना या आज पन्नाशीत असलेल्या अनेकांनी अनुभवलेल्या आहेत. त्यांच्याशी वाचक सहज जोडला जातो. चिंचा काढण्याचा प्रसंग, शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या पायाला आणि हाताला पकडून उचलून नेणे, अशा अनेक प्रसंगात आपलेच बालपण रंगवले जात आहे, असे वाचकाला वाटत राहते. बोरूने तक्ते रंगवण्यासारखा शालेय उपक्रमही अनेकांनी अनुभवलेला आहे. हे सारे लेखक एका लयीत सांगत जातो. त्यामुळेच हे आत्मचरित्र आपलेच जगण्याचे पुस्तक आहे, असे वाचकास वाटत राहते.

या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी जात, धर्म पंथ भिन्न असूनही, समता मानणारा एकजीव समाज कसा होता, हे लेखकाने वारंवार मांडले आहे. एकमेकांच्या अडीअडचणीला ते कसे मदत करत याचे सुंदर दाखले या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यामुळे कागलसारख्या गावात सण-उत्सव कसे एकत्र साजरे केले जात, हे सहज-सुंदर वर्णन यात वाचायला मिळते. नातेसंबंध हे कुटुंबापुरते, समाजापुरते नव्हते, तर, ते प्रत्येकाचे प्रत्येकाशी होते, हे उलगडत जाते. यातील अनेक प्रसंग तत्वाशी बांधीलकी जपणारी माणसं कशी होती, हे सांगत जातात. अनेक दिवस ज्या मुख्याध्यापकांशी अबोला धरला होता, त्यांनी गोडाचे जेवण स्वहस्ते बनवून निरोप देणे. बदलीच्या गावी त्या शाळेपर्यंत सोडवायला जाणे, या प्रसंगातून लेखक जसा त्या व्यक्तींचे मोठेपण सांगतो, तसेच ते स्वत:ला कशी शिकवण मिळाली, हे ही सांगत जातो. आपल्या शिक्षकांचा, ज्यांच्याकडून आपण काही शिकलो, त्यांच्याबद्दल ते अत्यंत आदराने व्यक्त होत जातात.

या आत्मकथनामध्ये अनेक गंमतीदार प्रसंग येतात. अगदी सुरुवातीलाच नाटकाच्या प्रयोगावेळी साप आल्याची बतावणी करून रंगाचा बेरंग झाल्याची गोष्ट येते. मात्र त्यासाठी ते कोणाला दोष देत नाहीत. त्यांनी अशा प्रसंगातही आपण काय शिकलो हे नकळत सांगितले आहे. क्रिकेटच्या मॅचचे वर्णनही असेच आले आहे. कागलपासून कोल्हापूरपर्यंत पायी चालत येणे, अनवाणी पायांनी मॅच खेळणे सारे काही आजच्या पिढीला न पटेल असे… मात्र त्या काळातील वास्तव. त्या काळात जातीभेद हा घरातील आचरणाचा, रूढी परंपरेचा भाग. मात्र त्याचा परिणाम मुलांवर होत नसे. मुले कशी परस्परांच्या घरात जात, खेळत, खात याचे सविस्तर वर्णन येते. वायंगणकर कुटुंबाशी जडलेला स्नेह, बदली होऊन गेल्यावरही तो त्यांनी जपणे अशा प्रसंगातून माणुसकीचा अखंड झरा कसा प्रवाहीत होता हे समजते. त्याकाळी पैसे कमी होते, पण मन मोठे होते. आज पैसा बक्कळ आहे पण मने छोटी झालेत, हे पदोपदी जाणवते.

अत्यंत कष्टाचे जीवन आनंदाने जगत, आयुष्यात अनेक कामे करत, हा शिक्षक घडत जातो. लहानपणी नाटकांशी जडलेले नाते मनापासून जपतो. पुस्तकाच्या शेवटी त्या काळातील नाटकाची वाटली जाणारी पांप्लेट छापली आहेत. तो एक ऐतिहासिक ऐवज आहे. कथा, कविता लिहितो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्न करत राहतो. शाळा सुटल्यावर मजूरी, हातमाग प्रशिक्षण, हातमागावर कामगार, शिक्षक म्हणून नोकरी, मुख्याध्यापक अशा विविध भूमिका वठवत ते जगतात. त्यांच्या जगण्याला एक समाधानाची किनार आहे. इतरांनी दिलेल्या डागाची काळी किनारही ते कोठे दिसू देत नाहीत. सेवानिवृत्तीनंतर पुस्तकाच्या वेडातून ग्रंथपाल म्हणून जबाबदारी स्विकारणे, ग्रंथालयाची अवस्था बदलण्यासाठी केलेले प्रयोग, याला वाचकांचा मिळालेला प्रतिसाद हे सर्व मनापासून भावते. पुस्तक हे महत्त्वाचे आहे, ती वाचली पाहिजेत, हे सांगताना वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटत जाते. पत्रकाराच्या भूमीकेत ते मर्यादित वावरतात, पण उल्लेखनीय. पत्रकारिताही ती व्रतस्थाप्रमाणे करतात. त्यातील किस्सेही रंजकपणे लिहिले आहेत. एखादा शिक्षक कसा समाज शिक्षक बनतो, हे पुस्तक वाचताना लक्षात येते. मंगलाष्टका लिहिणे, त्याबाबतच्या आठवणी, मानपत्राच्या घटना खूप छान रंगवल्या आहेत. आई, वडिलांबाबत लिहिताना ते हळवे होतात. भावूक होतात.

हे पुस्तक संस्कृती, रूढी, परंपरा यांची वर्णने त्या काळातील चित्र लेखक हुबेहुब उभा करतो. त्यांच्या लग्नाचे विधी, विविध धार्मिक विधीची वर्णने, विविध जातीमधील परंपरा, शिवजयंतीतून विद्यार्थ्यांत चांगल्या सवयी रूजणे, रूजवणे ही सर्व माहिती खूप चांगल्या पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. पण यातील सर्वात भावलेला भाग आहे, तो लेखकाने प्रांजळपणे आपले तंबाखूचे व्यसन कसे सुटले याचे केलेले वर्णन. हे वर्णन करताना विद्यार्थी-विद्यार्थीनी कशा कारणीभूत ठरल्या हे त्यांनी प्रांजळपणे लिहिले आहे.

पुस्तकांचे महत्त्व अधोरेखीत करणारे बोते सर स्वत:च्या आयुष्याचा पट ‘माझ्या जगण्याचे पुस्तक’ या पुस्तकातून उलगडत जातात. तो निश्चितच वाचनीय आहे.

पुस्तकाचे नाव – माझ्या जगण्याचे पुस्तक
लेखक – वि. म. बोते, मोबाईल – 9922240580
प्रकाशक – मोहित प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठसंख्या – २७२ किंमत – २५० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading