आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
शनिवार दि २४ मे रोजी मान्सून केरळ, ता.नाडू ओलांडून कर्नाटकापर्यन्त एका दिवसात पोहोचला.
रविवारी त्याने संपूर्ण गोवा काबीज करत दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ पर्यन्त पोहोचून मान्सून ने त्याच्या नेहमीच्या वेळपेक्षा ११ दिवस आधी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
कोकण व गोवा पाऊस –
आजपासून संपूर्ण आठवड्यात म्हणजे शनिवार दि. ३१ मे पर्यन्त मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर व प्रभाव अधिक राहील.
उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस
कोकण वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अश्या उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आज व उद्या ( रविवार व सोमवारी ) जोरदार पावसाची शक्यता जाणवत असुन मंगळवार दि. २७ मे पासून पावसाचा जोर काहीसा कमी होवून केवळ भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
अर्थात मान्सून च्या महाराष्ट्रातील वाटचालीनुसार आता ह्यापुढे पावसाची कमी अधिक तीव्रता जाणवेल.
खरीप पेरणी-
ह्या वर्षी मे महिन्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे जमिनीत भरपूर ओल निर्माण झाली असुन पुढील मशागतीस सध्या वाफसा नाही.
त्यातच मान्सून ने आजच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. वाफस्यासह मे महिन्यातच जर पेरणी केली तर ती पेरणी वेळेआधीची आणि अतिआगाप ठरु शकते. कारण उष्ण-सवहनी प्रक्रियेतून अवकाळी पावसाने मिळालेली जमीनओल आणि प्रशांत महासागरातून मान्सूनी वाऱ्यांनी वाहून आणलेल्या आर्द्रतेतुन झालेल्या मान्सून च्या पावसानंतर पूर्वओलीस मिळालेल्या थंडाव्यातील ओलीची साथ ह्यात नक्कीच फरक आहे, असे वाटते. मान्सूनच्या चांगल्या पावसानंतर जमीन ओलीस अधिक थंडावा मिळाल्यानंतरच जुनमध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या वाफस्यावरच पेरणीचा विचार करावा, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.