आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामागे काही दृष्टिकोन ठेवून ही परंपरा आखून दिली आहे. त्याला वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक कारणे आहेत. त्यामागे खगोलशास्त्र आहे.
सौ पुष्पा सुनील वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा, वरूड
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला गणरायाचे आगमन झाले आहे. हा उत्सव घराघरात तसेच सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो. गणपती म्हणजे विद्येची देवता तो १४ विद्यांचा पाया आहे. त्याचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या शब्दात केले आहे”अकार”चरण युगुल ! उकार उदर विशाल ! मकर महामंडल ! मस्त का कारे !
गणपतीच्या दोन्ही पायाच्या ठिकाणी अकार आहे. उकार हे तुझे विशाल हा उदर आहे. मोकार महामंडल म्हटले आहे. या आधी बीजाला नमन केले आहे. विश्वाचे बीज म्हणजे ओम आहे. एकदम वृक्ष उगवत नाही. बिजामध्ये ज्याप्रमाणे वृक्ष सामावला असतो. त्याप्रमाणे ओमपासून जगाची उत्पत्ती झाली आहे. यालाच नादब्रह्म म्हणतात तो म्हणजे गणपती.
ओंकार प्रधान ! रूप गणेशाचे ! हे तिन्ही देवाचे जन्मस्थान !
असे गणेशाचे वर्णन येते. ब्रह्मा; विष्णू; महेश या तिन्ही देवाचं वास्तव्य गणपतीमध्ये आहे. गण म्हणजे इंद्रिय व पती म्हणजे स्वामी ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे प्रत्येकाच्या सर्व इंद्रियावर स्वामित्व करणार बुद्धी हेच गणेशाचे रूप. तो बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणार आहे.
आता गणपतीचे स्वरूप आपण पाहूया. त्याच्या हातातील आयुधे; पायातील नुपूर; त्याचा खंडित दात; फरश; अभय हस्त’, मनीभूषणे, या सर्वांचा तत्वार्थाच्या दृष्टीने अर्थ बघूया.
अठरा पुराणे हीच मनी भूषण होत. संपूर्ण वेद हीच तुझी उत्तम व्यापक गणेश मूर्ती होय. उत्तम पदरचना हेच रंगविलेले वस्त्र होय. त्याच्या पायातील घागऱ्या काव्य व नाटकाची रचना करू गेल्यास त्यातील अर्थ हा घागऱ्यातील मंजूर ध्वनी होय. कमरेतील शेला (मेखला) पदराच्या शेंड्याप्रमाणे झळकते. सहा शास्त्र हेच गणपतीचे हात होय. त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय ही त्या हातातील आयुधे होत.
फरश – तर्कशास्त्र हाच फरश होय.
मोदक – वेदांत शास्त्र गोड व रसाळ मोदक होय.
मोडका दात – वार्तिकारांच्या (प्रश्न करणारे) व्याख्यानाने स्वभावतः खंडित बौद्धमध्ये दातांच्या हाती शोभते.
हस्त व अभय हस्त-कल्याणकर वरदायक अभयस्त म्हणजे सत्कार वाद (ब्रह्म विषयक वाद) होय. धर्म प्रतिष्ठा यांची ज्यापासून स्थापना होते तो अभयस्त होय.
गणपतीची सोंड – परंतु सुखाचा परमानंद व अति निर्मळ विचार व उत्तम संवाद व सरळ हे शुभ्र दात होय.
सूक्ष्म नेत्र – गणपतीचे नेत्र अतिसूक्ष्म आहे म्हणजे ज्ञानदृष्टी दर्शविते. ते ज्ञान दृष्टीचे प्रतीक होय.
कान – कानाच्या ठिकाणी बोधामृत ग्रहण करण्याची शक्ती दर्शविते.
गंडस्थळ – गंडस्थळातून निघणारा मध (गोड पाणी) व त्याचे सेवन करणारे मुनी हेच भ्रमर प्रमेय (ज्ञान) प्रमाता (परमात्मा) सिद्ध करणे. हीच गंडस्थळावरील पोळ्याच्या ठिकाणी असून एकाच तात्पर्याचे सिद्धांत गंडस्थळावरील टवटवीत फुले ज्ञानमकरंदाने परिपूर्ण असलेली भरपूर पाहिजे होत.
वर वर्णन केलेले गणेशाचे स्वरूप श्री संत ज्ञानेश्वर माऊलीने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. त्या मूर्तीतील प्रत्येक अवयवाचे तात्विक दृष्ट्या वर्णन त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात आले आहे. ब्रम्हांडाची निर्मिती करण्यात आली तेव्हा देवी देवता यांचे देखील स्थान या रचनेत अनन्यसाधारण आहे. गणपतीला बुद्धीची देवता म्हटले आहे. हा झाला गणपतीच्या सगुन मूर्तीच्या अवयवाचा सांकेतिक अर्थ परंतु या विश्वरचनेतील माणूस हेही देखील एक सावयावं कलाकृती आहे. या मनुष्य शरीरात देखील जे ब्रम्हांडात आहे तेच या शरीरात आहे. पिंडी ते ब्रम्हांडी असं म्हणतात.
आपल्या शरीरात गणपतीचे स्थान कुठे आहे हे बघूया. मानवी शरीर हे एक अद्भुत रसायन आहे. जे भौतिक शरीर आहे त्याबरोबर काही अदृश्य स्वरूपातील तत्त्वे आहेत पैकी भौतिकमध्ये पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहेत अदृश्यमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचप्राण, सात्विक राजस, तामस ही तीन तत्त्वे, काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार हे सहा शत्रू आहेत. शरीरामध्ये सहा चक्र आहेत. यापैकी जी बुद्धी आहे तिचं कार्य फार महत्त्वाचा आहे. ही बुद्धीची देवता म्हणजे गणपती. मनुष्याचा आर्थिक, मानसिक, भौतिक व सर्वांगीण विकास होण्याकरता बुद्धी सावध पाहिजे. गणपतीचे स्थान आपल्या बुद्धीत आहे. पूर्ण शरीराचे संचालन करण्याकरता बुद्धीची उपासना करावी लागते. नाहीतर इहलोक व पारलौकिक सुख प्राप्त होणार नाही.
या बुद्धीची उपासना म्हणजे काय? तर योग्य ज्ञान ग्रहण करून समृद्धी प्राप्त करून वाईट विचार, कल्पना त्यामधून काढून टाकावी की जेणेकरून लोककल्याण व आत्मकल्याण होईल. हीच त्या गणेशाची उपासना होय. या बुद्धीच्या भरवशावर आपण आपली एक ओळख निर्माण करू शकतो. लोक कल्याण साधले जाते. अर्थप्राप्ती होते. या बुद्धीची सतत साधना करीत राहिल्यास मनुष्य जीवन सर्वांग सुंदर होते. असा हा आत्मरूप गणेश हा सर्व विद्यांच आश्रय स्थान जे की ज्याच्या केवळ स्मरणाने सर्व काहीतरी शक्ती अंगी येते व सकलविद्या, कला जिभेवर नांदू लागतात.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या तर्कशुद्ध भाषेतून, वांग्मय यातून व ओजस्वी व प्रभावी वाणीतून गणपतीचे वर्णन केले आहे. गणपतीची आराधना केल्यास सकलविद्या, कला जिभेवर सदैव नांदतात. गणेशाची उपासना केल्यास वक्तृत्वाला गोडी येते त्यापुढे अमृतही फिके वाटते. नवरस त्याच्या मुखावाटे निघणाऱ्या अक्षरांचे सेवक होतात. गणेशाची मूर्ती ही वांग्मयीन मूर्ती होय.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामागे काही दृष्टिकोन ठेवून ही परंपरा आखून दिली आहे. त्याला वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक कारणे आहेत. त्यामागे खगोलशास्त्र आहे. ऋतुचक्रानुसार देवी देवतांना अर्पण करण्यात येणारे भोग तसेच या सृष्टीतील प्रत्येक घटक निसर्ग, हवा, पाणी यांचा होणारा मानवी जीवनावर परिणाम, बदल त्याची आपल्या जीवनात आवश्यकता काय? याचे भान ठेवून सण, उत्सव साजरे करण्यात येतात. निसर्गाची साखळी कायम राहावी म्हणून ही आपल्या पूर्वजांनी योजना केली आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर कसा अवलंबून आहे?
जीवो जीवस्य जीवनम् ! देवी देवता जशा ब्रम्हांडात आहे तशाच आपल्या शरीरात देखील आहेत. त्याचा आपण कधी विचारच करत नाही. तर या सण उत्सवा द्वारे, समाजप्रबोधनाद्वारे उजागर व्हावयास हव्या. या सर्व गोष्टींचा खोलवर विचार केल्यास ती अंधश्रद्धा नाही. परंतु त्याचा तत्त्वार्थ लक्षात घेतल्या जात नाही.
या गोष्टीचे जाणकार लोक फार थोडे आहेत. बाकी देवी देवतांचे, सण उत्सवाचं विडंबन होत आहे. निरर्थक अर्थ हानी, वेळेचा दुरुपयोग, मानवी शक्तीचा र्हास होत आहे. लहान लहान मुले व्यसनाधीन होत आहे. नाच तमाशा, ढोलक यामुळे ध्वनी प्रदूषण होते आहे. फटाके आतिषबाजी यामुळे वायू प्रदूषण होत आहे…गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन केल्यामुळे जल प्रदूषण होत आहे. याकडे जे मंडळाचे प्रमुख आहेत त्यांनी लक्ष द्यायला हवे.
गणपती ही विद्येची देवता आहे तर त्यासंबंधी काही प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हायला पाहिजे. इतर गोष्टीवर शासकीय स्तरावरून बंधने आली पाहिजेत. आज स्त्रिया देखील व्यसन करीत आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे व आपली कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत आहे. हे स्वरूप बदलून गणपती जवळ प्रबोधनात्मक कार्यक्रम जर ठेवले व हा फालतू खर्चाला आळा घातला तर हा आपला समाज सत्कार्याकडे, सदबुद्धीकडे प्रवाहित होईल. खरोखर गणेशाचे स्वरूप समजून घेतले तर हे विडंबन थांबेल व समाज सुविचाराकडे प्रवाहित होईल. आणि आता जे समाजावर दुष्प्रवृत्ती व्यसन, दुराचार, काळाबाजार, बलात्कार, भ्रष्टाचार या सर्वांना आळा बसेल. हीच त्या गणेशाची उपासना होईल सद्बुद्धी चा दाता म्हणजे गणेश
जैसी दिपकळी का धाकुटी । बहु तेजाते प्रगती ।
तैसी सद्बुद्धी थे कुटी । म्हणू नये ।।
असा हा सकलविद्यांचा राजा गणराया कार्याच्या आरंभी याचा स्मरण करतात व सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात पुन्हा त्या गणरायाला वंदन करते नमो नमो गणराया ! तू चौदा विद्येचा पाया ! मंगलमूर्ती अगाध कीर्ती बाप्पा मोरया ! बाप्पा मोरया.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.