July 2, 2025
Posters of Marathi films Snowflower, Muktai, Chhabeela, and Raosaheb selected for NAFA 2025 world premiere in San Jose, California.
Home » ‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!
मनोरंजन

‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!

‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!
कॅलिफोर्निया थिएटरमध्ये ‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला’ आणि ‘रावसाहेब’ चित्रपटांचे ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर’!
अमेरिकेतील सॅन होजे येथे २५ ते २७ जुलै २०२५ ला संपन्न होणार ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) चा दुसरा फिल्म फेस्टिव्हल!

सॅन होजे : परदेशात मराठी चित्रपटसृष्टीचा टक्का वाढवण्यासाठी अभिमानास्पद कार्य करत, गेल्यावर्षी प्रथमच ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ने ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करून मराठी चित्रपटांचा भव्य कौतुक सोहळा साजरा केला होता. यंदा हा महोत्सव अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात सॅन होजेतील कॅलिफोर्निया थिएटरमध्ये २५ ते २७ जुलै २०२५ रोजी संपन्न होणार आहे. यावर्षीच्या महोत्सवासाठी प्रख्यात दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’, अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबीला’ आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटांची निवड करण्यात आली असल्याचे ‘नाफा’तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी, ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेते निर्माते अभिजित घोलप यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’द्वारे मराठी चित्रपटांना अमेरिका-कॅनडामध्ये भव्य कॅनव्हास प्राप्त झाला आहे. हॉलिवूडच्या बेव्हर्ली हिल्सपासून अवघ्या काही मैलांवर असलेल्या ‘सॅन होजे’ येथे ‘नाफा’चा यावर्षी तीन दिवसांचा अनोखा दैदिप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. मराठी तारे-तारकांसोबत हॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती या महोत्सवात असणार आहे.

‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांची ‘नाफा २०२५’ मराठी चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘स्नोफ्लॉवर’ चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले: “‘स्नोफ्लॉवर’ हा चित्रपट, मानवी भावना आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, कायदा माणसासाठी आहे, की माणूस कायद्यासाठी आहे? हा गहन प्रश्न विचारतो. ही कथा NAFA सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रदर्शित होणे ही विलक्षण गोष्ट आहे. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी NAFA एक महत्वाची भूमिका बजावत आहे. ‘स्नोफ्लॉवर’ नाफाच्या प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभव देईल.”

‘मुक्ताई’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले: “‘दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’ पसायदानातील ही ओळ म्हणजे ज्ञानेश्वर-मुक्ताई यांचा सार आहे. त्यांचा विश्वास होता की हे आत्मज्ञान जगभर पोहोचायला हवं, आणि NAFA फेस्टिवलमुळे ते खऱ्या अर्थाने पोहोचत आहे. या अध्यात्मिक प्रवासाला व्यासपीठ मिळवून दिलं, याबद्दल NAFA चे मनःपूर्वक आभार.”

‘छबीला’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल भालेराव म्हणाले: “छबीला या चित्रपटाच्या कथेची सुरुवात रघुवीर तांडा या छोट्याश्या गावापासून झाली, ज्या गावात आजही रस्ता, लाईट, पाणी नाही, येथील समाज आजही खाणीत दगड फोडून  हलाकीत जिवन जगत आहे, छबिलाद्वारे ही कथा आज सातासमुद्रापार पोहोचली याचा मला अभिमान आहे, या साठी मी nafa चे मनापासून आभार मानतो.”

‘रावसाहेब’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले: “माझा चित्रपट ‘रावसाहेब’ अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी NAFA मध्ये प्रदर्शित होणार आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. ही फिल्म मोठ्या पडद्यावर पाहण्याचीच आहे आणि अशी मराठी फिल्म तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल, याची मला खात्री आहे.”

“नाफा फिल्म फेस्टिवल २०२५” मध्ये चार उत्कृष्ट मराठी चित्रपटांचे अमेरिकन प्रीमियर – ही केवळ एक कलाकृतींची प्रदर्शने नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमेरिकन आणि कॅनेडियन मंच खुले करण्याची ऐतिहासिक नांदी आहे” असे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले.

‘नाफा’मध्ये यावर्षी २५ जुलैला ‘गाला डिनर’ सोबतच ‘अ‍ॅवॉर्ड्स नाईट’ रंगणार असून २६ व २७ जुलै रोजी मुख्य ‘कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात होईल. महोत्सवासाठी निवडलेल्या चार मराठी चित्रपटांचे ‘वर्ल्ड प्रीमियर शोज’, त्यासोबत १६ शॉर्ट फिल्म्सचे प्रीमियर, ४ आंतरराष्ट्रीय भाषिक चित्रपट, ‘स्टुडंट्स सेक्शन’, ‘मास्टर क्लासेस’, ‘मीट अ‍ॅण्ड ग्रीट’, ‘लाईव्ह परफॉर्मन्सेस’ आणि बरंच काही या महोत्सवात असणार आहे. तसेच सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. ‘नाफा’ महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

या सोहळ्याची संपूर्ण अमेरिका आणि कॅनडातील भारतीय प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. गेल्यावर्षीपासून ‘नाफा’ने सुरू केलेल्या दर महिन्याला एका मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे अमेरिकेतील नव्या मराठी प्रेक्षकांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading