December 4, 2024
Nandadeep Poetry Book by Priti Jagzhap
Home » मनमंदिरात तेवणारा काव्यरुपी नंदादीप
मुक्त संवाद

मनमंदिरात तेवणारा काव्यरुपी नंदादीप

आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर एका वेगळ्याच उंचीवर भरारी घेण्याची खूणगाठ बांधून प्रिती जगझाप यांनी आपल्या काव्यलेखनीतून नंदादीप साकारलेला आहे. या नंदादीप काव्यसंग्रहात ६६ काव्यरचना रेखाटून काव्यप्रतिभेची ठळक मुद्रा वाचकमनावर उमटवण्यात हा संग्रह लक्षवेधी ठरला आहे. शब्दफुलांच्या, शब्दांच्या ओढीने केलंलं त्यांचं हे लेखन त्यांच्या दर्जेदार शब्दसामर्थ्याची साक्ष देते.

माधवी सागर कांबळे

सातारा

प्रसिद्धीच्या पाऊलखुणा
सहजासहजी उमटत नसतात.
प्रयत्नांचे डोंगर त्याला,
अव्याहतपणे फोडावे लागतात.

नंदादीप म्हणजे अखंड तेवणारा तेजोदीप. त्याचं सात्विक तेज नकारात्मकता घालवून चैतन्य, उल्हास निर्माण करतो. दिव्यांचा दैदिप्यमान इतिहास पाहिला, तो समजून घेतला तर हा तेजाचा, प्रकाशाचा प्रवास एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाण्यास हातभार लावतो. प्रितीताईंनी आपल्या या काव्यसंग्रहाला नंदादीप हे नामकरण देऊन जणू काही काव्यरचनेची रोषणाईच केली आहे. मुखपृष्ठ रेखाटणारे श्रीकृष्ण ढोरे यांनी एका सात्विक, निरागस स्त्रीचं समर्पक चित्र रेखाटून या काव्यसंग्रहाला चौदहवीं का चाँद असंच काहीसं केलंय. स्त्री ही नंदादीपाप्रमाणेच आपल्या आयुष्यात अखंड तेवत असते. त्यामुळे काव्यसंग्रहाला दिलेले नाव आणि मुखपृष्ठावरील चित्र यांचा दुग्धशर्करा योग असल्याचेच भासते.

किशोरी अवस्थेपासूनच काव्यप्रतिभेची चुणूक दाखवणाऱ्या प्रितीताई भाग्यवानच म्हणायला हरकत नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई हीच केंद्रबिंदू असल्याने प्रितीताई देखील याला अपवाद राहिल्या नाहीत. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या आईच्या नावावरूनच आपल्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला नंदादीप हे नाव देऊन आपल्या आईला प्रकाशझोतात आणण्याची त्यांची ही सुप्त संकल्पना म्हणजे आईप्रती स्त्रवणारी अगाध कृतज्ञताच. समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर यांच्या प्रकाशनाने साकारलेला हा संग्रह त्यांनी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या वडील आणि काका यांना अर्पण केला आहे.

भूभरीकार अरुण झगडकर यांनी आपल्या प्रस्तावनेत या काव्यसंग्रहाचे अंतरंग रेखीव, समर्पक शब्दांकणातून मांडल्याने या काव्यसंग्रहाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. प्रिती ताईंनी आपल्या मनीचे हितगुज सांगताना आपला जीवनपट पुढे मांडून जीवनातील विविध प्रसंग, मिळालेली कुटुंबाची साथ, आप्तस्वकियांचे प्रेम, साहित्यिकांचे मिळणारे प्रोत्साहन यामुळेच आज त्यांचा नंदादीप आकाराला येत आहे. या संग्रहातील काव्यांना मैत्री, प्रेम, करुणा, ग्रामीण जीवन, वृद्धांचे मनोगत, देशप्रेम, देशभक्ती, पर्यावरण, निसर्ग, शेतशिवार, पंढरी अशा नानाविध भावभावनांना आपल्या शब्दांत बांधण्याची किमया त्यांनी केली आहे.

बाईच बाईला अजूनही
समजून कसे घेत नाही?
स्वतःच्याच अस्तित्वाला
खंबीर आधार का देत नाही
या ओळी मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहत नाहीत. स्त्रीच स्त्रीचा शत्रू असल्याने तिचा पाय मागे ओढण्यासही स्त्रीच कारणीभूत असते हे प्रकर्षाने जाणवते.

आयुष्याचे गणित मांडताना चार दिवस सुखाचे नि चार दिवस दुःखाचे कधी संपून जातात हे कळत नाही. आयुष्याची ही व्यथा समर्पक शब्दांत मांडली आहे.
दूर तुजपासून प्रिती आज जरी
विलासी मिठी तुझी
देते मला साथ तरी
या काव्यफुलात दोघां उभयतांना गुंफताना प्रेमरसाच्या हळूवार दिवसांच्या अलवार आठवणी जागृत होताना दिसतात. ठरला आहे. शब्दफुलांच्या, शब्दांच्या ओढीने केलंलं त्यांचं हे लेखन त्यांच्या दर्जेदार शब्दसामर्थ्याची साक्ष देते. त्यांच्या मनातील नजाकता, नाजुकता, मनातील तरलता, संवेदनशीलता या साऱ्यांचा संगम त्यांच्या कवितांमधून जाणवतो.

त्यांच्या मनाचं हळूवार रोपटं शब्दांच्या हिंदोळ्यावर झुलवत वाचकांना सुखदुःखाची, आशानिराशेची जाणीव करून देणारं आहे. त्यांच्या कवितांना कुठेही साचेबंदपणाची चौकट नाही की आशयाचा परीघ नाही. मनाच्या गाभाऱ्यातून मोकळ्या अवकाशापर्यंत या कविता विहरताना दिसतात. त्यांच्या या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या अन् अनेक प्रतिमांना स्थान देऊन आपल्या शब्दशैलीतून, गर्भगळीत आशयघन कवितांचा उगम झालेला दिसून येतो.

मलपृष्ठावरील डॉ. पद्मरेखा धनकर यांनी प्रिती ताईच्या मनमंदिरातील नंदादीपाने जनमाणसातील अंधःकार लोप पावून प्रकाशमानाची वाटचाल करेल अशी आशावादी तरल भावना व्यक्त केली आहे.

प्रिती विलास जगझाप यांनी आपल्या मनमंदिरात तेवणारा काव्यरुपी नंदादीप काव्यसंग्रहाच्या रुपाने रसिकांसाठी उजळला आहे. आपल्या आईबद्दलचा स्नेह, स्त्री जीवनाविषयीची कळकळ, ग्रामीण जीवनाविषयाची आस्था, प्रेमाचे विविध रंग याविषयीचे चिंतन या काव्यसंग्रहात आले आहे.

डॉ. पद्मरेखा धनकर

पुस्तकाचे नाव – नंदादीप ( काव्यसंग्रह )
कवयित्री – प्रिती विलास जगझाप
पृष्ठे – ८०, किंमत – १२० रुपये
प्रकाशक – समिक्षा पब्लिकेशन, पंढरपूर जि. सोलापूर
नंदादीप काव्यसंग्रहासाठी संपर्क 9421721391


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading