अलिंगनाचे अनेक फायदे-तोटे आहेत. दुःखी माणसाला आधार देणारे हे अलिंगन त्याचे जीवन आनंदाने भरून टाकू शकते. अलिंगनातून मिळणाऱ्या आनंदाने अनेक मानसिक आजारातूनही मुक्ती मिळू शकते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
कां पतिपुत्रांते अलिंगी । एकचि ते तरूणांगी ।
तेथ पुत्रभावाचा अंगी । न लगेचि कामु ।। 480 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला अलिंगन देते, परंतु पुत्राला अलिंगन देतेवेळी तिच्या मनाचे पुत्राविषयी प्रेम असतें त्या प्रेमांत कामाचा स्पर्श नसतो.
अलिंगन किंवा गळाभेट यात प्रेमाचा पवित्र भाव असतो. या क्रियेतून अनेक समस्यांचे निराकरण होते. प्रेमाने, आपुलकिने घेतलेली ही भेट अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदारही राहीलेली आहे. अनेक राजे महाराजे युद्ध समेट घडवण्यासाठी गळाभेट घेत असत. गळाभेटीतून त्यांच्यातील राजकिय वैर संपूष्टात आणतात. गळाभेटीत कपटही पाहायला मिळते. धृतराष्ट्राने भीमाला गळाभेटीतून मारण्याचा प्रयत्न केला होता. अफझलखान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही गळाभेटीत कपट दिसून येते. पण या घटनते शिवाजी महाराज यांचे चातुर्य आणि स्वयंभु गुणांचा उलघडा झाला. राजा हा स्वयंभु असतो हे यातून सिद्ध झाले. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी यांनी एका चरणात शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हटले आहे. राजे हे श्रीमान योगी होते हे यासाठीच म्हटले गेले आहे कारण अध्यात्माने त्यांना पुढच्या घटनांची अनुभुती येत होती. यासाठीच जागरूक राहून राजे योग्य पाऊले ते उचलत. गळाभेटीमध्ये दगाफटका होणार हे याच गुणामुळे त्यांनी ओळखले आणि योग्य कृती केली.
गळाभेट सद्गुरुंच्या सोबतही असते. गुरु आणि शिष्याच्या गळाभेटीमध्ये शिष्य गुरुमय होऊन जातो. सद्गुरु त्याला त्याच्यापदी बसवतात. तितके सामर्थ्यवान त्याला करतात. वारकरीही पांडूरंगाच्या गळाभेटीसाठी आतूर असतात. या भेटीतील आनंद हा अनुभवाचा असतो. तो शब्दात सांगता येणे कठीण आहे. भेटीतून मिळणारा आनंद वर्षभर वारकऱ्यांसाठी उर्जा देत राहातो. जीवनात ती उर्जा वारंवार मिळत राहून त्याचे जीवन विठ्ठलमय होऊन जाते. अशा या अलिंगनाचे अनेक फायदे आहेत. दुःखी माणसाला आधार देणारे हे अलिंगन त्याचे जीवन आनंदाने भरून टाकू शकते. अलिंगनातून मिळणाऱ्या आनंदाने अनेक मानसिक आजारातूनही मुक्ती मिळू शकते.
अलिंगन देताना व्यक्तीनुसार त्याचा भाव बदलत असतो. स्त्री पुत्राला अलिंगन देताना तिच्या मनामध्ये त्या मुलाविषयी प्रेम असते. यातून या दोघांनाही आनंद मिळतो. प्राण्यांमध्येही हा प्रेमभाव दिसून येतो. स्त्री पतिला जेव्हा अलिंगन देते तेव्हा त्यात कामाचा स्पर्श असतो. पण यातून त्या दोघांना मिळणारा आनंद दोघांचे जीवन सुखी करतो. अलिंगन किंवा गळाभेटीचे फायदे विचारात घेऊन त्याचे महत्त्वही जाणून घेणे गरजेचे आहे.