December 4, 2024
Agriculture during the regions of Shivaji the king of farmers
Home » शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती ॥
वर्षानुवर्ष पिचत पडलेल्या, परकीय राजवटी खाली दबलेल्या आणि शेती उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला बळीराजानंतर पुन्हा एकदा उर्जितावस्था आणून देणारा राजा शिवाजी महाराजांच्या रूपानं जन्माला आला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे धोरण राबवलं त्याचा विचार आपणाला या लेखात करावयाचा आहे. शिवाजी महाराजांचा जन्म एका महाभयंकर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेला होता. त्यामुळेच त्या काळात ‘अस्मानी आणि सुलतानी’ असा दोन्ही बाजूनं उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचं वर्णन करणारा शब्द रूढ झालेला होता. त्यानिमित्तानं सुरुवातीला थोडं भारतीय दुष्काळाच्या संदर्भात पाहुयात.

इंद्रजीत भालेराव

भारत हा शेतीप्रधान देश आहे. म्हणूनच तो दुष्काळप्रवण देश आहे.  इसवीसनापूर्वी ६६ वर्षे आधी इथं महाभयंकर दुष्काळ पडल्याची नोंद सापडते. त्यानंतरची नोंद आहे इ. स. ८५७ ची. मधल्या ९०० वर्षांच्या काळात दुष्काळ पडल्याची नोंद सापडत नाही, याचा अर्थ त्या काळात दुष्काळ पडलाच नाही असं नाही. फक्त नोंद सापडत नाही इतकंच. त्यानंतरच्या दुष्काळाच्या मात्र सविस्तर नोंदी सापडतात. तसा तर वर्षाआड इथं दुष्काळच असतो. तो कधी ओला तर कधी कोरडा एवढाच त्यात फरक असतो. कधी वादळ वाऱ्यानं, कधी गारांच्या माऱ्यानं, तर कधी आवर्षणानं इथला माणूस कोलमडून पडतो. त्यात सर्वाधिक भरडला जातो तो शेतकरी.

प्रत्येक शेतकरी आपल्या आयुष्यात तीस ते चाळीस दुष्काळ आणि एकदोन महादुष्काळ अनुभवत असतोच. दुष्काळाच्या आठवणी हा त्याच्या अनुभवाचा ठेवाच असतो. दुष्काळ सर्व ओरबाडून नेतो, पण आठवणींचं अंबार मात्र पूर्ण भरून देतो. पिढ्यापिढ्यातली म्हातारी माणसं या दुष्काळाच्या आठवणी चघळत बसतात. आठवणी आठवत पुढची पिढी पुढच्या दुष्काळाला सामोरी जात असते. प्रत्येक्षातली भाकरी दुष्काळात दुर्मिळ असली तरी ही आठवणींची शिदोरी मात्र संपता संपत नाही. ती पिढ्यानुपिढ्या पुरतच राहते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १४७८ मध्ये पडलेला दुष्काळ बारा वर्षे टिकला. त्याच्या आठवणी ५०० वर्षे उलटली तरी महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. तो दुष्काळ दुर्गादेवीच्या दुष्काळ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच दुष्काळात बिदरच्या बादशहाचे मंगळवेढ्याचे अधिकारी संत दामाजीपंत यांनी धान्याचं सरकारी गोदाम फोडून जनतेला धान्य वाटलं होतं. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने राजाच्या दरबारात जाऊन त्या नुकसानीची भरपाई केली होती, अशी आख्यायिका आहे.
त्याआधीही महाराष्ट्रानं दुष्काळांना सतत तोंड दिलेलं होतंच. इसवीसनपूर्व ५०० ते इसवीसन ५०० हा थोडा समृद्धीचा कालखंड सोडला तर, नंतर दुष्काळ हा महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला होता. दुर्गादेवीचा बारा वर्षाचा दुष्काळ म्हणजे अतिभयानकच होता. लिखापढीत त्याचे फारसे पुरावे नसले तरी लोकपरंपरेत त्याचा इतिहास अजून जिवंत आहे.

दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर १६३० मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला तसंच महाभयंकर दुष्काळाला सामोरं जावं लागलं. या दुष्काळाचं वर्णन रामदास आणि तुकाराम या दोन्ही संतांच्या वाङ्मयात विपुल प्रमाणात सापडतं. हे वर्णन कवीकल्पना म्हणून सोडून देण्यासारखं नाही. तत्कालीन परदेशी प्रवाशांची अनुभवकथने आणि इतर पुराव्याच्या आधारे हे वर्णन पूर्णपणे सत्य आहे, याची खात्री पटते.

कितीयेक ग्रामेची ती ओस झाली
पिके सर्व धान्येची नाना बुडाली
जन बुडाले बुडाले पोटेवीण गेले
बहु कष्टले कष्टले किती एक मेले
विसा लोकात लोकात एकची राहिले
तेणे उदंड उदंड दुःखची पाहिले
गुरे विकिली सर्व वस्त्रेची पात्रे
भटी विकिली सोवळी केली धोत्रे
लोक भलेसे दिसती खेटरे चोरीती
वस्त्रे धोत्रे पातळे लपवूनी पळती
बायेला लेकुरे सांडूनिया जाती
भिक मागती मागती तिकडेची मरती

असं रामदासांनी तेव्हाच्या दुष्काळाचं वर्णन केलेलं आहे. रामदास सतत फिरस्तीवर असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याची दैन्यवस्था दिसतच होती. नकळतपणे त्यांच्या कवितेतून ती जागोजाग विखुरलेली दिसते. शेतकऱ्यांचा अडचणींचा पाढा वाचणारा एक भाग दासबोधात आहेच. तेव्हाचे दुसरे कवी तुकाराम यांनीही आत्माअनुभवाच्या अंगानं या दुष्काळाचं वर्णन आपल्या एका दीर्घ अभंगात केलेलं आहे. मागच्या तुकोबांवरच्या लेखात आपण हा अभंग बाजूला ठेवला होता. कारण तो इथं जास्त संयुक्तिक वाटेल म्हणून. तो आता आपण पाहूयात,

संवसारे जालो । अति दुःखे दुःखी
मायबापे सेखी ।  क्रमिलिया
दुष्काळे अटीले । द्रव्य नेला मान
स्त्री एकी अन्न अन्न । करीता मेली
लज्जा वाटे जीवा । त्रासलो या दुःखे
व्यवसाय देखे । तुटी येता

दुसऱ्या एका अभंगात या दुष्काळाविषयी उपहासानं बोलताना तुकाराम म्हणतात,
बरे जाले देवा । निघाले दिवाळे
बरी या दुष्काळे । पीडा केली
अणुतापे तुझे । राहिले चिंतन
जाला हा वमन । संवसार
बरे जाले देवा । बाईल कर्कशा
बरी हे दुर्दशा । जनांमध्ये
बरे जाले जगी । पावलो अपमान
बरे गेले धन । गुरे ढोरे
बरे जाले नाही । धरीली लोकलाज
बरा आलो तुज । शरण देवा
बरे जाले तुझे । केले देवाईल
लेकरे बाईल । उपेक्षिली
तुका म्हणे बरे । व्रत एकादशी
केले उपवासी । जागरण

अशा अवघड पार्श्वभूमीवर शिवाजी राजांचा उदय झालेला आहे. संपूर्ण जीवन शेतीवर आधारित असलेल्या या काळात अनिश्चित पाऊस, सततची युद्धे, जुलमी राज्यकारभार आणि मदतीचा अभाव यामुळे शेतकरी रयतेला कोणी वालीच उरलेला नव्हता. यांचा वाली म्हणून शिवाजी राजांचा उदय झाला. त्यामुळे शिवाजी हे बळीराजाचेच अवतार होते अशी लोककल्पना रुजली असावी, असं अ. रा. कुलकर्णी यांना वाटतं. ‘शिवकालीन महाराष्ट्र’ या त्यांच्या पुस्तकात शेती आणि शिवाजी राजांचा फार चांगला अनुबंध त्यांनी उलगडून दाखवला आहे.

शिवाजी राजांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच पडलेल्या या दुष्काळात कुटुंबातील विसांपैकी एकच माणूस शिल्लक राहिल्याचा उल्लेख रामदासांच्या वरील काव्यात आपण पाहिला. शिल्लक राहिलेल्यांचा वाट्याला केवळ दुःख आणि दुःखच आलं, हेही रामदासांनी सांगितलेलं आहेच. शेतीला तर पुष्कळच मनुष्यबळ लागतं. नव्यानंच उभं राहू पाहणाऱ्या स्वराज्यालाही सैनिक म्हणून माणसांची गरज होती. माणसाप्रमाणेच शेतात आवश्यक असलेली जनावरंही या दुष्काळात मृत्युमुखी पडली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि शेतकरीही उभा केला. म्हणूनच इतर राजांपेक्षा शिवाजी राजांचं कौतुक आपणाला अधिक वाटतं. बैल, अवजार आणि बी बियाणांसाठी सर्वतोपरी मदत राज्यभर करण्यात यावी, असे आदेशच तेव्हा राजांनी काढलेले होते.

शेतसारा आणि त्याच्या वसुलीच्या संदर्भात काही उल्लेख सभासदांच्या बखरीत पाहायला मिळतात. त्यात असे म्हटले आहे की, ‘उत्पन्न झालेल्या पिकाचे पाच हिस्से करावेत. दोन हिस्से दिवानात जमा करून घ्यावेत आणि तीन हिस्से शेतकऱ्यांना द्यावेत.’ शिवाजींच्या आधीचे महाराष्ट्रातले राजे आणि शिवाजी महाराज यांच्या समकालीन भारतातले इतर राजे याच्या उलटं करीत असत. म्हणजे तीन हिस्से सरकारात जमा आणि दोन हिस्से शेतकऱ्याला ठेवले जायचे, अशा नोंदी सापडतात. म्हणून शिवाजी हे रयतेचे राजे होते असं रयतेला वाटत असे.

शिवाजी महाराजांची भूमिका शेतकऱ्याकडून केवळ घेण्याचीच नव्हती तर त्याला मदत करण्याचीही होती. त्या संदर्भात राजे म्हणतात, ‘नव्याने जर कोणी शेती करू इच्छित असेल तर त्याला गाई, बैल उपलब्ध करून द्यावीत. शेतीसाठी लागणारं बी बियाणं उपलब्ध करून द्यावं. त्याच्या सालचंदीची म्हणून देखील त्याला अन्नधान्य उपलब्ध करून द्यावं. त्याला शेती उभी करण्यासाठी दिलेला हा सगळा ऐवज चार वर्षात पिकाचा अंदाज पाहून त्याच्याकडून वसूल करावा’ अशा प्रकारचं रयतेचे पालकत्व आपण स्वीकारलं पाहिजे, असा राजांचा आग्रह होता.

प्रत्येक गावातल्या कारकूनानं पिकावर शेतकऱ्यांकडून नियमित शेतसारा वसूल करावा. त्यात जशी दिरंगाई करू नये तसेच बळजोरीही करू नये. देशमुख, देसाई आणि जमीनदारांच्या दबावाखाली जगण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये. जनतेची नागवणूक करण्याची सूत्रे त्यांच्या हाती राहू नयेत. जुलूम हे करतील आणि त्यामुळे बदनामी मात्र राजाची होईल आणि असे होऊ नये म्हणून आपण सदैव सावध राहिले पाहिजे, असं राजांना वाटत असे.

याआधी राजाच्या लष्कराला रयतेला लुटायचा जणू अधिकारच प्राप्त होत असे. बळाच्या जोराने आणि सुरक्षेच्या नावाखाली सैनिक अक्षरशः रयतेला ओरबाडीत असत. पण शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला होता की, ‘रयतेच्या काडीलाही हात लावाल तर याद राखा.’ काही वस्तू घेण्याची गरजच पडली तर काय सावधगिरी बाळगायला हवी हे सांगताना महाराज म्हणतात, ‘तुम्हाला गरज पडली म्हणून रयतेच्या शेतातली त्यांच्या मालकीची मोठी झाडं तुम्ही अविचारानं तोडू नका. कारण ही झाडं काही एकदोन वर्षात एवढी मोठी झालेली नसतात. रयतेनं ही झाडं प्रयत्नपूर्वक लावून वर्षानुवर्ष संगोपन करून आपल्या लेकरांसारखी वाढवलेली असतात. ती तुम्ही अशी अचानक तोडायला लागलात तर त्यांच्या दुःखाला पारावार राहणार नाही. कुणाला असं दुःख देऊन केलेल्या कामाचा शेवट विजयाकडे जात नसतो. त्यामुळे उलट प्रजापिडनाचा दोष राजाच्या अंगावर येत असतो आणि असा दोष अंगावर येणं राजाच्या चांगल्या प्रतिमेसाठी योग्य नसतं. त्यामुळे तुम्ही असं काही करू नका. तुम्हाला फारच गरज असेल तर एखादं जीर्ण झालेलं वाळलेले झाड मालकाला त्याचा थोडाफार मोबदला देऊन त्यांच्या संमतीनं तोडलं तर काही हरकत नाही. पण त्यांच्यावर चुकूनही बळजोरीचा प्रयोग करू नका.’ रयतेच्या काळजाची इतकी काळजी करणारा अन्य कोणता राजा इतिहासात शोधून तरी सापडेल का ? याविषयी शंकाच आहे. जिजाऊ यांच्यावर कविता लिहिताना म्हणूनच मी पुढील ओळी लिहिल्या होत्या,

पाखरांच्या पंखावरी चढले शेवाळ
पावसाने झोडपिली माणसे मवाळ
थोर तुवा दया केली जिजाऊ माऊली
झडपल्या वासरांची झालीस गाऊली
बैल दिले नांगराला फाळही दिलास
काळावर धावणारा काळही दिलास

कुठल्याही कारणाने आपल्या राज्यातल्या लोकांना गाव सोडून जावं लागू नये याची महाराज दक्षता घेत. तसं होणं म्हणजे आपलं राज्य वाईट असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कुणाच्या काही अडचणी असतील तर त्या आधी सोडवा आणि आपल्या राज्यात लोकांना स्थिर करा, असं त्यांचं म्हणणं होतं. सरकारी माणूस म्हणून धाक दाखवून गैरकृत्य केल्यास लोकांना आपल्यापेक्षा मोगल बरे वाटतील आणि मग स्वराज्याच्या उभारणीला त्यांची जी उत्स्फूर्त मदत मिळते आहे, ती मिळणार नाही, असं राजांचं म्हणणं होतं. उलट पिकांची नासधूस करणाऱ्या शत्रूपासून आपण त्यांना संरक्षण दिलं पाहिजे असं त्यांना वाटे.

राज्यातल्या पडीक जमिनी वहितीखाली आणाव्यात, आपण होऊन तसं करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावं, असं महाराजांना वाटायचं. सरकारवर अवलंबून न राहता एकीनं राहून गावाचं व पिकांचं संरक्षण करणारांचं राजे दरबारात कौतुक करीत असत. पाटस्थळ आणि मोटस्थळ अशा दोन प्रकारच्या सिंचन व्यवस्था तेव्हा अस्तित्वात होत्या. धरण बांधून पाटानं जमिनीला पाणी देणं म्हणजे पाटस्थळ आणि विहिरी बांधून मोटेनी पाणी देणं म्हणजे मोटस्थळ. पुणे जिल्ह्यातील शिवापूर आणि नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या ठिकाणी बांधलेल्या शिवकालीन धरणांचे तपशील आणि किस्से इतिहासात उपलब्ध आहेत. यानिमित्तानं पाटस्थळ आणि मोटस्थळ या सिंचन व्यवस्थांची चर्चाही तिथं आलेली आहे.

महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडीभूषण असा केलेला आहे. शेतकऱ्यांचा आसूड लिहिणाऱ्या महात्मा फुले यांची ही कृती मोठी अन्वर्थक आहे. याच पार्श्वभूमीवर शरद जोशी यांनी शिवाजीला शेतकऱ्यांचा राजा म्हणनं देखील तेवढंच अन्वर्थक आहे. शरद जोशी यांनी ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’ नावाचं एक पुस्तकच लिहिलेलं आहे. शरद जोशी यांचं हे पुस्तक शेतीनिष्ठ दृष्टिकोनातून शिवाजी राजांची प्रतिमा उभी करणारं आहे. हे पुस्तक शिवाजीराजांच्या निमित्तानं लिहिलं असलं तरी शेती, शेतकरी आणि राजा यांच्या परस्पर संबंधांचा बळीराजापासून सुरू झालेला सर्व इतिहास शेती शोषणाच्या नव्या दृष्टिकोनातून शरद जोशी यांनी या पुस्तकात मांडला आहे. इतिहासाच्या ज्ञातअज्ञात ५००० वर्षांच्या इतिहासात बळीराजा आणि राजा शिवाजी या दोन राज्यांशिवाय शेतकऱ्यांचा कैवार घेणारा अन्य कुणी राजा शोधूनही सापडत नाही, असं ठाम विवेचन शरद जोशी यांनी ईथं केलेलं आहे.

संपत्ती उत्पादक शेतकरी यांचा इतिहास लिहायचे सोडून सरदार जहागीरदार आणि राजे या चोर भामट्यांचा इतिहास लिहिला जातो याचे सविस्तर विवेचनही शरद जोशी या पुस्तकात करतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी उभी केलेली शिवाजी राजांची प्रतिमा आपोआपच ठळक होत जाते. शेतीशोषणाच्या विरोधी शेतकऱ्यांच्या बाजूचा विचार शिवाजीराजे कसा करत होते, हे शरद जोशी पुराव्यासह या पुस्तकात मांडतात. शिवाजी राजांच्या आयुष्यातील सर्व घटनांचा अन्वयार्थ शेतीच्या अंगानं लावताना एक वेगळाच राजा शरद जोशी आपल्यासमोर उभा करतात. शिवाजी महाराजांचा मिर्झाराजे जयसिंगाला शरण जाण्यामागचा शेतीपोषक विचारही आपणाला इतिहासाचा नवा अन्वयार्थ देऊन जातो. ‘इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येओ’ या धारणेवर ‘इडापिडा जावो आणि शिवाचे राज्य येओ’ ही नवी घोषणा शरद जोशी देतात.

एकेकाळी मार्क्सवादी मंडळी शिवाजी राजालाही सरंजामशाहीचा प्रतिनिधी समजत. परंतु श्रीपाद अमृत डांगे यांनी मात्र शिवाजी महाराजांच्या जनताभिमुखतेला प्रथम मान्यता दिलेली आहे. आपल्या ‘बारा भाषणे’ नावाच्या पुस्तकात डांगे म्हणतात, “जनतेच्या ध्यासातील आदर्श राजा शिवाजीच्या रूपाने अवतरला. शिवाजीने तडका फडकी जुनी वतने खालसा केली. जुन्या करपद्धती रद्द केल्या. भूदासावरील अमर्याद हुकुमत नष्ट केली. आणि जमीन महसुलाचे मक्ते द्यायची पद्धतही बंद केली. प्रत्येकाला कसायला जमीन, कुळाला स्थिरता, प्रत्यक्ष पैदा केलेल्या पिकावरच कर आकारणी, शेतकऱ्याच्या उत्पन्नावर वतनदाराचा हक्क नाही, या शिवाजीच्या आर्थिक सुधारणा होत्या.”

पुढं गोविंद पानसरे यांनी तर शिवाजी राजांवर स्वतंत्र पुस्तकच लिहिलं आणि शिवाजींचं धर्मनिरपेक्ष मोठेपण आणि त्यांनी घेतलेली रयतेची बाजू उलगडून दाखवली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी राजांना खराखुरा न्याय दिला. पण शिवाजींचं शेतीधोरण हा त्यांच्या पुस्तकाचा मुख्य विषय नसल्यामुळे आपल्या या शेतीविषयक लेखात त्यावर सविस्तर लिहीत नाही.

शिवाजी महाराजांच्या जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारी आणखी पुस्तिका पानसरे यांच्याही आधी नरहर कुरुंदकर यांनी लिहिली होती. या पुस्तिकेचीही खूप चर्चा झालेली होती. या पुस्तिकेत शिवाजी राजांच्या जीवनाचे रहस्य सांगताना प्राचार्य नरहर कुरुंदकर म्हणतात, “शिवाजीने पुन्हा एकदा सर्व जमीनीची मोजमापे केली. ही मोजमापे करण्यासाठी काठीचे माप वापरले. बिघे, चावर अशी जमीन मोजून प्रत्येक गावाची जमीन निश्चित केली. ही जमीन कोण वहिती करणार याची निश्चिती करून टाकली. या जमिनीत पीक किती येते याची काळजीपूर्वक तपासणी केली. जे एकूण पीक येईल त्याचे तीन वाटे प्रजेला व दोन वाटे राजाला अशी विभागणी करून टाकली. धर्मशास्त्रात खर्च, वेच जाता उरलेल्या उत्पन्नाचा षष्ठांस सांगितलेला आहे. शिवाजीच्या राज्यात खर्च, वेच वजा न धरता एकूण उत्पन्नाच्या दोन पंचमांस म्हणजे सुमारे ४०% कर आहे. हा कर लहान नाही. पण ही वाटणी सर्वांनी अत्यंत आनंदाने स्वीकारली. त्यासाठी लोक पिढ्यानपिढ्या शिवाजींचे ऋणी राहिले. हे लक्षात घेतले तर शिवाजीच्या पूर्वी जनतेला काहीच मिळत नव्हते, ही गोष्ट समजून येईल. एकदा जमीन निश्चित ठरली, तिचे कर निश्चित ठरले, त्यातून समाधानाने जगण्यापुरते उत्पन्न सुटू लागले, सर्वांच्यावर कर सारखे बसले, त्यांची वसुली पक्षपात न होता चालू लागली व एकदा एवढे कर दिल्यानंतर संपूर्ण संरक्षण आणि न्याय यांचे आश्वासन मिळाले, म्हणजे मग तक्रार कोणतीही उरत नाही. शिवाजीने प्रजेला समाधान मिळू शकेल अशी कर योजना पुरस्कारली आणि तिची पक्षपात विरहित निर्दोष अंमलबजावणी वर्षानुवर्ष करून दाखवली, हे त्याच्या राजवटीच्या यशाचे एक गमक आहे”

‘मराठी सत्तेचा उदय आणि अस्त’ यांची मिमांसा करणारं एक पुस्तक फार पूर्वी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इंग्रजीतून लिहिलं होतं. या पुस्तकात शिवाजी महिराजांच्या यशाचं रहस्य सांगताना रानडे यांनी शिवाजी राजांनी सुरू केलेली पगारी राज्ययंत्रणा याचा तपशीलवार विचार केलेला आहे. शिवाजींनी जमिनदारी आणि जहागिऱ्या बंद करून प्रजेला तर सुखी केलेच पण तेव्हा कुठंच अस्तित्वात नसलेली पगारी राज्ययंत्रणा ही शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त होती ते सविस्तर सांगितलं. शिवाजी महाराजांच्या पुढच्या वारसांना ही यंत्रणा पुढं नीट सुरू ठेवता आली नाही आणि मराठी सत्तेचा अस्त झाला. इथं शिवाजी राजांचे पुढचे वारस म्हणजे पेशवे यांची पेशवाई, याकडं रानडे यांनी निर्देश केलेला आहे. त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या सत्तेने मात्र शिवाजी महाराजांचीच राज्ययंत्रणा कशी अनुसरली, तेही रानडे यांनी नीट समजून सांगितलं आहे.

संदर्भ :
१. छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ – सं. डॉ जयसिंगराव पवार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे (२०११)
२.  छत्रपती शिवाजी महाराज : जीवन रहस्य – नरहर कुरुंदकर, देशमुख आणि कंपनी, पुणे (२०१४)
३. शिवाजी कोण होता ? – गोविंद पानसरे, लोकवाङ्मय गृह, मुंबई (१९८८)
४. शिवकालीन महाराष्ट्र – डॉ. अ. रा. कुलकर्णी, राजहंस प्रकाशन, पुणे (१९९३)
५. महाराष्ट्राचा इतिहास – मराठा कालखंड – भाग-१ (शिवकाल) डॉ. वि. गो. खोबरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई (२००६)
६. मध्ययुगीन महाराष्ट्र – डॉ. अ. रा. कुलकर्णी, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे (२००७)
७. मराठे आणि महाराष्ट्र – डाॅ. अ. रा. कुलकर्णी, डायमंड पब्लिकेशन्स (२००७)
८. मराठा कालीन ग्रामव्यवस्थेचा ऱ्हास (ई.स. १६०० ते १८१८) प्रो. ई. मि. रेईस्नर, अनु. बाचुळकर – कट्टी, कीर्ती प्रकाशन, कोल्हापूर (२००१)
९. महाराष्ट्र संस्कृती – पु. ग. सहश्रबुद्धे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे (१९७९)
१०. आज्ञापत्रे – सं. डॉ. अ. वा. कुलकर्णी, मानसन्मान प्रकाशन, पुणे (२००४)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading