September 8, 2024
Natural mangroves are mangrove forests
Home » निसर्गनिर्मित तटरक्षक – खारफुटी वने
फोटो फिचर

निसर्गनिर्मित तटरक्षक – खारफुटी वने

जागतिक खारफुटी दिन – 26 जुलै

खारफुटी किंवा खाजण वने किंवा कांदळवन अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्राजवळ भरती-ओहोटीच्या भागामध्ये वाढणाऱ्या या वनस्पतींबद्दल जाणीव, जागृती वाढावी म्हणून 26 जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन (International Day For The Conservation Of The Mangrove Ecosystem) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारची खारफुटी वने आढळतात.

कोकण किनारपट्टीवरही आपल्यापैकी अनेकांनी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे किंवा वनस्पती पाहिलेल्या असतीलच. समुद्र आणि खाडीजवळच्या या ठिकाणी खूप दलदल असल्यामुळे प्रत्यक्ष जवळ जाऊन ही झाडे पाहणे किंवा त्यांचे निरीक्षण करणे शक्य नसले, तरीही किनारपट्टीवरून किंवा किनाऱ्यावरच्या- समुद्राजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना किंवा कोकणातील खाडीपुलावरून जाताना या वेगळ्या प्रकारच्या वनस्पतींनी कधी ना कधी आपले लक्ष वेधून घेतले असणार.

वनस्पतींपेक्षा या झाडांची काहीशी वेगळी रचना कदाचित आपल्या लक्षातही आली असेल. उदाहरणार्थ समुद्राच्या ओहोटीच्या वेळी दिसणारी आणि जमिनीतून उलटी वर आलेली, छोट्या-छोट्या काड्यांसारखी किंवा शंकू सारखी दिसणारी मुळे. तसंच सहजपणे लक्षात येणारी मोठ्या आकाराची जमिनीवर पसरलेली आणि हवेतून झाडाच्या खोडाकडून जमिनीकडे जाणारी, झाडांना आधार देणारी मोठी मोठी मुळे. झाडांच्या थोडे जवळ जाऊन निरीक्षण करण्याची संधी मिळाली, तर काही झाडांच्या पानावर दिसणारे पांढरे ठिपके आणि झाडांवर फळे किंवा बिया लटकत असतानाच त्यांना फुटलेले भात्याप्रमाणे टोकदार असणारे अंकुर.

या झाडांच्या उपयुक्ततेबद्दल काय सांगावे? ही झाडे सातत्याने दलदल / चिखल, समुद्रकिनारी सातत्याने वाहत असलेला वारा, समुद्राचे खारे पाणी, लाटा, भरती-ओहोटीचा प्रभाव अशा सगळ्या विपरीत परिस्थितीत समर्थपणे उभी राहून किनारपट्टीचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करीत असतात. तिथल्या जमिनीची धूप थांबवत असतात. जणूकाही हिरवी भिंतच. पण खर्‍या भिंतीप्रमाणे वाऱ्याला आणि पाण्याला अडथळा न निर्माण करता ही निसर्ग निर्मित तटरक्षक खारफुटी वने किनारपट्टीच्या संरक्षणाचं काम करीत आहेत.

तसेच अतिवृष्टीच्या वेळी आणि पूरसदृश परिस्थितही किनार्‍याचे संरक्षण करतात. याच वनस्पतींच्या भागांमध्ये अनेक प्रजातींचे मासे व जलचर अंडी घालतात त्यामुळे सागरी जीवसृष्टी आणि मत्स्य उत्पादनाच्या दृष्टीनेही ही वने महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे पक्षी, कीटक, कोळी, प्राणी हेही इथे गुण्यागोविंदाने नांदताना आढळतात आणि म्हणूनच याला खारफुटी परिसंस्था (mangrove ecosystem) असे म्हटले जाते.

पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे मोठे कांदळवन / खारफुटीचे वन आहे. याबद्दल कदाचित आपण ऐकले असेल. मात्र कधीकधी आपल्या आजूबाजूला संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी असणाऱ्या / दिसणाऱ्या या खारफुटी वनांच्या रक्षणाचे कार्यही आपण सर्वांनी करायला हवे. अशा या वनांच्या महतीची माहिती आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचवायला हवी आणि त्यांना या कामाशी जोडायला हवे.

सौजन्य – https://krishivarada.wordpress.com/


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

काय डोंगर काय ते झाडी

उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर

जीएसटी – कुछ खुषी कुछ गम !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading