छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेने सन २०२५ पासून बालवाङ्मयासाठी रघुनाथ शिवराम बोरसे यांच्या नावाने एक विशेष बालवाङ्मय पुरस्कार सुरू केला असून ‘दैनिक केसरी’चे पत्रकार संजय ऐलवाड हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पुरस्कार निवड समितीने श्री. ऐलवाड यांच्या ‘झिब्राच्या कथा’ या कथासंग्रहाची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. या पुरस्काराच्या निवडीसाठी परिषदेने नियुक्त केलेल्या समितीत अध्यक्ष डॉ. काळुंखे यांच्यासह कवी रवी कोरडे आणि बालसाहित्यिक विनोद सिनकर हे अन्य दोन सदस्य होते.
संजय ऐलवाड हे मूळ उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी २००९ पासून पत्रकारितेला सुरुवात केली असून २०१० पासून गेली पंधरा वर्षे ते पुण्याच्या ‘दैनिक केसरी’ या वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आजपर्यंत ‘हातावरचं पोट’, ‘घुसमट’ हे दोन कथासंग्रह; ‘अंतरीच्या कविता’ हा कवितासंग्रह; ‘मुलाफुलांची गाणी’, ‘चिमणी पडली आजारी’ हे दोन बालकवितासंग्रह; ‘भित्रा थेंब’, ‘बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा’, ‘जिब्राच्या कथा’ हे तीन बालकथासंग्रह आणि ‘पिंटूची आकाशवारी’, ‘पोळा’ ह्या दोन बालकादंबऱ्या; ‘आर्टिओची गुरुकिल्ली’ हे माहितीपर पुस्तक अशी एकूण १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय तीन संपादित पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांना बालवाङ्मयासाठी महाराष्ट्रातील विविध संस्थांचे सुमारे २५ पुरस्कार मिळालेले आहेत.
२०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या व सध्या बालवाङ्मयात चर्चेत असलेल्या ‘झिब्राच्या कथा’ या बालकथासंग्रहासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचा हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. रुपये अकरा हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार त्यांना शनिवारी २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता बालसाहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी या पुरस्काराची व पुरस्कार वितरण समारंभाची घोषणा केली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष व निवड समिती प्रमुख डॉ. रामचंद्र काळुंखे, कार्यवाह डॉ. दादा गोरे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते, डॉ. दीपा क्षीरसागर हे पदाधिकारी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन