निसर्ग, पर्यावरण आणि प्राणी यांचे माणसांच्या सुंदर विचारातून संवर्धन झाले पाहिजे. जल, प्राणी, वृक्ष संवर्धन हाच संजय ऐलवाडच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. माणसांच्या मनोविकृतीला कुठेतरी थांबवता आले पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न संजयच्या एकंदरीत साहित्यात आलेला दिसतो.
प्रा.रामदास केदार
उदगीर
भाषा ही प्रत्येकालाच अवगत असते. मात्र अवगत करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. माणसांप्रमाणेच सृष्टीतील मुक्या पशू पक्षांनाही त्यांची भाषा एकमेकांना समजत असते. ते आपापसात भावना व्यक्त करु शकतात. हे संजय ऐलवाड यांनी आपल्या बालकथेतून बालमनाला रंजकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सृष्टी सौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक व संवादात्मक बालकथा आहेत .संजयच्या प्रत्येक कथा ह्या बालकांबरोबरच मानवीसमुहास नवा संदेश देणाऱ्या असतात.
“बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा ” हा त्यांचा नवा बालकथासंग्रह हाच संदेश देणारा आहे.
उदगीर तालुक्यातील एकुरका येथील प्रसिद्ध साहित्यिक. पुणे येथे केसरी वर्तमान पत्रात वृत्तविभागात सध्या ते कार्यरत असून त्यांचे हातावरचे पोट, घुसमट हा कथासंग्रह, अंतरीच्या कविता हा कवितासंग्रह, आरटीओची गुरुकिल्ली ही माहिती पुस्तिका, मुलांफुलांची गाणी बालकविता, पिंटूची आकाशवारी, भितरा थेंब हे बालकथा, वारुळ ही बालकादंबरी तर शब्दवेल हे पत्रकार व संपादकांच्या लेखसंग्रहाचे संपादन इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेचे लातूर जिल्हा प्रतिनीधी असून बालसाहित्य लेखनासाठी त्यांना मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
” बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा ” या बालकथा संग्रहात नऊ कथा आहेत. या सर्वच कथातून निसर्ग पशू पक्षांचे दर्शन घडते. संवादात्मक कथा आहेत. अन्न, पाण्यांच्या शोधात बिबट्याचे पिल्लू सोसायटीत प्रवेश करते. जंगलाला नष्ट करण्याच्या माणसांच्या चुकांचे फटके मुक्यांच्या जीवावर कसे बेततात हे पिल्लाच्या आणि सोसायटीत खेळणाऱ्या मुलांच्या संवादातून कळते. छोट्या छोट्या माणसांच्या चुका मुलांना कळायला लागतात. हे या कथेतून लेखकांने सांगण्यांचा प्रयत्न केलेला आहे.
डोंगराच्या पायथ्याशी अवघड वाटा आणि सुविधा नसलेल्या शाळेतील मुलांच्या धडपडीचे आणि कार्यांचे कौतूक करणारी वाढदिवस ही कथा आहे.
मुलं मँडचा वाढदिवस साजरा करण्यात मोठा आनंद शोधत असतात. तो आनंद या कथेत व्यक्त होतो. “घरटं” या कथेत चिमणीला जंगलात गवताची काडी न मिळाल्याने तारांनी घरटं बांधायला लागते. म्हणजे रानातले हे मुके जीव गावच्या वस्तीकडे नाईलाजाने यावे लागते. तर “फुलपाखरू ” या कथेत फुलपाखरांचे आयुष्य हे फक्त चौदा दिवसाचे असते. कमीच असते पण आनंदी स्वच्छंदी असते. माणसांचे मात्र याउलट असते. याची जाणीव लेखक मुलांना करून देतो. तर लहान मुले त्याच्यावर लळा लावतात. हे चिंटूच्या संवादातून सांगतो.
“झाड “या कथेत झाडे ही रसाळ फळे खाता यावीत यासाठी फळं, फाद्यांचे ओझे अंगावर घेऊन ऊन पावसात ताठ उभे राहतात. दुसऱ्यांसाठी हा देह अर्पण करतो. माणसांनेही झाडांपासून असा बोध घ्यावा. असे मुलांना सांगतो. हल्ली अनेक आजार वाढू लागले आहेत. यात विषाणूचा आजार तर जीवघेणा असतो. या विषाणूचा फटका टेकडीला बसतो. त्या टेकडीवर राहणाऱ्या मुक्या पशू पक्षांनाही बसतो. संपूर्ण टेकडीलाच आजार होतो. माणसाच्या या क्रुर वागण्यामुळे टेकडीलाही आजार सहन करावा लागतो. हे “टेकडीवरचे आजारपण ” या कथेत सांगतो.
मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी बबल्या कसा वेगवेगळ्या युक्ती शोधून काढतो. प्रयत्न करत असतो हे “बबल्या ” कथेतून लेखक मुलांना सांगतो. तर “मधाचं पोळ” या कथेत अस्वलाला मधाचं गोड पोळ खाण्याची इच्छा होते. सगळं पोळ काढून गोड मध खातो. आणि रिकामी पोळ फेकून देतो. मधमाशा त्याला चावत भोवताली गोंगावत असतात. मधमाश्यांना मध खाल्यांचे दुःख होत नाही. तर त्या पोळीत पिल्ली असतात. ते तडफडून मरतात. मधमाशांचे मातृत्व आणि मध गोळा करण्यांची कसरत कशी असते. हे मुलांना कळायला लागते. अस्वलाला मधमाशांच्या भावना उशीरा कळतात. पश्चात्ताप होतो. खूप महत्वाचा मधमाशी आणि अस्वलांचा शेवटी झालेला संवाद मुलांना खूप प्रेरणादायी ठरणारा आहे.
निसर्ग, पर्यावरण आणि प्राणी यांचे माणसांच्या सुंदर विचारातून संवर्धन झाले पाहिजे. जल, प्राणी, वृक्ष संवर्धन हाच संजय ऐलवाडच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. माणसांच्या मनोविकृतीला कुठेतरी थांबवता आले पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न संजयच्या एकंदरीत साहित्यात आलेला दिसतो. सुनील मांडवे यांनी सुंदर असे मुखपृष्ठ रेखाटले आहे. सुनिताराजे पवार यांची पाठराखण आहे.
पुस्तकाचे नाव – बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा (बालकथा)
लेखक – संजय ऐलवाड
प्रकाशन – संस्कृती प्रकाशन पुणे
पृष्ठे – ६४ मूल्य – ८०