साधना म्हणजे तरी काय ? सो..हम…सो..हम.. ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना ? ही लय ज्याला सापडली, पकडता आली, तोच खरा आत्मज्ञानी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधे निजविसी । बुझाऊनी ।। ७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – सतरावी जीवनकलारुपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरुपी) दुध देतेस आणि अनाहत ध्वनीचें गाणे गातेस आणि समाधीच्या बोधानें समजूत घालून स्वरुपी निजवितेस.
सद्गुरू समाधिस्थ झाले तरी ते भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची आध्यात्मिक प्रगती साधण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन असते, असे मानले जाते. संतांच्या अनेक लीला सांगितल्या जातात. अनेक भक्तगण त्यांचे अनुभव नेहमीच सांगत असतात. समाधिस्थ झाल्यानंतरही सद्गुरू भक्तांना अनुभव देतात. हे नव्या पिढीला पटणे जरा कठीणच वाटते. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, असे ही नवी पिढी समजते. असे कधी असणे शक्यच नाही, असे त्यांचे मत असते.
मग कोणत्याही देवळात गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते, असे का म्हणता? पूर्वीच्या काळी जे तंटे वर्षानुवर्षे चावडीवर सुटत नसत, ते देवळात झालेल्या एका बैठकीत सुटल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे कसे शक्य आहे ? असा चमत्कार घडलाच कसा ? याचे आश्चर्यही वाटते. मंदिर, संतांची समाधी स्थळे या पवित्र जागा आहेत. या जागांची वैशिष्ट्ये विचारात घ्यायला हवीत. संतांच्या समाधीच्या जागेतील वातावरणात विशिष्ट लहरींचा वावर असतो. त्या लहरीतून मनाला आनंद, उत्साह प्राप्त होतो. या वातावरणात आल्यानंतर या लहरींची लय, तो नाद आपल्या शरीरात प्रवेश करतो. यामुळेच हे बदल घडतात.
साधना म्हणजे तरी काय ? सो..हम…सो..हम.. ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना ? ही लय ज्याला सापडली, पकडता आली, तोच खरा आत्मज्ञानी. सद्गुरू ही लय भक्ताला पकडायला शिकवतात. त्यांच्या लयीत आपली लय मिसळायला हवी. ती मिसळावी यासाठीच तर सगळे प्रयत्न सुरू असतात. एकदा का तो सूर, तो नाद, ती लय सापडली की मग पुन्हा विसरणे नाही. पुन्हा ती सुटून जाणे शक्य नाही.
समाधिस्थ झाले तरी ती लय सुटत नाही. म्हणूनच तर भक्तांना अनुभव येत राहतात. संत, सद्गुरूंची समाधी संजीवन आहे, हे यासाठीच तर म्हटले जाते. ते भक्ताला त्यांच्या लयीत ओढण्याचा प्रयत्न करतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी देवातील देवळात दर्शनासाठी रांगा लागतात. समाधीच्या दर्शनासाठीही रांगा लागतात. सद्गुरु अनुभवातून भक्ताला ज्ञानी करतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.