January 28, 2023
Dr Leena Nikam article on Rajmata Jijau
Home » प्रशासक जिजाऊ अन् आज्ञापत्र
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

प्रशासक जिजाऊ अन् आज्ञापत्र

प्रशासक जिजाऊ आणि आज्ञापत्र

आज अस्तित्वात असलेल्या लोकशाही व्यवस्थेचे प्रेरणास्त्रोत छत्रपतींच्या स्वराज्य धोरणात आहे. आणि ‘स्वराज्य’ या शब्दाची पहिली ओळख त्यांना करून दिली ती जिजाऊंनी. स्वराज्य आणि स्वधर्म यांचे बीजारोपण त्यांनी बालपणीच शिवरायांच्या मनात केले. जिजाऊंनी जणू ‘नूतन सृष्टीच निर्माण केली’ असे जे आज्ञापत्रकार म्हणतात त्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे.

डॉ. लीना निकम, नागपूर

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती ही प्रामुख्याने जिजाऊंच्या संस्कारातून व त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच झाली. जिजाऊंनी शिवरायांना फक्त ‘बोलके’ मार्गदर्शनच केले नाही तर त्यांची एक एक कृती, त्यांचे धाडसी निर्णय, त्यांचं धीराचं वागणं त्यांचं प्रेमाचं बोलणं आणि संकटातूनही खंबीरपणे जगणं हे सर्व शिवरायांसाठी आदर्श ठरलं. केवळ आपल्या मुलाला घडविणाऱ्या त्या सामान्य माता नव्हत्या तर मुलाकडून राष्ट्राला घडविणाऱ्या ‘नूतन सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या असामान्य माता होत्या म्हणूनच त्या ‘राष्ट्रमाता’ आहेत केवळ ‘राजमाता’ नव्हेत.

शिवबांच्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या मार्गदर्शक व साक्षीदार जिजाऊ आहेत. मग ‘शिवाजीराजांची राजनिती’ उर्फ ‘आज्ञापत्रात’ जिजाऊ डोकावल्या नाहीत तरच नवल ! आज्ञापत्राच्या पानापानातून ‘जिजाऊ – नीती’ चे इतके सुंदर प्रतिबिंब दडले आहे की या आज्ञा म्हणजे असं वाटतं, कुशीत घेऊन कुणीतरी आपल्याला प्रेमाने समजावीत आहेत, मार्ग दाखवित आहे. आज्ञापत्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा ठेवा होय. आज्ञापत्र म्हणजे जिजाऊंच्या शिकवणुकीचा परिपाक होय.

आज्ञापत्रातील जिजाऊंबद्दलचे शिवाजीराजांचे उद्गार अतिशय कळकळीचे व मातृनिष्ठेने न्हाऊन निघालेल्या अंतःकरणाचे दर्शक आहेत. उदाहरण द्यायचे तर ‘हे राज्य व हा किर्तीलाभ व पुढे काही जे होत आहे ते सकलही त्यांचे चरणीचा प्रताप त्यांची आज्ञा प्रमाण मानोन त्यांचे चित्त प्रसन्न करून घ्यावे. यापरीस स्वामीस इष्ट साधत नाही.’ यावरून छत्रपती शिवाजीराजांची आपल्या मातोश्रीवरील अनन्यनिष्ठा दिसून येते. याठिकाणी ‘त्यांची आज्ञा प्रमाण मानोन’ हे वाक्य फार महत्वाचे वाटते. शिवरायांनी आयुष्यभर जिजाऊंची आज्ञा प्रमाण मानली. त्याप्रमाणे ते वागले आणि जगले सुद्धा.
आज अस्तित्वात असलेल्या लोकशाही व्यवस्थेचे प्रेरणास्त्रोत छत्रपतींच्या स्वराज्य धोरणात आहे. आणि ‘स्वराज्य’ या शब्दाची पहिली ओळख त्यांना करून दिली ती जिजाऊंनी स्वराज्य आणि स्वधर्म यांचे बीजारोपण त्यांनी बालपणीच शिवरायांच्या मनात केले. जिजाऊंनी जणू ‘नूतन सृष्टीच निर्माण केली’ असे जे आज्ञापत्रकार म्हणतात त्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. शिवाजीराजे हे युद्धावरून परत येत किंवा नवीन मोहिमेवर जात तेव्हा ते जिजाऊंसोबत चर्चा करीत सल्लामसलत करीत, पुढील योजना आखीत आणि युद्धतंत्राबाबतही मार्गदर्शन घेत.

याचीच परिणती म्हणजे ‘गनीम दमानी पडोन हारीस आला, जेर जाहला तरी एकाएकी उडी घालू नये. दुरूनच चौगिर्द घेरून मांडियांचा मार देत असावे. दंगेखोर गनीम आपण जेर झालो असे जाणून दगाबाजीने कौल घेतो, तरी त्यास जवळ बोलावू नये,’ अशासारख्या आज्ञापत्रातील आज्ञा होत.
जिजाऊ हिंदवी स्वराज्यातील अनेक घटनांच्या नुसत्या प्रेरकच नव्हत्या तर प्रत्यक्ष निर्मात्या होत्या. अनेक प्रसंगी राजे मोहिमेवर गेल्यावर आणि आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांनी आपल्या पदराच्या सावलीत मोठ्या आपुलकीने आणि धीटपणे स्वराज्यरूपी लेकराला जपले आणि जोपासले. इतकेच नव्हे तर या काळात त्यांनी काही किल्लेही जिंकलेत हे फार महत्वाचे. विशेष नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आग्य्राला महाराजांच्या जीवाला कोणत्याही क्षणी धोका होण्याची शक्यता होती. याची काळजी जिजाऊसाहेबांना लागून राहिलेली होती पण फक्त काळजीची काळजी करण्यापेक्षा तिची सावकाश उकल करणे हे जिजाऊ चांगल्या जाणून होत्या म्हणूनच अशाही परिस्थितीत रांगणा किल्ला आदिलशहाकडून मिळवून स्वराज्यात दाखल केला. कारण – ‘राज्यसंरक्षणाचे मुख्य उपाय म्हणजे किल्ला. राज्य वाढविण्याचे प्रमुख साधन, ते देशोदेशी विशेष स्थळ पाहोन बांधावे याची पूर्ण जाणीव जिजाऊंना होती.

जिजाऊंनी महाराजांचे आठ विवाह करून नात्याची माणसं जोडली. यापाठीमागे मनुष्यबळ संघटित करणे हाच राजकीय उद्देश होता. पण नात्यातला असूनही स्वराज्यविरोधी कृत्य करणारा असेल तर त्यांची कधी भीडही बाळगली नाही याचे सार आज्ञापत्रातील ‘उत्तम माणूस संग्रही असावा’ या वाक्यात दिसते. माणसं ओळखण्याची कला शिवराय शिकले ते जिजाऊंपासूनच. जिजाऊंची भूतदयेची शिकवण आणि प्रजेला उपद्रव न होऊ देता कार्य करणे याविषयीची शिवरायांची जी आज्ञा आहे ते बघून तर प्रत्यक्ष जिजाऊ आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो.

‘अंध, पंगु, आतुर, अनाथ, अनुत्पन्न जे असतील त्यांचे ठाई भूतदया करून ते निवांत असिजेतो त्यांचा जीवनोपाय करून चालवीत जावे’ किंवा आरमाराच्या बांधणीसाठी ज्या सूचना दिल्या गेल्या त्या बघा. “स्वराज्यातील आंबे, फणस, आदि करून ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू नये. काय म्हणोन की, ही लाकडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी जतन करून बहुतकाळ वाढवली. ती झाडे तोडल्यावर त्यांचे दुःखास पारावार काय ? या वृक्षांच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्टी सर्वथैव होऊ न द्यावी, कदाचित एखादे जे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन संतोषे तोडून न्यावे. बलात्कार सर्वथैव न करावा.” वृक्षसंवर्धनाबाबतची केवढी ही दूरदृष्टी!

शिवराय ‘प्रजाहितदक्ष राजे’ वाटतात ते यामुळेच डोळ्यात तेल घालून ते स्वराज्य जपत होते. वाढवीत होते हेच यावरून स्पष्ट होते आणि मनात तरळून जाते ती त्यांना जबाबदारपणे जगण्यास शिकवणारी प्रशासक जिजाऊ. या करारी स्त्रीचे स्वराज्याच्या कारभारात अतिशय कडक लक्ष होते. जिजाऊंनी त्यांच्या पदरी असलेल्या दादोजी कोंडदेवाने दिलेले काही निर्णय जसे फिरवले तसेच कधीकधी प्रत्यक्ष शिवाजी राजांनी दिलेले निर्णयही त्यांनी फिरविले. उदाहरणच द्यायचे तर गणो गबाजी की याला पुणे परगण्यातील मौजे बेहरखेडे येथील जमीन इनाम मिळाली होती. परंतु काही कारणामुळे शिवाजी महाराजांनी त्याचे इनाम परत घेतले. त्यामुळे तो सरळ लालमहालात जिजाऊ साहेबांजवळ आला. त्यांनी त्याची तक्रार ऐकून घेतली व त्याच्यावर अन्याय होत आहे हे पटल्यामुळे “चिरंजीव राजेश्री साहेबाचे खुर्द खताचा उजर न करणे” असे स्पष्ट शब्दात लिहून त्यांनी त्याचे इनाम त्याला परत दिले. तसेच जेजुरीच्या पुजाऱ्यांच्या भांडणांचा निवाडाही आऊसाहेबांनीच केल्याची नोंद आहे. यावरून जिजाऊंची अन्यायाविरूद्ध उभे राहण्याची हातोटी लक्षात येते. हीच जिजाऊंची न्यायबुद्धी शिवरायांमध्ये दिसून येते.

स्वराज्याचे न्यायदान हे ‘व्यवहार निर्णय’ म्हणून ओळखले जाई. यावेळी धर्म, जात आणि प्रतिष्ठा विचारात घेतली जात नसे. ज्याच्या हातून गुन्हा घडला तो कोणत्याही जातीचा असो, तो गुन्हेगारच. स्त्रीवर अत्याचार करणारा रांझ्याचा पाटील असो, नाहीतर अफजलखानचा मोहिमेनंतर फितूर झालेला खंडोजी खोपडे असो किंवा मुरूड जंजिऱ्याच्या मोहिमेत रामाकोळ्याच्या मोहिमेला वेळीच जाणून रसद न पोहोचविणारा आणि मोहिम अपयशी करणारा आबाजी कुलकर्णी असो, शिवाजी राजांच्या व्यवहार निर्णयात त्याला क्षमा नव्हती. जिजाऊ ह्या स्वराज्यातील ‘संसद आणि सुप्रीम कोर्ट’ होत्या असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

शिवाजीराजांना स्वराज्याच्या कार्यात जीवाला जीव देणारे साथीदार लाभले या पाठीमागे जिजाऊंचे संस्कार आणि साधना होती. या करारी स्त्रीने आपल्या संपूर्ण जीवनात शेवटच्या क्षणापर्यंतच्या महाराजांच्या धाडशी मोहिमांतून जे राजकीय मार्गदर्शन केले त्यावरून त्यांची असामान्य बुद्धिमत्ता दिसून येते. आपल्या पुत्राच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास कारणीभूत ठरल्या यामुळेच –

‘राजास भूपति असे भूमीकरीता म्हणावे ते भूमीच गेल्यावर राज्य कशाचे करणार ? पति कोणाचा होणार ?’
“राज्यातील प्रजा तोच राज्याचा जीवनोपाय, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग”
“संन्निधवासी शत्रू म्हणजे केवळ उदरातील व्याधी. खजिना म्हणजे राज्यातील जीवन’
“गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी’
‘आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच’
‘आधी वतनदार हा एक विश्वास, ततोपि प्रामाणिक म्हणजे सोने आणि सुगंध’ यासारख्या सुरेख वाक्यांची खैरात आज्ञापत्रकार करून जातात ‘दिगंतविख्यात कीर्ती संपादिलेल्या शिवरायांच्या सुरेख राजनितीमुळेच ‘आज्ञापत्र’ हा राज्य प्रशासन पद्धतीविषयक एक महत्वपूर्ण प्रबंध तयार झाला.
शिवरायांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा कळस बघत असताना जिजाऊने रचलेला पायाही कुणीच विसरू शकत नाही. आज्ञापत्र आजच्या जीवनातही आदर्श आहे. फक्त राजासाठीच त्या मार्गदर्शनपर सूचना नाहीत तर सर्वांसाठीच त्या मार्गदर्शनपर सूचना आहेत. यासाठी घराघरात शिवचरित्राचे वाचन झाले पाहिजे. आज आपण बघतो, वाढती व्यसनाधीनता कुटुंबाच्या, समाजाच्या आणि पर्यायानं राष्ट्राच्या चिंतेचा विषय आहे. जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही या गोष्टींना थारा दिला नाही. उलट आज्ञापत्र सांगते,

‘भोजन, उदकपान यांचा समय नेमून त्यास अन्यथा होऊ न द्यावे, उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षू देऊ नये, जवळील लोकांस भक्षू देऊ नये, सर्व काळ हत्यारविरहित खाली हात राहू नये. राजाने कलांचे रसिक असावे, परंतु दरबारात नाचगाणी करू नयेत त्यात आसक्त राहू नये.’ असेही आज्ञापत्र सांगते.
शेतकऱ्यांविषयी अतोनात कळवळा असलेला राजा महाराष्ट्राच्या इतिहासात सापडणार नाही. याची कारणमीमांसा जर समजून घेतली तर त्याची बीजं जिजाऊंच्या धोरणात सापडतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. गाढवाचा नांगर फिरलेली पुण्याची पडिक जमीन नांगरताना जिजाऊंसमोर एकच ध्येय होते की, शेतकऱ्याच्या हाताला काम मिळावं, जमीन कसली जावी, घरात धान्याची रास उभी रहावी आणि या सोन्यासारख्या माणसांच्या जीवनाचं सोनं व्हावं ! अशुभाला शुभ करण्याची ताकद जिजाऊंनी ठेवली होती. हे संस्कार शिवराय कसे विसरणार? म्हणूनच शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठालाही न शिवण्याचं आवाहन ते करतात.

‘घोडी वाटेल तशी चारू नका आता चारा संपवलात तर पावसाळ्यात मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली असे होईल. अशा परिस्थितीत लोक जातील, कोणा शेतकऱ्याचे दाणे आणतील, कोणी भाकरी, कोणी गवत, कोणी जळण, कोणी भाजीपाला असे जर तुम्ही वागू लागलात जे बिचारे शेतकरी कष्ट करून जीव सांभाळून राहिलेत ते जाऊ लागतील. कित्येक बिचारे उपाशी मरतील आणि त्यांना असे वाटेल आपल्या मुलखात मुघल आला त्यापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात.’
यावरून शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराज किती सजग होते हे दिसून येते. त्याचबरोबर अस्मानी सुलतानी संकटामुळे जर शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर त्याचे कर्ज माफ करून द्यावे असेही ते सुचवतात. शेतकऱ्यांची इतकी काळजी घेणाऱ्या राजाच्या राज्यात ते आत्महत्या कशी करणार बरे ? शेतकरी दादा खऱ्या अर्थानं सुखी होता तो शिवरायांच्या राज्यातच. कारण राजे शेतकऱ्यांच्या जीवनाशी एकरूप झाले होते.

गडावरील पाणी वृक्षसंवर्धनाबाबत जसे शिवाजी महाराज जागरूक होते तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या पाटबंधाऱ्याच्या योजना पूर्ण करून घेतल्या होत्या. जिजाऊ माँ साहेबांनी सुद्धा या योजनांमध्ये लक्ष घालून त्यांना मदत केली होती. महाराष्ट्र शासनाच्या एका पाटबंधारे योजनेला ‘शिवबंधारे’ हे नाव दिल्या गेले ते शिवाजी महाराजांच्या पाणी नियोजनामुळेच. पाणी म्हणजे जीवन. त्याचा योग्य वापर व्हायलाच हवा. शिवाजी महाराज गडावर पाणी किती हे बघूनच किल्ला बांधण्याचे ठरवायचे. आज्ञापत्रातील ‘दुर्ग’ या विषयावर त्यांचे विचार बघा. “गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरील झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें म्हणून तितकियावरीच निश्चिंती न मानावी किं निमित्य की, झुंजामध्ये भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात, आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता जसे जागी ‘जखिरीयाचे पाणी’ म्हणून दोन चार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे गडाचे पाणी बहुत जतन राखावे.” पाण्याचा साठा करून ठेवण्याचे म्हणजे ‘जखिरीयाचे पाणी’ ठेवण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण आजही तेवढेच उपयोगी आहे. पाण्याचा वापर जपून करण्याचे जसे हा राजा सांगून गेला तसे केरकऱ्यामुळे प्रदूषण वाढते आणि तो जमा झाला तर त्याचा उपयोग कसा करावा हेही हा राजा सांगून गेला. ते म्हणतात “गडावरी मार्गामार्गावर, बाजारात, तटोतट केर कसपट किमपि पडो न द्यावे. ताकीद करून झाला र गडाखाली न टाकिता जागजागी जाळून ती राखही परसांत टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करवावे “

कचरा जाळून त्याची राख ही भाजीपाल्यांच्या वाफ्यांसाठी फार उपयोगी असते. ती राखही वाया जाऊ देऊ नये. गडावरील तोफखाना, दारूसामानाची काळजी घ्यायला सांगणारा राजा कचरा जाळून होणाऱ्या राखेचाही वापर तेवढ्याच दक्षतेने करायला सांगतोय. याशिवाय गडावर जी झाडे असतील त्यांचे रक्षण तरं करावेच पण ‘याविरहित जी जी झाडे आहेत ती फणस, चिंचा, वड, पिंपळ आदिकरून थोर वृक्ष बिंबे, नारिंगे आदिकरून लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे जतन करावे समयी तितकेही लाकडाचे तरी प्रयोजनास येतील हे सुद्धा महाराजांनी एखाद्या पर्यावरण तज्ज्ञाप्रमाणे सांगितले आहे.

जिजाऊ चरित्र आणि त्याबरोबर शिवचरित्र हा आपल्या आयुष्याचा एक भाग झाला पाहिजे इतके ते प्रेरणादायी आहे त्याचे सतत वाचन, चिंतन आपणास अनेक अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक ठरेल एवढी ताकद त्यात निश्चितच आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाने जर जिजाऊ सॉफ्टवेअर डोक्यात आणि मनात डाऊनलोड केले तर आपण निश्चितच बौद्धिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम राहू शकू. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची सजगता आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच म्हणावेसे वाटते-
जिजाऊ माँसाहेब
कुठलं रसायन होतं हो तुमच्यात ?
जे कधीच हारलं नाही
कधीच खचलं नाही
कधीच मोडलं नाही
सारी व्यवस्थाच उलथून टाकली
मनगटाच्या अन् बुद्धीच्या जोरावर
उखडून फेकलात दहशतवाद
अन् धार्मिक गुलामगिरीला लावला सुरूंग
साऱ्याच शाह्यांना शह दिला
जागविला स्वाभिमान अन देशाभिमान
कसं सांभाळलंत शिवबाला ?
खूप मोठा काळ एकल पालकत्वही निभावलंत
त्याच्या पौगंडावस्थेच्या आणि सर्व वयाच्या अवस्था
जागवल्यात पूर्ण क्षमतेनं
बारा मावळ्यांतील रयतेची नाळ शिवबाशी जोडली
बाल धारकरी एकत्र केले
अन्यायाविरूद्ध दोन हात केलेत
आणि साकारले महान छत्रपती
आजी पालकत्वही निभावलं तुम्ही
अन् शूर बुद्धिमान पराक्रमी
संभाजीराजे घडविलेत
जे होते स्वराज्यरक्षक, संस्कृतपंडीत महान लेखक कवी सुद्धा
आजही तुम्ही जगातील एकमेव आदर्श माता आहात.
सोन्याच्या नांगराने नांगरणी केली शिवबाच्या हाताने स्वराज्याचे विचार पेरण्यासाठी
अस्मितेचे विचार रूजवण्यासाठी
न्याय, समता, मानवतेचे पीक उदंड काढण्यासाठी
कुठून आणलंत माँ साहेब एवढं बळ ?
आपल्या संस्कारांनी असे पुत्र या मातीला दिलेत
जे आहेत एक अविनाशी विचार
काळाच्या ओघातही अमीट राहणार ज्याचं अस्तित्व…
‘खरंच जिजाऊ तुम्ही नसता तर
नसते झाले शिवराय नि शंभू छावा
जिजाऊ तुम्ही नसता तर
नसता मिळाला स्वराज्य ठेवा
जिजाऊ तुम्ही नसता तर
नसते लढले मावळे
जिजाऊ तुम्ही नसता तर
नसते दिसले विजयाचे सोहळे !

संदर्भ – राष्ट्रमाता जिजाऊ : डॉ. एम. ए. बाहेकर ( आज्ञापत्र )
बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ या डॉ. लीना निकम आणि शैलजा मोळक यांच्या पुस्तकातून साभार

Related posts

झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित

माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !

Leave a Comment