February 22, 2025
Shivaji University PhD-Wala Gulvya stands out at the Innovator and Startup Exhibition
Home » नवसंशोधक व स्टार्टअप प्रदर्शनात शिवाजी विद्यापीठाचा ‘पीएचडीवाला गुळव्या’ ठरला लक्षवेधी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नवसंशोधक व स्टार्टअप प्रदर्शनात शिवाजी विद्यापीठाचा ‘पीएचडीवाला गुळव्या’ ठरला लक्षवेधी

कोल्हापूर : कोल्हापूरकर नागरिकांना गूळ, गुऱ्हाळघरे आणि तिथले गुळवे हे काही नवे नाहीत. आज मात्र शिवाजी विद्यापीठात आलेल्या अभ्यागतांना ‘पीएचडीवाला गुळव्या’ त्याच्या आधुनिक गुऱ्हाळयंत्रासह पाहावयास मिळाला. विद्यापीठात ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’च्या निमित्ताने आयोजित विशेष नवसंशोधक आणि स्टार्टअप्स प्रदर्शनामध्ये या गुळव्याला आणि त्याच्या उत्पादनांना आज मोठीच पसंती लाभली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

  • Shivaji University PhD-Wala Gulvya stands out at the Innovator and Startup Exhibition

स्वतःला अभिमानाने ‘पीएचडीवाला गुळव्या’ म्हणवून घेणारे आणि आपल्या ब्रँडचेही नाव तेच ठेवणारे डॉ. ओंकार अपिने आणि विद्यापीठाच्या जैवतंत्रान अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुषमा पाटील यांनी अधिविभाग प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुळावर आणि गूळ निर्मिती प्रक्रियेवर गेली अनेक वर्षे काम केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन ते स्टार्टअपचे हे एक महत्त्वाचे उदाहरण ठरावे. त्याद्वारे त्यांनी खऱ्या अर्थाने सेंद्रिय अशा गुळाची, गूळ पावडरची निर्मिती केली. या अंतर्गत उसाचे रसवंतीगृह आणि गुऱ्हाळघर यांच्यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासंदर्भात डॉ. अपिने यांनी सांगितले की, आपल्याला गुऱ्हाळघरे एकाच ठिकाणी पाहायची सवय असते. मात्र या प्रकल्पाअंतर्गत पोर्टेबल गुऱ्हाळयंत्राची निर्मिती केली आहे.

यामध्ये रसवंतीगृहाप्रमाणे रसही काढता येईल आणि आरोग्यदायी पद्धतीने गूळही तयार करता येईल. गुऱ्हाळघराला किमान १२ ते १५ जणांइतके मनुष्यबळ लागते. मात्र, येथे अगदी दोघा जणांतही काम करता येऊ शकते. या यंत्राचा वापर कसा करावा, त्यावर गूळ निर्मिती कशी करावी, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. तसेच गुळाची ढेप, पावडर, वडी, काकवी तसेच इतर पदार्थ बनविण्याविषयीही माहिती देण्यात येते. या प्रकल्पाची, त्याच्या उत्पादनांची शेतीतज्ज्ञ प्रताप चिपळूणकर यांनीही पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या प्रदर्शनात औद्योगिक क्षेत्रातील विविध उत्पादक कंपन्यांसह नवसंशोधक, स्टार्टअप्स, विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी तसेच काल झालेल्या अटल टिंकरिंग स्कूलच्या प्रदर्शनामधील काही निवडक प्रकल्प यांचा समावेश आहे. विद्यार्थी स्टार्टअप पोस्टर प्रदर्शनात पदव्युत्तरचे ४, पदवीस्तरीय १२, पीएचडीचे १३ आणि शिक्षक गटात ४ असे एकूण ३३ प्रकल्प मांडण्यात आले.

यातील नॅनोतंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पांविषयी जाणून घेण्यात विद्यार्थ्यांनी रस दाखविला. औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उत्पादनेही लक्षवेधी ठरली. त्यासह स्टार्टअपमधून उद्योग-व्यवसायांपर्यंत यशस्वी झेप घेतलेले कृषी उद्योजक, फौंड्री उत्पादक, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांची कृषी उत्पादने, स्लरी प्रक्रिया उद्योग उत्पादने, अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल उत्पादक, थ्री-डी प्रिंटिंग उत्पादक, अन्न प्रक्रिया व्यावसायिक, आयुर्वेदिक व औषध उत्पादक यांचाही लक्षवेधी सहभाग राहिला.

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्व स्टॉल व पोस्टरची फिरुन पाहणी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनांना स्टार्टअपपर्यंत नेऊन पुढे त्याचे यशस्वी उद्योग-व्यवसायात रुपांतर करण्याच्या दृष्टीने या परिषदेपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रकाश वडगांवकर, डॉ. अण्णासाहेब गुरव, सुभाष माने, डॉ. पंकज पवार आदी होते. डॉ. गजानन राशिनकर, डॉ. रचना इंगवले, डॉ. एस.एस. काळे, डॉ. सत्यजीत पाटील यांनी प्रदर्शनाचे संयोजन केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading