डॉ. ज्योती जाधव यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्रदान
आपल्या शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी त्याला आत्मविश्वासाने तोंड द्या. मला कोल्हापूरमध्येच राहून संशोधन क्षेत्रात नवे वैज्ञानिक समीकरण आणि सिद्धांत जगासमोर आणल्याचा सार्थ अभिमान आहे.
डॉ. ज्योती जाधव
डॉ. ज्योती जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा
कोल्हापूर : येथील राजोपाध्येनगर परिसरातील कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासन यांच्यावतीने ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा स्व. पद्मजा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त “पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार” देण्यात येतो. सन २०२४ चा हा पुरस्कार जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधक व शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. ज्योती जाधव यांना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वसुधाताई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रमिला शारंगधर देशमुख, मंत्रालयीन कक्ष अधिकारी राजकुंवर डफळे-पवार आदी उपस्थित होते.
जगामध्ये अव्वल दोन टक्के संशोधकांच्या यादीमध्ये सलग पाच वर्षे नाव समाविष्ट असणाऱ्या, तसेच जॅगरी क्वीन म्हणून परिचित आणि शुभज्योत हे वैज्ञानिक समीकरण जगासमोर आणणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. ज्योती जाधव यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल, कोल्हापुरी फेटा व रोख पाच हजार रुपये असे आहे.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. जाधव म्हणाल्या, “आपल्या शैक्षणिक वा सामाजिक प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी त्याला आत्मविश्वासाने तोंड द्या. मला कोल्हापूरमध्येच राहून संशोधन क्षेत्रात नवे वैज्ञानिक समीकरण आणि सिद्धांत जगासमोर आणल्याचा सार्थ अभिमान आहे. महिलांमध्ये कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जिद्दीने कार्यरत राहा. त्यागाशिवाय यश नाही. शेतकऱ्यांसाठी, गूळ उत्पादकांसाठी आणि सांडपाणी व्यवस्थापनामध्ये अजून बरेच वैज्ञानिकदृष्ट्या काम करण्याची मनोकामना आहे.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वसुधाताई पवार म्हणाल्या, “स्व. पद्मजा पवार या एक आदर्श महिला होत्या. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. पवार ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवित आहे.”
दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. यामध्ये लहान व मोठ्या गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्वागत प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. जे. के. पवार यांनी केले. आभार राजनंदिनी पवार यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, क्रीडाशिक्षक महेश सूर्यवंशी, प्रकाश आमते, डी. एस. पाटील, मानसिंग चव्हाण, श्रद्धा पवार आदी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.