December 2, 2023
Kusumagraj yancha shodhat Soumitra play in shivaji University
Home » कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’
काय चाललयं अवतीभवती

कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’

‘कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’च्या सादरीकरणाने भारावले रसिक

कुसुमाग्रजांच्या शोधात….सौमित्र

कोल्हापूर : ‘… शंभराव्या प्रयोगाची मांड पहिल्यातच बसू दे, फुटू दे तरी इंद्रधनुष्य नवनवीन प्रयोगा-प्रयोगी एक तरी क्षण जिवंत होऊ दे… असू दे भान सतत जागं, माझं मलाच विंगेतून पाहता येऊ दे… घडता घडता नाटक सहज घडू दे… पडदा नेहमी नेमका पडू दे…दिपवू नकोस डोळे अंधारातून प्रकाशात, जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येऊ दे… रस्ता आणि पाय मला दोन्ही आवडू देत… शेवटी माझा मला मी पुन्हा एकदा सापडू दे…’ अशी ‘नटराजाप्रती एका नटाची प्रार्थना’ या स्वरचित कवितेने सुप्रसिद्ध कवी सौमित्र तथा अभिनेते किशोर कदम यांनी ‘कुसुमाग्रजांच्या शोधात… सौमित्र’ या त्यांच्या काव्य-नाट्याची नांदी आज शिवाजी विद्यापीठात केली आणि पुढची ५० मिनिटे आपल्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या कवी कुसुमाग्रज स्मृती व्याख्यानमालेचे!

मराठी अधिविभागाने व्याख्यानमालेअंतर्गत कवी सौमित्र यांना विषय दिला ‘कुसुमाग्रजांच्या शोधात… सौमित्र’. मात्र, या विषयाने कवी सौमित्र यांच्या संवेदनशील मनाला वेगळीच दिशा दिली आणि त्यातून एक आगळा काव्य-नाट्याविष्कार साकार झाला, ज्याची प्रथम अनुभूती घेत असताना वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात उपस्थित असलेला प्रत्येक रसिक श्रोता त्या काव्य-नाट्यानुभवात चिंब भिजून गेला, रोमांचित झाला.

या सादरीकरणामध्ये कवी कुसुमाग्रज आणि नाटककार वि.वा. शिरवाडकर या दोघांमधला धागा उलगडण्याचा प्रयत्न करत असतानाच कवी सौमित्र यांनी आपले काव्यविश्व, अभिनय आणि रंगभूमी यांच्याशी त्यांचे नाते जोडून पाहण्याचा प्रयत्न अत्यंत गांभीर्यपूर्वक केला. ‘अनेक मराठी कवींनी रंगभूमीबद्दल, अभिनयाबद्दल कविता लिहीलेल्या आहेत. त्या कविता, नाटकं, माझं जगणं आणि मी, रंगमंच आणि जगणं यांचा परस्परसंबंध, माणसा-माणसांमधील नातेसंबंध, भावबंध यांच्यातील धागे शोधून मी तुमच्यासमोर काही तरी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे,’ अशी प्रांजळ भूमिका आपल्या निवेदनात नमूद करून कवी सौमित्र यांनी या आगळ्या प्रयोगाचे सादरीकरण केले.

या सादरीकरणामध्ये कुसुमाग्रजांच्या नाटकांतील काही प्रवेश, काही स्वगतं, काही कुसुमाग्रजांच्या, काही स्वतःच्या तर काही अन्य कवींच्या कवितांचाही समावेश होता. या सर्व बाबींची गुंफण सौमित्र यांनी इतक्या अनोख्या पद्धतीने केली की रसिकांना एका सलग आणि सुसूत्र सादरीकरणाचा आनंद मिळाला. माणसाचं कलेशी, कवितेशी, नाटकाशी असणारं नातं, त्यातून समृद्ध होत जाणारं जगणं आणि त्या जगण्यामध्ये संवेदनशील माणूसपण जपण्याचं महत्त्व उलगडून दाखविणारा असा काव्य-नाट्यानुभव विद्यापीठाच्या मंचावर प्रथमच साकारला गेला.

‘आपण सारेच विंगेत उभे आहोत, स्टेजवर काही घडण्याची वाट बघत…’ असं म्हणत सुरवात केल्यापासून ‘नाटक संपलं आहे इथं- माझ्याजवळ, माझ्या त्या अस्तित्वांच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेले आहेत… मी एक होतो… तो अंशा-अंशांनी हजारांच्या जीवनात, कदाचित स्मरणात वाटला गेला आहे… नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो…’ या भरतवाक्यापर्यंत कवी सौमित्र यांनी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले. एक खरा अभिनेता केवळ रंगमंचाच्याच नव्हे, तर संपूर्ण प्रेक्षागृहाच्या पोकळीत कसा सामावला जातो, त्या समग्र अवकाशाचा आपल्या सादरीकरणासाठी किती कल्पक वापर करून घेतो आणि त्या आवकाशालाही त्यातील प्रेक्षकांसह आपल्या सादरीकरणाचा कसा भाग बनवून टाकतो, याचा प्रत्ययकारी अनुभव अभिनेता किशोर कदम यांनी या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांना दिला.

तत्पूर्वी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे आणि श्री. कदम यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. डॉ. मोरे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला.

Related posts

दुष्टांच्यातील दुष्टत्व संपवणे हेच अध्यात्म

मधाचे गाव पाटगावचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात

गुरु, शिक्षक हे विचारवंत अन् संशोधकवृत्तीचे हवेत

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More