November 22, 2024
Home » पाणथळ जागांच्या अभ्यासातून `हे` निष्कर्श
संशोधन आणि तंत्रज्ञान

पाणथळ जागांच्या अभ्यासातून `हे` निष्कर्श

पाणथळ जागांचा अभ्यास हा जैवविविधता जोपासण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सध्या पाणथळ जागी असणाऱ्या पाण्याचा उपयोग हा शेती आणि पिण्यासाठी केला जातो. या जागांच्या परिसरात पीक पद्धतीत बदल झाला आहे. एरवी एक पीक पद्धती होती; पण या पाणथळ जागांच्या विकासानंतर त्या परिसरात दुबार, तिबार पीक पद्धती वापरली जाऊ लागली आहे. 
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

पाणथळ जागांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. यामध्ये नदी, तलाव, बंधारे, धरणे इत्यादींचा समावेश होतो. हायड्रोफाईट्‌स, हायड्रिक माती, हायड्रिक कन्डिशन या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. वर्षभर पाणी असणाऱ्या पाणथळ जागांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

हे विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम डॉ. लीला भोसले यांनी पाणथळ जागांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींची नोंद त्यांनी केली. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या सर्व पाणथळ जागांचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. या पाणथळ जागांचे महत्त्व विचारात घेऊन डॉ. अपर्णा पाटील यांनीही हा विषय संशोधनासाठी निवडला. डॉ. पाटील यांना या संशोधन कामात डॉ. संजय साठे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बेलवळे बुद्रुक, सोनाळी, मुरगूड, करंजवणे, बेनिक्रे येथील पाणथळ जागांचा अभ्यास केला.

108 सूक्ष्म वनस्पतींच्या प्रजातींची नोंद

या पाणथळ जागांची वैशिष्ट्ये डॉ. पाटील यांनी त्यांच्या संशोधनात मांडली आहेत. या ठिकाणी 108 सूक्ष्म वनस्पतींच्या प्रजातींची नोंद त्यांनी केली आहे. यामध्ये मुख्यतः क्‍लोरोफायसी, बॅसिलोरॅलीफायसी, सायनोफायसी या कुळातील प्रजाती आढळल्या. या प्रजातींचा आकार अत्यंत सूक्ष्म म्हणजे काही मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतका आहे. त्यांना हरित नील शैवाल असे म्हटले जाते. 

पाणथळ जागांचा उपयोग पूरनियंत्रण करण्यासाठी

पाणथळ जागांचा अभ्यास हा जैवविविधता जोपासण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सध्या पाणथळ जागी असणाऱ्या पाण्याचा उपयोग हा शेती आणि पिण्यासाठी केला जातो. या जागांच्या परिसरात पीक पद्धतीत बदल झाला आहे. एरवी एक पीक पद्धती होती; पण या पाणथळ जागांच्या विकासानंतर त्या परिसरात दुबार, तिबार पीक पद्धती वापरली जाऊ लागली आहे. साहजिकच वर्षभर पिके शेतात डोलू लागली आहेत. या पाणथळ जागांचा उपयोग पूरनियंत्रण करण्यासाठीही होतो. शेती, पिण्यासाठी पाणी यासह मासेमारीसाठीही या जागा आता विकसित केल्या जाऊ शकतात. 

सूक्ष्म शैवालांचा अभ्यास

बारमाही पाणी असणाऱ्या पाणथळ जागांचा सलग तीन वर्षे सातत्याने अभ्यास केला, तर त्याची योग्य स्थिती सांगता येऊ शकते. यामध्ये हायड्रोबायोलॉजी आणि इकॉलॉजी यांचा समावेश होतो. प्लॉनटा म्हणजेच प्लवंग या सूक्ष्म शैवालांचा अभ्यास करून पाण्याचा निष्कर्ष काढता येतो. हरित नील शैवालामध्ये (फायटोप्लानटॉन) नायट्रोजन टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. हे शैवाल माशांचे खाद्य आहे. या पाणथळ जागा पक्ष्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या जागावर जैव शृंखला अवलंबून असते. प्लवंग, कारा, नायटेला, स्पायरोगायरा ही मोठी शैवाले या पाणथळ जागेत आढळतात. यावर शंख तयार करणारे प्राणी अवलंबून असतात. तसेच मासेही या वनस्पती खातात. या माशांना पक्षी आणि मानव खातात, अशी ही शृंखला तयार होते. तसेच थंडीच्या कालावधीमध्ये येणारे परदेशी पक्षीही या पाणथळ जागांची निवड करतात. यासाठीच या जागांचा अभ्यास करण्याची गरज आहे. 

या आहेत संशोधनाच्या संधी 

  1. पाणथळ जागांच्या ठिकाणी पाणी प्रदूषण कसे होते, याचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज. 
  2. नवनवीन संकल्पना घेऊन पाणथळ जागांच्या ठिकाणचे पक्षी आणि मासे यांचा अभ्यास करण्याची संधी. 
  3. नील हरित शैवाल, अझोला यांचे कल्चर तयार करून नायट्रोजनपुरवठा करणारी जैविक खते तयार करण्यासाठी, तसेच माशांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने होणारे खत अशा पद्धतीने पाणथळ जागांचा अभ्यास करता येणे शक्‍य.
  4. इकोटुरिझमच्या संधी विचारात घेऊनही या जागांचा विचार होण्याची गरज..  

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading