October 6, 2024
Suresh Dwadashiwar speech in Shivaji University
Home » Privacy Policy » राजर्षी शाहू यांचा नितीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार जगभर जावा: सुरेश द्वादशीवार
काय चाललयं अवतीभवती

राजर्षी शाहू यांचा नितीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार जगभर जावा: सुरेश द्वादशीवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा नीतीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार ग्रंथानुवादाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे  केले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू महाराजांच्या चरित्रग्रंथाच्या रशियन व इटालियन अनुवादांचे प्रकाशन आज सकाळी शिवाजी विद्यापीठात झाले. विद्यापीठाचे शाहू संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व प्रबोधिनीचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते.

Suresh Dwadashiwar

शाहूचरित्राच्या जागतिक भाषांतील अनुवादांचे स्वागत करताना सुरेश द्वादशीवार म्हणाले, शाहू महाराजांचे व्यक्तीमत्त्व अद्भुत होते. त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा जगाला परिचय करून देणारा हा अनुवाद प्रकल्प आहे. या माध्यमातून आपण केवळ आपला माणूस मोठा करतो, असे नव्हे, तर महाराष्ट्र मोठा करीत असतो. म्हणून हे काम महत्त्वाचे आहे. उण्यापुऱ्या ५० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराजांनी या आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड दिले आणि महत्त्वाचे म्हणजे त्या सर्व ठिकाणी विजय मिळविला व आपला ध्वज उंचावत ठेवला. त्यांनी पुकारलेला संघर्ष हा काही केवळ ब्राह्मणशाहीविरुद्धचा नव्हता किंवा धार्मिक संघर्षही नव्हता, तर त्यांनी तो असत्याशी मांडलेला संघर्ष होता. महाराजांनी माणूस तेवढा एक मानला. माणसा-माणसांत फरक करू नका, कोणालाही माणुसकीचे अधिकार नाकारू नका, असे ते सांगत असत. त्यांचे व्यक्तीगत वर्तनही त्याच धर्तीचे होते. टिळकांशी टोकाचे मतभेद असूनही त्यांच्या अडचणीच्या वेळी उदार मनाने धावून जाणारा असा हा राजा होता. त्यांनी दिलेली मूल्ये रुजविण्यासाठी आणि देश एक करण्यासाठी आपण साऱ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी रशिया आणि इटली येथील ऐतिहासिक संदर्भांचा आपल्या भाषणात दाखला दिला आणि त्या पार्श्वभूमीवर शाहूचरित्राच्या अनुवादाचे महत्त्व विषद केले. शाहूकार्य देशाच्या सीमा ओलांडून विदेशांत जाते आहे, ही बाब महत्त्वाची असून त्यामुळे तेथील नागरिकांतही चांगले परिवर्तन होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे चरित्र वर्षभरापूर्वी आले असते आणि पुतीन यांनी वाचले असते, तर कदाचित युक्रेनवरील हल्लाही टळला असता, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी भारतीय व जागतिक भाषांमध्ये शाहूचरित्राच्या अनुवादाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे, ही फार मोलाची बाब आहे. रशियन आणि इटालियन अनुवादाच्या प्रक्रियेत गुंतलेल्या सर्व अनुवादक या महिला आहेत, ही शाहूकार्याला एक मोठीच आदरांजली आहे. अनुवादाच्या उर्वरित प्रकल्पांमध्येही शिवाजी विद्यापीठ सक्रिय सहभाग घेईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तत्पूर्वी, डॉ. जयसिंगराव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यामध्ये १५ भारतीय आणि १० विदेशी भाषांत शाहूचरित्र घेऊन जाण्याचा संकल्प आपण सोडला असून भारतीय भाषांत हिंदी, मराठी, कन्नड, कोकणी, तेलगू या भाषांमध्ये प्रकाशित झाले असून बंगाली, गुजराती, सिंधी अनुवाद तयार आहेत. असामी, पंजाबी, मल्याळम, तमिळ व राजस्थानी हे अनुवाद बाकी आहेत. विदेशा भाषांमध्ये इंग्रजी, जर्मन, रशियन व इटालियन प्रकाशित झाले असून चीनी, जपानी, स्पॅनिश, डच, पोर्तुगीज हे बाकी आहेत. प्रकाशित झालेले विदेशी अनुवाद हे त्या त्या देशांच्या वकिलातींमार्फत तेथील विद्यापीठे, ग्रंथालये, विचारवंत आणि अभ्यासक आदी महत्त्वाच्या व्यक्ती व संस्थांना मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रशियन अनुवादक डॉ. मेघा पानसरे यांनी सभागृहात तर डॉ. अलेस्सांद्रा कॉन्सोलारो यांनी इटलीमधून ऑनलाईन स्वरुपात अनुवादामागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी डॉ. पवार आणि डॉ. पानसरे यांनी रशियन अनुवादामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनुवादक तात्याना बिकवा यांना आदरांजली वाहिली. यावेळी रशियन व इटालियन अनुवादामधील एकेक परिच्छेदांचे वाचनही डॉ. पानसरे व डॉ. कॉन्सोलारो यांनी केले.

सुरवातीला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व प्रमुख पाहुणे द्वादशीवार यांच्या हस्ते शाहूचरित्राच्या रशियन व इटालियन अनुवाद ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. भारती पाटील, शाहू चरित्रकार डॉ. रमेश जाधव, डॉ. सुनीलकुमार लवटे, सुरेश शिपूरकर, वसंत भोसले, प्राचार्य आनंद मेणसे, डॉ. हरिष भालेराव, डॉ. जे.के. पवार, व्यंकाप्पा भोसले, नामदेवराव कांबळे, विजय शिंदे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांच्यासह अनेक शाहूप्रेमी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading