June 7, 2023
Vyavharik Marathi Book by L Ra Nasirabadkar
Home » विचार नेमक्या, नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत सांगणारं पुस्तक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

विचार नेमक्या, नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत सांगणारं पुस्तक

सामाजिक माध्यमांपासून ते संगणकावरील मराठीच्या वापरापर्यंत सर्व अंगांची चर्चा आणि मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. १९८५मध्ये प्रकाशित झालेली या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या शंभरभर पृष्ठांची होती. पण त्यातले अनेक संदर्भ आता कालबाह्य झाले होते आणि बदलत्या काळानुसार भाषेच्या वापराची अंगंही विस्तारलेली होती. या सर्वांचा विचार करून ही नवी आवृत्ती संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी भाषाविकास संस्थेनं आणि संपादक डॉ. नंदकुमार मोरे यांनी घेतलेले कष्ट पुस्तकातल्या हरेक पानावर दिसतात.

सदानंद कदम, सांगली. ९४२०७९१६८०

शालेय पाठ्यपुस्तकांमधून पाठाच्या शेवटी असणारा ‘कार्यात्मक व्याकरणा’चा भाग वगळण्यात आला त्याला आता खूप वर्ष झाली. त्याचे परिणाम आता सगळीकडे दिसू लागले आहेत. आज पदवीधर माणसाला, सर्व स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना, ‘मराठी जपली पाहिजे’ असा गळा काढणाऱ्या मराठी माणसाला, सर्व माध्यमांमधून नव्यानं लिहिते झालेल्यांना ‘प्रमाण मराठी’ लिहिणं जड जातं हा त्याचाच दृश्य परिणाम.

न दिसणारे परिणाम तर अनेक. या सगळ्यात भर घातली ती नव्यानं हाती आलेल्या समाज माध्यमांनी… ते वाचताना हाताळल्या जाणाऱ्या यांत्रिक साधनांनी. हे सगळंच आजच्या भाषिक ऱ्हासाला कारणीभूत ठरले आहे. ही नवमाध्यमं हाती आली आणि पत्रलेखन बंद झालं. आता साक्षरांनाही आपण अखेरचं पत्र कधी लिहिलं होतं ते आठवत नाही, कुणाला ते लिहायचं म्हटलं तर ‘मायना’ काय लिहायचा हेच सुचत नाही. शालेय शिक्षणातून ‘पत्रलेखन’ वगळल्याचा परिणाम.

महाविद्यालयातून बाहेर पडणारालाच नव्हे तर, शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणारांनाही रजेचा अर्ज लिहिताना दुसऱ्याच्या अर्जाची स्थळप्रत समोर ठेवावी लागते. ‘मराठी अध्यापक संघा’चं काम करणाऱ्याला ‘धन्यवाद’ कधी लिहायचं आणि ‘अभिनंदन’ कधी करायचं ते समजत नाही. ‘अध्यापक’ तयार करणारा प्राध्यापक आपलं पद ‘अधिव्याखाता’ असं लिहितो तर त्याचाच दुसरा सहकारी ‘पुथक्करण’ असं लिहितो. ‘पुनर्वसन’, पुनर्पडताळणी’ आणि ‘पुनर्मूल्यांकन’ हे शब्द नीट लिहिणारा शाळा तपासणी अधिकारी बत्तीस वर्षांत भेटला नाही. आजही मी त्याच्या शोधात आहे.

‘जिल्हा शिक्षणाधिकारी’ पदावर काम करणारा मराठी माणूस आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांच्या प्रकाशचित्राखाली ‘अस्मरणीय’ क्षण असं लिहितो तेव्हा मराठीचं भवितव्य सांगायला ज्योतिषाची गरज आहे असं वाटत नाही. कधीकाळी ‘आकाशवाणी’चा शब्द अखेरचा मानला जायचा. पण ती आता दंतकथा ठरेल की काय अशी स्थिती आहे. आता तिथंही ‘ग्रामीण शिक्षक’, ‘पारंपारिक’ असे नवे मराठी शब्द जन्माला घातले जात आहेत.

पाककृती सांगताना ‘रवा खरपूस भाजून त्यात ‘दुधाची शाई’ घाला’ अशा सूचना दिल्या जात आहेत. उभ्या आयुष्यात चार ओळी ‘नीट’ मराठीत न लिहिणारा जेव्हा ‘स्वयंघोषित’ प्राध्यापक होतो तेव्हा मराठीची दुर्दशा अधिकच जाणवते.

आपलं भवताल असं असताना भाषेची काळजी वाहणारे, तिचं सत्त्व जपणारे अनेकजण कार्यरत आहेत हे आशादायक चित्र आहे. ही मंडळी नव्या पिढीला… नव्यानं लिहिणारांना सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. प्रा. यास्मिन शेख, अरुण फडके ही गेल्या पिढीतील अशी माणसं. त्यांचं काम दीपस्तंभासारखं. नव्या पिढीतही नेहा लिमयेसारखी तरुणी अशी धडपड करताना दिसते. तेव्हा थोडं आशादायी चित्र दिसतं. ही माणसं जसं भाषा ‘जपण्याचं’ काम करतात तशीच काही पुस्तकंही.

प्रा. यास्मिन शेख यांचं ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी लेखन कोश’, अरुण फडके यांचा ‘मराठी लेखन कोश’ ही अशी काही ठळक पुस्तकं. १९८५मध्ये आलेलं ल. रा. नसिराबादकर यांचं ‘व्यावहारिक मराठी’ हे असंच एक पुस्तक. आता त्याची नवी विस्तारीत आवृत्ती कोल्हापूरच्या ‘भाषाविकास संशोधन संस्थे’नं प्रकाशित केली आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारातून आणि समाजमाध्यमांसारख्या विविध माध्यमांतून व्यक्त होत असताना आपले विचार नेमक्या आणि नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत हे सांगणारं हे पुस्तक. मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्या, प्रत्येक लिहित्या माणसाच्या हाती असलंच पाहिजे असं. हे तुम्हाला सांगेल नेमकं कसं आणि कुठल्या शब्दांत व्यक्त व्हायला हवं.

अगदी पत्रलेखन, स्फुट लेखन, बातमी लेखन, प्रसिद्धीसाठीचं निवेदन, जाहिरातीचा मसुदा, अनुवाद आणि संपादन यापासून ते आशयघन लेखन, कथा-संवाद लेखन, कथा-पटकथा आणि माहितीपटासाठीचं लेखन अशा सर्व लेखनाविष्कारात सविस्तर मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. हे पुस्तक त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची पूर्वतयारी करून घेणारं. तुम्हाला अनेक भाषिक कौशल्यात तयार करत तुमची अभिव्यक्ती अधिक प्रभावशाली करणारं. तुमचं सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकसित करणारं.

भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, भाषण आणि संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, भाषेची शब्दनिष्ठ सर्जनशीलता, मराठी भाषा… तंत्रज्ञान आणि संगणकावरील संवाद, कल्पनाविस्तार, सारांशलेखन, कार्यालयीन लेखनव्यवहार, पत्रव्यवहार, प्रसारमाध्यमांसाठी वृत्तलेखन, वृत्त भाषांतर, जाहिरात मसुदालेखन, स्मरणिका संपादन आणि मुद्रणप्रत, ग्रंथपरीक्षण, मुलाखतलेखन, लेखनविषयक नियम आणि प्रमाण शब्दांची सूची, मुद्रितशोधन, देवनागरी लिपी आणि मराठीची वर्णमाला, पारिभाषिक शब्दसूची ही या पुस्तकातील प्रकरणं. प्रत्येक प्रकरणात त्या विषयीचं सविस्तर मार्गदर्शन आणि अनेक उदाहरणं.

सामाजिक माध्यमांपासून ते संगणकावरील मराठीच्या वापरापर्यंत सर्व अंगांची चर्चा आणि मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. १९८५मध्ये प्रकाशित झालेली या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या शंभरभर पृष्ठांची होती. पण त्यातले अनेक संदर्भ आता कालबाह्य झाले होते आणि बदलत्या काळानुसार भाषेच्या वापराची अंगंही विस्तारलेली होती. या सर्वांचा विचार करून ही नवी आवृत्ती संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी भाषाविकास संस्थेनं आणि संपादक डॉ. नंदकुमार मोरे यांनी घेतलेले कष्ट पुस्तकातल्या हरेक पानावर दिसतात.

मराठी भाषा जिथं जिथं वापरली जाते अशा सर्व क्षेत्रातील भाषावापरासाठीचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. वर म्हटल्याप्रमाणं प्रत्येक ‘लिहित्या’ माणसाच्या हाती असलंच पाहिजे असं. या पुस्तकात भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारी चर्चा आणि सविस्तर मार्गदर्शन तर आहेच, शिवाय अवांतर वाचनासाठी आणि शब्दसंग्रहाची वाढ होण्यासाठीचं दिशादर्शनही आहे. हे पुस्तक मराठीच्या बोलीभाषांची ओळख तर करून देतंच, शिवाय भाषा समृद्ध होण्यासाठी नव्या शब्दांना कसं प्रचारात आणायला हवं तेही सांगतं.

सध्या शालेय शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर ‘एकोणीस’ की ‘एकोणवीस’ असले वाद सुरू आहेत. वर्णचिन्हाचं आणि जोडाक्षर लेखनाचं प्रमाणीकृत लेखन कसं हवं यासारखे विषय चर्चिले जात आहेत. अशा विषयावर ठोस मार्गदर्शन करताना शासनाकडून निर्गमित झालेला १० नोव्हेंबर, २०२३चा सुधारित आदेश आणि त्यानुसार वर्णचिन्हांचे अंकांचे प्रमाणीकृत शब्दलेखन, जोडाक्षरलेखनाची पद्धतीही पुस्तकात समजावून देण्यात आली आहे.

पुस्तकाला डॉ. नंदकुमार मोरे यांची प्रदीर्घ अशी अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही आहे. ते शिवाजी विद्यापीठात ‘मराठी विभाग प्रमुख’ म्हणून कार्यरत आहेत. संपादक म्हणतात त्याप्रमाणं ‘या पुस्तकातील भाषिक कौशल्यांच्या गोष्टी कोणाही व्यक्तीचं जीवन समृद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या भाषा शिक्षण, भाषेतून तयार होणारे रोजगार आणि व्यवसायाबरोबर भाषा अभिवृद्धीच्याही आहेत.’

हे पुस्तक शालेय स्तरापासून पदव्युत्तर पातळीवरच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वांनाच दिशादर्शन करणारं आहे. बदलत्या काळातील भाषिक गरजा ओळखून ते नव्यानं संपादित आणि विस्तारीत करण्यात आलं आहे. त्यामुळंच ते नव्यानं सामोऱ्या येणाऱ्या भाषिक आव्हानांना पुरून उरणारं आहे.
काही शब्द लिहिताना लिहिणाऱ्याचा सतत गोंधळ उडतो असतो. ऱ्हस्व-दीर्घ, जोडाक्षरलेखन, द्वितलेखन आणि शालेय वयापासून असणारा त्या शब्दांविषयीचा रूढ समज यामुळं तो होत असतो. तसा तो होऊ नये म्हणून देण्यात आलेली शब्दसूची आणि पारिभाषिक शब्दांची सूची ही या पुस्तकाची खास वैशिष्ट्यं.

हरेक मराठी माणसाचं, प्रत्येक लिहित्या हाताचं आपल्या भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी ‘भाषाविकास संशोधन संस्थे’नं प्रकाशित केलेलं हे पुस्तक आपल्या हाती असायलाच हवं. ते तुमची भाषा आणि लेखन तर ‘नीट’ करेलच शिवाय तुमचं समग्र व्यक्तिमत्त्वही विकसित करेल.

पुस्तकाचे नावः व्यावहारिक मराठी
लेखकः ल. रा. नसिराबादकर.
पृष्ठे : ४८०
किंमत : ६०० ₹
पुस्तकासाठी संपर्कः भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर.
संपर्क : ९८२३११८३००/७३८५५८८३३५

Related posts

आद्य मुंबई अन् नाना शंकरशेट 

मुलाखतीला सामोरे जाताना…

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे