January 7, 2025
Tippira authors emotional hug with Jagdish Khebudkar
Home » टिप्पीरा लेखकाची जगदीश खेबुडकरांशी भावपूर्ण गळाभेट
गप्पा-टप्पा

टिप्पीरा लेखकाची जगदीश खेबुडकरांशी भावपूर्ण गळाभेट

गळाभेट……।

गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना भयंकर मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणे अवघड होऊन जाते. साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय.

त्याकाळी गीतकार म्हणून गाजलेले ग. दि. माडगूळकर, चिंतामणी पोद्दार, शांताराम नांदगावकर, ना. धो. महानोर, शांता शेळके, पी सावळाराम अशी कितीतरी गीतकारांची नावे तोंडात येतात. कविते निर्मितीतून गीत करणे हे शक्यतो कोणत्या कविला जमत नाही. कविता लिहिता येते परंतु गीत लिहिणे ही कला तशी फार अवघड आहे. चित्रपटातील प्रसंग पाहून गीतरचना करायची ही कला ठराविक कवीला जमते एवढे मात्र निश्चित. या मंडळींनी अतिशय त्रास घेऊन अनेक अग्निदिव्य पार करीत ही मंडळी मोठी झाली आहे. सुखासुखी गीत तयार करता येत नाही त्याच्यासाठी अनुभव मोठा असणे गरजेचे असते.

जगदीश खेबुडकर हे फार मोठे गीतकार अजूनही त्यांची गाणी आकाशवाणीवरून चित्रपटांमधून ऐकावयास मिळतात हे तर खरे मोठे भाग्य समजावे लागेल. डोळ्यापुढे एखादा प्रसंग गीतात चित्रीत करणे हे सोपे काम नाही. भयंकर अनुभवी गीतकार होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक कलाकाराची कलेच्या अगोदरचा इतिहास पाहिला तर ही मंडळी शून्यातून पुढे आली आहे. प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागचा इतिहास पाहिला तर कष्टमय थरातून ही मंडळी पुढे आलेली आहेत असे दिसते. हे मी पूर्णपणे वाचले आहे निळू फुले पूर्वी माळी म्हणून काम करत होते. अभिताभ बच्चन ड्रायव्हर म्हणून काम करत होते. आमचे संगीतकार बाबूजी कोल्हापूर स्टुडिओमध्ये चहा देण्याचे काम करत होते. विलासराव शिंदे कोर्टामध्ये चपराशी म्हणून काम करत होते आज ही मंडळी मोठ्या पदावर आहेत. हे नाकारता येत नाही. प्रत्येकाचा इतिहास आगळावेगळा असाच आहे. ही मंडळी एकदम वरच्या पदावर हळूहळू गेली त्यांच्यामागे शून्य होते एवढे मात्र निश्चित.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर उर्फ बाबूजी यांनी आशा भोसले, लता मंगेशकर ,कवी जगदीश खेबुडकर, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील अशा कितीतरी लोकांना स्वतःच्या चित्रपटांमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. म्हणूनच आज रोजी महाराष्ट्र या कलाकारांच्या पुढे नतमस्तक ठेवल्याशिवाय राहात नाही…।

…. साहित्य लेखन करतेवेळी सुरवातीच्या कालखंडामध्ये माझी काही पुस्तके प्रकाशित झाली होती. मला महाराष्ट्र प्रदेश गंथालय मुंबई तर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण साहित्यिक म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. तो प्रसंग अजून मला आठवतो मी पुरस्कार घेऊन येताना सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे गाडीमध्ये डब्बा नंबर ए सेवन मध्ये माझे रिझर्वेशन होते. माझ्यासोबत सांगली जिल्ह्यातील पत्रकार व साहित्यिक सुद्धा होते. आमच्या डब्यामध्ये दादर स्टेशन मध्ये एक माणूस चढला त्याच्या अंगामध्ये पांढरा शुभ्र सदरा पॅन्ट कोट व केस मागे टाकलेला माणूस आमच्या डब्यामध्ये चढला. आणि त्याची शीट शोधू लागला आम्ही जिथे बसलो होतो तिथेच या माणसाचे रिझर्वेशन होते. तो माणूस अचानक माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला माझा नंबर 55 आहे तुमचा नंबर किती आहे मी म्हणालो माझा नंबर 56 असा आहे. परंतु हा माणूस कोण होता लवकर कळाय. साधन नव्हते अंगामध्ये कोट आहे हा साहित्यिक तर नसेल ना असा प्रश्न माझ्या मनाला पडला होता मी त्या व्यक्तीला म्हणालो..।

,,, सर तुमच्या सीटवर मी बसलो आहे तुम्ही तुमच्या सीटवर बसा..।

असे म्हणून मी 56 नंबर सीट वर बसलो ती व्यक्ती 55 नंबरच्या सीटवर बसली आणि गाडी सुरू झाली. आमच्या डब्यामध्ये प्रवाशांची बरीच गडबड चालू होती. गाडी पुढे पुढे जात होती आणि डब्यातील शांतता कमी झाली. सर्वत्र शांतता पसरली. माझ्या समोर बसलेली व्यक्ती पिशवीतील एक पुस्तक काढून वाचण्यात दंग होती. त्या पुस्तकाचे नाव होते,, टिप्पीरा,,, हे पुस्तक वाचण्यामध्ये ही व्यक्ती दंग होती वाचता वाचता त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. आणि म्हणाले,, कुठे उतरणार,,

,,, किर्लोस्करवाडीला मी म्हणालो..।
,, कुठे गेला होता तो इसम म्हणाला..।
,,, पुरस्कार घ्यायला मी म्हणालो..।
,,, कसला पुरस्कार तो इसम म्हणाला..।
,, मी ग्रामीण साहित्यिक आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ग्रंथालय मुंबई तर्फे मला पुरस्कार देण्यात आला म्हणून गेलो होतो..
,, चांगले आहे लिहित रहा तो इसम म्हणाला..l

त्या माणसाच व माझं एवढेच बोलणे झाले परंतु तो माणूस परत वाचण्यात दंग झाला. त्याच्या हातातील पुस्तक हे मी लिहिले आहे हे मला माहित आहे पाहूया पुढे काय घडते. याची मी वाट पाहत होतो. गाडी पुढे पुढे जात होती डब्यात शांतता पसरली होती. डब्यातील बरीच माणसे झोपी गेली होती फक्त आम्ही दोघे जण जागे होतो. ती व्यक्ती म्हणाली झोपून टाका आता. मला रात्रभर जागण्याची सवय आहे. मी म्हणालो ठीक आहे म्हणून मी माझ्या सीटवर आडवा झालो. परंतु मला झोप येत नव्हती आणि माझ्या मनाने खात्री केली ही पुढे बसलेले व्यक्ती साधी नसून फार मोठी आहे पण त्यांच्या हातातले पुस्तक हे मी लिहिले आहे हे त्यांना सांगू शकत नव्हतो. मी या कुशीवरून त्या कुशीवर होत होतो. परंतु ती व्यक्ती वाचत होती. मी उठलो आणि त्यांना म्हणालो या गाडीचा डबा सारखा हालतोय मला झोप येणे कठीण आहे काय हो तुम्ही साहित्यिक आहात काय..।

,,,, होय..।
,,, कुठे उतरणार मी म्हणालो..।
,,, मी कोल्हापूरला उतरणार ती व्यक्ती म्हणाली..।
,,, कसलं पुस्तक वाचत आहे मी म्हणालो..।
,,, हा ग्रामीण कथासंग्रह आहे आमच्या कोल्हापूरचा गवळी प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे ती व्यक्ती म्हणाली..।
,,,, कसं लिहिले आहे पुस्तक मी म्हणालो..।
,,, ग्रामीण जीवनावर आधारित आहे. पुस्तक सुंदर लिहिले आहे .माणसाच्या आयुष्यामध्ये किती वाईट दिवस येतात याचं चित्रण डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही एवढे मात्र निश्चित ती व्यक्ती म्हणाली..।

एवढेच ऐकून माझ्या मनाला फार समाधान लाभले माझे साहित्य कोणीतरी वाचत आहे याचा अभिमान माझ्या मनाला वाटत होता. सह्याद्री एक्सप्रेस जोरात पळत होती मी तसाच माझ्या सीटवर आडवा झालो पण झोप येत नव्हती त्या व्यक्तीचे शब्द माझ्या कानामध्ये घर करून राहिले होते. स्टेशने कधी गेली कळले नाही आणि पहाटे 03:55 ला सह्याद्री एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्टेशनवर येऊन थांबली. परंतु ती व्यक्ती अजून जागीच होती मी त्यांना नमस्कार घातला त्यांचा निरोप घेतला आणि डब्यातून खाली उतरलो. यावर काही महिने होऊन गेले आणि सांगली आकाशवाणी वरून मला एक पत्र आले. भेटीगाठी या कार्यक्रमामध्ये आपली मुलाखत घेण्यात येणार आहे. १ डिसेंबर 1997 रोजी सांगली आकाशवाणी वर सकाळी दहा वाजता हजर राहावे. मी कॅबिन मन नाटक कार या विषयावर आपण मुलाखत द्यायची आहे रेकॉर्डिंग दहा वाजता सुरू होईल हे पत्र हातात पडल्यानंतर मला फार आनंद झाला. माझ्या साहित्याची दखल घेऊन सांगली आकाशवाणीने घेतलेला निर्णय अतिशय सुंदर होता त्याचा आनंद मला फार झाला होता..।

… मी त्यादिवशी सांगली आकाशवाणी वर मुलाखतीसाठी गेलो असता रेल्वेत भेटलेली व्यक्ती मला दिसली आणि मी एका माणसाला विचारलं ही व्यक्ती कोण आहे. तो माणूस म्हणाला हे कोल्हापूरचे प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर आहेत. त्यांचेसुद्धा आज तुमच्या बरोबर रेकॉर्डिंग आहे हे ऐकून मला आनंद झाला आम्हा दोघांना रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर खुर्चीवर बसवले आणि मी त्या व्यक्तीला म्हणालो नमस्कार साहेब..।

,,, नमस्कार ..।
,,, आपण पाठीमागे एकदा रेल्वे डब्यामध्ये भेटलो होतो का मी म्हणालो..।
,, भेटलो असेल आता मला काही आठवत नाही खेबुडकर म्हणाले..।
,,, मी लेखक दत्तात्रय मानुगडे आज माझं रेकॉर्डिंग आहे मी म्हणालो..।
,,, अच्छा टिप्पीरा कथासंग्रह लिहिलेली तूच लेखक काय खेबुडकर म्हणाले..।
,,, होय मला मुंबईचा पुरस्कार मिळाला त्यावेळी तुमची आणि माझी भेट झाली होती परंतु मी लेखक आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो कारण लेखन करताना मीपणा मला आवडत नाही हा माझा स्वभाव आहे. कारण साहित्यातील भांडवल हे समाजाचे असते लेखक मात्र याला निमित्त असतो. मी म्हणालो..।
,,, वा फार छान अशी साहित्यिक मंडळी मला आवडतात खेबुडकर म्हणाले..।

मी ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांची कडकडून गळाभेट घेतली मला फार आनंद झाला आणि माझं मन म्हणू लागलं हा इतका मोठा माणूस माझ्या आयुष्यामध्ये मला दोन वेळा भेटतो याच्यासारखा दुसरा आनंद नाही. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांची माझी ओळख झाली हे मी माझं भाग्य समजतो त्या दिवशी त्यांचे रेकॉर्डिंग अगोदर झाल व माझे रेकॉर्डिंग त्यांच्या नंतर झाले ही आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. जगदीश खेबुडकर यांची गीते अनेक चित्रपटातून ऐकली आहेत. आकाशवाणीवरून ऐकली आहेत. यांची लिहिण्याची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे हे कुणाला सुद्धा नाकारता येत नाही. त्यांनी लिहिलेली किती मंत्रमुग्ध करतात प्रत्येक गीतावर एक कथा निर्माण होईल अशीही भावपूर्ण गीते पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. त्यांचे अनेक किस्से मी त्यादिवशी आकाशवाणीवर ऐकले होते. एखाद्या चित्रपटाचे शूटिंग चालू असले तर चित्रतपस्वी पेंढारकर रात्री फोन करत असत खेबुडकर असा असा प्रसंग आहे मला सकाळ पर्यंत गीत पाहिजे. जगदीश खेबुडकर एका रात्रीत गीत लिहून भालजी पेंढारकर यांना देत असतं. तेच गीत संगीत बद्ध करून चित्रपटाचे शूटिंग चालत असे. इतका हा ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांना कोटी कोटी सलाम. त्यांची नि माझी ओळख झाल्यानंतर मी त्यांच्या घरी एकदा गेलो होतो भरपूर गप्पा झाल्या साहित्यिक चर्चा रंगली. रात्र कशी गेली कळले नाही. ते दिवस तो प्रसंग मला राहून राहून आठवतो. काही दिवसानंतर ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर आमच्यातून निघून गेले हे मला समजताच मी कोल्हापुर गाठले आणि शेवटचे दर्शन घेतले. हा दिवस सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये न विसरण्यासारखा असा आहे..।

दत्तात्रय पांडुरंग मानुगडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading