September 24, 2023
Book Review of Sunil Pote Aambil Poetry Collection
Home » आंबीलमधून ग्रामीण भागातील वैविध्यतेचे दर्शन
मुक्त संवाद

आंबीलमधून ग्रामीण भागातील वैविध्यतेचे दर्शन

बोलीचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्याकरिता झाडीबोलीत काव्यसंग्रह

एकंदरीत झाडीपट्टीत आंबील हे गरीबांचे उत्तम अन्न आहे. त्यामुळे कवी सुनिल पोटे यांनी “आंबील” हे शीर्षक देऊन साहित्यक्षेत्रातील सर्व साहित्यिकांचे आंबीलच्या रूपाने मन तृप्त व्हावे या आशेने हा कवितासंग्रह तयार केलेला दिसून येतो.

अरूण झगडकर

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
9405266915

झाडीपट्टीतील भाषा सौष्ठत्वाला नवजीवन देण्याकरिता अनेक झाडी साहित्यिकांनी झाडीबोली भाषेला पुनर्जीवित करण्यासाठी व भाषेचे संवर्धन आणि संगोपन करण्याच्या अविरत प्रयत्न करीत आहेत. “भाषा टिकली तर संस्कृती टिकेल” या आत्मिक भावनेने झाडीबोली भाषेत साहित्य निर्माण करून बोलीला जिवंत ठेवण्याचे कार्य करीत आहेत. यामध्ये आता कवी सुनिल पोटे यांनी “आंबील” हे शीर्षक असलेले पहिले काव्यसंग्रह झाडीबोलीत प्रकाशित करून बोलीचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्याकरिता या कवितासंग्रहाच्या रूपाने साहित्य क्षेत्रात येत आहेत.

“आंबील” म्हणजे झाडीपट्टीतील विशेषतः ग्रामीण भागातील पुष्टीदायक अन्नपदार्थ म्हणून संबोधण्यात येते. गरीब, शेतकरी, कामगार, मजूर यांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे आंबील होय. उन्हाळ्यात घराबाहेरील विविध प्रकारची कामे करावी लागतात. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे विविध विकारांचा धोका होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी आंबील हे पातळ पेय पिऊनच सर्वजन घराबाहेर जात असतात.”आंबील” या कवितेत कवी म्हणतात. तपनानं जीव पिसा, कालव वालव करे व्हती आंबील औषधी, बेस लागे म्हणे सारे…

एकंदरीत झाडीपट्टीत आंबील हे गरीबांचे उत्तम अन्न आहे. त्यामुळे कवी सुनिल पोटे यांनी “आंबील” हे शीर्षक देऊन साहित्यक्षेत्रातील सर्व साहित्यिकांचे आंबीलच्या रूपाने मन तृप्त व्हावे या आशेने हा कवितासंग्रह तयार केलेला दिसून येतो.

गाव आणि गावातील संस्कृती रान- माती सण-उत्सव आणि रुढी-परंपरांशी एकनिष्ठ झालेला हा कवी शहरात उदरनिर्वाहासाठी वास्तव्यात असला तरी मनातील आठवणीचे गाव मात्र नजरेआड होताना दिसत नाही . त्यांच्या “आंबील” मधील रचना वाचत असताना हे सर्व प्रतिबिंबित होताना दिसून येते.गावाप्रती, गावातील प्रथा,चालीरीती, शेती, माती, गावातील लोकांचे जगणे,इतरांच्या विषयी प्रेमभाव,प्रत्येक रचनेत होत असते. गावाविषयी जाणिवेची साक्ष त्यांच्या “गड्या आपला गाव बरा” या कवितेतून होताना दिसून येते.

एका घरचा पाहुणा, साऱ्या गावाला माहीत
करे काळीज मोकळा चहा पाणी पीत पीत..

म्हणजेच झाडीपट्टीतील मानवी स्वभावाचे दर्शन त्यांच्या ओळीतून लक्षात येते.ग्रामीण भागातील प्रत्येक माणूस किती समाजाभिमुख आहे ते कवी सुनिल पोटे यांनी कवितेच्या माध्यमातून दर्शविलेले आहे.

गाव खेड्यातील व्यक्तिरेखा व त्यांची संस्कृती आणि रितीरिवाज आणि इतरांच्या विषयी सेवाभाव हे या कवितासंग्रहातून सहज दिसून येतात. विश्वासाला कसल्याही प्रकारे बाधा निर्माण होणार नाही अशी ही ग्रामीण संस्कृती या भागात कवीने प्रत्यक्ष बघितली आणि अनुभवले आहे. बोलीभाषा जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी धडपड करणारा कवी स्वतःची कसलीही पर्वा करीत नाही. ते एका कवितेत म्हणतात.

कोणी म्हणो गावंढळ, कोणी म्हणोत गावटी
बोलीमंदी झाडीबोली, जणू रूपवान नटी

झाडीबोली किती सौदंर्यवान आहे ते त्यांच्या प्रत्येक रचनेत सामावलेले आहे. आपली मायबोली हृदयात जपणारा हा कवी बोलीचे गोडवे गाताना दिसून येतो.

ग्रामीण भागातील विवाहाच्या पद्धती आणि मुलीचे लग्न ठरले हे सिद्ध करण्यासाठी या भागात “चोरीपोहे” हा कार्यक्रम घेतल्या जातो. याविषयी कवी “चोरीपोहे” त्या कवितेत म्हणतात की,

पक्की सोयरीक तवा, चोरी पोह्यानं होवाची
चाले विश्वासावं काम झाडी शब्दाले जागाची…

असा विश्वास गावच्या सर्व जनसामान्यात अजूनही पाहायला मिळते. मग ते शालमुंदीचा कार्यक्रम असो कि याभागातले सामुदायिक भोजन करणे असो हे अतिशय विश्वासाने व सन्मानाने पूर्ण केल्या जातात.

उच्च शिक्षण घेऊन नोकरी निमित्ताने शहरात जरी वास्तव्याने राहत असेल तरी पण गावाची नाळ अजूनही सुटलेली नाही. कवी स्वतःला मनाने मी अजूनही गावातच आहे असे संबोधून “मन आतून गावठी” या कवितेत कवी व्यक्त होतात

घर आतून बाहेर राजबिंडा शोभिवंत
मनी झोपडीच्या डेरी सागवनी जातिवंत

एकंदरीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी झोपडीचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की या झोपडीत माझ्या किती वाटतो आनंद , तसे कवीला सुद्धा आपल्या साध्या घराची आठवण मनोमनी येत असून कवितेच्यारूपाने घरातील जिवंतपणा अजूनही कायम ठेवलेला आहे.

ग्रामीण भागातील संस्कृतीच्या अनेक पाऊलखुणा कवितेच्या रूपाने कवी सुनिल व्यक्त होताना दिसून येतात. अंगणात नित्याचा सडा असो की चुलीवरील स्वयंपाक असो.अशा विविध विषयावर लेखन केलेले दिसून येते.त्यामध्ये चुरण्याची शिदोरी, रेंगी, पाटावरुला, दंडार, बोतरी, ढोबर, बंडी, ढोली अशा अनेक विषयाला स्पर्श केलेला आहे. यावरूनच कवीचे गावाशी, पर्यायाने गावच्या संस्कृतीशी किती घनिष्ठ नाते जुळलेले आहे. ते वरील सर्व रचनावरून सहज लक्षात येते.
“मोडी” या कवितेत कवी सुनिल म्हणतात,

मोळी काड्याची बांधून मांडे वझा डोईवर
दम टाकत वाकत घामाघूम गाठे घर

गावच्या अर्थव्यवस्थेचे त्यांच्या काबाडकष्टाचे प्रत्यक्ष अनुभव “आंबील” या कवितासंग्रहात केलेला आहे. “माती टाकाले” या कवितेत कवी सुनिल म्हणतात.

रोज मरनाले पुरे माती टाकून टाकून
तुझ्या अंगाच्या मातीनं उभा संसार टिकून

म्हणजेच कष्टाचे महत्त्व काय आहे आणि शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा का म्हणतात. त्यांचे वर्णन या कवितेत करून देत असतो. ग्रामीण शेतकरी अन्नधान्य पिकवितो म्हणजे तो देश उभारणीतील महत्त्वाचा घटक आहे. स्वतःची अर्थव्यवस्था कायम राहावी यासाठी त्याची सततची धडपड सुरू असते. “भूजल्या मासऱ्या” या कवितेत कवी सुनिल पोटे म्हणतात..

भुजलेल्या मासऱ्याले दावे तपन कडक
शिका बांधून वाशाले ठेवे भरून मडक

अशाप्रकारे कवी सुनिल यांनी स्वतःचे अनुभव, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था त्यांचे दैनंदिन कार्य “आंबील” या काव्यसंग्रहातून विविध कवितेच्या माध्यमातून मांडलेले आहे.

ग्रामीण समाज हा निसर्गाशी घनिष्ठ नातं जपणारा आणि निसर्गपूजक आहे. त्यामुळे कवीने “आंबील” या कवितासंग्रहात निसर्गातील उपयोगी घटकावर बोलीभाषेतून अनेक काव्यरचना लिहिलेले आहेत त्यामध्ये हिरीचं पाणी, फणकट, गवताचा वझा, शेण, धानबांद्या, रोवना, चुरणा, दातन, शेणी अशा अनेक विषयावर उत्तम रचना आपणास वाचायला मिळतात. “मातीतला जीव” या कवितेतून कवी म्हणतात.

माझ्या मनाचा कोपरा दाट आठवांनी भरे
काळजात गाव माझे क्षणोक्षणी ते पाझरे

अशा नानाविध ग्रामीण जीवनात दैनंदिन उपयोगी येणाऱ्या अनेक विषयावर कवी सुनिल काव्य रूपात व्यक्त होताना दिसून येतात.वर्तमान परिस्थितीत ग्रामीण भागातील झालेली वाताहत या काव्यसंग्रहात विविध विषयाला स्पर्शून काव्यरूपात संदेश दिलेला आहे. त्यामध्ये तुझं शहर गुलाबी, नाही नावानं वावरं, पोट रीतच गाडगं,वाटणी अशा विविध कवितेमधून झाडीपट्टीतील संपूर्ण व्यवस्थेचे चित्रण “आंबील” या संग्रहात केलेले आहे.

कवी सुनिल पोटे एवढ्यावरच न थांबता झाडीच्या भूभागातील प्रेमाचे वर्णन सुद्धा कवितेच्या माध्यमातून केलेले दिसून येते.

“पेरमाचं चिखल” या कवितेत कवी म्हणतात…

तुझी आठवण माझ्या मनामंदी भायच दाटते
भर पावसात जीव पिसारल्यावाणी वाटते…

अशाप्रकारे झाडीपट्टीतील विविध प्रसंगाची साक्ष देणाऱ्या विविधांगी काव्यरचना “आंबील” या झाडीबोली भाषेतील कविता वाचकाला झाडीपट्टीतील वैविधतेची ओळख पटवून देत भूतकाळात घेऊन जातात.

कवितासंग्रहाचे नाव : आंबील
कवी : सुनील पोटे
प्रकाशक : समिक्षा पब्लिकेशन, पंढरपूर

Related posts

चंदन (ओळख औषधी वनस्पतीची)

अक्षरलिपी : काव्यसमीक्षेतील अक्षरधन

काकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल

Leave a Comment