कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन
संस्था अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती
कणकवली – सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे मराठी साहित्यातील नव्या कवीना प्रेरणा देण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ स्मृती प्रित्यर्थ ‘ गोलपिठा ‘ या काव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार योजनेला महाराष्ट्रातून 85 कवींनी आपल्या प्रत्येकी पाच कविता पाठविल्या होत्या. यामधून कवयित्री विद्या पाटील यांच्या कवितांची ‘ गोलपिठा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून या काव्य पुरस्काराचे परीक्षक म्हणून मराठीतील ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन (वसई ) यांनी काम पाहिले. रोख दोन हजार रुपये / स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे विविध साहित्यिक पुरस्कार आयोजित केले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कथा कादंबरी कविता समीक्षा वैचारिक लेखन करणाऱ्या गुणवंत लेखक कवीना प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्कारांचेही आयोजन करण्यात येते. यावर्षीपासून मराठीतील नव्या उत्तम कथाकाराला आणि नव्या उत्तम कवी – कवयित्रीला प्रेरणा देण्यासाठी ज्येष्ठ कथाकार बाबुराव बागुल कथा पुरस्कार आणि कविवर्य नामदेव ढसाळ स्मृती गोलपिठा पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी बाबुराव बागुल कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता कविवर्य सायमन मार्टिन यांच्या परीक्षणार्थ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 85 कवींनी सहभाग घेतला होता.
स्त्री अस्तित्वाचा शोध घेणे हे विद्या पाटील यांच्या काव्य लेखनाचे मुख्यसूत्र
विदर्भ, मराठवाडा, मुंबई, खानदेश, कोकण, बेळगाव, गोवा आदी भागातून मराठी कवींनी आपल्या कविता पाठविल्या होत्या. कवींचा हा प्रतिसाद लक्षात घेऊन मराठीतील नामवंत कवींना परीक्षेत नेमून हा रिझल्ट तयार करण्यात आला. गोलपिठा पुरस्कार विजेत्या कवयित्री विद्या पाटील या सिंधुदुर्गनगरी येथील आहेत. त्यांनी या काव्य पुरस्कारासाठी पाठविलेल्या एकूण कविता या स्त्री जाणिवेने लिहिल्या गेलेल्या असून स्त्री अस्तित्वाचा शोध घेणे हे त्यांच्या काव्य लेखनाचे मुख्यसूत्र आहे. स्त्रीच्या चांगुलपणाला उजागर करत तिची स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवणे आणि आत्मसन्मानासाठी झगडताना अनिष्ट गोष्टी झिडकारने हा विचार विद्या पाटील यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आढळत असल्याने त्यांच्या कवितांचा गोलपिटा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला असे परीक्षक कविवर्य सायमन मार्टिन यांनी स्पष्ट केले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.