July 2, 2025
Vijay Mallya in a YouTube interview with Raj Shamani claiming political vendetta, analyzed by Nandakumar Kakirde
Home » विजय मल्ल्याची मुलाखत – चोराच्या उलटया बोंबा
विशेष संपादकीय

विजय मल्ल्याची मुलाखत – चोराच्या उलटया बोंबा

विशेष आर्थिक लेख

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी  राज शमानी या लोकप्रिय यूट्यूबरला चार तासांची प्रदीर्घ मुलाखत दिली. आपण राजकीय सुडाचा बळी आहोत  असा दावा त्यांनी केला. मला हवं तर ‘फरार’ म्हणा पण ‘चोर’ म्हणू नका असंही आवाहन त्यांनी  केले. मराठी भाषेत “चोराच्या उलट्या बोंबा” अशी म्हण आहे. त्याचा प्रत्यय या मुलाखतीत पदोपदी आला. जगभरात दोन कोटी लोकांनी ही मुलाखत पाहिल्याचा ” गर्व ” विजय मल्ल्या यांना आहे. या पार्श्वभूमीवर या मुलाखतीची शहानिशा…

नंदकुमार काकिर्डे

विजय विठ्ठल मल्ल्या हे नाव भारतीयांना नवीन नाही. 18 डिसेंबर 1955 ला कोलकाता येथे  त्यांचा जन्म झाला. सेंट झेवियर्स कॉलेजमधून वाणिज्य पदवी घेतली. व्यापार,उद्योजक व राजकारण हा त्यांचा व्यवसाय. 1986 मध्ये पहिला विवाह समीरा तय्यबजी यांच्याशी केला. त्यानंतर दुसरा विवाह 1993 मध्ये रेखा मल्ल्या यांच्याशी विवाह झाला.सिद्धार्थ मल्ल्या, लैला मल्ल्या,  तान्या मल्ल्या व लीला मल्ल्या ही त्यांची संतती. कर्नाटक मधून  2002 मध्ये जनता दल सेक्युलर व काँग्रेस यांच्या पाठिंब्यामुळे पहिल्यांदा खासदार झाले, तर 2010 मध्ये जनता दल सेक्युलर व भाजप यांच्या पाठिंब्यामुळे दुसऱ्यांदा खासदार झाले. मे 2016 मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सरकार दरबारी फरार,  आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतात हवी असलेली व्यक्ती अशी नोंद आहे. सध्या लंडन मध्ये त्यांचे वास्तव्य आहे.

2016 मध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या दिवाळखोरी आणि दिवाळे संहितेची शक्ती दाखवण्याच्या प्रयत्नात मोदी सरकारने त्यांचे ध्येय गाठले. त्याचे विजय मल्ल्या उत्तम उदाहरण असे वक्तव्य त्यांनी मुलाखतीत केले. राज्यसभेची खासदारकी, मानद डॉक्टरेट आणि राजकीय क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रांशी जवळचे संबंध ठेवून देशात राजकीय प्रभाव निर्माण करणाऱ्या या व्यक्तीला तुरुंगात टाकून  कायद्यासमोर कोणीही मोठा नाही हे दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न होता. मात्र अटकेपूर्वीच विजय मल्ल्या फरार झाले व  लंडन निवासी झाले. त्यांचा पासपोर्ट केंद्र सरकारने जप्त केल्यामुळे त्यांना भारतात परतता येत नाही असाही दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेला याबाबतची माहिती दिली होती असे मल्ल्या यांनी मुलाखतीत सांगितले आहे. आपण एक “गैरसमजग्रस्त” उद्योजक असून किंगफिशर  एअरलाइन्सच्या पतनासाठी उच्च विमान इंधन कर, रुपयाचे अवमूल्यन व इतिहाद एअरवेजला त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याला भारत सरकारने परवानगी नाकारल्याने आपली कंपनी तोट्यात गेली असे त्यांनी नमूद केले आहे. भारताचे विमान वाहतूक क्षेत्र अनेक वर्षांपासून अतिरेकी नियमन व दंडात्मक कर आकारणी याच्याशी सामना करत असल्याचा त्यांचा दावा आहे. किंगफिशर कंपनी तोट्यात गेलेली होती. मात्र त्याचवेळी इंडिगो आणि स्पाइस सेट यासारख्या विमान कंपन्या नफ्यात होत्या ही गोष्ट सोयीस्करपणे विजय मल्ल्या विसरलेले आहेत.

विजय मल्ल्या यांना 1983 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी युनायटेड ब्रुवरीज समूह, किसान प्रॉडक्टस, युबी पेट्रोकेमिकल्स,आणखी काही कंपन्या व प्रचंड मालमत्ता वारसा हक्काने मिळाली. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर नव्या कंपन्यांची खरेदी सुरू केली. त्यातील बहुतेक सर्व खरेदी आर्थिक अडचणीत आली. त्यावेळी त्यांनी किंगफिशर हा सर्वात लोकप्रिय बिअरचा ब्रँड तयार केला होता. तसेच मॅकडोवेल नंबर 1, रॉयल चॅलेंज, बॅग पायपर सारखे ब्रँड बाजारपेठेत सादर करून भारतीय मद्य बाजारपेठेत वर्चस्व निर्माण केले होते. 1988 मध्ये विकत  घेतलेली बर्जर पेंट्स ही कंपनी 250 कोटी रुपयांना कान्साई पेंटस यांना विकावी लागली. 1989 मध्ये विकत घेतलेली बेस्ट अँड क्रॉम्प्टन उत्कृष्ट कंपनी गैरव्यवस्थापनामुळे गाळात गेल्याने 1995 मध्ये त्याची विक्री करणे मल्ल्या यांना भाग पडले.

1990 मध्ये विकत घेतलेली मंगळूर केमिकल्स अँड फर्टीलायझर्स ही कंपनी 1994 मध्ये आजारी म्हणून घोषित करावी लागली. अखेरीस कर्ज फेडीच्या अटीनुसार वन टाइम सेटलमेंट व 135 कोटी रुपयांची व्याजमाफी घेऊन ही कंपनी झुआरी इंडस्ट्रीजला विकण्यात आली. विविध ‘किसान’ ब्रँडची उत्पादने तयार करणारी कंपनी युनि लिव्हरला विकण्यात आली. या पाठोपाठच त्यांना पिझ्झा कंपनी,कार्बोरेटेड वॉटर कंपनी, टेलिकॉम व आरोग्य सेवा व अन्य काही कंपन्या बंद कराव्या लागल्या.

2003 त्यांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी किंगफिशर एअरलाइन्स कंपनी स्थापन केली.ती प्रत्यक्षात 2005 मध्ये सुरू झाली. आंतरराष्ट्रीय उड्डाण हक्क मिळवण्यासाठी त्यांनी एअर डेक्कन कंपनी ताब्यात घेतली. त्यांनी संपत्तीची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी केली ही बाब नाकारता येणार नाही. त्यांच्या चुकीच्या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका त्यांच्या कंपनीला बसला. त्यावेळी तेलाच्या किमती वाढल्या, महसूल कमी झाला आणि कर्ज वाढत राहिले. परिणामतः किंगफिशर एअरलाइन्सचे 12 वाजले. त्यांना 7000 कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीतील कंपनीला आर्थिक सवलती मेळाव्यात म्हणून विजय मल्ल्या यांनी अत्यंत भयंकर युक्त्या वापरल्या.

सातत्याने विविध उड्डाणे रद्द करणे, कर्मचाऱ्यांना पगार न देणे असे प्रकार केले. यावेळी स्टेट बँकेसह अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी विजय मल्ल्या यांना भरभरून कर्ज दिली होती. या विमान कंपनीने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दिला नाही तसेच उद्गम स्रोतावरील कर वजावट रक्कम सरकारला भरली नाही. त्या रकमेचा अपहार केला. त्यामुळे कर अधिकाऱ्यांनी त्यांची खाती गोठवली.सेवा कर, विक्री कर आणि कर्मचाऱ्यांचे पगार मोठ्या प्रमाणावर विलंबित झालेले होते. 2012 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स चे काम बंद पडले. त्यांनी त्यावेळी 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे स्टेट बँकेसह विविध राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज बुडवलेले होते.

2016 मध्ये त्यांनी साठावा वाढदिवस भव्य प्रमाणात केला. 2011 मध्ये व्हेरिटस नावाच्या कॅनडियन संशोधन कंपनीने किंगफिशर एअरलाइन्स बाबत धोक्याची घंटा वाजवली होती. ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे नमूद केले होते. कंपनीचे भाग भांडवल नष्ट होऊन कशीबशी  कंपनी चालू होती. अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी कोणत्याही गंभीर इशाऱ्याला न जुमानता कोट्यावधी रुपयांचे कर्जाचे रूपांतर अधिमुल्यल्यासह भाग भांडवलात परिवर्तित केले. त्यावेळी अरुणा राय, प्रशांत भूषण व निखिल डे या त्रयींनी लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता.पण त्याकडे केंद्र सरकार, विविध राष्ट्रीयकृत बँका यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आढळले.

यावेळी किंगफिशर कडून इतर युबी समूहातील कंपन्यांकडे निधी वळवण्यात आला होता.सर्व कर्जे फेडण्यात विजय मल्ल्या यशस्वी झाले नाहीत तर त्यांना अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी डिफॉल्टर घोषित केले होते. त्याचवेळी विजय मल्ल्या लंडनला पळून गेले. यावेळी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी विजय मल्ल्या यांची मालमत्ता व शेअर विकून टाकून 14 हजार कोटी रुपये वसुली केली होती.  मल्ल्या यांच्यावर 6200 कोटी रुपये कर्जाचा बोजा होता. मल्ल्या यांचा दावा होता की त्यांच्या कर्जापेक्षा जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य खूप जास्त आहे.

किंगफिशर ची अश्लील कॅलेंडर, वैभवशाली जीवनशैली व निर्णयांची अपरिपक्वता या काळात वाढलेली होती.  त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोषही निर्माण झालेला होता. त्यांच्या कंपन्यांना बँकांच्या कर्जातून बाहेर काढण्यासाठी मल्ल्या त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून किमान 4000 कोटी रुपये  देणार होते.  प्रत्यक्षात ही रक्कम कधीच दिली नाही. परदेशातून कर्जफेड करण्याची तयारी दाखवली. तोपर्यंत सर्व गोष्टींना खूप उशीर झालेला होता. दिवाळखोरी कायद्याने इतर अनेक मोठ्या कर्जबुडव्यांच्या तुलनेत विजय मल्ल्याकडून जास्त वसुली केली आहे.

“मी गुन्हेगार नाही,” असे त्यांनी सांगितले. “मी नोकऱ्या निर्माण केल्या, ब्रँड निर्माण केले आणि मला शक्य असलेला प्रत्येक पैसा परत करण्याची ऑफर दिली.” त्याला एफईओ कायद्यांतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते, जे भारतातील या कायद्यांतर्गत पहिलेच प्रकरण आहे. प्रत्यार्पणाचे प्रयत्न आणि न्यायालयीन खटले चालू आहेत. या मुलाखती द्वारे त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत आपण देश प्रेमी आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नाही तर किंग फिशर कर्मचाऱ्यांची माफी त्यांनी या मुलाखतीत मानभावीपणे मागितली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांची बाजू पुढे मांडण्याची गरज असून विजय मल्ल्या यांच्या दाव्याबाबत वस्तुस्थिती मांडण्याची निश्चित गरज आहे. त्यांची मुलाखत लबाडपणाची असून सत्य चव्हाट्यावर आणले पाहिजे. अर्थात यात केंद्र सरकारची चूक असेल तर तीही प्रांजळपणे कबूल करण्याची हिम्मत मोदी सरकारने दाखवली पाहिजे. फुटबॉल खेळात जसा सेल्फ गोल असतो तसा या प्रकरणात मोदी सरकारचा होऊ नये ही अपेक्षा.

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading