March 31, 2025
Vinod Kumar Shukla, Gyanpeeth Award-winning Hindi writer, known for his profound and poetic storytelling.
Home » विनोदकुमार शुक्ल : काळजातला लेखक
मुक्त संवाद

विनोदकुमार शुक्ल : काळजातला लेखक

परवा विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि मला स्वतःलाच हा पुरस्कार मिळाल्याइतका आनंद त्या दिवशी झाला. इतका हा लेखक आत आत माझ्या काळजात रूतून बसलेला आहे. अर्थातच मी त्यांना कधी भेटलो नाही आणि त्यांना फोनवर देखील बोललेलो नाही. पण एखादा लेखक आपल्या काळजात रुतून बसण्यासाठी त्याला प्रत्यक्ष भेटण्याची थोडीच गरज असते ! त्याच्या साहित्यातून तो आपल्या काळजात रुतून बसू शकतो.

इंद्रजीत भालेराव

॥ विनोदकुमार शुक्ल : काळजातला लेखक॥

१९९४ ची गोष्ट असावी. परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात रुजू होऊन चार-पाच वर्षे झाली होती. म्हणजे तसा अजून मी परभणीत रुजू लागलो होतो. त्यादरम्यान आमचं महाविद्यालयही रुजत होतं. पार्टिशनच्या खोल्या आणि तसंच ग्रंथालय होतं. तिथं चांगली पुस्तकं होती आणि चांगली नियतकालिकंही यायची. मध्यप्रदेश हिंदी अकादमीचे ‘साक्षात्कार’ हे नियतकालिक नियमित येत असे. तेव्हा पहिल्यांदा विनोद कुमार शुक्ल हे नाव वाचणात आलं. तेव्हा त्या साक्षात्कार नियतकालिकात ‘दिवार मे एक खिडकी रहती थी’ या विनोद कुमार शुक्ल यांच्या कादंबरीची प्रकरणे येत असत. प्रत्येक अंकात एक प्रकरण येत असे. आम्ही त्या अंकाची उत्सुकतेने वाट पाहत असू. तेव्हा आम्हाला कोणीही सांगितलेलं नव्हते की विनोद कुमार शुक्ल हे फार मोठे लेखक वगैरे आहेत. पण ही प्रकरणं वाचून हा माणूस थोर आहे असं वाटत गेलं.

आमच्या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक आणि लेखक प्रभाकर हरकळ आणि मी असे आम्ही दोघे ही प्रकरणं वाचायचो आणि त्यावर तासंतास छानपैकी चर्चा करायचो. मजा यायची. कारण त्या कादंबरीतला नायकही एका नव्या महाविद्यालयात रुजू झालेला प्राध्यापक असतो आणि आम्हीही थोडेफार तसेच होतो. त्यामुळे आम्हाला ही कादंबरी आपलं जीवन मांडते आहे, असं वाटायचं, म्हणून ती खूप आवडायची. त्यांच्या तिरकसपणातील सरळता मोठी वेधक होती. म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या या अंकाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहायचो.

पुढे १९९७ साली ही कादंबरी पुस्तक रुपात प्रकाशित झाली आणि पुढच्या एक-दोन वर्षात तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे ती कादंबरी पुढे मराठीतही अनुवादित झाली. विनोद कुमार शुक्ल हे नाव पक्क हृदयावर कोरलं गेल्यानंतर आम्ही विनोद कुमारांची पुस्तकं शोधायला सुरुवात केली. त्यांचे काही कवितासंग्रह मिळवले. विनोद कुमारांची कविता वाचूनही आम्ही तसेच झपाटले गेलो. त्यांच्या काही कवितांचे मी स्वतः अनुवादही केले आणि त्या काळात मी कवीसंमेलनाची जी सूत्रसंचालनं करायचो, उदाहरणार्थ १९९५ साली परभणीला झालेल्या, त्याआधी १९९३ साली साताऱ्यात झालेल्या आणि नंतर १९९७ साली अहिल्यानगरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाची सूत्रसंचालने मी केली तेव्हा आवर्जून विनोद कुमार शुक्ल यांच्या कविता मी सूत्रसंचालनातून सादर केल्या. तेव्हाची त्यांची मला अजूनही मुखपाठ असलेली एक कविता अशी आहे,

उदास होऊन एक माणूस बसला होता
मी त्याला ओळखत नव्हतो
पण मी उदासीला ओळखत होतो
म्हणून मी त्याच्या जवळ गेलो
मी हात पुढे केला
माझा हात धरून तो उभा राहिला
तो मला ओळखत नव्हता
पण हात पुढं करण्याला ओळखत होता
आम्ही दोघं सोबत चालायला लागलो
आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत नव्हतो
पण सोबत चालण्याला ओळखत होतो

पुढं आमचे मित्र, साक्षात मासिक आणि साक्षात प्रकाशनाचे संपादक रमेश राऊत यांनी विनोद कुमार शुक्ल यांच्या बहूदा ‘पेडपर कमरा’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. तो साकेत प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यादरम्यान स्वतः राऊत हे अनेकदा विनोद कुमार शुक्ल यांना भेटलेले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी पुष्कळ गोष्टी कळायच्या. नंतर साहित्य अकादमीने त्यांच्यावर एक माहितीपटही काढला. त्यातून त्यांचं साधं, सरळ जीवन समजलं. खूप आपुलकी वाटायची या लेखकाविषयी. पुढे निशिकांत ठकार सरांनी विनोद कुमार शुक्ल यांची बहुतेक सर्वच पुस्तकं मराठीत आणली. माझा विद्यार्थी आसाराम लोमटे यानेही सगळा विनोद कुमार शुक्ल वाचून काढला आणि एक दिवस तो त्यांच्या घरी जाऊन धडकला. त्या भेटीचा आणि विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्याचा आढावा घेणारा एक सुंदर लेख त्याने अनुभव मासिकात लिहिला, जो सध्या समाजमाध्यमावर फिरतो आहे. तो सुंदर लेख वाचून विनोद कुमार शुक्ल आणखी जवळून समजले.

अनेक हिंदी नियतकालिकांनी याआधीच विनोद कुमार शुक्ल यांच्यावर विशेषांक काढलेले आहेत. पण त्यातल्या त्यात ‘साक्षेप’ या हिंदी नियतकालिकाने त्यांच्यावर काढलेला विशेषांक हा आठशे पानांचा आहे. त्यात समग्र विनोद कुमार शुक्ल मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यांच्या साहित्याची समीक्षा आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू समग्रपणे या अंकात मांडण्यात आलेले आहेत. हा अंक वाचला की विनोद कुमार शुक्ल यांचे समग्र आकलन व्हायला हरकत नसावी. हा अंकही विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्याबरोबरच माझ्या आवडीचा अंक आहे.

परवा विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि मला स्वतःलाच हा पुरस्कार मिळाल्याइतका आनंद त्या दिवशी झाला. इतका हा लेखक आत आत माझ्या काळजात रूतून बसलेला आहे. अर्थातच मी त्यांना कधी भेटलो नाही आणि त्यांना फोनवर देखील बोललेलो नाही. पण एखादा लेखक आपल्या काळजात रुतून बसण्यासाठी त्याला प्रत्यक्ष भेटण्याची थोडीच गरज असते ! त्याच्या साहित्यातून तो आपल्या काळजात रुतून बसू शकतो. असे हे माझ्या काळजातले लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

Anonymous March 27, 2025 at 8:04 AM

मस्त

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading