माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय संदर्भ माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. वाचता वाचता मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा एखादा नवाच पैलू माझ्या लक्षात येतो आहे.
इंद्रजीत भालेराव
॥ चितमपल्ली आणि गंडभेरूंड ॥
मारुती चितमपल्ली गेले आणि पुन्हा एकदा त्यांची सगळी ग्रंथसंपदा समोर घेऊन बसलोय. याआधी ही सगळी पुस्तकं अधून मधून वाचतच होतो. पण आता पुन्हा एकदा सगळी पुस्तकं वाचण्याची ओढ निर्माण झालेली आहे. कारण चितमपल्लींचं स्मरण करण्याचं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं हेच एक चांगलं साधन आहे. त्यामुळे ग्रंथसंपदा समोर ठेवलेली आहे. कुठलंही पुस्तक काढतो. त्यातलं कुठलंही प्रकरण काढतो आणि वाचतो. आता प्रत्येक पुस्तक घेऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं असा क्रम मी लावत नाही. त्याचं कारण हे वाचन निरुद्देश आहे. पण माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय संदर्भ माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. वाचता वाचता मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा एखादा नवाच पैलू माझ्या लक्षात येतो आहे.
मारुती चितमपल्ली यांच्या ‘चैत्रपालवी’ या लेखसंग्रहातला ‘सिंदबादचा रुख’ हा लेख वाचत होतो. यात रुख या अजस्त्रकाय पक्षाचा सर्वप्रथम उल्लेख अरेबियन नाईट्स या सुरस आणि चमत्कारिक गोष्टीत सिंदबाद या दर्यावर्दीच्या दुसऱ्या व पाचव्या सफरीत आढळून येतो, असं मारुती चितमपल्ली नोंदवतात. हा पक्षी प्रचंड मोठा आहे, त्याच्या पंखाचं, त्याच्या अंड्याचं आणि त्याच्या एकूणच देहाचं वर्णन सिंदबादनं तिथं केलेलं आहे. हा प्रचंड पक्षी हत्ती आपल्या पायात धरून वर उचलू शकतो असंही तो म्हणतो.
तीन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या अरेबियन नाईट्स या ग्रंथातही अशा पक्षाचं वर्णन असल्याचं मारुती चितमपल्ली सांगतात. या अरेबियन नाईटचा शोध घेत तेराव्या शतकात फिरलेल्या मार्को पोलोनं या रूख पक्षाचं वर्णन पुढील प्रमाणे करून ठेवलेलं आहे, ‘गरुडासारखा दिसणारा हा पक्षी प्रचंड आकाराचा होता. त्याच्या पंखाची लांबी तीस कदम होती. त्याच्या पिसाची लांबी बारा कदम होती. तो इतका शक्तिमान होता की आपल्या पंखात हत्तीला पकडून सहज उंच आकाशात नेतो. त्यास खाली जमिनीवर सोडून देताच त्याचा चेंदामेंदा झाल्यावर त्याला निवांतपणे खात बसतो.’
अशा विविध परदेशी ग्रंथातून येणाऱ्या या रूख नावाच्या पक्षाचं वर्णन वाचून झाल्यानंतर मारुती चितमपल्ली म्हणतात, ‘असा पक्षी त्या काळात खरोखरच होता काय ? आधुनिक पक्षी शास्त्रज्ञ अशा प्रकारचा पक्षी इतिहास काळात होता, हे मान्य करत नाहीत, असा तपशीलही चितमपल्ली जोडतात. परदेशी लेखकांच्या लेखनात असा एखादा वेगळा पैलू सापडला तर त्याची मूळं आपल्या संस्कृत ग्रंथात शोधण्याची मारुती चितमपल्ली यांची खास सवय इथं मात्र दिसून येत नाही. त्यामुळे चितमपल्ली यांची राहिलेली ही अपुरी बाजू मी शोधत गेलो आणि मला काय काय सापडत गेलं तेच पुढच्या नोंदीत नोंदवलेलं आहे.
हे सगळं वाचताना मला दि. के. बेडेकर यांच्या ‘चित्रवेध’ या पुस्तकात वाचलेल्या ‘आकाशव्याघ्र’ या एका शिल्पाविषयीचा लेख आठवला. देहूच्या मंदिरावर त्यांनी हे शिल्प पाहिले होते. एक अजस्त्र सिंह, ज्याला पंख आहेत, तो चार पायात चार हत्ती आणि शेपटीत एक हत्ती धरून आकाशात उडतो आहे, असे ते चित्र आहे. या सिंहाच्या पायाला गरुडासारख्या नख्या आहेत, असंही बेडेकर लिहितात. बेडेकरांना हे चित्र पाहून आश्चर्य वाटलं आणि त्यांनी बराच शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंदाज करण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळात खूप गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्यांना नेमका अंदाज करता आला नाही. हे शुरत्वाचे प्रतीक देहूच्या विठ्ठलरुक्माई मंदिरावर का ? असा प्रश्न त्यांना पडला होता. विठ्ठलरुक्मिणी हे तर अहिंसक देव. मग इथं हे चित्र कशाला ? असं त्यांना वाटत होतं. त्यांचा हा लेख प्रकाशित झाल्यानंतर धुंडीराज विनोद या त्याकाळच्या अध्यात्मिक पुरुषाने त्यांना काही प्रतिक्रिया पाठवल्या. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘हत्ती हे ज्ञानेंद्रियांचे प्रतीक व व्याघ्र हे जीवाचे प्रतीक मानले म्हणजे त्या शिल्पाचा अर्थ असा लागतो की, त्यात ज्ञानेंद्रियांचा निग्रह करून मुक्त झालेला जीव दाखवलेला आहे.’ आकाशगमनाचा हा अर्थ मला अगदी स्वाभाविक असा वाटतो, असं बेडेकरांना तेव्हा वाटलं होतं. या अर्थाशी सुसंगत व त्याला पोषक अशी एक ओवी ज्ञानेश्वरीत असल्याचं प्रा. गं. बा. सरदार यांनी तेव्हा बेडेकरांना कळवलं होतं. ती ओवी अशी,
मेघ उदार परी वोसरे
म्हणऊनि उपमेसी न पुरे
हे निःशंकपणे सपांखरे
पंचानन ॥ अ. – ९, ओ. – २०५ ॥
या ओवीत आलेला ‘सपांखरे पंचानन’ या शब्दाचा अर्थ अध्यात्मिक दृष्ट्या दृढतर भक्तांसाठी असला तरी त्याचा शब्दशः अर्थ, पंख असलेला सिंह, असाही होतो. याचा अर्थ तो शब्द भारतीय पुराणात कुठेतरी असावा.
परवा समाजमाध्यमावर एक रील पाहताना असं लक्षात आलं की, एका रीलमध्ये असं शिल्प असलेली भिंत दाखवत आहेत आणि त्याला ‘हेच ते गंड भेरुंड’ असं म्हणत आहेत. मग मी त्या रीलवर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्या खूप जाणकारांनी लिहिल्या होत्या. त्यात अनेकांनी असं लिहिलं होतं की, हे असं चित्र अनेक किल्ल्यांच्या भिंतीवर किंवा दरवाजावर दिसतं आणि मंदिराच्या दारावर किंवा भिंतीवरही दिसतं. हे शौर्याचं प्रतीक आहे, असं काही जणांनी लिहिलं होतं. तर ही विजयनगरच्या साम्राज्याची राजमुद्रा आहे, असंही काही जणांनी लिहिलं होतं. तसंच अशी शिल्पे कर्नाटकातल्या किल्ले आणि मंदिरावरही दिसतात, असं काहीजणांनी लिहिलेलं होतं. एक जण तर लिहीत होता, कर्नाटकच्या एसटीवरही हे चिन्ह दिसतं. याचा अर्थ ही कर्नाटकची राजमुद्रा आहे काय ? पाहायला पाहिजे. यानिमित्तानं मी समाज माध्यमावर गंडभेरुंड या शब्दाचं आणखी संशोधन केल्यावर वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या नोंदी पाहायला मिळाल्या. त्यातली विश्वकोशातली नोंद मी खाली दिलेली आहे. तिचं संकलन सचिन जोशी यांनी केलेलं आहे. तिच्यात अशा प्रकारची चिन्हे कुठे ? कशी ? कधी ? वापरतात ? अशा चिन्हाचे किती प्रकार आहेत ? ते सर्वच लिहिलेलं आहे. ती नोंद इथं मी मुद्दाम सोबत देत आहे.
। दुर्गद्वारशिल्पांचे प्रकार ।
दुर्ग किंवा गडकोटांच्या दरवाजांवर असलेली शिल्पे ही प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने, फुले, फळे या स्वरूपांत असतात. काही वेळा शिल्पशपट्टीवर गणपती अथवा इतर देव-देवता विराजमान असतात, तर कधी वेलबुट्टीसारखे नक्षीकाम दिसते. याशिवाय काही वेळा किल्ल्यांच्या दरवाजावर शिलालेख आढळतात.
कौटिलीय अर्थशास्त्र, शुक्रनीति, अग्निपुराण, अभिलाषितार्थचिंतामणि, समरांगणसूत्रधार यांसारख्या ग्रंथांमधून दुर्गांचे प्रकार, तसेच दुर्गांचे दरवाजे, तटबंदी यासंबंधीची विस्तृत माहिती मिळते. कोणती वास्तू तसेच कोणत्या देवतेचे मंदिर कोणत्या दिशेस असावे, यासंबंधीदेखील सूचना केलेल्या दिसतात.आकाशभैरवकल्पम् या ग्रंथात दुर्गद्वारशिल्पांबद्दल पुढील माहिती मिळते : प्रत्येक बाह्यदरवाजाखालील उंबरठ्यावर भद्रमुख कोरावे. वरच्या भागांवर यक्ष-राक्षसांच्या प्रतिमा उठावदार कोराव्यात. त्यावर अतिभयंकर सिंहाच्याही आकृती ठसठशीत कोराव्यात. तसेच पूर्वद्वारावर विघ्नराज म्हणजे गणपती, दक्षिण दरवाजावर कालिका, पश्चिम दरवाजावर भद्रकाली, तर उत्तरेकडे हनुमंत कोरावा.
आकाशभैरवकल्पम् ग्रंथात सांगितल्याप्रमाणे भयंकर सिहांच्या किंवा व्याघ्राकृतीच्या ठसठशीत प्रतिमा अनेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात. दुर्गांवर आढळणाऱ्या ह्या सिंहाकृती त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार केवल सिंहाकृती, शरभ आणि व्याल असे प्रकार पडतात.
कोणतेही वैशिष्ट्य नसणारी सिंहाकृती म्हणजे केवल सिंहाकृती किंवा व्याघ्रकृती होय. ही सिंहाकृती किंवा व्याघ्राकृती बरेचदा हत्ती तसेच गंडभेरुंडासमवेत आढळते. तोरणा किल्ल्याच्या चित् (चित्ता) दरवाजावर हरणावर झडप घालणाऱ्या व्याघ्राकृतीचे शिल्प आहे.
। शरभ ।
शरभ म्हणजे मानव-पशू आणि पक्षी या तिन्हींचे एकत्रित वैशिष्ट्य असलेला काल्पनिक संमिश्र प्राणी. प्राचीन साहित्यामध्ये शरभ हे शंकराचे रूप मानले आहे. त्यामुळे अनेक मंदिरांतून शरभाची शिल्पे आढळतात. दुर्गांच्या दरवाजावर पंख असलेली विक्राळ मुखाची व तीक्ष्ण नख्या असलेली सिंहाकृती म्हणजे शरभ होय. केवल व्याघ्राकृतीप्रमाणेच शरभदेखील केवल शरभ, तसेच हत्ती व गंडभेरुंड यांच्यासमवेत आढळतो. माहुली तसेच अर्नाळा किल्ल्यावर केवल शरभाची शिल्पाकृती आढळते. शिवनेरीच्या दुसऱ्या (परवानगी) दरवाजावर गण्डभेरूण्ड तसेच दोन हत्तींना जेरबद्ध करणाऱ्या शरभाचे शिल्प आहे. याशिवाय रायगड, लोहगडसारख्या किल्ल्यांवरदेखील शरभ शिल्पाकृती पाहावयास मिळते.
। व्याल ।
व्याल म्हणजे सिंह आणि ड्रॅगन (सापाप्रमाणे लांब शरीर असणारा प्राणी) यांचा संमिश्र प्राणी होय. अनेक शिल्पांमध्ये छाती पुढे काढून पंजा उगारलेल्या अवस्थेत याचे शिल्पांकन केलेले असते. ओडिशामध्ये याला ‘विराळ’ तर दक्षिण भारतामध्ये ‘व्याल’ असे म्हणतात. व्याल या काल्पनिक प्राण्याचे शिल्पांकन भारतातील अनेक मंदिरांमध्ये केल्याचे दिसून येते. ड्रॅगनप्रमाणे लांब असणाऱ्या या प्राण्यास ज्या प्राण्याचे शिर असेल, त्या प्राण्याच्या नावाने ओळखले जाते. उदा. सिंहाचे तोंड असणाऱ्या प्राण्यास सिंहव्याल, तर हत्तीचे शिर असल्यास गजव्याल म्हणतात. यानुसार व्यालाचे नरव्याल, अश्वव्याल, अजव्याल अशी अनेक नावे आहेत. द्वारशिल्प म्हणून व्यालाचे शिल्पांकन दुर्मीळ आहे. रायगडावरील राजसभेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस मेंढ्याच्या शिंगाप्रमाणे बाकदार वळणाचे शिंग असलेल्या सिंहाकृतीचे शिल्प आहे. हे शिल्प शार्दूलाचे किंवा व्यालाचे असावे.
। गंडभेरुंड ।
सिंहाकृतीशिवाय द्विमुखी पक्ष्याचे म्हणजे गंडभेरुंडाचे शिल्पदेखील अनेक किल्ल्यांवर पाहावयास मिळते. एका धडाला दोन डोकी असणारा काल्पनिक पक्षी म्हणजे गंडभेरुंड होय. जसे शरभ शंकराचे रूप मानले जाते, त्याप्रमाणे गण्डभेरूण्ड विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळे गंडभेरुंडाची शिल्पेदेखील किल्ल्यांपेक्षा मंदिरांमध्ये जास्त प्रमाणात आणि विविध स्वरूपांत आढळतात. किल्ल्यांच्या दरवाजावर गण्डभेरूण्ड हा स्वतंत्र न दिसता तो नेहमी हत्तीसमवेत अथवा शरभासमवेत आढळतो. काही वेळा शरभ गंडभेरुंडाच्या पायाखाली किंवा चोचीमध्ये दिसतो. तर हत्ती हा कायमच गंडभेरुंडाच्या पायाखाली किंवा चोचीमध्ये दिसतो. शिवनेरी किल्ल्यावर गंडभेरुंड हा शरभाच्या पायाखाली दिसतो. तर गाविलगडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हत्ती आणि व्याघ्राकृती अशा दोघांनाही आपल्या चोचीमध्ये आणि पायामध्ये पकडलेल्या गंडभेरुंडाचे शिल्प आहे. याशिवाय मानवीरूपातील गंडभेरुंडाचे शिल्पदेखील पाहावयास मिळते. सिंहगडावरील राजाराम महाराजांच्या समाधी मंदिरात असलेल्या वृंदावनाच्या मागील भिंतींवर मानवी देहधारी गंडभेरुंडाचे शिल्प आहे. या गंडभेरुंडाच्या दोन्ही हातांमध्ये दोन साप असून, तो त्यांचे भक्षण करीत आहे.
शरभ, व्याल व गंडभेरुंड यांसारख्या काल्पनिक संमिश्र पशु-पक्ष्यांच्या शिल्पांशिवाय इतर अनेक पशु-पक्ष्यांची शिल्पे आढळून येतात. शिवनेरी, सिंहगड तसेच रोहिडा, देवगिरी यांसारख्या किल्ल्यांवर हत्तीची स्वतंत्र शिल्पे आढळतात. ही सर्व शिल्पे दर्शनी बाजूकडून अर्धउठावामध्ये कोरलेली आहेत. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याच्या महादरवाजावर मोर, हत्ती, हरीण आणि कोंबडा यांची शिल्पे कोरलेली आहेत. तर याच किल्ल्याच्या दर्या उर्फ यशवंत दरवाजावर ऋद्धिसिद्धिसह गणेश तसेच गरुड, हनुमान यांच्यासह दोन मगरी अमरवेलासह कोरलेल्या आहेत. जीवधन किल्ल्याच्या नाणेघाटाकडील प्रवेशद्वारावर सूर्य-चंद्राचे शिल्प आहे. पूर्णगडाच्या प्रवेशद्वारावरदेखील गणपतीसह चंद्र-सूर्य प्रतिमा आढळतात. शिवनेरी किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर शरभ शिल्पाच्या पायाजवळ पाल किंवा सरडासदृश प्राण्याचे शिल्प आहे. प्रतापगडावरील रेडे बुरुजाजवळील चोरदिंडीवर घोरपडीचे शिल्प आहे. तर पुरंदरजवळील वज्रगडाच्या दुसऱ्या दरवाजावर अग्निशलाकेचे दुर्मीळ द्वारशिल्प आहे. इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मते, ‘राजगडाच्या दुसऱ्या गुंजवणे दरवाजाच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. तेव्हा हे शिल्प गजलक्ष्मीचे असावे’.
दुर्गद्वार शिल्पांमध्ये पुष्कळ विविधता आढळते, तथापि त्यांतून नेमकी माहिती मिळत नाही. त्या संदर्भात केवळ अंदाज लावता येतो. याउलट किल्ल्यांच्या दरवाजांवरील शिलालेख मात्र इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.
। संदर्भ ।
१. खरे ग. ह. – स्वराज्यातील तीन दुर्ग, मुंबई, १९६७
२. घाणेकर प्र. के. – अथातो दुर्गजिज्ञासा, पुणे, १९९१
३. घाणेकर प्र. के. – भा. इ. सं. मं., पुणे, १९८३-८४.
४. देशपांडे प्र. न. – राजगड दर्शन, मुंबई, १९८१.
५. पाळंदे आनंद – दुर्ग तोरणा, पुणे, १९९८.
६. बेडेकर दि. के. – चित्रवेध, २०२१
७. चितमपल्ली मारुती – चैत्रपालवी, नागपूर, २०१६
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.