September 16, 2024
Whose responsibility is it to protect her
Home » ‘ती’च्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची ?
मुक्त संवाद

‘ती’च्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची ?

अशा विकृतांचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या अब्रूला हात घालणार्‍यांना जशा कडक शिक्षा केल्या होत्या, तशा कडक शिक्षांची तरतूद आणि अंमलबजावणी होण्याची आज गरज आहे तरच अशा गुन्हेगारांना चाप बसेल असे वाटते.

भारतासारख्या देशात स्त्रीला देवी, शक्ती, माता म्हणून पुजले जाते आणि त्याच देशात स्त्रीची सर्वांत जास्त विटंबना होते, हे भयावह वास्तव आहे. गेल्या वर्षी मेमध्ये मणिपूरमधील महिला, सध्या कोलकात्यातील डॉक्टर युवती, बदलापूरमधील चिमुरड्या विद्यार्थिनी, कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये मुलीच्या बाबतीत जे घडलं, त्या वेळी या मुलींच्यामधलं देवत्व संपलं होतं का ? आपल्या देशातील ऑलिंपिकविजेत्या कुस्तीपटू महिला लैंगिक शोषणाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शासनाकडून त्यांना ज्या पद्धतीने फरपटत नेलं गेलं, त्या वेळी त्यांच्यातलं देवत्व नष्ट झालं होतं का ? हाथरस येथे घडलेली घटना, बिल्किस बानोसंदर्भात जे घडलं, त्या महिला आपल्या देशातील नव्हत्या का ? एकीकडे स्त्रीची पूजा करायची आणि दुसरीकडे तिचा आत्मसन्मान, प्राण, जगण्याचे हक्क पायदळी तुडवले जात असताना मूग गिळून गप्प राहायचं, हे कुठपर्यंत चालणार ? स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कधी मिळणार ? या देशातील दुटप्पी, ढोंगी, दांभिक मानसिकतेचे काय करायचे ? यांसारखे अनेक प्रश्न मेंदूत थैमान घालतात आणि आपल्या घरात, गावात, शाळेत, कॉलेजात आणि एकूणच देशात मुली/स्त्रिया सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न मनाला छळत राहतो.

मुलीला तिच्या इच्छेप्रमाणे शिकवायचं, तिचा देशभरात कुठेही नंबर लागेल तिकडे उच्च शिक्षणासाठी पाठवायचं असं ठरवलं होतं, पण आता छातीच होत नाही ! असं सध्या मुलीच्या पालकांना, आईवडिलांना वाटू लागलं यात चुकीचं काय आहे? आपली शाळेला, कॉलेजला गेलेली मुलगी सुरक्षितपणे घरी परत येईल की नाही, आपण नोकरीला गेलो असताना आपल्या घरात असलेली आपली मुलगी सुरक्षित असेल की नाही? यांसारखे अनेक प्रश्न आता पालकांना अस्वस्थ करू लागले आहेत.

या परिस्थितीला घाबरून मुलींना शाळेतच पाठवायचे नाही का ? मुली असुरक्षित आहेत म्हणून त्यांना घरातच डांबून ठेवायचे का की दावणीला बांधलेल्या गायीप्रमाणे तिला दोर बांधून आपण प्रत्येक ठिकाणी तिच्या सोबत जायचे आणि सुरक्षितता पुरवायची ? काय करावं बरं ? मुलींवर बलात्कार होतात, अत्याचार होतात, वासनांध पुरुष तृप्ती झाली की, यातना देत तिची निर्घृणपणे हत्या करतात. माणूस इतका क्रूर आणि विकृत कसा बनत असेल? नेमके कोणते रसायन त्याच्या मेंदूत या वेळी कार्य करत असेल? यांसारखे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात.

पिढ्यान् पिढ्या, वर्षानुवर्षे असे अत्याचार होत राहतात, मुली/स्त्रियांच्या हत्या होत राहतात. समाजातील एक घटक म्हणून, पालक म्हणून आपण हळहळतो, मोर्चे काढतो, बंद पुकारतो, रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पेटवून मृतात्म्यास शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली वाहतो. काही दिवस समाजमाध्यमांवरती अशा क्रूर कृत्यांना पायबंद घालण्याची चर्चा केली जाते. जनक्षोभाला, दबावाला बळी पडून शासन गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची हमी देते. प्रश्न तात्पुरता मिटतो, अत्याचाराची पुढील घटना घडेपर्यंत!

अशा घटनांचा खोलवर विचार करत असताना एक गोष्ट मात्र सातत्याने जाणवत राहते, ती म्हणजे पुरुषी एकाधिकारशाही, पुरुषी मस्तवालपणा ! स्त्रीची उपभोग्यता, स्त्री म्हणजे पुरुषाच्या वासनापूर्तीचे साधन, स्त्रीची पुरुषासाठीची उपयुक्तता आणि बरंच काही. आपले सामाजिक वास्तवही वारंवार तेच आपल्यासमोर मांडत राहते की, स्त्री ही फक्त पुरुषांच्या गरजांचे, वासनेच्या पूर्तीचे एक साधन मात्र आहे. त्यामुळे अशा विकृतींना वाव मिळतो.

या विकृतींच्या समर्थनार्थ अनेक बाबी पुढे आणल्या जातात. मुलींनी छोटे आणि उद्दीपन करणारे कपडे का घालावेत ? मुलींनी रात्री-अपरात्री बाहेर का पडावे ? मुलींनी मुलांबरोबर इतके फ्रँकली का वागावे? आपण मुलगी आहोत याची जाणीव ठेवून मुलींनी आपली अब्रू जपणं महत्त्वाचं नाही का? मुलींचे पालक मुलींना इतकं स्वातंत्र्यच मुळी का देतात? यांसारखे प्रश्न मुलीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणतात असं मात्र या प्रवृत्तींना वाटत नाही.

अशा प्रश्नांना उत्तरे देत असताना एक गोष्ट सांगावी वाटते की, अशा विकृतांना आपली वासना शमविण्यासाठी कुठल्याही वयाची स्त्री चालते, छोट्या चार-दोन वर्षांच्या चिमुरडीपासून ते ऐंशी वर्षांची वृद्धाही यांच्या पाशवी नजरेतून सुटत नाही. केसांपासून पायांपर्यंत झाकलेली स्त्रीसदृश आकृतीही अशा विकृतांना आकर्षित करते, मग उद्दीपन करण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो ?

हे दररोज कुठे ना कुठेतरी घडत असते, काही उघड होते, काही तसेच काळाच्या उदरात गडप होते. या घटना घडू नयेत म्हणून काय करावे? पालक म्हणून मला वाटते, मुलींपेक्षा मुलांनाच जास्त समुपदेशनाची गरज आहे. लहान वयापासूनच मुलगा आणि मुलगी समानतेचे संस्कार पाल्यांना घरातूनच आपल्या वर्तनातून पालकांनी दिले पाहिजेत. विशेषतः मुलांना आपल्या भावना, भावनांवरील नियंत्रण कसे करावे याचे धडे दिले पाहिजेत. संपर्कात येणार्‍या प्रत्येक मुलीचा/स्त्रीचा सन्मान, तिचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे याचे भान मुलांना दिले गेले पाहिजे. मला काहीतरी हवंय, मला ती आवडते म्हणून मी कुठल्याही मुली/स्त्रीवर बळजबरी करणार नाही, माझ्या कुठल्याही भावनेचे शमन करण्यासाठी मी जबरदस्ती करणार नाही अशी शिकवण घरातूनच आईबापांनी मुलांना देण्याची गरज आहे, यासाठी मुले आणि पालक यांच्यामध्ये सुसंवादाची गरज आहे.

मुलींनी काय करावे ? मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे अगदी बालवयापासूनच दिले जाण्याची गरज निर्माण झाली आहे. याबरोबर स्त्री म्हणून काही गोष्टी आपल्याला जाणवतात, कुणाची वाईट नजर, स्पर्श, हेतू वाईट आहे हे लगेच लक्षात येते. अशा वेळी सजगपणे दक्ष राहून थोडेही शंकास्पद वर्तन, कृत्य, हावभाव जाणवले तरी जागरूक राहून जाब विचारायला शिकले पाहिजे. आपल्या पालकांना याची कल्पना दिली पाहिजे. जिथे शिकत, नोकरी करत असतील, तिथल्या व्यवस्थापनाला न घाबरता, न संकोचता हे नजरेस आणून दिले पाहिजे.

चिमुकल्या मुलींच्या बाबतीत पालकांची जबाबदारी फार मोठी आहे. आपले प्रायव्हेट पार्ट कोणते? आपल्या प्रायव्हेट पार्टला कोणी स्पर्श करते का ? आपल्याला न आवडणारे स्पर्श कोणते ? याची जाणीव मुलामुलींना करून देण्याची निकड आहे. ओळखीचा आहे, जवळचा आहे, मामा आहे, काका आहे, आजोबा आहे, तो असं काहीही करणार नाही, म्हणून आपल्या नकळत्या चिमुरड्यांना त्यांच्या स्वाधीन करू नये. तसंच काही वावगं निदर्शनास आल्यास त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, तरच अशा घटनांना अटकाव करता येईल.

खरे तर कुठल्याही घरात स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार यांचे समर्थन होतच नसावे; तरीही स्त्रियांवरती असे मरणप्राय प्रसंग का ओढवत असावेत? यासाठी आपली व्यवस्था जबाबदार आहे असे वाटते. ज्या प्रशासनावर आपण योग्य न्याय मिळेल म्हणून विश्वास ठेवतो, ते या बाबतीत गंभीर नाही. जरी गांभीर्याने घतलं तरी कठोर आणि जलद शिक्षेची तरतूद नाही. शिवाय शिक्षा भोगून सुटून आल्यानंतर उजळ माथ्याने असे नराधम समाजात वावरतात, त्यामुळे अशा कृत्यांतून उलथापालथ करणारे काहीही गुन्हेगारांच्या आयुष्यात घडत नाही, हे पाहून हे विकृत लोक मुजोर बनतात. कसेही वागले तरी मृत्युदंड किंवा तत्सम कठोर शिक्षा होत नाही हे माहीत असल्यामुळे अशा प्रवृत्ती निर्ढावतात आणि दररोज वर्तमानपत्र उघडले की, अशी एखादी तरी घटना आपल्यासमोर येतेच.

अशा विकृतांचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या अब्रूला हात घालणार्‍यांना जशा कडक शिक्षा केल्या होत्या, तशा कडक शिक्षांची तरतूद आणि अंमलबजावणी होण्याची आज गरज आहे तरच अशा गुन्हेगारांना चाप बसेल असे वाटते. या सर्व वास्तवाचा विचार करता मुलींनी घाबरून न जाता स्वतःच्या शारीरिक आणि सर्व प्रकारच्या क्षमता वाढविणे हाच उपाय महत्त्वाचा वाटतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या वहिवाटीची आणि अंतर्गत संघर्षाची कहाणी म्हवटी

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख संवाद कौशल्य धोरण राबवण्याची  गरज !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading