🎋प्रचलित कांडी लागण पद्धत :
ऊस कांडी लागण पद्धतीने बेणे गुणन दोन कांड्यांतील अंतर कमी करून वाढविता येते. दोन डोळा कांडीचे टोकास टोक टक्कर पद्धतीने लागण केल्यास बेणे गुणन प्रमाण १:१५ पेक्षा जास्त मिळते. यामध्ये बेणे ऊसाची जाडी कमी मिळत असली तरी या बेण्याची उगवण क्षमता ८५ ते ९५ टक्यांपर्यंत मिळते.
🎋ऊस रोप लागण पद्धत :
(अ) गादीवाफा पद्धत :
यासाठी १ मीटर रुंद, १० मिटर लांबीचे वाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करताना तळाशी प्लॅस्टिक पेपर किंवा खतांच्या रिकाम्या पिशव्या अंथरून त्यावर चांगले कुजलेले शेणखत व मातीच्या मिश्रणाचा सहा इंच थर देऊन त्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची प्रक्रिया केलेल्या दोन इंचाच्या एक डोळा कांड्या १-२ इंच कांड्यांतील अंतर आणि दोन ओळींतील अंतर १ इंच याप्रमाणे ठेवून मांडणी करावी. त्यावर २ इंच मातीचा थर द्यावा. अशाप्रकारे अर्घा गुंठा क्षेत्रामध्ये एक एकराला पुरेशी रोपे तयार करता येतात.
(ब) प्लॅस्टिक प्रो ट्रे पद्धत
◆ प्लॅस्टिक ट्रे ४२ कपांचे ५६० मिमी ३६० मिमी × ७० मिमी आकार आणि ७८० मायक्रॉन जाडीचे वापरावेत.
◆ एक ट्रे भरण्यासाठी कोको पीट १.७५ किलो, शेणखत ०.५ किलो, पोयटा माती ०.५ किलो, रेती ०.२५ किलो या प्रमाणात लागते. त्यामुळे या मिश्रणाचा गोळा रोप लागण करताना फुटत नाही.
◆ साधारणतः ३०-३५ दिवसांचे रोप लागणीस योग्य असते. ही रोपे जोमाने वाढतात. फुटव्यांची संख्या जास्त मिळते.
◆ ४२ कपांच्या प्लॅस्टिक ट्रेमधील रोपांच्या मरीचे प्रमाण तुलनेने कमी असते. बेणे गुणन प्रमाण १:१५ पर्यंत निश्चितपणे मिळू शकते.
🎋रोपापासून लागवड करताना घ्यावयाची काळजी
◆रोपाचे वय ३०-३५ दिवसांचे असताना लागवड करावी. जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यास फुटव्यावर परिणाम होतो.
◆रोप लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रोपांना पाणी द्यावे.
◆रोपांची लागवड योग्य खोलीवर करावी. हलक्या प्रवाहाने पाणी द्यावे.
◆लागवड करताना ट्रेमधील मिश्रणाचा गोळा फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
◆रोप लागवडीपूर्वी वसंत ऊर्जा / बुरशीनाशक / कीटकनाशक / सूक्ष्म अन्नद्रव्य यांची रोपांवर फवारणी / आळवणी करावी.
(क) उती संवर्धित रोप लागवड पद्धत :
रोगमुक्त चांगल्या प्रतीचे बेणे निर्मिती व नवीन जातींचा प्रसार जलद करण्याकरिता हे तंत्र उपयुक्त आहे. उती संवर्धित रोपांचा वापर केल्यास पायाभूत बेणे मळ्याचे गुणन निश्चितपणे १:२५ पेक्षा जास्त मिळते.
🎋ऊस बेणे मळा कार्यक्रम यशस्वी राबवण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
◆कारखान्याच्या गाळप क्षमतेप्रमाणे हंगाम व गटनिहाय तसेच विविध जातींचा आराखडा तयार करावा.
◆आराखड्याप्रमाणे प्रथम स्तर बेण्याची हंगाम व वाणनिहाय मागणी संबंधित संस्थेकडे करावी.
◆बेणे उत्पादक शेतकऱ्यांची निवड रस्त्यालगत जमीन व पाण्याची उपलब्धता पाहून करावी.
◆योजना राबविण्यासाठी सक्षम ऊस विकास विभाग असावा.
◆बेणेमळा निरीक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षित पाहणी पथक असावे.
◆पथकाच्या शिफारशीनंतर बेणेमळातील बेणे वाटप करावे.
◆बेणे उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करून त्यांना ओळखपत्र द्यावे.
◆चांगल्या दर्जाचे बेणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची पुढील वर्षासाठी निवड करावी.
◆बेणे मळा विद्यापीठ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेल्या जातींचा असावा.
◆रोपवाटिकेसाठी बेणे हे प्रमाणित असावे.
◆एक डोळा रोप निर्मितीसाठी प्रमाणित बेणे वापरणाऱ्या रोपवाटिकेची निवड कारखाना स्तरावर करावी.
डॉ.अभिनंदन पाटील 📞९७३७२७५८२१
डॉ. गणेश पवार 📞९६६५९६२६१७
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.