May 22, 2024
Book Review of Randha Bhausaheb Mistry
मुक्त संवाद

जीवनानुभवाला समृद्ध करणारी कादंबरी रंधा

भाऊसाहेब मिस्त्री यांनी कादंबरी लेखनातून आपलं गाव, आपली माणसं, व्यवसाय कौटुंबिक जबाबदारीचे भान आणि नात्यांची, मैत्रीची असणारी गुंफण मांडत ग्रामीण भागातल्या कुटुंबातील दैनंदिन जीवनाचे यथार्थ असे वर्णन मांडलेले आहे. सामान्य, उपेक्षित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्या कौटुंबिक अशा बाबी मांडताना त्यांची असणारी सामाजिक, नैतिक बांधिलकी कादंबरीचा महत्त्वाचा असा भाग वाचकांच्या मनाला भिडणारा असाच आहे.

डॉ. मिलिंद विनायक बागुल,
अध्यक्ष.
भिमरमाई प्रतिष्ठान, जळगांव

माणसांच्या जीवन जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारे साहित्य नव समाजाच्या दिशेने वाटचाल करणारे आणि नव समाज निर्मितीसाठी उपयुक्त आणि मोलाचे असते साहित्य हे समाजाचा आरसा असतो सामाजिक जाण आणि भान जपणाऱ्यासाठी ते मोलाचे असते माणसाच्या जीवनाच्या व्यथा, त्यांच्या जगण्याची दिशा, त्यांच्या जगण्यासाठी त्याची चाललेली धडपड आणि समाजात वावरताना त्याला आलेले अनुभव हे जेव्हा साहित्यातून व्यक्त केले जातात तेव्हा त्या अनुभवांना आपलेस करणारा, स्वीकारणारा वाचक त्यात निश्चितपणे स्वतःला शोधताना दिसत असतो. समाज वास्तवाची जाण असणारी कादंबरी रंधा ज्यातून भाऊसाहेब मिस्तरी यांनी जीवनानुभव मांडला आहे या जीवनानुभवातून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे त्या त्या परिसराचे निश्चितपणे दर्शन घडते. जगण्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या चालीरीती माणसा माणसाची वृत्ती, प्रवृत्ती त्यातून घडत जाणारे व्यक्तिमत्व या साऱ्या गोष्टी एका वेगळ्या अशा उंचीवर तर कधी दोलायमान करणारे ठरतात. परंपरेने चालत आलेले व्यवसाय त्या व्यवसायातून आलेले अनुभव घडत जाणारे कुटुंब आणि घडवत जाणारी समाज व्यवस्था यातील वास्तवता भाऊसाहेब मिस्तरी यांनी रंधा कादंबरीतून मांडलेली आहे.

अण्णा सतत आपल्या कामात व्यस्त असणार व्यक्तिमत्व. शेतकऱ्यांना शेतात लागणाऱ्या अवजारांचे वर्षभर काम करण्याच्या मोबदल्यात शेतकरी अण्णा आणि कुटुंबियांना अन्नधान्य पुरवायचे यात काही शेतकरी लबाडी करायचे हा कादंबरीतला मुद्दा माणसाच्या वृत्तीचा, त्याच्या मनातली इतरांना फसवणुकीचा असणारा स्वभाव भाऊसाहेब मांडत जातात, असं असल्यावर देखील अण्णांच्या स्वभावातील त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील इमानदारी अण्णा मांडताना म्हणतात,” मी घाम गाळतो कारण माझ्याकडे येणारा शेतकरी माझ्या कामाचे मोल करतो म्हणून मला काम करताना आनंद मिळतो.” आपल्यातली इमानदारी, प्रामाणिकता आपल्या स्वतःला घडवत असते आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त करून देणारी आणि आपल्या प्रगतीची, व्यवसायाची, नोकरीची, माणुसकीची जिव्हाळ्याची वाट समृद्ध करीत असते. माणसाच्या जीवनाची वाटचाल कशी आणि कशाप्रकारे होत असते त्याच्या वाटेला आलेल्या साऱ्या गोष्टी त्याला किती कशा गोष्टी शिकवून जातात हे रंधा कादंबरीतून लेखक माडतांना जीवनाचा पटच उलगडतात. परिस्थिती जगण्याला कसा अर्थ प्राप्त करून देत असते माणसाचं माणसाशी असणारी नातं दृढ करताना अनेकदा येणारे वेगवेगळे अनुभव कादंबरीत भाऊसाहेब मिस्तरी मांडत जातात.

आपल्या जीवनातली अडथळ्यांची शर्यत पार करीत जगण्याला बळ कसं देता येईल जगण्याला सर्वार्थाने अर्थ कसा प्राप्त करून देता येईल यासाठी धडपडणारी माणसं आपल्या कुटुंब वत्सलतेचा प्रत्यय पदोपदी आणून देतात. लेखकाने कादंबरीत मांडलेला प्रसंग बापाच्या दुनियेची नव्या पिढीची समृद्ध वाट निर्माण करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांची साक्षच देत असते.

“मी खाली बसलो त्या लाकडावर अण्णांनी रंधा दोन्ही हातात धरला मीही तो रंधा धरला त्या लाकडावर आम्ही रंधा ओढत होतो त्या रंधा मधून वरती लाकडाचे गोल गोल भेंडोळे निघत होते त्या रंधाच्या तोंडात लाकडाचे भेंडोळे फसले की अण्णा मला थांब म्हणून सांगत होता. अण्णा त्या रंध्याला उलटा दुसऱ्या लाकडावर ठोकून काही हाताने त्यात अडकलेले लाकडाचे भेंडोळे बाहेर काढून त्याचे तोंड मोकळे करत होता मग पुन्हा आम्ही रंधा ओढत होतो. मी लवकर थकून जात होतो, रंधा ओढून. कुत्रा धावत आल्यावर जसा धापा टाकतो तसं मी तोंडाने श्वास घेत होतो हे बघून अण्णा मला म्हणाला,
“मोठा झाल्यावर करशील हे काम”?
” माझ्याने नाही होणार अण्णा हे काम”?
“मग काय करशील पोटासाठी”?
“मला नाही माहित अण्णा”
“एक कर शाळेत मन लावून अभ्यास कर पुढे तुला आपोआप तुझी वाट सापडत जाईल”(पृष्ट. क्र.९८)
बाप बेटातला हा संवाद अनेकदा अनेक कुटुंबातून आपणास ऐकावयास मिळत असतो. मुलांमध्ये आणि बापामध्ये असणारी एक वाक्यता फार काही अनुभवास मिळत नाही. पिढ्यांमधील वाढत जाणारे अंतर आणि काळानुरूप होत जाणारे वेगवेगळे बदल निश्चितपणे पिढीच्या बदलास कारणीभूत ठरत असतात लेखकाच्या वडिलांना आपल्या पिढी जात व्यवसायाचा वारसा मुलांनी जपला पाहिजे किंवा हे काम केल्याने मुलाच्या पोटाचा प्रश्न सुटेल अशी असणारी मानसिकता मुलाकडून काम होत नसल्याने बदलते परंतु मुलाला शिक्षणाचे महत्त्व सांगत जीवनाचे धडे गिरवण्याचा संस्कार आणि मार्गदर्शन बाप करत असल्याचा जीवनानुभव लेखक मांडतात. शिक्षणाची वाट आपल्या जगण्याला नवा विचार देत असते आपला आत्मभिमान जागृत करत असते. स्वाभिमानाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देत असते म्हणूनच वडिलांनी सांगितलेला मार्ग पत्करताना लेखक, कादंबरीकार भाऊसाहेब मिस्त्रींना कोणताही धोका वाटत नाही हे महत्त्वाचे वाटते.
सामान्य कुटुंबाची आपल्या दैनंदिन जीवनात होणारी वाटचाल खऱ्या अर्थाने कष्टप्रद अशीच असते या कष्टप्रद जीवनात उजेड पेरण्यासाठी शिक्षणाचा होणारा प्रचार, प्रसार अनेकांचे जीवनमान बदलविणारा ठरला हा बदल लेखकांच्या जीवनात देखील आला माणसांच्या जगण्याच्या दिशा शिक्षणाने कशा बदलत जातात हा विचार देखील कादंबरीच्या माध्यमातून लेखक भाऊसाहेब मिस्तरी मांडून जातात. गावगाडा आणि आपल्या जगण्याशी निगडित असणारा व्यवसाय आपल्या जीवनमानाला किती बदलविणारा ठरत असतो, संसारातले चढ-उतार आपल्या जगण्याला कसे बळ देणारे, विचार करायला लावणारे असते हे देखील कादंबरी वाचकाला लक्षात येण्या वाचून राहत नाही. तत्कालीन परिस्थितीत असणारी कुटुंब आणि आपली वाटचाल एकत्रित कुटुंब पद्धतीत करीत होती त्याचा अनुभव कथन करताना लेखक कादंबरीत लिहितात.

“आमच्या घरात खाणारी तोंड जास्ती असल्याकारणाने रोज थोडीफार भाकरी उरत होती ताई त्या भाकरीचे तुकडे एकत्र करून कुटून काढत होती त्यातील मी तिखट, कांदे, लसूण, वरून पाणी टाकून काही भाकरीचा काला तयार करून देत होती आम्ही सर्व भाऊ, ताई, अण्णा तो काला आवडीने खात होतो. अण्णा कधीकधी रेडिमेट कपडे आम्हा सर्व भावांना एकाच रंगाची, एकाच नक्षीचे घेऊन येत होता तेव्हा मात्र आम्ही सर्व बँड वाला माणसासारखे दिसत होतो. गल्लीतली मुलं बँड वाले म्हणून आम्हाला चिडवत होती तेव्हा अण्णा असे एकसारखे कपडे कशाला आणत असेल? या विचाराने अण्णांचा मला राग येत होता पण बोलत नव्हतो. ताई कधी कधी रेशन दुकानातून मिळणारी साडी विकत घेऊन येत होती अण्णा धोतर आणि सफेद शर्ट घालत होता”(पृष्ट क्रमांक१०१)

माणसांच्या जीवनातल्या जगण्यासाठीच्या तऱ्हा या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या होत्या हा जिव्हाळा, ऋणानुबंध जोडत नाती दृढ करणारा आणि जोपासणारा देखील होता. भाऊसाहेब मिस्त्री यांनी आपल्या कुटुंबातील ऋणानुबंधाच्या आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सामाजिक बाबी मांडताना, लिहिताना प्रातिनिधिक स्वरूपात तत्कालीन परिस्थिती मांडलेली आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबाचं दैनंदिन जीवन जगताना प्रतिनिधीक स्वरूपात अण्णा आणि त्याच कुटुंब कादंबरीच्या माध्यमातून मांडताना लेखक आपला जीवनानुभव मांडतात हा जीवनानुभव अनेकांच्या देखील अनेकांचा देखील असू शकतो. आपल्या ग्रामीण जीवनात जगण्याच्या दिशा ठरलेल्या असतात चाकोरिबद्ध जीवनाचा सारांशच कादंबरीत मांडला गेला आहे. भाऊसाहेब मिस्तरी आपली शिक्षणाची सुरुवात, कुटुंबाची वाटचाल एका नव्या वळणा वळणाने कशी बदलत गेली आहे ते स्पष्ट करीत कादंबरीतून मांडत जातात. मुंबईच्या शब्दांव्यय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रंधा कादंबरीचे मुखपृष्ठ नितीन खिलारे यांनी रेखाटले असून मुखपृष्ठ कादंबरी शीर्षकाच्या अनुषंगाने समर्पक आणि लेखकांच्या परंपरागत व्यवसायाचे प्रतीक असल्याचे देखील लक्षात येते. भाऊसाहेब मिस्त्री यांनी कादंबरी लेखनातून आपलं गाव, आपली माणसं, व्यवसाय कौटुंबिक जबाबदारीचे भान आणि नात्यांची, मैत्रीची असणारी गुंफण मांडत ग्रामीण भागातल्या कुटुंबातील दैनंदिन जीवनाचे यथार्थ असे वर्णन मांडलेले आहे. सामान्य, उपेक्षित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्या कौटुंबिक अशा बाबी मांडताना त्यांची असणारी सामाजिक, नैतिक बांधिलकी कादंबरीचा महत्त्वाचा असा भाग वाचकांच्या मनाला भिडणारा असाच आहे.

पुस्तकाचे नाव – ‘रंधा’
लेखक – भाऊसाहेब मिस्तरी
प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ – नितीन खिल्लारे, मूल्य – ३२१ रुपये
कादंबरीसाठी संपर्क नंबर : मो. +९१ ९३२१७७३१६३

Related posts

आध्यात्मिक तेज

संस्कृती संवर्धनासाठी अनुवाद संशोधन होणे गरजेचे – माया पंडित

महाराष्ट्रातील ‘घडवलेले’ राजकारण लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच : पृथ्वीराज चव्हाण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406