July 2, 2025
Rural women preserving biodiversity through traditional knowledge and sacred grove protection
Home » स्त्रियांनी जपलेली जैविक विविधता…
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्रियांनी जपलेली जैविक विविधता…

स्त्री आणि पर्यावरण

जैविक विविधतेचं महत्त्व, तिचं संरक्षण-संवर्धन करण्याची गरज आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशा संवर्धनाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान जगभरातल्या ग्रामीण स्त्रियांनी पिढ्यान् पिढ्या जपलं आहे. जैविक विविधता हा आपल्या जगण्याचा पाया आहे, याची जाणीव असल्यामुळे स्त्रिया आपल्या परिसरातल्या वैविध्याच्या रक्षणासाठी पुढाकारही घेतात. आपल्या देशात आणि देशाबाहेरच्या अनेक ठिकाणी स्त्रियांनीच देवराया किंवा जंगलं राखून पक्षी, प्राणी, वनस्पतींच्या अनेक प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवलं आहे.

वर्षा गजेंद्रगडकर, Mob. 9822056124
varshapune19@gmail.com

ओरिसामध्ये नयागढ नावाचा एक जिल्हा आहे. बांबू आणि साल वृक्षांच्या बरोबरीने वेगवेगळे कंद, फळं, औषधं देणाऱ्या असंख्य वनस्पतींनी इथलं जंगल समृद्ध आहे. गेली काही दशकं तस्करी आणि बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे या जंगलाला धोका निर्माण झाला होता. पण स्थानिक स्त्रियांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या वन संरक्षण समित्यांमुळे जंगलतोड आणि तस्करीला लक्षणीय आळा बसला आहे आणि त्यामुळे तिथल्या जैववैविध्याचं पुनरुज्जीवन व्हायलाही मदत होते आहे.

पारंपरिक ज्ञान आणि लोकशाही निर्णयप्रक्रियेच्या आधारे या समित्यांचं काम फक्त कोंड या स्थानिक आदिवासी समूहातल्या स्त्रियाच करतात. पूर्वी जंगल राखण्याचं काम या समूहातले पुरुष करायचे. त्या वेळी जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याचे तोटे कोंड समूहाला सोसावे लागत होते. काही पुरुषांची लाकूडतोडे आणि तस्करांशी हातमिळवणी होती. ज्यांची नव्हती त्यांच्याकडे उघड विरोध करायचं धाडस नव्हतं. त्यामुळे जंगलक्षेत्र कमी व्हायला लागलं आणि स्त्रियांना आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लागणारं सरपण, फळं, कंदमुळं आणि पाणी आणण्यासाठी आणखी पायपीट करणं भाग पडायला लागलं. जंगलाच्या ऱ्हासाचं कारण अधिकाधिक स्पष्ट दिसायला लागलं तशा जंगलाच्या आधारे जगणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या स्त्रियांनी एकमेकींना हाक दिली. जंगल वाचवण्याची आणि त्यासाठी चोवीस तास गस्त घालण्याची जबाबदारी स्त्रियांनी आपल्याकडे घेतली.

स्त्रियांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वन संरक्षण समित्या अतिशय शिस्तबद्ध रितीनं काम करतात. कामाची समान वाटणी व्हावी यासाठी एक वही ठेवून त्यात त्या त्या दिवशीची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्रियांची नावं लिहिली जातात. सकाळ उजाडली की त्या दिवशीच्या वेळापत्रकानुसार संबंधित स्त्रिया हातात काठ्या घेऊन बाहेर पडतात. ठरावीक ठिकाणी एकत्र भेटून त्या जंगलाकडे कूच करतात. प्रत्येक दिवशी गस्तीची पाळी संपली की पुढच्या पाळीच्या स्त्रियांच्या घराच्या दाराबाहेर काठी ठेवून जाण्याचा शिरस्ता आहे. काही स्त्रिया गेली जवळपास चौतीस-पस्तीस वर्षं गस्त घालण्याचं काम अविरत करताहेत.

अशा गस्तीखेरीज स्त्रियांच्या पुढाकाराखालच्या समित्यांनी काही कडक नियमही केले आहेत. सरपणासाठी जंगलातल्या फांद्या/झाडं तोडायला बंदी आहे. वन समितीच्या सदस्यांनाही फक्त जमिनीवर पडलेल्या डहाळ्या किंवा काटक्या गोळा करता येतात. घराची डागडुजी करायची असेल किंवा काही सण-उत्सव असेल तर झाड तोडण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक असतं. उन्हाळा सुरू होणार अशी चिन्हं दिसायला लागली की काडेपेटी घेऊन जंगलात जायला बंदी असते. सरधोपट नवीन झाडं लावण्यापेक्षा असलेल्या झाडांना वाढीला वाव देण्यावर या समितीचा भर आहे. त्यामुळे मुळासकट फळझाड किंवा इतर वनस्पती उपटण्याऐवजी, परत फुटवा येईल अशा पद्धतीनं झाडाचा हवा तेवढाच भाग तोडला जातो. झाडं नैसर्गिकरीत्या वाढावीत म्हणून पावसाळ्यात जंगलामध्ये पूर्ण चराईबंदी असते. जंगलात घुसखोरी करणाऱ्यांना दंड केला जातो आणि गावातल्या सगळ्या लोकांपुढे माफी मागावी लागते.

जंगल आणि जैववैविध्य रक्षण मोहिमेच्या या शिस्तीत आणखी एक विशेष बाब अंतर्भूत आहे. स्थानिक लोक ज्या छोट्या झुडपाला सियाली या नावानं ओळखतात, त्या श्वेत कांचनाचा उत्सव (सियाली उत्सव) इथल्या स्त्रिया दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला साजरा करतात. या झाडाची पानं कोंड आदिवासी पत्रावळी तयार करण्यासाठी वापरतात. घरगुती वापराखेरीज पत्रावळ्या विकणे हा कोंड स्त्रियांसाठी अर्थार्जनाचा मार्ग आहे. जंगलांचा -हास व्हायला लागला, तेव्हा या वेलवजा झुडपांची संख्या जंगलात जेमतेम बोटांवर मोजण्याइतकी कमी झाली होती. हे लक्षात आल्यावर कोंड स्त्रियांनी हा उत्सव सुरू केला. फळं फुटून जमिनीवर पडलेल्या बिया शेण आणि गोमूत्रात मिसळून मातीच्या भांड्यात साठवल्या जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे ज्येष्ठी पौर्णिमेला, सियाली उत्सवाच्या दिवशी, वनदेवतेची पूजा करून या झुडपाच्या बिया जंगलात, जलाशयांच्या आसपास लावल्या जातात. या उत्सवात सगळेच गावकरी सामील होतात.

जंगल रक्षणासाठी कोंड स्त्रियांनी उभ्या केलेल्या या यंत्रणेमुळे अन्न सुरक्षितता आणि उपजीविकेच्या प्रश्नांवर तर मार्ग निघाला आहेच, पण स्त्रियांच्या या काटेकोर देखरेखीमुळे जैविक विविधता राखली जाते आहे; याचा परिणाम म्हणून जंगल परिसंस्थांचा समतोल सांभाळला जातो आहे, आणि विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांचा जंगलातला वावर पुन्हा सुरू झाला आहे. नयागढ हा पूर्वी हत्तींचा एक आवडता आंतरमार्ग (कॉरिडॉर) होता, पण जंगल विरळ होत गेल्यामुळे त्यांचा या भागातला वावर थांबला होता. आता स्त्रियांनी जंगल समृद्ध केल्यामुळे या भागात हत्तींचा आढळ पुन्हा दिसायला लागला आहे. भारतातली बहुसंख्य राज्य सरकारं आजही स्थानिक समुदायांना वन हक्क देण्याबाबत राजी नाहीत. वस्तुतः, जंगलांवर उपजीविका अवलंबून असणाऱ्या समुदायांचे वन हक्क मान्य केले तर स्थानिक समुदायांच्या निसर्ग संवर्धनाच्या देशी पद्धतींच्या आणि पारंपरिक ज्ञानाच्या रक्षण-संवर्धन आणि प्रसाराला चालना मिळेल आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठीही त्याची मदत होईल.

समुदायाधारित वनसंवर्धनाची, विशेषतः स्त्रियांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या जंगलरक्षणाची ही लाट ओरिसा राज्याच्या संपूर्ण ग्रामीण आणि आदिवासी भागात चांगलीच पसरली आहे. गंजम जिल्ह्यातल्या कांतेइपल्ली गावातल्या शंभर स्त्रियांनीही याच पद्धतीनं गेल्या सहा वर्षांत 202 हेक्टर्सवर पसरलेलं कालीअंबा संरक्षित वनक्षेत्र वाचवलं आहे. या स्त्रियांनीही वन सुरक्षा समिती स्थापन केली आहे. काठ्या आणि निर्धार एवढी दोनच शस्त्रं सोबत घेऊन वन सुरक्षा समितीच्या या सदस्य स्त्रिया रात्रंदिवस आपल्या गावाच्या परिसरातल्या जंगलात गस्त घालतात. मुद्दाम वणवे लावून जंगल पेटवण्याचे प्रयत्नही या स्त्रियांनी हाणून पाडले. यामुळे एकेकाळी बेकायदेशीर लाकूडतोडीमुळे विरळ झालेलं हे जंगल पुन्हा बहरलं आहे. वृक्षसंवर्धनाच्या बरोबरीने शिकारीला आळा आणि वन्यजीव संरक्षण यांसाठीही या स्त्रियांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे शिकार आणि वृक्षतोडीसाठी जंगलात शिरणाऱ्या सगळ्यांनाच आता स्त्रियांच्या टेहळणीची भीती बसली आहे.

देशभरात ठिकठिकाणी स्त्रियांनी संघटित होऊन जसं आपलं पर्यावरण, जंगल वाचवलं आहे, तसं एकेकट्या स्त्रियांनीही वनं राखण्यासाठी, हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि देशी वृक्षांच्या संरक्षण-संवर्धनासाठी ठाम पाऊल उचललं आहे. अशा दोन विशेष स्त्रियांविषयी इथे सांगायलाच हवं. जमुना तुडू या झारखंडमधल्या स्त्रीनं दोन दशकं जंगल संवर्धनाचं काम करून त्याद्वारे आपल्या समुदायाला सक्षम केलं आहे आणि शाश्वत जीवनशैलीचा मार्गही दाखवला आहे.

जमुना तुडू या आज पद्मश्री सन्मानप्राप्त पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या, तरी मुळात ही झारखंडमधल्या संथाळ आदिवासी समुदायातली एक अल्पशिक्षित स्त्री. रोजचं जगणं निसर्गाशी घट्ट बांधलेलं! भौतिक गरजांपलीकडे जाऊन निसर्गावर प्रेम करण्याचा वारसा ‘त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. लग्नानंतर सरपण गोळा करण्यासाठी त्या जंगलात जायला लागल्या. त्या वेळी त्यांच्या लक्षात आलं की, अनेक कारणांसाठी जंगलातली झाडं तोडली जाताहेत. अशा प्रकारे आपण झाडं संपवली तर सगळी जंगलं लवकरच नष्ट होतील. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी जंगलरक्षण-संवर्धनासाठी पाच जणींना सोबत घेऊन वन सुरक्षा समिती स्थापन केली. जंगलाच्या अगदी गाभ्यापर्यंत जाऊन त्यांनी झाडं कापणाऱ्यांना रोखलं, समजावून सांगितलं. जंगलाचं शोषण करणाऱ्यांना शिक्षाही केली. त्यामुळेच त्या झारखंडच्या ‘लेडी टारझन’ म्हणून ओळखल्या जातात.

‘जंगलं वाचली तर माणूस वाचेल’, असा विश्वास. आपल्या गावातल्या प्रत्येकाच्या मनात जागवताना त्यांनी गावकऱ्यांना कृतीसाठीही प्रवृत्त केलं. कुटुंबात मुलीचा जन्म झाला की 18 स्थानिक झाडं लावायची आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी 10 झाडं लावायची, असा नियम करणाऱ्या जमुना तोडू यांनी मतुरखाम या आपल्या गावाचं 50 हेक्टर्सचं जंगल वाचवलं आहे. आज त्यांच्या प्रेरणेमुळे स्थापन झालेल्या जवळपास 500 वन सुरक्षा समित्यांच्या सदस्य असलेल्या 10 हजार स्त्रिया झारखंडमधल्या गावागावांतून वनरक्षणाचं काम करताहेत. हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन काठ्यांखेरीज आता धनुष्य-बाण जवळ बाळगण्यावरही भर दिला जातो. तुडू यांच्या या अथक प्रयत्नांमुळे झारखंडच्या ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये जंगलसंवर्धन ही लोकचळवळ झाली आहे.

तुलसी गौडा यांची कथा तर विलक्षण म्हणावी अशी आहे. कर्नाटकातल्या होन्नाळी या अगदी लहानशा गावातला त्यांचा जन्म ! दोन वर्षांच्या असतानाच वडील गेले. अफाट दारिद्र्यामुळे शालेय शिक्षणाला त्या मुकल्या पण परिसरातल्या निसर्गानं, विशेषतः जंगलांनी त्यांना जे अनौपचारिक शिक्षण दिलं, त्यामुळे तुलसी गौडा या वनांच्या चालत्या बोलत्या ज्ञानकोश म्हणून नावाजल्या गेल्या.

गावातल्या वनखात्याच्या रोपवाटिकेत त्यांची आई काम करायची, ते या लहान मुलीला सोबत घेऊन. त्यांचा निसर्गाशी असलेला अतूट बंध आणि जंगलांचं अपवादात्मक म्हणावं असं ज्ञान सिद्ध झालं ते त्या मातावृक्ष (मातावृक्ष – जंगलातले म्हणजे सर्वांत जुने आणि मोठे वृक्ष. हे वृक्ष इतर लहान वनस्पतींशी जोडलेले असतात आणि अतिरिक्त कार्बन आणि नायट्रोजन मुळांच्या जाळ्याद्वारे पुरवून त्यांचं संगोपन करतात.) ओळखायला लागल्या आणि वनीकरण प्रकल्पांसाठी अत्युत्तम पद्धतीनं बीजसंवर्धन करायला लागल्या तेव्हा! अनन्यसाधारण निष्ठा आणि स्वयंसिद्ध तज्ज्ञतेमुळे त्यांनी उजाड झालेल्या जमिनींवर पुन्हा जिवंत- जागत्या परिसंस्था उभ्या केल्या. सुरुवातीची 35 वर्षं, कर्नाटक राज्याच्या वनविभागात कामगार म्हणून त्या रोजंदारीवर काम करत होत्या; नंतर 15 वर्षं त्यांना याच विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळाली. या काळात त्यांनी सुमारे एक लाख झाडं लावली; आणि आपल्या पोटच्या मुलांसारखी लावलेल्या झाडांची काळजी घेतली; वन्यजीव संरक्षणाला हातभार लावला; जंगलातले वणवे रोखले. आयुष्यभर आत्यंतिक तळमळीनं केलेल्या त्यांच्या या कामामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यातल्या अभयारण्यांमधली आणि राखीव वनप्रदेशातली जैवविविधता वाचली आणि वाढली. त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला पण लोकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना दिलेला ‘वृक्षमाता’ हा सन्मान अधिक मोठा आणि सार्थ आहे, हे त्यांच्या कामाची ओळख असणारं कुणीही मान्य करेल. गेल्या वर्षी (2024) डिसेंबरमध्ये निधन होईपर्यंत त्यांचा श्वास जंगलांशीच जोडलेला होता.

आजही भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे, जंगलांच्या बरोबरीनं शेतीतल्या जैववैविध्याचं रक्षण- संवर्धनही महत्त्वाचं आहे. गेल्या चार-पाच दशकांत भारतात एक पीक पद्धतीवरचा भर वाढत गेल्याने आणि संकरित बियाणांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे वेगवेगळ्या पिकांच्या विविध स्थानिक प्रजाती दुर्मीळ होत गेल्या आहेत. याचे अनेक दुष्परिणाम दिसताहेत. एक पीक पद्धतीमुळे जमिनीचा कस कमी होणं, उत्पादनात हळूहळू घट होत जाणं, संकरित बियाणांमुळे शेतीच्या खर्चात वाढ होत जाणं, कुटुंबाला पोषक अन्न पुरेशा प्रमाणात न मिळणं, हवामान बदलाचे तडाखे सोसण्याची संकरित पिकांची क्षमता नसल्यामुळे शेती नुकसानीत जाणं, त्यामुळे अगोदर असलेली हलाखीची परिस्थिती आणखी वाईट होणं असं दुष्टचक्र चालू राहतं. यावर उपाय म्हणून देशाच्या काही भागांत स्थानिक वाणांची साठवण, संवर्धन, वापर करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था स्थानिक समुदायांना मार्गदर्शन करताहेत. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. वंदना शिवा यांची ‘नवधान्य’ ही संस्था शेतकऱ्यांना, विशेषतः स्त्रियांना बीज संवर्धनाच्या पारंपरिक पद्धती वापरण्यासाठी आणि बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करते आहे; त्यासोबत प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही करते आहे.

तेलंगण राज्यातल्या मचनूर गावाचं उदाहरणही या संदर्भात विशेष आहे. या गावातल्या शेतकरी स्त्रियांना चांगल्या दर्जाच्या बियाणांची उणीव काही वर्षांपूर्वी जाणवायला लागली. सावकाराकडून बियाणं उधार घेण्यावाचून त्यांच्यापुढे दुसरा मार्ग नव्हता. पण तेही उशिरा मिळायचं आणि त्याचाही दर्जा वाईटच. हे चक्र मोडण्यासाठी त्यांनी स्वतःचीच बियाणं वाचवून ती साठवायला आणि एकमेकींना द्यायला सुरुवात केली. यातूनच संघम सीड बँकेचा जन्म 1995 मध्ये झाला. सीड बँक तयार करण्यासाठी डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी या स्वयंसेवी संस्थेची मदत या स्त्रियांना मिळाली. जवळपास 75 गावातल्या शेतकरी स्त्रिया या उपक्रमात आज सहभागी आहेत. या बँकेत 80 प्रकारच्या अन्न पिकांच्या बिया आहेत; यात मुख्यतः भरड धान्यं, डाळी आणि तेलबिया आहेत. कोरड्या, प्रतिकूल परिस्थितीत ही पिकं तग धरू शकतात. भात आणि गव्हाच्या, कमी पाण्यात आणि वाढलेल्या तापमानातही चांगलं उत्पादन देणाऱ्या या प्रजाती आहेत. बीजवैविध्य आणि त्याच्या साठवण आणि संवर्धनाच्या पारंपरिक पद्धती यांचं ज्ञान असणाऱ्या ठिकठिकाणच्या स्त्रिया या ज्ञानाचा उपयोग करून सध्याच्या हवामान बदलांना यशस्वीरीत्या तोंड देताना दिसताहेत.

इथे अगदी ठळक, मोजक्या उदाहरणांचा उल्लेख केला असला तरी देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगभरात ठिकठिकाणी इतरही अनेक स्त्रियांनी जैववैविध्य राखण्याची आणि ते वाढवण्याची आपली ऊर्मी आणि क्षमता सिद्ध केली आहे. ब्राझीलमधल्या ग्वाजाजरा समुदायातल्या स्त्रियांनी ‘महिला योद्धे’ अशी स्वतःची ओळख सांगत, कारू क्षेत्रातलं ॲमेझोन पर्जन्यवन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपली घरंदारं सोडून या स्त्रियांनी ईशान्य ब्राझीलमधलं जंगल वाचवण्यासाठी मोहीम उघडली आहे. ही उदाहरणं स्त्रियांचा निसर्गाशी, विशेषतः जंगल आणि शेतीशी असणारा आदिबंध तर स्पष्ट करतातच, पण निसर्गाचा -हास रोखण्यासाठीची त्यांची अंगभूत अंतर्दृष्टी आणि धमकही यांतून अधोरेखित होते. शाश्वत विकासासाठी स्त्रियांना अग्रस्थानी आणण्याची नितांत आवश्यकता आहे, ते यासाठी!

( सौजन्य – साप्ताहिक साधना )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading