April 25, 2024
Home » वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

सर्व प्राणीमात्रात ही ऊर्जा आहे. त्यांच्या पोटात असणारा जठराग्निही त्याचेच रुप आहे. अन्न पचवण्याची ताकदही त्याच्यापासूनच मिळते आणि त्या अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा ही सुद्धा त्याचेच रूप आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

वायू तूं अनंता । यम तूं नियमिता ।

प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। 520।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – हे अनंता, तूं वायू आहेस व जगाचा शासन करणारा यम तूं आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नि ( जठराग्नि) तो तूं आहेस. 

विश्वरुप दर्शनात या विश्वात जेवढ्या जेवढ्या म्हणून शक्ती आहेत. त्या सर्व भगवंताच्या आहेत. त्याची निर्मितीही त्याच्यापासून झालेली आहे. वारा वाहतो. म्हणजे पवनशक्ती येथे अस्तित्वात आहे. पाऊस पडतो म्हणजे पाण्याला शक्ती आहे. ढगांचा कडकडातून विजेची निर्मिती होते म्हणजे येथेही शक्ती निर्मिती होते. ही शक्ती, ही ऊर्जा हे भगवंताचे रुप आहे. पाण्यापासून विजेची निर्मिती करता येते. ही ऊर्जा एकातून दुसऱ्यात परावर्तीत होऊ शकते. एका रुपातून दुसऱ्या रुपात त्याचे रुपांतर होते. आपणाला जीवनातही कधी कधी थकवा जाणवतो. धकाधकीच्या जीवनात आपणाला मानसिक आधाराची गरज वाटते. खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी ऊर्जा हवी हवीशी वाटते. अशा कठीण प्रसंगात एखादा मनाला प्रोत्साहित करणारा लहानसा प्रसंगही मोठी ऊर्जा देऊन जातो. यातून फिनिक्स भरारी सुद्धा घेऊ शकतो. सर्व नष्ट झालेले असतानाही त्यातून साम्राज्य उभे करू शकतो. फक्त अशा एखाद्या ऊर्जा देणाऱ्या प्रसंगाची गरज असते. ही शक्ती, ही ऊर्जा ही भगवंताचे रूप आहे हे विश्वरुपदर्शनातून स्पष्ट होत आहे.

इतकेच काय तर ती ऊर्जा आपणात सुद्धा आहे याचा बोधही त्यातून होत आहे. कारण तो या सर्व विश्वात सामावलेला आहे. सर्व शक्तीमध्ये त्याचा निवास आहे. यामुळेच भक्त प्रल्हादासाठी तो नृसिंहरुपात खांबातून प्रकट झाला. भक्त प्रल्हादासारखी आपली भक्ती असेल तर तो निश्चितच प्रकट होईल. आपली भक्ती, आपली इच्छाशक्ती त्यासाठी तिव्र असायला हवी. नृसिंह अवतार यावर अनेकजण विश्वास ठेवणार नाहीत. पण सांगण्याचा उद्देश हाच आहे की दुष्टांचा नाश करण्यासाठी ही शक्ती प्रकट होत असते. मग ती कशाच्याही रुपात असू शकते. कदाचित अनेकांना ही अतिशोक्ती वाटत असेल. विज्ञानाच्या प्रगतीने आपण हे सिद्ध करू शकत नाही. हेही तितकेच खरे आहे. पण ही शक्ती आहे ही ऊर्जा आहे हे तरी सत्य मानायला हवे. त्याची अनुभुती घ्यायला हवी.

अध्यात्मिक प्रगतीसाठी ही अनुभुती गरजेची आहे. प्रत्येक गोष्टीत भगवंताचे अस्तित्व आहे. तो प्रत्येकात आहे. याची अनुभुती यायला हवी. या शक्तीला, या ऊर्जेला नमन हे करायलाच हवे. या शक्तीच्या अनुभुतीतून अध्यात्मिक प्रगती साधायला हवी. या सर्व शक्ती या सुर्याभोवती फिरत आहेत. गृह ताऱ्यांची निर्मितीही सूर्यापासून झाली आहे असे मानले जाते. सूर्याभोवतीच त्यांचा प्रवास सुरु आहे. अखेर सर्व शक्ती ही सुर्यापासून प्रकट झाली आहे. मग ती सूर्यातच सामावणार आहे. सूर्यापासून निर्माण झालेल्या या ऊर्जेची अनुभुती घेऊन आपण अध्यात्मिक विकास हा करायला हवा. सर्व प्राणीमात्रात ही ऊर्जा आहे. त्यांच्या पोटात असणारा जठराग्निही त्याचेच रुप आहे. अन्न पचवण्याची ताकदही त्याच्यापासूनच मिळते आणि त्या अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा ही सुद्धा त्याचेच रूप आहे. या ऊर्जेची अनुभुती घेऊन त्याला वंदन करून अध्यात्मिक प्रगती साधायला हवी. आत्मज्ञानी व्हायला हवे. 

Related posts

दुसऱ्यात भगवंत पाहाणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार

मातृमंदिरतर्फे संत वाड्.मयविषयक पुरस्कारासाठी आवाहन

आत्मज्ञान प्राप्तीसाठी हवे आत्मरूपी गुरूंचे स्मरण

Leave a Comment