December 1, 2023
The word is also a spark use properly article rajendra ghorpade
Home » शब्द हीसुद्धा एक ठिणगीच
विश्वाचे आर्त

शब्द हीसुद्धा एक ठिणगीच

शब्दाने लोकांची मने भडकवताही येतात आणि लोकांची मने आनंदीही करता येतात. यासाठी वाढत्या वेगाच्या या विचाराला योग्य दिशा देण्याची गरज आहे. सोहम हा सुद्धा एक शब्द आहे. या शब्दाचे सामर्थ्य जाणून घ्यायला हवे. यासाठी योग्य शब्दाची निवड ही गरजेची आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैसी ।
तैसी नाना जीवराशीं । परेशु असे ।। १०६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यांतून उष्णता जशी एकसारखी असते, त्याप्रमाणें अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे.

पूर्वीच्याकाळी घरात पेटता विस्तव ठेवला जायचा. देवघरात नेहमीच हा अग्नी असायचा. आता काळ बदलला आहे. चुलीची गरज आता संपली आहे. गॅसच्या शेगडीने आता त्याची जागा घेतली आहे. लायटरची एक ठिणगीही आता गॅसची शेगडी प्रज्वलित करू शकते. आगपेटीचा शोध लागल्यानंतर मुख्यतः या देवघरातील धुनीची गरज संपली. विस्तवाच्या एका ठिणगीसाठी सतत लाकडे पेटत ठेवायची गरज होती. पण आगपेटी शोधाने याची गरज संपली.

मनुष्याला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याने वारंवार संशोधन करून नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले. पण मानव जसजसा प्रगत होऊ लागला तसा त्याच्या विचारात, आचारातही फरक पडत गेला. अनेक प्रश्नावर त्याने उत्तरे जरूर शोधली. पण या विकासाने त्याच्या भौतिक प्रगतीचा वेग वाढला. सातत्याने तो वाढतच चालला आहे. पूर्वी वर्षे, महिनोन्महिने भेटीगाठी होत नसत. बरीच वर्षे एखाद्याची टक लावून वाट पाहावी लागायची. प्रगती होत गेली तसा या कालावधीतही फरक पडला. महिन्याचा कालावधी दिवसांवर आला. नंतर काही तासांवर आला. पुढे काही मिनीटावर आला. आता तर तो सेकंदावर आला आहे. भेटला नाहीस ठीक आहे. पण फोनच्या माध्यमातून सेकंदात संपर्क होऊ लागला आहे.

या बदलत्या परिस्थितीत विचारही तितकाच वेगाने बदलतो आहे. विस्तवाचा एक कण सगळे जंगल भस्मसात करू शकतो. पण तोच विस्तव आपणाला चूल पेटवण्यासाठीही लागतो. गॅस पेटविण्यासाठी लायटर लागतोच ना? ठिणगीचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. काय पेटवायचे हे आपण ठरवायला हवे. विध्वंसक कृत्य करायचे की विधायक काम करायचे हे आपण विचारात घ्यायला हवे. शब्द हीसुद्धा एक ठिणगीच आहे. यासाठी याचा वापर करताना विचार करायला हवा. शब्दाने लोकांची मने भडकवताही येतात आणि लोकांची मने आनंदीही करता येतात. यासाठी वाढत्या वेगाच्या या विचाराला योग्य दिशा देण्याची गरज आहे. सोहम हा सुद्धा एक शब्द आहे. या शब्दाचे सामर्थ्य जाणून घ्यायला हवे. यासाठी योग्य शब्दाची निवड ही गरजेची आहे. विध्वंसक की विधायक, गोंगाट की शांती देणारे शब्द वापरायचे हे आपणच ठरवायला हवे.

विस्तव विध्वंसक जरी असला तरी त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी असणारी उष्णता ही समान असते. समाजामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्ती आहेत. काही चांगले आहेत. काही वाईट विचाराचे आहेत. पण या सर्वांच्या ठिकाणी असणारा आत्मा मात्र एकच आहे. तो सारखाच आहे. याचा आत्मा मोठा याचा आत्मा लहान, याचा उच्च याचा नीच असा भेदभाव येथे नाही. त्याचे तेज हे सर्वांठायी सारखेच आहे. यासाठी सर्वांच्यामध्ये तो पाहाण्याची दृष्टी ठेवायला हवी. यातून स्वतःमधील आत्मा जाणून घेऊन, त्याची अनुभुती घेऊन आत्मज्ञानी होण्यासाठी हा जन्म आहे हे विचारात घेऊन स्वधर्माचे पालन करायला हवे.

Related posts

राजर्षी शाहूंच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

किंमत…

येलीचा तोरा !!

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More