“आजकाल रस्त्या रस्त्यांवर पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या मोटारगाड्या फिरू लागल्या म्हणून बरेच मला आता विसरलेत. ‘गरज सरो वैद्य मरो’अशातली गत झाली बघा ! दोन चाकांचं वाहन फिरेल अशी कल्पना सुद्धा नव्हती कोणाला. पण प्रत्यक्षात जेव्हा फिरलं तोच माझा जन्म ! पण ते खूप दिवसांपूर्वीचं…. म्हणजेच साधारणता दोन अडीचशे वर्षांपूर्वीचं ! तसं पाहिलं तर चाकाचा शोध खूप वर्षांपूर्वी लागला परंतु दोन चाकांना एकत्र करून माझा जन्म व्हायला खूपच उशीर झाला असं म्हणावं लागेल. जन्म ठिकाण मात्र विकसित युरोपात झाला हे मात्र नक्की. त्यावेळी खूप नवल केलं सर्वांनीच माझ्या जन्माचं ! हळूहळू मग मी जगभर प्रसिद्ध होत गेले. त्या काळात लोकसंख्या जरी विरळ होती तरी मी दिसले म्हणजे मला पळताना बघायला खूप गर्दी व्हायची तेव्हा…! सारेच नवल करायचे. सुरुवातीच्या काळात मी फक्त उच्चभ्रू लोकांच्याच घरात दिसायचे परंतु हळूहळू बदल होत माझा वापर बऱ्याच अंशी जगभर वाढला आणि मी खूप जणांच्या प्रगतीची निशान बनले…!
मला आजही आठवतं जेव्हा मी नुकतीच लोकांना माहित झाले तेव्हा मी ज्याच्याकडे असायची तेव्हा त्या व्यक्तीची किंमत समाजात नक्कीच वाढायची इतका माझ्या अस्तित्वात अर्थ होता. ज्यांनी ज्यांनी प्रगती केलेली दिसते त्या प्रत्येकाच्या आयुष्यात माझं स्थान अजूनही ती व्यक्ती विसरलेली नाही. सर्वच देशांनी माझं उत्पादन सुरू केलं.जगाच्या कानाकोपऱ्यात बऱ्यापैकी माझा वापर सुरू झाला त्याप्रमाणे मी भारतात पण आले ! अन् हळूहळू इथल्या गोरगरिबांची जीवनवाहिनी कधी झाले हे मला सुद्धा कळलं नाही. बऱ्याच जणांना शिकायला थोडा त्रास झाला ! काहीजण शिकता शिकता घसरून पडले. काही एकमेकांना धडकले मात्र त्या तेव्हाच्या धडका आता जशा दोन मोटारींच्या समोरासमोर होऊन लोकं थेट मरतात अशा अजिबात नव्हत्या. थोडंफार लागायचं, कधीतरी हाडांची मोडतोड व्हायची यापेक्षा जास्त कधीच कुणाला लागलं नाही. आता मात्र माझी साथ सर्वांनी सोडली अन् रोज काही ना काही कानावर ऐकू येतं. कधी कधी तर ते ऐकून अंगावर काटेच उभे राहतात. हे सगळं झालं गुळगुळीत रस्त्यांनी अन् जोरात पळणाऱ्या गाड्यांनी ! लहान बापाचं व्हायला कुणीच तयार नाही. प्रत्येकालाच इतकी घाई झाली की बस्स. लोकांना वाटतं सगळं ‘अभी के अभी’ व्हायला पाहिजे असं करण्याच्या नादातच बरेचजण खपतात.
माझा काळ मला चांगला आठवतो. ज्यांना ज्यांना मैलो मैल रोज पायी प्रवास करायला लागायचा त्यांनी मला चालवायला शिकून घेतलं. त्यात व्यापारी, राजकारणी, विद्यार्थी असे सगळेच आले. माझ्या संगतीने व्यापारातून पुढे गेलेला अन् मला शाळा शिकताना वापरलेला असा एकही नाही की तो माझ्या बाबतीत कृतघ्नपणे वागला परंतु काळाच्या ओघात त्याचं झालं असं की, पेट्रोलवर पळणाऱ्या गाड्या आल्या अन् बऱ्याच माणसांत आळस घुसला. मला कोपऱ्यात लावून दिलं. खूप दिवस पाहिलंच नाही ! एखाद्या जायबंदी झालेल्या पेशंटचा एकेक अवयव जसा निकामी व्हावा तसं माझा एकेक पार्ट संपत गेला अन् मीसुद्धा संपले. एक दिवस असाच भंगार गोळा करणारा आला आणि नाईलाजाने बऱ्याच दिवसांपासून माझ्यामुळे गुंतून पडलेली ती कोपऱ्यातली जागा मालकाने मोकळी करून टाकली….!
तिथून निघताना मी मात्र खूप कठोर अंतकरणाने निघाले होते. मला माझा सगळा मागचा प्रवास डोळ्यापुढे दिसू लागला. मी कुणाचं काय वाकडं केलं अन् मला असे दिवस आले असं वाटू लागलं…पण भंगारवाल्या दादाला हात जोडून सांगितलं,‘दादा, मान्य आहे मला तू मला माझ्या जुन्या मालकाकडून पैसे देऊन विकत घेतलं पण माझी हात जोडून विनंती. तू काय मला तुझ्या दुकानात कायमस्वरूपी ठेवायला थोडं आणलंय? तू पण मला चार दोन दिवसात लोखंडाच्या कारखान्यावाल्याला विकशील! बरोबर ना. म्हणजे माझा कब्जेदार पुन्हा बदलणार. माझी काही हरकत नाही. पण तू मला सायकलवाल्या कंपनीवाल्याला विकलंस तर लै उपकार होतील तुझे. जमलं तर बघ तुला हात जोडते…!’ त्यानं माझं म्हणणं ऐकलं. बरेच दिवस मला विकलच नाही कुणाला. मीही तशीच त्याच्या डेपोत पडून राहिले. मध्यंतरी माझ्यासारखी एखादी दुसरी सायकल रस्त्यावर पळताना दिसायची. सायकलींचे कारखाने सुद्धा त्या काळात बंद पडले. पण हळूहळू माझं नशीब अचानक फळफळलं!!!
डॉक्टर लोकांना मी त्याबद्दल खूपच धन्यवाद देईल. बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा त्रास व्हायला सुरुवात झाली. जुन्या काळात मला वापरून किंवा शेतीच्या, अंगमेहनतीच्या कामधंद्यांमुळे लोकांचा व्यायाम व्हायचा परंतु नंतरच्या काळात तो होईना म्हणून हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले. बरेच लोकांना गुडघेदुखीचा त्रास पण सुरू झाला. अशा दोन त्रास असलेल्या पेशंटांना डॉक्टरांनी सरळ पुन्हा सकाळ संध्याकाळ सायकली चालवायचा सल्ला दिला….अन् बघता बघता व्यायामाचे निमित्ताने का होईना मला परत नवं आयुष्य मिळालं. दुसऱ्या अर्थाने पुनर्जन्मच म्हणावा लागेल माझा ! आता माझी ही चांगली सातवी आठवी पिढी म्हणावी लागेल.
मला पण नवनवीन शोध लावून गियर आलेत, कितीही पळवलं तरी माणसं थकत नाहीत. गुडघे सुद्धा दुखायचं काही काम नाही. मला पहिले दिवस येतील अन् माझी किंमत पेट्रोलवर किंवा बॅटरीवर पळणाऱ्या मोटरसायकल पेक्षासुद्धा जास्त होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं…मी दम धरून राहिले म्हणून जमलं. मध्येच जर का उतावीळपणा करून धीर सोडला असता तर मग हे इतके चांगले दिवस नसते बघायला मिळाले मला……! आत्ता माझ्याबी लक्षात आलं माझ्यामुळं बरेच पेशंट चांगले झाले ! अनेकांना चांगलं आयुष्य मिळालं.
जुन्या काळात मला वापरून केलेल्या प्रवासाने कितीतरी गरिबांचे प्रपंच चालले. पैसे पण न मोजण्या इतके वाचले असतील संपूर्ण जगाचे! म्हणतात ना आपण कुणाचं वाईट नाही केलं म्हणजे आपलं बी वाईट कसं होईल…..? हेच थोडं मनमोकळं बोलायचं होतं तुमच्याशी …आता मात्र मन एकदम हलकं हलकं झालं बघा…..”
🖊️ 🖊️ 🖊️ निवृत्ती सयाजी जोरी ,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
9423180393,
8668779597
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.