June 18, 2024
Run Cycle Movement World Cycle Day article
Home » सायकल वापरा चळवळ…
काय चाललयं अवतीभवती

सायकल वापरा चळवळ…

सायकलमुळे शरीराच्या सर्व भागाचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरूस्त राहाते. मनात आलेला राग सायकलिंगमुळे कमी होतो. मन एका कामात गुतल्यासारखे राहाते. त्यामुळे मनाचाही व्यायाम होतो. तग धरून राहण्याची, टिकाव धरण्याची क्षमता सायकल चालवण्याने वाढते. हृदय आणि फुफुस उत्तम राहाते. हात, गुडघे, कंबर, पाठीचा उत्तम व्यायाम होतो.

राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर हे लहान शहर आहे. साधारण दहा किलोमीटरचा व्यासाचा शहराचा विस्तार असू शकेल. दहा किलोमीटर म्हणजे चालत म्हणाल तर एका टोकाहून दुसऱ्या टोकाला दीड तासात सहज जाता येणे शक्‍य आहे. हेच अंतर सायकलवरून म्हणाल तर चाळीस मिनीटात गाठता येणे शक्‍य आहे. त्यामुळे सायकलचा वापर या शहरात जास्त असायला हवा होता. पण सध्यातरी तसे चित्र दिसत नाही. वाढत्या सुविधा आणि सहज उपलब्धतेमुळे नागरिक इंधनाची वाहने येथे अधिक वापरतात. प्रत्येकाच्या घरी सायकल नाही, पण दुचाकी जरूर आहे. अगदी सर्वसामान्याच्या घरीही दुचाकी पाहायला मिळते. कोणी कोणते वाहन वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण या शहरात सायकल प्रेमीही अधिक पाहायला मिळतात. हे सुद्धा तितकेच खरे आहे. इथे सायकल चालवण्याचा छंद अनेकांना आहे. लहान मुलांपासून थोरापर्यंत अनेकजण सायकल आवडीने चालवतात.

सायकल वापरा चळवळ

सायकल चालवणाऱ्यांचे गट मात्र कोल्हापुरात पाहायला मिळतात. या गटामध्ये डॉक्‍टर, इंजिनिअर, व्यावसायिकही आहेत. हा गट दरवर्षी उत्तर भारतातील विविध ठिकाणी सायकलची ट्रिप काढतो. पण सायकलचे ट्रेक करण्यासाठी नेहमी सायकल चालवण्याचा सराव असावा लागतो. तरच उत्तर भारतातील ट्रेक करणे शक्‍य होते. नियमित सरावासाठी हा गट दररोज कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी सायकलने जातो. सराव हवा तरच असे मोठे ट्रेक करणे शक्‍य होते. त्यांची ठिकाणे व वारही ठरलेले आहेत. पन्हाळा, जोतिबा, निपाणी अशी विविध ठिकाणे विविध वारी करत असतात. रोज एक ठिकाण त्यांनी निश्‍चित केलेले असते. दररोज अंदाजे 40 ते 50 किलोमीटर सायकलींग केले जाते.

ट्रेक करण्यासाठी सायकलींगचा सराव करणे, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कोल्हापूरात अनेकजणांना असे छंद आहेत. 30 ते 75 हजार रुपयांपर्यंतच्या महागड्या सायकली खरेदी करून हा सराव करणे हा तर एक व्यायामाचा भाग आहे. मग त्यात वेगळे असे वैशिष्ट्य काय आहे ? असाच प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. पण या गटामध्ये असणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या दैनदिन कामासाठीही सायकलचा वापर करतात.

सायकल चालवण्याचे फायदे

सायकल चालवण्याचे फायदे या गटास कसे झाले आहेत हे या गटातील सदस्यांकडूनच समजून घ्यायला सर्वांनाच आवडेल. त्यांचे अनुभव तर आहेतच, पण त्यापेक्षा उतारवयातही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह निश्‍चितच प्रोत्साहन देणारा आहे. या गटात साठी पार केलेले गृहस्थ आहेत आणि ते दररोज 50 किलोमीटर सायकल चालवतात. तरीही त्यांना कधीही थकवा जाणवला नाही. असे नाही की ते यापूर्वी सायकल चालवत होते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही काहींनी हा नित्यक्रम सुरू केला. तंदुरूस्त राहण्याचा अनुभव त्यांच्याकडून जरूर शिकायला हवा. सायकलमुळे शरीराच्या सर्व भागाचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरूस्त राहाते. मनात आलेला राग सायकलिंगमुळे कमी होतो. मन एका कामात गुतल्यासारखे राहाते. त्यामुळे मनाचाही व्यायाम होतो. तग धरून राहण्याची, टिकाव धरण्याची क्षमता सायकल चालवण्याने वाढते. हृदय आणि फुफुस उत्तम राहाते. हात, गुडघे, कंबर, पाठीचा उत्तम व्यायाम होतो. असे हे फायदे ऐकल्यावर सायकल चालवण्याचा मोह कोणाला होणार नाही. म्हणूनच म्हणतो आता सायकल वापरा चळवळीमध्ये आपणही सहभागी व्हा. प्रदुषण कमी करण्यासाठी, इंधनाची बचत करण्यासाठी, स्वतः तंदुरूस्त राहण्यासाठी सायकल चालवा आणि सायकल वापरा चळवळीला बळ द्या.

महाविद्यालयात नियमित सायकलने जाणारे प्राध्यापक

Related posts

जागतिक दूध उत्पादनात भारताचे 24.64 टक्के योगदान

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार

मिसेस अचीव्हर सुजाता रणसिंग चालवतात शाळा !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406