September 9, 2024
Mountain bike ride is difficult
Home » डोंगरावरची सायकल राईड अवघडच, पण….
वेब स्टोरी

डोंगरावरची सायकल राईड अवघडच, पण….

सायकल उचलुन घेऊन चढण सोपं नव्हतं. कड्यावर व उंच कातळाठिकाणी सायकल घेऊन चढण अवघड जात होतं. परंतु ध्येय मात्र अर्जुनाने धनुष्यबाणाचा माश्याच्या डोळ्यावर नेम धरल्यासारखे एकाग्र असल्याने अडथळा निर्माण होण्याचं काहीच कारण नव्हतं. जेथे तोल जाईल तेथे सायकल सोडून द्यायची व घेतलेल्या जोखमीपासून प्रथम सुरक्षित रहायचं ही खुणगाठ मनाशी पक्कीच बांधलेली होती.

तुम्ही ठरवलं तर कुठलीही अशक्य गोष्ट सहज शक्य करून दाखवू शकता पण त्यासाठी तुमच्या अंगी ध्येय, जिद्द, चिकाटी, संयम, आवड आणि परिश्रम करण्याची तयारी अंत: करणातून असायला हवी. २०२१ मध्ये नवीन सायकल घेऊन अगदी तीन महिन्यांतच जुन्नर तालुक्यातील अनेक डोंगर माथ्यावर सायकल राईड करत मी गवसणी घातली होती. यातील सायकल राईडचे दोन मार्ग मात्र नेहमीच माझ्या लक्षात राहीले.

अनेक डोंगर माथ्यावर सायकल राईड केली खरी पण एकाही राईडला मात्र सोबती कधीच घेतला नाही याचं खास कारण होतं की संगतीची सवय लागायला नको व आलेल्या आव्हानांना सामोरे एकटं कसं जायचं ? हे जर का आपण शिकलो तर पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो व ती पुर्ण करण्याची कला हस्तगत करून यशस्वी होऊ शकतो.

हटकेश्वर डोंगर रांगेवर सायकल राईड करताना खूप काही शिकायला मिळालं. गोद्रे गावच्या उतळेवाडीतून अगदी हटकेश्वर माथ्यापर्यंत सायकल उचलुनच घेऊन जायची होती. पाठीवर बॅग त्यामध्ये फस्टेड, पाण्याच्या चार बाटल्या, नाष्टा व जेवण, हवा पंप, पंक्चर सामान व स्पॅनर कीट घेऊन ही सफर सुरू झाली होती. हटकेश्वर मंदिर, हटकेश्वर नैसर्गिक पुल यांना गवसणी घालून लेण्याद्री डोंगर माथा गाठून लेण्याद्रीला उतरायचं होतं. खरेतर लांबचा व खडतर प्रवास होता.

सायकल उचलुन घेऊन चढण सोपं नव्हतं. कड्यावर व उंच कातळाठिकाणी सायकल घेऊन चढण अवघड जात होतं. परंतु ध्येय मात्र अर्जुनाने धनुष्यबाणाचा माश्याच्या डोळ्यावर नेम धरल्यासारखे एकाग्र असल्याने अडथळा निर्माण होण्याचं काहीच कारण नव्हतं. जेथे तोल जाईल तेथे सायकल सोडून द्यायची व घेतलेल्या जोखमीपासून प्रथम सुरक्षित रहायचं ही खुणगाठ मनाशी पक्कीच बांधलेली होती. अगदी हटकेश्वर नैसर्गिक पुलावर सायकल तेवढ्याच ध्येयाने पोहचवत माघारी फिरत लेण्याद्री गाठली ती पण अगदी सूरक्षित. जवळपास या राईडमध्ये सायकल १६ कि.मी खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागला होता.

दुसरं ध्येय ठरलं होतं ते म्हणजे सोमतवाडीपासून डोंगर माथ्यावर सायकल घेऊन चढायची व थेट आपटाळे समोर असलेल्या डोंगर माथ्यावरून खाली उतरावयाची. जवळपास ९ कि.मी हा डोंगर माथ्यावरचा प्रवास असणार होता. खरेतर हा फार लांबचा पल्ला होता. अनेक ठिकाणी डोंगर माथा वरखाली करावा लागणार होता. सायकल घेऊन चढण व उतरणं तेवढं जिकिरीचं होतं. या राईडला मात्र कस लागणार होता. राईडला बेजवाटेच्या आगोदर डाव्या बाजूने सोमतवाडी डोंगर चढायला सुरुवात केली होती. हटकेश्वरमध्ये आलेल्या अनुभवांच्या शिदोरीमुळे एवढी काळजी नव्हती. अती शहाणपणा मात्र करायचा नाही एवढे एकच ध्येय घेऊन चालू लागलो होतो.

पहीला डोंगर माथा गाठला होता. सोमतवाडी डोंगर माथ्यावरुन आता प्रवास वनदेव डोंगर माथ्यावर व तेथून पुढे चालू झाला होता. खरेतर येथून सायकल उचलुन कडा उतरणं एवढं सोपं नव्हतं. हटकेश्वरला जो अनुभव आला नव्हता तो आता येणार होता. उतरताना सायकलचे पाठीमागे कड्याला कधी टच होईल व अचानक तोल कधी पुढे जाईल सांगणे फार कठीण होतं. सायकलच चाक खाली टेकताच ते अचानक किती जोरात पुढे फिरून जाईल सांगणे कठीण होतं. येथे सर्व एकाग्रतेचा कस लागला होता.

एकाच वेळी सायकलची पाठीमागील बाजू, पाठीमागील कडा, पुढे टाकावे लागणार पाऊल, अतिशय सांभाळून सगळं जपून करावं लागतं होतं. अचानकच काही प्रसंग ओढवलाच तर सोबत कुणीच नव्हतं त्यामुळे सगळं काही सुरक्षित उपाय व सावधगिरीने चालू होते. येथे वेळ जास्त गेला तरी हरकत नाही हा फॉर्म्युला कामाला येणार होता. सर्व काही सुरक्षित उपाय घेऊन खिंडीत पोहचलो होतो. सर्वात अवघड असलेल्या कातळ उतराईचा टप्पा या राईडमधील पार झाला होता.

स्वतःचा व सायकलचा बॅलन्स कसा साधावा ते येथे शिकायला मिळाले होते ते पण सुरक्षितता घेऊन.
खिंडीतून पुन्हा चढाई सुरु झाली होती. पुढे एक छोटीशी लिंगी दिसून आली. या लिंगीवर सायकल कशी चढवली जाऊ शकते ? हा प्रश्न पडला. चला ही पण शिकवण पुढे कामाला येईल ? असे समजून येथे थोडावेळ लिंगीवर सायकल चढवायचे ट्रेनिंग शक्कल लढवून पुर्ण केले. खरेतर हटकेश्वर वर जेवढा त्रास झाला नाही एवढा त्रास या राईड दरम्यान झाला. कारण पुढे सायकल माथ्यावर घेऊन जाताना अनेक अवघड टप्पे पार करावे लागले व त्यातून खूप काही शिकायला मिळालं. पुढे पश्चिमेकडून सायकल घेऊन उतराई करत ध्येय साकार झालं होतं.

खरेतर डोंगर माथ्यावर सायकल प्रवास फार म्हणजे फारच अवघड व जोखीमभरा वाटला. प्रत्येक वेळी आपलं लक्ष विचलित होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चढाई पेक्षा सायकल घेऊन उतराई अवघड आहे कारण चढाई दरम्यान पडलो तर एवढं नुकसान शरीराचं होणार नाही जेवढं उतरताना पडलो तर होईल. अतिशय सुरक्षितता घेऊनच डोंगर माथ्यावर सायकल राईड केली पाहिजे. यातुन एवढे मात्र शिकायला मिळते की जर तुम्ही एकाग्रतेने एखादे कार्य केले तर विजयला गवसणी घालणे फार सोपं आहे.

जयहिंद


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

इचलकरंजी आपटे वाचन मंदिरचे साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

नागपुरातील मारबत – बडग्या महोत्सव : आख्यायिका आणि वास्तविकता

अभिमानाला धक्का न लागता करावं लागेल जोडण्याचं काम – अभय फिरोदिया

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading