January 20, 2026
Chhaya Koregaonkar addressing an audience on women empowerment and Ambedkarite ideology in Maharashtra
Home » शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करणारी छाया
मुक्त संवाद

शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करणारी छाया

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ७
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज छाया कोरेगांवकर यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

समाजात काही मोठ्या झालेल्या महिलांचे आयुष्य आपण पाहातो तेव्हा त्या अतिशय संघर्षातून पुढे आलेल्या दिसतात. कित्येकदा तो संघर्ष हा कौटुंबिक वा वैचारिक असलेला दिसतो. पण अशा अनेक महिला आज पुढे येत आहेत, आपले आयुष्य आनंदी, समाधानी करत समाजासाठी देत आहेत. मनातील अनेक दुखरे कोपरे सांधत इतर महिलांचे दुःख व समस्या सोडवण्यासाठी त्या वेळ व श्रम देत आहेत. त्यांपैकीच मुंबईस्थित छाया कोरेगांवकर.

छायाताईंचा माझा परिचय कर्जत येथे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनानिमित्ताने झाला. त्या संमेलनाच्या अध्यक्ष व मी उद्घाटक. कोणीतरी स्त्री इतर महिलांसाठी काम करते म्हटलं की मी त्या व्यक्तीचा परिचय करून घेते त्याप्रमाणे मी ताईंचा नंबर घेऊन परिचय वाढवला. ताईंनी महिलांच्या समस्यांवर बरेच काम केले आहे.

ताईंनी दलित कुटुंबात जन्म घेतल्यामुळे जातीयतेचे चटके बालपणापासून सोसले आहेत. ताईंचा जन्म कोरेगावला व शालेय शिक्षण मुंबईला जुनी अकरावी झाले होते. वडील शासकीय अधिकारी असल्याने ते शिक्षणासाठी आग्रही होते. त्यामुळे घरची परिस्थिती अनुकूल होती. आर्थिक विवंचना नव्हती. परंतु वडील उच्चशिक्षित असले तरीही परिवर्तनवादी चळवळ व डॅा. बाबासाहेब आंबेडकर या नावापासून दूर ठेवण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे जाती संबंधी न्यूनगंडांची भावना एक व्यक्ती म्हणून ताईंच्या मनात होती.

अशातच ताईंचे लग्न अतिशय कोवळ्या वयात वडीलांनी करून दिले. पण ते लग्न यशस्वी झाले नाही. ताई वर्षाचे मूल घेऊन सासर सोडून माहेरी परतल्या. वडीलांनी भक्कम आधार दिला. आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली व ताई १९८३ मधे मराठी विषयासह पदवी परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. ताईंचे पूर्ण शिक्षण मुंबईत रूईया कॅालेजमध्ये लग्न अयशस्वी झाल्यानंतर झाले. त्यानंतर स्वतःच्या हिंमतीवर ताईंनी बॅंकेत नोकरी मिळवली. नोकरी, मुलाचे संगोपन आणि सामाजिक कामाची आवड असल्याने ते काम करत ताईंनी वयाची चाळीशी गाठली. ताईंनी एकूण ३७ वर्ष बँकेत नोकरी केली. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ ताई साहित्यिक व सामाजिक कामात गुंतल्या आहेत.

सामाजिक काम कसे व कोणासोबत करावे याला योग्य दिशा मिळणे आवश्यक असते पण तेव्हा ताईंना निश्चित दिशा सापडली नाही. त्यामुळे त्या उजव्या विचारसरणीच्या गोतावळ्यात घुटमळत राहिल्या. त्यांनी प्रथम विवेकानंद केंद्र, साने गुरुजी कथामाला, राष्ट्र सेवादल यांच्याबरोबर त्यांनी जोडून घेतले. परंतु सुमारे २००० साली आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची भेट झाली, त्यातीलच एक जोडीदार मिळाला आणि आयुष्याचा कोन १८० अंशात बदलला असे ताई म्हणतात. ‘वैचारिक संवादामुळे स्वतःची खरी ओळख पटली. A for Ambedkar आणि B for Buddha या नव्या अध्यायाने आयुष्याला कलाटणी मिळाली. साहित्य निर्मितीला वेग आला. विचाराला धार आली. कथा, कादंबरी, कविता याशिवाय सामाजिक विषयांवरच्या लेखनाकडे वळले. लेखनप्रवास आत्मनिष्ठेकडून समष्टीकडे होऊ लागला.’ असे ताई आज आत्मविश्वासाने व आनंदाने सांगत होत्या.

दूरदर्शन, काव्य संमेलनातून कविता वाचन, ‘बाईकडून बाईकडे’ या स्वरचित कवितेच्या कार्यक्रमातून महिला आत्मभान जागृतीचे प्रयत्न ताई करत आहेत. सहाव्या बोटाचा हिरवा कोंब १५०, आकांत प्रिय माझा, एक अवकाश माझंही हे काव्यसंग्रह व रिक्त विरक्त कादंबरी, गर्भार क्षणाच्या गोष्टी हा कथा संग्रह प्रकाशित आहे. ताईंच्या कथा व कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार तसेच कोकण मराठी साहित्य संमेलन, सूर्यकांता पोटे, राजर्षी शाहू साहित्य गौरव, इ. पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

व्यक्तिगत आयुष्यात काही वर्ष ताईंनी एकल महिलेचे आयुष्य अनुभवले परंतु तेव्हाही जो काही संघर्ष वाट्याला आला त्यातून खचून न जाता आपल्यासारख्या एकल, कष्टकरी आणि शोषित महिला व त्यांच्या समस्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. त्यांच्यासाठी संगमनेर येथे ग्रामीण महिलांचे प्रश्न, त्यांची बचतगट बांधणी व मार्गदर्शन, महिला संघटन व सक्षमीकरण, वस्ती पातळीवर जाणीव जागृती अशा कामात ताईंनी स्वतःला झोकून दिले.

लेखन, वाचनाने ताईंचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. त्या ज्या मातंग समाजात वाढल्या तेथील वैचारिक दारिद्र्य, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या गोष्टींनी ताई अस्वस्थ होत्या. तेव्हा जमेल तसे त्यांनी त्यांच्या समाजात शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. यामुळे ताईंनी स्वतःचे नाव व स्थान निर्माण केले. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने ताईंना नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रमुख वक्ता म्हणून बोलायची संधी मिळाली. ताईंची वैचारिक भूमिका लोकाभिमुख झाल्याने मुक्ता साळवे साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन अशा संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळाला. या मान सन्मान व संधीचा फायदा घेऊन ताईंनी त्यांच्या समाजात डॅा. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे महत्व पटवून देणे सुरु केले.

छायाताईंचा प्रवास म्हणजे एका पारंपारिक, धार्मिक रूढी- परंपरा असलेल्या घरातून पुरोगामीत्वाकडे जाणारा प्रवास हा अचंबित करणारा आहे. अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग

विसाव्या शतकातील मराठासमाज : मौल्यवान अन्वयार्थक दस्तऐवज

अजय कांडर लिखित ‘कळत्या न कळत्या वयात’ नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर व्हावेत

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading