📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 21, 2026
मुक्त संवाद

‘दयवाराचे दिवस’ : मनाच्या तळाशी साठलेल्या आठवणींचा हळुवार गंध!

‘दयवाराचे दिवस’ या रवींद्र हिरा शिवाजी गुरव यांच्या लेखातून ग्रामीण जीवन, धुक्याची मोहक दुनिया, बालपणीच्या आठवणी, निसर्गाचा गंध आणि सुख-दुःखांच्या भावविश्वाचा हळुवार अनुभव घ्या.

तळ ढवळून

निसर्गाच्या कुशीत दवबिंदू होऊन विसावलेलं ‘दयवार’ म्हणजे केवळ धुकं नव्हे, तर बालपणीच्या आठवणी, सुख-दुःखांच्या संवेदना आणि मातीशी जोडलेल्या नात्यांचा हळुवार पट! रवींद्र हिरा शिवाजी गुरव यांनी ग्रामीण बोलीतून उलगडलेले ‘दयवाराचे दिवस’ मनाच्या तळाशी साठलेल्या आठवणींना अलगद स्पर्श करतात.

हे काय? ‘दयवार’ दाट पडलंय नव्हं बो! झाडा-बेलींवर नटून पाणी होऊन बसलंय. हेचीच गाठ घ्याव रवी रथाची चौखूर उधळलेली किरणं दूत होऊन आल्यात. तवर हे नाहीनपत झालंय नव्हं कुठंतरी! आळवावरच्या पानावर ते त्या तिकडं दडून मोती होऊन बसलंय. ‘इथंच हाय खरं गावंना झालंय.’ ‘हाय – हाय. दिसालं – दिसालं!’ म्हणीस तवर चिमटीतबी गावंना की. मुठी-फशात तर दांडगच लांब. कसं धरावं या भोतीभोरच्या दयवाराला ? गावात घरा-घरांवर फतकाल मारून बसलंय. चुलीच्या धुरासंगं वर सरकत एकजीव झालंय. तिथनं म्होरं शेतवडीतबी सराकलंय. बाटंबरच्या पेंडीतनं पाय वलं करीत. हारभुऱ्याची भाजी खुडतान तर थंडीन फुटलेल्या हाता-पायांना झोंबालंय. आंबंसकट भांडं, शिबडं, थाबडं, कुरकू, बुट्टी आणि धडप्यात येतंय म्हणता – म्हणता नुसतं पळतंयच हिकडनं तिकडं नि तिकडनं हिकडं की वो! हुदुड्या घालत. म्होरं होऊन पिकावर तसंच डुलतंय. डोंगर गाठता-गाठता आभाळालाच हात टेकाय जाऊन लख्ख मोकळंढाकळं व्हतंय.

सुख-दुःखबी असंच आसतंया की मनभर पसारलेलं, तरीबी ते कवा गावतंय तर कवाबवा गावतच नाही. मुलखातनं वातोर झालेले मनाच्या तळातले मन कणगीत साठवलेले हेच ते ‘दयवाराचे दिवस’ मनातनं कवा न तुटणारं मऊमुलायम, गुलजार असं हे दयवारच. तेलाच मन चिमटीत, मुठी-फशात आचूती धरण्याचा ह्यो खुळाकावरा प्रपंच. त्यो प्रत्येकात दडून बसलेला. आपलासा वाटणारा. सजीव निर्जीवात. चराचरात. जो तो ज्याच्या- त्याच्या कलानं यात सामील होणारा. शेतात पिकांवर नाना रोगाच्या धाडी. शेतकरी आतबट्यात. घर ढांकाला दयवार न्हेतं निसतरून कसं पडत असेल आणि दिसंनासं व्हईत असंल द्योबी एक यक्ष प्रश्नच तरी हे गावागावंड्यातील बालमनाचा दोस्तच की. पिकाला आंघूळ घालीत एक एकाच्या नावानं, सोताबी ती करून येणारं.

सुख दुःखाशी एकजीव झालेलं हे ‘दयवार’ उभ्या जन्माव आडवं पसारलंय. कधी पांगत. कवा दाटधमाक होत; तर कधीकधी, आधीमधी, कवाबवा फाकत. पिवळीधमाक सोनेरी किरणं दावत, बळ देत, दिशा दावीत खुणवीत पुढं निघालंय तेच्याच बोटानं बेतानं तेचं ते.

ते तिकडं बारा मुलखाव एक जन्मगाव आणि हे दुसरं हिकडं बारा कोसाब पोशिंदा भाकरीचं गाव सांगीत. जिव्हाळा साकव सांधित. तिथनं हिथंपतरचे जन्माच्या येतायेतीतले, यापातले हे ‘दयवाराचे दिवस. ‘ पाचवडे, वेदगंगा, पंचगंगेच्या काठावरनं अभेद्य सह्याद्री येंगून, नंदनवन स्वर्ग सुखी कोकण वलांडून अरबी समुद्राच्या ओढीसरशी सातासमुद्रापार निघालेलं. तेबी तुटायचं नाव न घीत. माघारी न वळता. जिकडं पुढा तिकडं मुलूख थोडा करीत. एखादी हाळी कानात घीत रानात सोडीत. चिरस्मरणीय ते त्याचेच दिवस होऊन, अथांग पोकळीत घुसून, चातक वाचक हुडकीत पुढं सरकत.

रवींद्र हिरा शिवाजी गुरव

दयवाराचे दिवस

हवेत आणि माणसात आर्द्रता राहिली नाही, असा हा काळ! आपल्या आजूबाजूला जे चाललं आहे, ते रोखता येत नाही. निमुटपणे सोसता येत नाही आणि या जगण्याच्या प्रवाहातून बाहेरही पडता येत नाही, अशी स्थिती सर्वसामान्य माणसांची झालेली. अशावेळी काळाचे, आठवणींचे अनेक तुकडे मनात गच्च भरून राहतात. या आठवणींना पहाटे न कळत पसरलेल्या दहिवरासारखा एक अंगभूत ओलावा असतो. हा सहसा हातात न पकडता येणारा ओलावा 'दयवाराचे दिवस' या रवींद्र गुरव यांच्या ललितलेखांच्या पुस्तकातून शब्दबद्ध झालेला दिसतो. कोकणातलं गाव, तिथला निसर्ग, माणसं, त्यांचा संघर्ष यांची शब्दचित्रे या ललित लेखांमधून साकारली आहेत.

‘कोकणातलं घर’, ‘मुराळी', राजकारण नावाचा औषध नसलेला रोग जडलेलं ‘गाव’, ‘लेझीम - हालगी', 'आठवडी बाजार', 'कर तोडली', 'शिमगा' अशा ललितबंधांमधून रवींद्र गुरव यांनी कोकणाचं सांस्कृतिक वर्तमान चित्रित केलं आहे. गावातली माणसं शहराकडे निघाली आणि शहरच गावात घुसू लागलं. त्यामुळे गावपण हरवत निघालेल्या वस्त्या जागोजाग तयार झाल्या आहेत. लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर, “गावात सर्रास गरजा पूर्ण होणं जड जाऊ लागलं तेव्हा कुणब्याच्या पोरानं, कुणब्यानं गाव सोडलं. मोजक्या कपड्यांनिशी आयुष्य पिशवीत, ड्रंकेत किंवा वळकटीत कोंबत गाव डोळ्यांत साठवत आजही हे जाणं सुरू आहे.” आणि तरीही पर्यावरणासह, इथल्या किडा - मुंगी-सापासह सगळं जपलं पाहिजे, असं वाटणारा हा लेखक आहे. याशिवाय जगण्यातले अनेक अनुभव या ललितबंधांमधून विखुरले आहेत. ‘पाचवीला पूजलेलं दिव्यांग असणं, ‘जातीसाठी माती', ‘गुरुकिल्ली' आणि ‘अंदाजपंचे धागुदरशे' तील हरवल्या मानधनाचा शोध अशा अनेक घटनांना चिंतनाची डूब मिळाली आहे. अनेक संकटं झेलत 'मरणाला दावं लावीन', म्हणणारा बाप आय.सी.यू.मधून परत येतो, तर दुसऱ्या बाजूला कुणी जगण्याची लढाई हरून आत्महत्येचा पर्याय निवडतो. यादरम्यान असणाऱ्या जगण्याचे असंख्य संदर्भ रवींद्र गुरव यांच्या ललितबंधामधून आलेले दिसतात. नवे आशयविश्व घेऊन आलेल्या या पुस्तकाचे मनस्वी स्वागत !

डॉ. श्यामसुंदर मिरजकर

Related posts

विकारांना जिंकले तर खरा संन्यास

गेले ते मैत्रीचे क्षण, छे !…

सुहासिनी योगा – महिला दिन विशेष

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406