September 17, 2024
Book review of Khurap by Ramesh Salunkhe
Home » खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख

‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न सुचिता घोरपडे यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या कथासंग्रहात मांडल्या आहेत.

रमेश साळुंखे

मराठी ग्रामीण कथेत आपल्या पहिल्याच कथासंग्रहाद्वारे आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख सुचिता घोरपडे यांनी निर्माण केली आहे. ‘खुरपं’ हा त्यांचा प्रकाशित झालेला कथासंग्रह. या कथासंग्रहातून लेखिकेने दहा कथा प्रकाशित केल्या आहेत. या कथासंग्रहाद्वारे त्यांनी २०१० नंतरचे बदलते ग्रामवास्तव नेमकेपणाने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सर्वसामान्यपणे मराठी ग्रामीण कथांचे स्वरूप पाहता ती प्राधान्याने आरंभापासूनच पुरुषकेंद्रित राहिलेली आहे. ग्रामीण स्त्री लेखिकांचे प्रमाण हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगेच आहे.

महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळी नंतर ग्रामीण भागातल्या स्त्रियाही शिक्षण घेऊ लागल्या, त्यातल्या काही नंतरच्या कालखंडामध्ये नोकरी, उद्योग-व्यवसायही मोठ्या प्रमाणात करु लागल्या. पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रांमध्ये ग्रामीण स्त्रियांचा वावर वाढला. हे खरे असले तरी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण स्त्रिया आजही शोषिकतेने जगताना दिसत आहेत. त्यांच्या वाट्याला आलेले भोग कमी होताना दिसत नाहीत. प्रसंगी आधुनिक-उत्तराधुनिक समजल्या जाणाऱ्या आजच्या कालखंडातही स्त्रियांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये पुरेशी प्रगती झाल्याचे चित्र दिसत नाही. चूल आणि मूल या मानसिकतेत फारसा बदल झाल्याचे चित्र दिसत नाही. ही मानसिकता बदलणे आवश्यकच आहे; आणि त्यात बदल स्त्रीच समर्थपणे करू शकते. म्हणून ग्रामीण स्त्रियांनीच आपले जगणे भोगणे साहित्यादी प्रांतांमधून व्यक्त करणे आवश्यक आहे. कारण स्त्रियांचे जगणे वास्तवदर्शीपणाने केवळ स्त्रीच मांडू शकते. असा बदल मराठी ग्रामीण कथेत अल्पांशाने का होईना पण तो दिसतो आहे. सुचिता घोरपडे यांच्यासारख्या लेखिका कथा, कविता, कादंबरी अशा वाङ्मप्रकारांमध्ये अपवादादाखल का होईना स्त्री लेखिका ग्रामीण स्त्रियांचे जगणे-भोगणे आजकाल यथार्थपणे मांडताना दिसत आहेत.

ग्रामीण कथांचा लेखक पुरुष असल्याने साहजिकच ग्रामीण कथेतले जगही अधिकपणाने पुरुषकेंद्रित राहिलेले आहे. स्त्रियांचे जगणे मराठी ग्रामीण कथा, कविता, कादंबऱ्यांमधून जरी आलेले असले तरी ग्रामीण स्त्री लेखिकांनी ग्रामीण स्त्रीचे जीवनचित्रण अल्पांशाने केले आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. पुरुष लेखकांनी अशा ग्रामीण कथां-कादंबऱ्यांमधूनही स्त्रियांचे भावविश्व अपवाद वगळता अत्यंत कमी प्रमाणात रेखाटले आहे. तेही अधिकांशाने सवंगतेच्या, हिणकसपणाच्या, टिंगलटवाळीच्या पातळीवर जाणारे आहे.

पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली ग्रामीण स्त्री देखिल कमी प्रमाणात का होईना शिकली सवरलेली असली; तरी ती तिचे स्वत:चे दुखणे-खुपणे रेखाटताना-शब्दबद्ध करताना दिसत नाही. याचा अर्थ असा नव्हे की तिला स्वभान आणि समाजभान आलेले नव्हते. स्वत:बरोबरच ती समाजाचाही विचार निश्चितच करत होती. पुरुषी जोखड, संकोच, सहनशीलता-दु:ख हेच प्रारब्ध मानणे, जग काय म्हणेल अशा दुष्टचक्रातून ती बाहेर पडली नाही. सबब ती पुरेशा प्रमाणात साहित्यादी प्रांतातून अभिव्यक्त होऊ शकली नाही. सुचिता घोरपडे यांनी मात्र ग्रामीण समान जीवन गांभिर्यानं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्व आणि समाजमनाची खदखद व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या कथासंग्रहात मांडल्या आहेत. अशी दु:खाने गदगदलेली व्यक्तिमत्वे आपणास या कथासंगहात जागोजागी भेटत राहतात.

१९९० नंतर एकूणच जगभर खूप मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदि क्षेत्रात प्रचंड उलथापालथी झाल्या. भांडवलदारी व्यवस्थेच्या टाचेखाली सर्वसामान्य माणूस भरडला जाऊ लागला. माणूसकी, संवेदनशीलता, मानवी मूल्ये यांचा झपाट्याने लोप होऊन माणसाला केवळ बाजारू मूल्य प्राप्त होऊ लागले. अशा जागतिक वातावरणाची कृष्णछाया ग्रामजीवनावरही पडणे अपरिहार्य होते. ग्रामीण जीवनही बाजारू संस्कृतीला हकनाक बळी पडू लागले. शोषणाचे नवे मार्ग निघाले आणि राजरोसपणे ते समाजाचा भाग बनले. सारा ग्रामीण समाजच सार्वत्रिक शोषणाच्या बळी पडू लागला. आपल्या जगण्याचे कुणीतरी क्रूरपणे शोषण करते आहे. याचाचा पत्ता न लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. जगाने पैशाच्या हव्यासापायी माणसांचे शोषण सुरू केले आणि माणसाने या ना त्या नात्याने स्त्रियांचे शोषण विविध पातळ्यांवर बिनबोभाट सुरू केले. मानसिक, भावनिक आणि शारीरिक पातळ्यांवर केवळ ग्रामजीवनातलीच नव्हे; तर शहरा-महानगरांमधील स्त्रीही या नव्या शोषणाला बळी पडली जाऊ लागली. तुलनेने शहरी अथवा महानगरीय स्त्रियांचे शोषण आपल्या साहित्यात पुरेश्या प्रमाणात आले आहे. पण ग्रामजीवनातल्या सर्वच पातळ्यांवर उपेक्षित ठरलेल्या स्त्री चित्रणाची काहीशी उणीव जी निर्माण झालेली होती; ती सुचिता घोरपडे यांनी भरून काढली आहे, यात शंकाच नाही.

 खाऊजा संस्कृतीच्या स्थिरावलेपणामुळे दिशाहीन संस्कृतीने माणसाचे पुरते जगणेच बदलून गेले. टोकाची सुखासीनता आणि टोकाचे उपरेपण या दोहोमध्येच सारा समाज हेलकावे खात राहिला. अर्थातच ग्रामीण परिसरही यातून सुटणे शक्य नव्हते. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील स्त्रियांमध्येही नवी मॉर्डर्निटी आली. आधुनिक समाजमाध्यमांचा परिचयही शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना अनायासे झाला. अशा चटपटीत माध्यमांवर चटपटीत व्यक्त होणंही आलं. पण ग्रामीण समाजजीवन, अशा जीवनातल्या समस्या, समूहमन, व्यक्तिगत आयुष्यातले खाचखळगे गांभीर्याने मांडण्याची उर्मी आजकाल विझत चालल्याचे चित्र सार्वत्रिक दिसते आहे. अशा वातावरणात ‘खुरपं’ हा सुचिता घोडपडे यांचा कथासंग्रह प्रकाशित होणं ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

या कथासंग्रहात पहिलेपणाच्या अपरिहार्यपणे उमटणाऱ्या अनेक बाबी अर्थातच पानोपानी भेटत राहतात. तथापि माणूस, निसर्ग, शेतीसंस्कृती, समाजभान यांचे गांभीर्य आणि ते तितक्याच तरलपणे व्यक्त करण्याचे सामर्थ या कथासंग्रहातल्या अनेक कथांमधून सहज दिसून येते. या कथांचा विचार करता या संग्रहातल्या कथांना ग्रामीण स्त्री दुखाची, स्त्री वेदनेची पाश्वर्भूमी अधिकांशाने लाभल्याचे दिसून येते. या कथेतली स्त्री अर्थातच २१ व्या शतकातली आहे. आधुनिकतेचा स्पर्श गावागावातला झालेल्या वातावरणातली आहे. असे असले तरी प्राचीन काळापासून तिच्या वाट्याला पुरुषी मानसिकतेतून आलेले भोगच आहेत. या संग्रहातून पुरुषी मानसिकतेला बळी पडलेल्या अनेक स्त्रियांची कहाणी लेखिकेने सांगितली आहे.

‘अवदस’ या कथेतली सुमाक्का, ‘माचुळी’ या कथेतली कमळी, ‘येडताक’ या कथेतली गोदी, शिलाक्का, तसेच इतर कथेतल्या, चंद्री, जनाबाई, अंशी, चंद्राक्का अशा स्त्रिया या संग्रहातील कथेत भेटतात. आपली जीवनकहाणी मूकपणे सांगतात. द्रारिद्रय, दु:ख, अवहेलना, अपमान, वासनांधता निमूटपणे सहन करतात. मूल्ययुक्त जगण्याची कास ती कदापि सोडत नाहीत. ग्रामीण स्त्रियांबद्दल-तिच्या दु:खाबद्दलची सहवेदना सुचिता घोरपडे यांनी यथार्थपणे प्रकट केली आहे. तथापि या कथांमधली बहुतेक स्त्री पात्रे आहेत, ती आजची-आजच्या काळातली वाटत नाहीत. टीव्ही संस्कृतीचे आक्रमण, न संपणारे एपिसोड, अशा कार्यक्रमांचे आजच्या ग्राम वास्तवाशी दुरान्वयानेही नसलेले नाते, तरीही त्या कार्यक्रमांमधल्या वातावरणाचे आंधळे अनुकरण, लुटुपुटुची भांडणे, भानगड्या, सासुसुनेमधला बेबनाव, दुष्काळ, आत्महत्या, शेतीमालाची विस्कटलेली घडी, साखरकारखानदारी आणि त्यामुळे निर्माण झालेली ग्रामजीवनातली गुंतागुंत, बेकारी, व्यसनाधीनता असे अनंत प्रश्न ग्रामीण जीवनातले कळीचे प्रश्न बनले आहेत. अर्थातच याची सावली ग्रामीण स्त्रीवर पडणे अभिप्रेत आहे. तशी ती पडलेलीही आहे. याचे अल्पांशाने सूचन सुचिता घोरपडे यांच्या कथांमधून दिसत असले तरी हा सगळा माहोल या कथांमधून दिसत नाही. या सर्व कथा १९७० ते १९९० या कालखंडातल्या मराठी कथेशी आणि त्या कालखंडातल्या स्त्री जीवनाशी नाते सांगणाऱ्या आहेत असे वाटत राहते. अर्थात याने काही बिघडत नाही कारण आजच्या ग्रामजीवनाचा सारा आसमंत कवेत घेण्याचे-त्याचा तितकाच सार्थ आविषकार करण्याचे बळ या लेखिकेमध्ये निश्चितच आहे. कथा कोणत्याही काळातली असो तिने वास्तव जीवनाचा किती सखोलपणे वेध घेतला आहे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्या पार्श्वभूमीवर पाहता ‘खुरपं’ चे वेगळेपण निश्चितच नजरेत भरते.

या कथासंग्रहाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे लेखिकेने चितारलेले निसर्गवर्णन. सुचिता घोरपडे ग्रामजीवनात्या स्त्री दु:खाचा जो वेध घेण्याचा प्रयत्न करतात, त्याकरिता अशा प्रकारच्या निसर्गवर्णनाची पार्श्वभूमी अत्यंत जाणीवपूर्वक वापरली आहे असे दिसते. कारण निसर्गाची मनमोहकता, निसर्गाची महिन्यागणिक बदलणारी विविध रूपं, हिरवळ, पानझड, फळं, फुलं, वेली असे अनंत घटक मनाला शांतवणारे, सुखावणारे असतात. तथापि ही सारी रूपं ग्रामजीवनातल्या स्त्रीच्या वाट्याला येत नाहीत. निसर्ग आणि ग्रामीण स्त्रीचे जगणे-भोगणे तसे परस्परविरोधी असेच असते. त्यामुळे निसर्गाच्या या अशा पार्श्वभूमीवर या कथासंग्रहातील कथांना, स्त्री दु:खाच्या कहाण्यांना विलक्षण कारूण्याची धार आलेली आहे. या कथासंग्रहातले निसर्गातल्या अनेक घटकांचे उल्लेख आणि त्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेली कथारूपं वाचकांच्या मनात चित्रदर्शीपणे प्रकट होतात; असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अनेक कथांची सुरुवात सुचिता घोरपडे यांनी ग्रामीण परिसराच्या निसर्गचित्रणाने केली आहे.

‘पंचगंगेच्या काठाला कासारवाडी पसलेली व्हती. शे-दोनशे उंबरा असल्यालं गाव. गाव बी कसं अक्षी हिरव्या रंगानं चितारल्यावाणी.’ अशी सुरुवात ‘डबरणी’ या कथेची होते. या निसर्गदृश्याच्या पार्श्वभूमीवर सुचिता घोरपडे दुसऱ्याच परिच्छेदात लिहितात, “अशा कासारवाडीत अंशीचं घर व्हतं. अंशी म्हंजी वडाप ने-आण करणाऱ्या म्हादबाची लेक अनुसया. म्हादबानं चांगलं गाव-जेवण घालून चार गाव सोडून तालुक्याच्या गावात म्हंजी कागलात अंशीला दिली व्हती. ह्या आय नसलेल्या पोरीला जरा लवकरच म्हादबानं उजवून टाकली. ते म्हणत्यात नव्हं न्हाती धुती पोर अन् जीवाला घोर. तवा अंशीला ईचारायच्या भानगडीत बी म्हादबा पडला नाय.” निसर्गाच्या निष्पाप वातावरणातली ही अशी अनुसया आणि तिच्या वाट्याला आलेले दुर्दैवाचे दशावतार, अगतिक होऊन तिनं पुन्हा संसाराशी गाठ बांधण्याचा प्रयत्न करणं हे सारे पाहिले की मन खिन्न होऊन जातं. निसर्गाच्या प्रसन्न वातावरणात या कथा घडतात. प्रसन्न निसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर या कथांमध्ये आलेला आशय वाचकांच्या मनावर अधिक ठसविण्यात सुचिता घोरपडे यशस्वी झालेल्या आहेत. या संदर्भात ‘खेकडं’ या कथेचाही आवर्जून उल्लेख करता येईल.

कथेच्या निवेदनाची आणि संवादाची भाषा लेखिकेने जाणीवपूर्वक ग्रामीण बोलीभाषाच योजलेली आहे, तीही वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर बोलली जाणारी कन्नड-मराठी मिश्रित बोलीभाषेचा खूप परिणामकारक वापर सुचिता घोरपडे यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून केलेला आहे. अशा भाषेच्या वापरामुळे कथेचा आशय, विषय, पात्रे आणि संवादांनाही वैशिष्ट्यपूर्णता लाभली आहे. महादेव मोरे, राजन गवस यांच्यानंतर अशा या सीमावर्ती परिसरातल्या संवाद भाषेचा-निवेदनाच्या भाषेचा चांगला वापर पहिल्याच कथासंग्रहात सुचिता घोरपडे यांनी केला आहे. कथेच्या आशयानुरूप भाषेचा वापर करत या लेखिकेने ग्रामजीवनातले लयाला जात असलेले शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांचा भरपूर वापर या कथासंग्रहात केला आहे. ग्रामीण बोली भाषेतला लहेजा लेखिकेने खूपच चांगल्याप्रकारे या कथासंग्रहातून व्यक्त केला आहे. या भाषेच्या योजकतेमुळे कथासंग्रहातील पात्रे, वातावरण, संवादांना परिमाणकारकता लाभली आहे.

या कथांच्या लेखनात सुचिता घोरपडे यांनी अनेक कथांमध्ये ग्रामजीवनातल्या लोकगीतांचाही वापर केला आहे. आजच्या आपल्या जगण्याभोगण्यात अशा लोककथा, लोकगीतेही समाजमानसातून हद्दपार होत असताना ही लोकगीते नजरेखालून घालणे-वाचणे निश्चितच सुखावून जाणारे आहे.

अंबारीचा हत्ती ह्यो लुटला जाईना

भावाची सर माझ्या कुणाला यीना

माझं दळाण गं कोण्या वाड्यात रांधतं

गोकुळी सखा गं माझं माहेर नांदतं…

            ‘येडताक’ या कथेच्या सुरूवातीस येणार्‍या या ओळींनी मन प्रसन्न कातर होऊन जातं आणि ‘भगटायला अजून पार अवकाश व्हता. त्या अदुगरच आबणटुक शिलाक्का दळणाला उठून बसल्याली.’ अशी एखाद्या प्राचीन कथेची सुरूवात व्हावी तशी सुचिता घोरपडे या कथेची सुरूवात करतात. किंवा याच कथेत शिलाक्काच्या कानांवर

सुर्व्यासंग ईर्सा करतोय अंदार ग अंदार

उजेड त्येला गिळतो म्हणून बेजार गा बेजार

पापाच्या म्होरं पुण्याई ठरतीया भारी

अन् गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी…

            अशी वासुदेवाची साद पडते. अवदस, डबरणी, किनव्या या कथांमध्येही लेखिकेने लोकगीतांचा वापर केला आहे. प्रत्येक कथा सुट्या स्वरूपात वाचल्या की ही लोकगीते परिणामकारक वाटतात. आशयानुगामी वाटतात. पण अशा लोकगीतांचा वापराचा अट्टहास कथेच्या आशयाला साजेसा असला तरीही तो कथा वाचताना खटकतो. अशा लोकगीतांच्या वापरामुळे या कथा वास्तवापासून वास्तव जीवदर्शनापासून किंचित दूर सरकतात का? आजच्या ग्रामजीवनात अशी लोकगीते सोन्याची खाण असली तरी त्यांच्या वापर दैनंदिन समाजजीवनात हा अशाप्रकारे होतो का? गाव जागवीत येणारी वासुदेवाची स्वारी आज कुठे दिसते का? असे अनेक प्रश्न ही कथा वाचताना सहज नजरेसमोर येत जातात.

            ‘चंदीच्या डोळ्यातल्या डोहालाबी भरती आल्याली चंद्रीनं खाली वाकून बुट्टीतलं फडकं उचललं, अन् ते फडकं कानाला गुंडाळलं. परत खाली वाकून भुईला पडलेलं खुरपं उचललं अन् चंद्रीनं भांगलायला चालू केलं’, ‘चईतर आला व्हता अन् सुदामाच्या जिंदगीलाबी नवी उमेदीची पालवी फोडून गेला व्हता. जगण्याला नवं बळ देऊनश्यान गेला व्हता.’,  ‘आता आबाच्या भरल्या डोळ्यांत दूरवर दिसणार्‍या दोन छब्या पुसटहून एकच व्हत चालल्या होत्या.’, ‘वगळीत उतरून कास्या नानानं सुतळीनं बांधल्यालं टिक्कं वढून काढलं. खांद्यावर टिक्कं टाकत, पायतानाचा चार्र चार्र आवाज करीत चालायला लागला.’ असे प्रवाही निवेदन सुचिता घोरपडे आपल्या सर्वच कथांमधून करताना दिसतात. त्यामुळे घटना, प्रसंग, वातावरण वाचकांच्या नजरेसमोर चित्रदर्शीपणे तंतोतंत उभे होतात.

            एकूणच ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित सुचिता घोरपडे यांच्या कथा लक्षवेधी ठरल्या आहेत. पारंपरिक आणि आधुनिकतेच्या सीमेवर ही कथा समर्थपणे उभी आहे. दिशाहीन भरकटण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रामजीवनाचे ताणेबाणे सुचिता घोरपडे यांची कथा आश्वासकपणे भविष्यातही सातत्याने मांडेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. केवळ ग्रामीण जनजीवनावरच नव्हे तर एकूणातच साऱ्या जगासमोर सुखासमाधानाने जगण्याचेच आव्हान सर्वसामान्य माणसांपुढे उभे असताना आपल्या सर्वांसमोरच खूप सारं तणकट माजलं आहे, नांगरल्याविणा भुई अमाप पसरून राहिली आहे आणि सुचिता घोरपडे यांनी आता ‘खुरपं’ घट्ट पकडून ही अशी भांगलणी सुरू केली आहे. मग रानमाळ स्वच्छ होईल, गाई-गुरांना, पशू-पक्षांना हिरवाकंच चारा मिळेलं, झाडं झुडपं बहरून येतील; आनंदानं जगणाऱ्या माणसांचं-माणुसकीचं  गाणं ऐकू येईल एवढं मात्र निश्चित !

पुस्तकाचे नाव : खुरपं
लेखिका : सुचिता घोरपडे
प्रकाशक : आर्ष पब्लिकेशन
मुखपृष्ठ: राजू बाविस्कर
पृष्ठे :164
मूल्य : 200 रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 8788754382


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पेरणी सुक्षेत्रात हवी

खोबऱ्यास प्रति क्विंटल 10 हजार 590 रुपये किमान आधारभूत किंमत

मराठवाड्यात आठवडाभर पावसाचा जोर कमी राहणार !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading